-सुनिता कुलकर्णी

आजच्या गुरूपौर्णिमेला कुणालाही आपल्या धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, कलासक्त, क्रीडासक्त गुरूंची आठवण येऊ नये एवढे धडे करोना गुरूजींनी गेल्या तीन साडेतीन महिन्यात दिले आहेत.  त्यामुळे यंदाची गुरूपौर्णिमा करोना गुरूजींके नाम… अर्थातच त्यांनी दिलेल्या धड्यांची उजळणी करत…

धडा नंबर १- तुमच्या आयुष्यात कितीही आणि काहीही ताबडतोबीचं, महत्त्वाचं असलं तरीही एक क्षुल्लक वाटणारा विषाणू ते थांबवू शकतो.

धडा नंबर २- कोट्यवधीच्या पॅकेजच्या नोकऱ्या, मोठमोठी घरं, ब्रॅण्डेड वस्तू… थोडक्यात ‘दीवार’मधल्या अमिताभसारखं तुमच्याकडे सगळं असलं तरी तुमच्या घराजवळ ‘दोन किलोमीटर’च्या परिसरात भाजीवाला, फळंवाला, किराणावाला असणं हेच जास्त महत्त्वाचं आहे.

धडा नंबर ३ – सुखरूप जगायचं असेल तर सध्याचा आणि पुढचा काही काळ तरी तुमचं घर हेच इंग्लंड-अमेरिका-फ्रान्स आणि स्वीत्झर्लंड. मुकाट्याने घरात बसा.

धडा नंबर ४ – तुमच्या खात्यात कितीही पैसे असले, तरी अशीही वेळ येते की सगळं जग ठप्प होतं आणि ते पैसे खर्च करायची इच्छा असली तरी करता येत नाहीत.

धडा नंबर ५ – जगात अविश्वसनीय गोष्टी घडू शकतात. सुट्टी कधी मिळेल असा विचार करणारे ऑफिसला कधी जायला मिळेल याची आतुरतेने वाट बघायला लागतात. घरकाम मदतनीस घरी बसतात आणि तुम्हाला भांडी, लादीफरशी, स्वयंपाक ही कामं न कंटाळता करावी लागतात.

धडा नंबर ६ – मुलांना मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यास कर सांगणाऱ्यांवर तो मोबाइल घे आणि अभ्यास कर असं सांगण्याची वेळ येते. ही यादी अशीच कितीही लांबवता येईल. तेव्हा तुमची तुम्हीच ती पूर्ण करा. असो.

आता करोना गुरूजी आहेत म्हटल्यावर गुरूदक्षिणाही द्यायलाच हवी. लवकरात लवकर करोनावर लस सापडून करोनाचं या पृथ्वीतलावरून उच्चाटन होणं या पेक्षा आणखी वेगळी गुरूदक्षिणा ती काय असणार? गुरूची विद्या गुरूला फळली हे करोनाच्या बाबतीत माणसाने खरं करून दाखवायची वेळ आली आहे.