बरोबर एक आठवडय़ाच्या अंतराने मराठी पत्रकारिता आणि साहित्यविश्वाला दोन हादरे बसले. २५ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘सिंहासन’कार अरुण साधू यांनी जगाचा निरोप घेतला, तो दिवस सोमवारचा होता. आणि आठवडय़ानंतर, २ ऑक्टोबरच्या सोमवारी, ह. मो. मराठे यांच्या निधनाची बातमी. साधू आणि मराठे ही साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्राच्या भिन्न टोकांवरची दोन नावे असली, तरी त्यांच्या त्यांच्या टोकावर त्यांनी आपली उंची निर्माण केली. साधू हे सोज्ज्वळ वृत्तीचे पत्रकार होते, तर मराठे हे बंडखोर, म्हणून वादग्रस्त पत्रकार ठरले. ‘हमो’ या नावाने परिचित असलेल्या मराठे यांच्या जीवनचरित्राची ओळख करून देणे हा या लेखाचा उद्देश नाही. पण एखाद्या साहित्यिकाने पत्रकारितेचा पेशा स्वीकारला असेल, तर त्याच्या साहित्यातच नव्हे, तर जगण्यातही त्या पेशाचे प्रखर प्रतििबब कसे उमटते याची साधू आणि ‘हमो’ ही दोन उदाहरणे आहेत. ‘हमों’नी मराठी पत्रसृष्टीच्या साऱ्या पायवाटा सहजपणे चोखाळल्या. त्या प्रत्येक पायवाटेवर आपल्या पाऊलखुणाही उमटविल्या, हे ‘हमों’चे वेगळेपण! किंबहुना, पत्रकारितेच्या प्रदीर्घ आणि प्रात्यक्षिक अनुभवामुळेच ‘हमों’चे साहित्य अधिक डोळस आणि समृद्ध झाले. वृत्तपत्रांच्या विश्वातही साहित्याची बीजे लपलेली असतात. आसपासच्या घडामोडींकडे डोळसपणे पाहून त्या समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारितेच्या जगात, या जगाची आपली अशी एक वेगळी कहाणी सतत विकसित होत असते. समाजाला समाजाचा आरसा दाखविण्याच्या गडबडीत, आपल्या विश्वात आकाराला येणारी ही कहाणी पत्रकारांच्या फारशी ध्यानातच येत नाही. अरुण साधू यांनी पत्रकारांच्या विश्वात वावरताना समाजाचा आरसा समाजासमोर धरला, तर मराठे यांनी पत्रकारिता करताना हाती आलेल्या आरशात आधी स्वतचे विश्व धुंडाळण्याचा प्रयत्न केला.. गेल्या चारपाच दशकांत जग कमालीचं बदलत गेलं. पत्रकारितेच्या विश्वालाही चकाकी आली. कॉर्पोरेट जगाचा स्पर्श वृत्तपत्रसृष्टीलाही झाला. तो अपरिहार्य असाच होता. पण या बदलाने पत्रकारितेचं जग अंतर्बा बदललं नाही. त्याचं बा स्वरूप झळाळलं, पण आतून ते विश्व होतं तसंच राहिलं.. म्हणून मराठे यांनी जवळपास ३० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर बेतलेलं, पत्रकारितेच्या विश्वातील विदारक वास्तवावर नेमकं बोट ठेवणारं वास्तव, नव्या जगातही तितक्याच प्रखरपणे जिवंत राहिलं, आणि ‘दोन स्पेशल’ नावाच्या नाटकाच्या रूपाने नव्याने रंगमंचावर येऊन नव्या पिढीलाही आपलंसं वाटू लागलं. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या सृष्टीत, ‘तत्त्व की तडजोड’ या शाश्वत प्रश्नाला प्रत्येकाला कधी ना कधी सामोरं जावं लागतं. या वास्तवाची ओळख पत्रसृष्टीत वावरणाऱ्यांना ते नाटक पाहिल्यानंतर होत असावी. कदाचित, ‘हमों’ची ‘न्यूजस्टोरी’ वाचतानाही, आपण त्यात कुठेतरी आहोत हेही पटलं असेल. पण बऱ्याच वेळा, ज्यात आपण असतो, ते आपल्यालाही जाणवत नसतं. हमोंना ते जाणवलं. आपल्या हाती असलेला आरसा केवळ समाजाला दाखविण्याआधी, त्याच आरशात आपण पाहावं, आपण नेमके कुठे आहोत, कसे आहोत, हेही अनुभवावं, ही उत्सुकता अगोदर हमोंच्या मनात दाटली. शोधपत्रकारितेची सुरुवातच त्यांनी एका अर्थाने स्वत:ला शोधण्यातून केली. शोधपत्रकारितेचा हा आगळा प्रकार त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेला आहे. त्यामुळे तो सहज सापडत नाही. त्याचा शोध घ्यावा लागतो, आणि तो सापडतो. मग हमोंच्या साहित्यातील पात्राच्या चेहऱ्यावरचे मुखवटे अगोदर समोर येतात, आणि खोलवर शोधले, की ते मुखवटे बाजूला करून त्यामागचा चेहराही शोधता येतो. त्यांच्या ‘घोडा’ या कथेने कॉर्पोरेट संस्कृतीचे मुखवटे असेच बाजूला करून खरे चेहरे समोर आणले. ‘हमो’ यांना बंडखोर म्हणून ओळखले गेलेच, पण त्यांच्यावर त्यांच्या जातिनिष्ठेचा, म्हणजे, ब्राह्मणनिष्ठेचाही शिक्का बसला. साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून त्यांनी आपली ही जातिनिष्ठा त्या मंचावरून निर्भीडपणे उघड केली, आणि त्यातून उभ्या राहिलेल्या वादाला ते खंबीरपणे सामोरेही गेले.

‘लोकप्रभा’चे दिवस हा हमोंच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील नोंद घ्यावा असा काळ असावा. या काळात त्यांनी आपल्या अनुभवाची सारी शिदोरी वापरली, आणि मराठी साप्ताहिक विश्वात ‘लोकप्रभा’ची मान उंचावली. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही त्यांची कादंबरी हे पाच दशकांपूर्वीच्या पिढीचे आत्मवृत्त आहे. ‘बालकांड’ आणि ‘पोहरा’ या आत्मकथनांनी असंख्य मराठी वाचकांना अस्वस्थ करून सोडले. ‘हमों’चा ‘पहिला चहा’ हा वृत्तपत्रीय स्तंभ वाचल्याखेरीज अनेकांना पहिला चहा कधी गोड लागलाच नाही. मराठी पत्रकारितेत ‘स्पॉट रिपोìटग’ हा वेगळा प्रकार हमोंनी जिवंतपणे वापरला. ‘एक दिवस, एक माणूस’ ही त्यांची लेखमाला याच प्रकारातून हाताळल्याने, पुस्तकी ढाच्यातही ती लोकप्रिय ठरली. एका पत्रकाराचा िपड असलेल्या हमोंची साहित्यनिर्मिती विपुल म्हणावी एवढी तर आहेच, पण त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीला अमाप वाचकवर्गही लाभला आहे. ‘येथेच छापून येथेच वाचले’, अशा पठडीतील स्वघोषित साहित्यिकांचे पुंजके आसपास फोफावत असताना हमोंच्या लेखनवैविध्याने साहित्यविश्वाला दिलेल्या समृद्धीचे मोल महत्त्वाचे ठरते.

दीर्घ आजारानंतर मध्यरात्रीनंतर हमोंनी अखेरचा श्वास घेतला, आणि पहाटेपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी मराठी पत्रसृष्टी आणि साहित्यविश्वात पसरली.

मराठी साहित्यविश्वावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकास या दिवशीचा ‘पहिला चहा’ बेचव लागला असेल यात शंका नाही!
दिनेश गुणे