बरेच आर्थिक व्यवहार इंटरनेटवर करायच्या आजच्या जमान्यात सायबर सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करायचे, हे आपल्याला माहीत असले पाहिजे.

गुन्हेगारी वृत्ती मानवाच्या सहज प्रेरणांपैकी एक आहे. त्याची माध्यमं बदलत राहतात, पण गुन्हा करण्याची प्रवृत्ती तीच असते. सध्याच्या इंटरनेटमय जगात वावरताना गुन्हेगारी प्रवृत्तीचा कोणताही फटका बसू नये असे तुम्हाला वाटत असेल तर गुन्हेगारीची ही मूळ पाश्र्वभूमी डोक्यात ठेवावी लागेल. त्यादृष्टीने विचार केला तर केवळ इंटरनेट आल्यामुळे गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली असा सरसकट आरोप न करता जी काळजी आपण यापूर्वीदेखील घ्यायचो तीच काळजी जर इंटरनेटच्या वापराबाबतीत घेऊ शकलो तर नक्कीच या गुन्ह्य़ांपासून आपणच आपले संरक्षण करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकतो.

‘लोकजागर’ या सदरात आपण मागील तीन लेखांमध्ये एक घटक कायम अधोरेखित केला होता, तो म्हणजे माहितीच्या साठय़ाची चोरी. तुम्ही कोण, कोठे जाता, काय करता, वय काय, डेबिट/क्रेडीट कार्ड कोणते, बँकेचे व्यवहार काय करता, आर्थिक परिस्थिती काय आहे, मित्र परिवार कोण ही आणि अशा यच्चयावत माहितीची चोरी यामध्ये अभिप्रेत आहे. सध्या आपणच वेगवेगळ्या प्रकारे इंटरनेटवर यातील काही माहिती प्रसवत असतो. कधी एखाद्या व्यवहारासाठी अत्यावश्यक बाब म्हणून तर कधी केवळ मनोरंजनाच्या एखाद्या सुविधेसाठी. कोणत्याही गुन्हेगाराला अशाच मूलभूत माहितीची गरज असते. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर घरफोडीचं घेता येईल. घरफोडी करणारा गुन्हेगार तुमच्या घरावर, तुमच्या वावरण्यावर, येण्याजाण्यावर, तुम्ही केलेल्या सुरक्षा उपायांवर नजर ठेवून असतो. एखादी व्यक्ती परगावी गेली असेल तर ती केव्हा परत येणार, ती काय करते, तिच्याकडे मौल्यवान ऐवज काय आहे अशा गोष्टींवर त्या गुन्हेगाराची नजर असते. ती व्यक्ती जर ज्येष्ठ नागरिक असेल तर तिचे वय, आजार, उपचार, झोपण्याच्या वेळा, त्यांच्याकडे कोण केव्हा येते याची माहिती अशी सर्व माहिती त्याने घरफोडी करण्याआधी जमा केलेली असते. किंबहुना त्याच्या कामाचा तो मूलभूत आधारच असतो. समजा एखादे ज्येष्ठ नागरिकांचे जोडपे रोज दुपारी गाढ झोपेत असते हे संभावित घरफोडय़ाला माहीत असेल आणि घरफोडीच्या अनुषंगाने त्याला घराची रचना वगैरे गोष्टी माहीत असतील तर तो त्याच्या घरफोडीच्या योजनेत हमखास यशस्वी होऊ शकतो. इंटरनेटवर गुन्हा करणारी व्यक्ती हीदेखील अशीच सर्व माहिती जमा करत असते. कधी ती थेट तुमच्या संगणकात शिरून किंवा अन्य ठिकाणांवरून माहितीसाठा चोरून. त्यामुळे आपण एरवी जगताना जी मूलभूत काळजी घ्यायचो तीच काळजी आपण इंटरनेटवरदेखील घेणे गरजेचे असल्याचे यातून अधोरेखित होते.

एखादी अनोळखी व्यक्ती जर आपल्याला भेटणार असेल तर इंटरनेट आणि संगणकपूर्व जमान्यात आपण काय केले असते, तर ती व्यक्ती कोण आहे, ती दिसते कशी, ती काय करते, तिच्या संदर्भात कोणी ओळखीच्या माणसाने काही सांगितले आहे का वगैरे बाबी तपासून पाहिल्या असत्या. आपला संगणकदेखील हेच करत असतो. त्यासाठी त्याची भाषा वेगळी असते. पण हे विचारण्याचे काम करण्याची संगणकाची मूलभूत ताकदच जर एखाद्या विकृत घटकाने उद्ध्वस्त केली असेल तर ते घडू शकणार नाही. त्यामुळेच आपणच आपली सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो तो माहिती देण्याचा. हा मुद्दा संगणकाबरोबरच मोबाइलसाठीदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. हल्ली कर्ज अथवा अनेक आर्थिक व्यवहारांसाठी तुमची ओळख पटवणारी अनेक कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल, चालक परवाना वगैरेंचा त्यामध्ये समावेश होतो. माहितीच्या चोरीमध्ये या सर्व घटकांचा मोठा सहभाग असतो असे सायबर सुरक्षा तज्ज्ञ मनोज पुरंदरे सांगतात. तुम्ही सादर केलेली ही माहिती उद्या गैरव्यक्तींच्या हाती लागली तर त्याचा गैरवापर होणार हे निश्चितच. त्यामुळेच ते सांगतात की अशी कागदपत्रे देताना ती कशासाठी, केव्हा आणि कोणाला दिली आहेत याची नोंद त्यावर आवर्जून करणे गरजेचे असल्याचे मनोज पुरंदरे नमूद करतात. कदाचित ही माहिती देताना त्यातून तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही, पण एखाद्या गैरप्रकारांमध्ये तुमचे नाव जोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हल्ली मोबाइलचे सिमकार्ड खरेदी करतानादेखील अशा कागदपत्रांची मागणी केली जाते. तेव्हा जर तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर झाला तर एखादा बेकायदेशीर व्यवहार, वर्तणूक तुमच्या नावाने नोंदवली जाऊ शकते. त्यामुळेच अशी कागदपत्रे देताना त्यावर त्याचा हेतू आणि इतर माहिती देण्याची सवयच लावून घ्यावी लागेल यावर मनोज पुरंदरे भर देतात.

गेल्या काही वर्षांत म्हणजे आपला मोबाइल स्मार्ट झाल्यापासून आपण मोबाइलचा वापर काही प्रमाणात का होईना संगणकासारखा करू लागलो आहोत. अशा वेळी अनेकदा काही अ‍ॅप डाऊनलोड करताना आपली संपर्क यादी, संदेश, फोटो अशी माहिती मिळवण्याचा अधिकार काही अ‍ॅप आपल्याकडून घेत असतात. संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे असल्यामुळे (कधी अपरिहार्य म्हणून तर कधी केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून) आपणदेखील त्या अ‍ॅपच्या सर्व मागण्या मान्य करतो. अशा मागण्या कधीकधी अवाजवी असतात. त्यापासून अटकाव करण्याचा मार्ग ते अ‍ॅप डाऊनलोड करून तुमच्या मोबाइलवर इन्स्टॉल करेपर्यंत आपल्याकडे नसतो. पण एकदा का ते इन्स्टॉल झाले की नंतर मग सेटिंग्जमध्ये अ‍ॅपच्या पर्यायावर जाऊन, अ‍ॅडव्हान्स या पर्यायाद्वारे त्या अ‍ॅपला आपल्या मोबाइलमधील माहिती वापरण्याचा किती अधिकार द्यायचा याबद्दल बंधन घालू शकतो असे मनोज पुरंदरे सांगतात. त्याला अ‍ॅप परमिशन असे म्हटले जाते. सध्यातरी बाजारात थेट प्रत्येक अ‍ॅपला स्वतंत्रपणे अटकाव करणारी सॉफ्टवेअर्स उपलब्ध नाहीत. त्यासाठी आपल्यालाच स्वतंत्रपणे सेटिंग्जमध्ये जाऊन बदल करावे लागतील. आजकाल मोबाइलवर कार्यरत असणाऱ्या अनेक ऑपरेटिंग सिस्टिम अशा गोष्टींना आणि व्हायरसना अटकाव करण्याचे तंत्र अंतर्गतरित्या देत असतात. पण तरीदेखील संगणकाप्रमाणेच आपल्या मोबाइलवरदेखील अटकाव करणारे सॉफ्टवेअर असणे गरजेचे असल्याचे ते सांगतात.

इंटरनेटवर व्यवहार करताना मूलभूत काळजी घेण्याचे जे उपाय आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला पासवर्ड. हा पासवर्ड नियमितपणे बदलण्याची आणि तो आपल्याशिवाय अन्य कोणालाही माहीत नसण्याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असते. पण आपल्या मूलभूत स्वभावानुसार अनेक वेळा कामाच्या सोयीसाठी आपण असे पासवर्ड अनेकांना सोपवत असतो. त्यामध्ये विश्वासाचा आणि सोयीचा भाग असला तरी इंटरनेटवर याची गणना मूलभूत निष्काळजीपणामध्ये केली जाते, असे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ निरंजन कऱ्हाडे सांगतात. हा पासवर्ड कसा असावा याबद्दल अधिक विश्लेषण करताना मनोज पुरंदरे सांगतात की, अनेक ठिकाणी काही ठरावीक शब्द यासाठी वापरण्याची आपली सवय आहे. अ‍ॅडमिन लॉगइनसाठी सर्वसाधारणपणे अ‍ॅडमिन हाच पासवर्ड वापरला जातो. तसेच स्वत:चे नाव, जन्मतारीख वगैरे गोष्टींचादेखील यात समावेश होतो. अशा प्रकारे सरसकट पासवर्ड ठेवण्याच्या सवयी आपण बदलणे गरजेचे असल्याचे ते नमूद करतात. ते सांगतात की शक्यतो आपला पासवर्ड अकरा अक्षरांपेक्षा मोठा असावा आणि त्यामध्ये एखादे कॅपिटल अक्षर, विशेष अक्षर (चिन्हांचा वापर) असावे. त्यामुळे संगणकीय गणितांचा वापर करूनदेखील असा पासवर्ड हॅकरला शोधून काढण्यासाठी ३२७ वर्ष लागू शकतात. पासवर्डसाठी सरळ एखादे वाक्यच लिहिणे हेदेखील सध्या सुरक्षित मानले जाते. मात्र असे पासवर्डदेखील नियतिपणे बदलणे अत्यंत गरजेचे असल्याचे निरंजन कऱ्हाडे सांगतात.

सायबर गुन्हेगारी जगात सध्या सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे गोडीगुलाबीने अथवा धाकदपटशा दाखवून तुमच्याकडून पासवर्ड चोरणे. याला सायबर विश्वात फिशिंग असे म्हटले जाते. एखादा प्रलोभनात्मक ई-मेल तुम्हाला पाठवणे, त्यावर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरणे आणि त्याचा वापर माहिती चोरीसाठी होणे हे एक सर्वसाधारण प्रकरण म्हणता येईल. तर कधी कधी चक्क त्यासाठी पैसेदेखील भरणे असे प्रकार यामध्ये वारंवार घडताना दिसतात. दुसरा प्रकार म्हणजे मोबाइलवरून एखादा फोन येणे (शक्यतो महिला), त्यावर तुम्हाला काही तरी ऑफर देणे किंवा आधी एखाद्या सरकारी संस्थेचे (आधार वगैरे) नाव वापरून मूलभूत माहिती घेणे. आणि नंतर त्याआधारे एखादा व्यवहार करणे आणि त्यासाठी तुमच्या मोबाइलवर मेसेजमध्ये आलेला संकेतांक विचारणे. या जाळ्यात अगदी बँकेत काम करणारे कर्मचारीदेखील सहजपणे ओढले जातात. असे फोन हे शक्यतो महिलांकडून करवून घेतले जातात. या पद्धतीने काम होत नसल्यास मग थेट पठाणी पद्धतीने धाक दाखवून (म्हणजे संकेतांक द्या नाही तर बँक खाते बंद होईल वगैरे) माहिती घेतली जाते. या प्रकारांमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून टारगेट केले जात असल्याचे मनोज पुरंदरे सांगतात. एकंदरीतच त्या वातावरणात असे नंबर दिले जाण्याचे प्रमाण बरेच आहे. पण येथे एक लक्षात ठेवावे लागेल की अशा प्रकारे कोणतीही संस्था मग ती सरकारी असो की खासगी तुम्हाला संकेतांक विचारत नाही. खरे तर असे एका वेळीच वापरता येणारे संकेतांक हा दुहेरी सुरक्षेचा भाग असतात. (म्हणजे एखादा आर्थिक व्यवहार करताना तुम्ही प्रत्यक्ष त्या यंत्रावर काही माहिती दिली असली तरी दुहेरी सुरक्षा म्हणून तुमच्या मोबाइल अथवा ई-मेलवर आणखीन एक सुरक्षा संकेतांक पाठवला जातो) फक्त आणि फक्त तुम्हीच त्याचा वापर करायचा असतो. याबाबत बँका सर्व ग्राहकांना असे ई-मेल अथवा संदेश पाठवत असतात. पण आपण ते बऱ्याच वेळा नजरेआड करतो. हे टाळले तरी अनेक गुन्हे कमी होऊ शकतात. दुहेरी सुरक्षा हे तंत्र गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी वापरात आहे. मुख्यत: बँकांचे आर्थिक व्यवहार,

ई-मेल सुविधा देणाऱ्या कंपन्या या ठिकाणी ते वापरले जाते. पण जेथे वापरले जात नसेल अशा ठिकाणांचा म्हणजेच वेबसाइटचा वापर व्यवहारांसाठी टाळणेच योग्य राहील. तो टाळणे शक्य नसेल तर एक ग्राहक म्हणून तुम्हाला तसा आग्रह धरायला हवा.

येथेच सायबर साक्षरता महत्त्वाची ठरते. सायबर साक्षरता जर आपल्यामध्ये रुजली असेल तर आपण या सर्व बाबी काळजीपूर्वक हाताळू शकतो. त्यातील काही बाबी वैयक्तिक स्तरावर तर काही तांत्रिक पातळीवर आहेत. त्यासाठी काही मूलभूत तांत्रिक बाबींचा वापर आपल्या संगणकीय अथवा मोबाइलवरील व्यवहारांसाठी करणे गरजेचे आहे. एखाद्या अ‍ॅपला आपली इतर माहिती घेण्यापासून रोखण्यासाठी काय करायचे ते आपण पाहिलेच आहे. पण वैयक्तिक कामांसाठी संगणकाचा वापर करताना तांत्रिकदृष्टय़ा कोणती महत्त्वाची काळजी घ्यावी हेदेखील पाहावे लागेल. निरंजन कऱ्हाडे यासाठी दोन महत्त्वाच्या सूचना करतात, एक म्हणजे आर्थिक व्यवहार करताना प्रायव्हेट ब्राऊजर या तंत्राचा वापर करावा. अशा प्रकारची रचना आपल्या नेहमीच्या ब्राऊजरमध्ये (हल्ली सर्वाधिक वापर असणाऱ्या क्रोमध्येदेखील ही रचना उपलब्ध आहे.) ही सुविधा दिलेली असते. क्रोमच्या अ‍ॅडव्हान्स सेटिंग्जमध्ये ही सुविधा मिळू शकते. त्याचबरोबर आपले काम झाल्यानंतर नियमितपणे सर्व माहितीसाठय़ाची सफाई करणारी सॉफ्टवेअर्स वापरावीत. कारण एखादी वेबसाइट पाहताना त्यातून तुमच्या संगणकावर कुकीजच्या स्वरूपात काही फाइल्स तात्पुरत्या स्वरूपात तयार होतात. या कुकीजच्या माध्यमातून तुमच्या इंटरनेटच्या वापरावर नजर ठेवली जाते. त्यामध्ये माहितीचे आदानप्रदान करण्याची रचना विकसित केलेली असते. त्यामागे एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीचा हेतू असल्याचे सांगितले जात असले तरी मुळातच तुमच्याशी निगडित अशी माहिती बाहेर पाठवण्याचा हक्क कोणालाही नाही. या गोष्टी टाळण्यासाठी निरंजन कऱ्हाडे वैयक्तिक वापरामध्ये संगणकावरील मूळ प्रणालीतच बदल सुचवतात. घरच्या वापरासाठी विंडोजची प्रणाली न वापरता लिनक्सची उबंतू ही प्रणाली वापरावी असे ते सांगतात. वैयक्तिक स्तरावरील वापरासाठी ही प्रणाली सोयीस्कर आणि लोकप्रिय असल्याचे ते सांगतात. विंडोजमधील सर्व वैशिष्टय़े त्यामध्ये आहेतच, पण व्हायरसच्या दृष्टीने सुरक्षेच्या त्रुटी दूर केल्या जातात. संगणकावर जरी काही व्हायरसचे दोष असले तरी या प्रणालीचा वापर करताना व्हायरसचे भ्रमण होण्याच्या दृष्टीने अटकाव केला जातो. मायक्रोसॉफ्टच्या काही मूलभूत सॉफ्टवेअर्सच्या विशेष सुविधांना त्यासाठी मुकावे लागू शकते, पण वैयक्तिक वापरामध्ये त्यामुळे कसलेही नुकसान होण्याची शक्यता नाही. आर्थिक व्यवहारांसाठीच नाही तर वैयक्तिक वापरासाठीही ही प्रणाली उत्तमच असल्याचे ते नमूद करतात. त्याचबरोबर ही प्रणाली मोफत (ओपन सोर्स असल्यामुळे) उपलब्ध असल्यामुळे सध्या आपण जे विंडोज व इतर सॉफ्टवेअर्स परवाना न घेता चोरून वापरतो तो मूलभूत गुन्हा तरी आपल्याकडून होणार नाही हा त्यामागचा बोनस समजायला हरकत नाही.

मोबाइलच्या वाढत्या वापरानंतर आपल्याकडे काही गोष्टींचा अतिरेकी वापर वाढला आणि त्यावर विश्वास ठेवण्याची आपल्या मनोवृत्तीतदेखील वाढ झाली. व्हॉटसअ‍ॅपवर आलेली माहिती ही खरीच असणार अशी आपली ठाम समजूत असते. ती माहिती आपल्याशी थेट वैयक्तिकरीत्या निगडित नसेल तोपर्यंत आपले स्वत:चे नुकसान होत नाही. पण जर अशाच प्रकारांतून तुमची गोपनीय माहिती कोणी मागितली तर ती देण्याचे प्रकार देखील त्यावरील अंधविश्वासामुळे घडतात. असे प्रकार पूर्णपणे टाळावेत.

अनेकांना आपले खाते क्रमांक आणि त्यासंबंधित पासवर्ड वगैरे माहिती संगणकावर नोंदवून ठेवायची सवय असते. पण असे पासवर्ड लिहून ठेवणे म्हणजे एकप्रकारे गैरव्यवहाराला आमंत्रणच देण्यासारखे आहे. त्यामुळेच पासवर्ड हा लक्षातच ठेवण्याची सवय लावून घ्यावी लागेल. तसेच आर्थिक व्यवहार करताना इतर कामं ज्या विंडोजमध्ये सुरू असेल त्यामध्ये न करता त्यासाठी वेगळी विंडो वापरावी असे निरंजन कऱ्हाडे सुचवतात. तसेच त्यासाठी ब्राऊजर प्रायव्हसी मोड वापरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याच जोडीने अ‍ॅनानॉमस ब्राऊजिंग (अज्ञात राहून इंटरनेटचा वापर) ही सुविधा देणारे ब्राऊजरदेखील आज उपलब्ध आहेत.

सध्या आपण इंटरनेट अथवा त्या अनुषंगिक अनेक माध्यमांचा अगदी सर्रास वापर करतो. आपली कागदपत्रे वगैरे साठवून ठेवण्यासाठीदेखील क्लाउड वगैरे साठवणूक सुविधांचा वापर केला जातो. यावर आपल्या फाइल्स सुरक्षित असण्यासाठी त्या त्या कंपन्यांनी काही मूलभूत सुरक्षा उपाय केले असले तरी आपण अशा फाइल्स सांकेतिक (एनक्रिप्टेड) करून ठेवाव्यात. त्यासाठी ट्रक्रिप्ट नावाचे उत्तम आणि अधिकृतरीत्या फुकट (ओपन सोर्स)सॉफ्टवेअर्स उपलब्ध असल्याचे निरंजन कऱ्हाडे सांगतात.

एकंदरीतच सायबर हल्ल्यांचा, गुन्हेगारीच्या पाश्र्वभूमीवर एक सामान्य माणूस म्हणून काय काळजी घ्यावी हे पाहताना एका महत्त्वाच्या घटकाकडे सर्वानाच लक्ष द्यावे लागेल. ते म्हणजे अ‍ॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर्स. आजवरच्या सायबर हल्ल्यांना डोळ्यासमोर ठेवून ही सॉफ्टवेअर्स तयार केलेली असतात. वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकात किमान फायरवॉल, आयडीएस (इन्ट्रजन डिटेक्शन सिस्टिम), अ‍ॅण्टी मालवेअर, अ‍ॅण्टी फिशिंग अशा सुविधा देणारे सॉफ्टवेअर आपण घेण्याची दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे मनोज पुरंदरे सांगतात. अर्थात या सॉफ्टवेअर्सचे अद्ययावतीकरण वरचेवर होत असते. त्या अपडेट्सचा वापर आपण करून घेतला पाहिजे.

अर्थात असे सारे उपाय असले तरी गुन्हेगारी प्रवृत्ती त्यावर मात करण्याचे प्रयत्न करत असतातच. कारण ती त्यांची मूलभूत प्रेरणाच आहे. त्यामुळेच सायबर सुरक्षा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुळातच आज तंत्रज्ञान हे प्रचंड वेगाने बदलत आहे. सहा महिन्यांनंतर तंत्रज्ञानात काय बदल होतील हे आज निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. ते पाहता सायबर व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या पद्धतीतदेखील बदल होऊ शकतात. त्यामुळेच आज एक सुरक्षा पद्धती वापरली की पुढे आराम करायचा असे करता येणार नाही. सायबर साक्षरता जर अंगी बाणवली तर किमान स्वत:चे संरक्षणाची सिद्धता स्वत:लाच करणे शक्य होऊ शकते.

सायबर फसवणूक झाल्यानंतर काय कराल?

सायबर फसवणूक होऊ नये म्हणून आपण कितीही काळजी घेतली असली आणि तरीदेखील आपली फसवणूक झाली असेल तर अशा वेळी पोलिसांकडे तक्रार नोंदवणे महत्त्वाचे असते. सर्वसाधारणपणे अशा गुन्ह्य़ांमध्ये सुरुवातीस आमिष दाखवून आणि बधला नाही तर नंतर घाबवरून माहिती मिळवून आर्थिक गैरव्यवहार करण्याची प्रवृत्ती आढळून आल्याचे पोलीस सांगतात. यासंदर्भात मुंबई पोलिसांची सायबर गुन्हे शाखा काही महत्त्वाच्या सूचना करते.

एखाद्या व्यक्तीला फसवून त्याच्याकडून ओटीपी घेतला असेल आणि त्याच्या क्रेडिट/डेबिट कार्डाचा गैरवापर करून जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर अशा वेळी सर्वप्रथम संबधित क्रेडिट/डेबिट कार्ड ब्लॉक करण्याला प्राधान्य द्यावे. नंतर लगेचच तक्रार नोंदवावी. ही तक्रार तुम्हाला कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात करता येते. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशा फसवणुकीमध्ये ज्या नंबरवरून आपल्याला कॉल आला आहे तो नंबर, त्यांनी पाठवलेले मेसेज आणि शक्य असेल तर त्या कॉलचे रेकॉìडग आपण जर ठेवले असेल तर पोलीस तपासाला मदत होऊ शकते.

क्रेडिट कार्डाशी संबंधित जर फसवणूक झाली असेल तर अशा व्यक्तीला क्रेडिट कार्डाचे बिल भरण्यापासून सूट मिळू शकते का, हा प्रश्न हमखास विचारला जातो. यासंदर्भात मुंबई पोलीस सांगतात की, हे सर्वस्वी बँकेवरच अवलंबून असते. काही बँका या स्वत:देखील चौकशी करतात. तर काही बँका पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीवरून पैसे परतदेखील करतात. पण हे पूर्णपणे त्या बँकेच्या धोरणांवरच अवलंबून असते.

गुन्हा घडण्यापूर्वीच जर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल (म्हणजे एखाद्या ठरावीक मोबाइल क्रमांकावर) शंका असेल, ती व्यक्ती तुमच्याकडून माहिती मिळवण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर अशा व्यक्तीविरुद्धदेखील तुम्हाला सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करता येऊ शकते.

भारतीय नागरिकाची ऑनलाइन फसवणूक परदेशात झाली असेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा स्थानिक सायबर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवणे गरजेचे असते.

सायबर गुन्ह्य़ांची व्याप्ती पाहता मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ९८२०८१०००७ या क्रमांकावर हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com