वसुधा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मासाला हिंदूू संस्कृतीत अपरिमित असं महत्त्व आहे. या काळात धार्मिक व्रतवैकल्ये, उपासतापास असतातच, त्याबरोबर सांस्कृतिक वातावरणही बहरलेलं असतं. आनंदलेल्या सृष्टीचं प्रतििबबच जणू या काळात भारतीय माणसाच्या मनात आणि जीवनात पडलेलं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपला समाज उत्सवप्रिय आहे. वर्षभर सतत आपण कोणता ना कोणता उत्सव साजरा करत असतो. आज आपल्या समाजाची आर्थिक रचना काही प्रमाणात बदलली आहे. पण एकेकाळी ती पूर्णपणे शेतीवर आधारित होती. कृषीप्रधानता हेच आपले वैशिष्टय़ होते. साहजिकच आपले सगळेच सण शेतीप्रधान रचनेशी जोडले गेलेले होते. शेतीतील कामं, ऋतुबदल या सगळ्यानुसार आपल्या सगळ्या सणांची, उत्सवांची, व्रतवैकल्यांची रचना केली गेली होती. चातुर्मास हा या सगळ्या व्रतवैकल्य, सणवार या सगळ्याचा परमावधी.

उन्हाळ्याची काहिली सहन होईनाशी झालेली असते. सगळ्यांना पावसाचे वेध लागलेले असतात. शेवटी एक दिवस प्रतीक्षा संपते आणि आषाढसरी बरसायला सुरुवात होते. तप्त झालेली धरती पाऊसधारांनी सुखावते. माणूसच नाही तर सगळे प्राणिमात्र पाऊसधारांमध्ये चिंब होतात. बळीराजाची लगबग सुरू होते. जगाचा पोशिंदा तो. सगळ्यांच्या पोटात चार घास पडावेत यासाठी आधी त्यालाच तर पाय रोवून उभं राहायचं असतं. नांगरणी, पेरणी अशी सगळी कामं वरुणराजाच्या जिवावर तर आखलेली असतात. बळीराजाचं आणि निसर्गाचं एक अनोखं नातं असतं. आकाशाचा रंग, वाहत्या वाऱ्यांची दिशा, पक्ष्यांचं, कीटकांचं वागणं या सगळ्यातून त्याला वरुणराजाच्या मनात नेमकं काय आहे, आपल्या हाताला यंदाच्या मोसमात काय लागणार आहे, याचा अंदाज येत असतो. आपल्या अंदाजानुसार शेतकरीराजा कामाला लागतो.

त्याच्या खालोखाल पावसाची वाट बघत असतात त्या गृहिणी. कारण आषाढसरींपाठोपाठ बरसणार असतात श्रावणधारा. आषाढसरींमुळे उन्हाळ्याच्या तगमगीचा मागमूसही राहिलेला नसतो. शुष्क, तप्त धरती आता सुखावलेली असते. तिचं बदललेलं रूपडंच तिच्या मनातल्या आनंदडोहाचं प्रतिबिंब दाखवत असतं. डोंगरदऱ्या हिरवाईने नटलेल्या असतात. जणू काही हिरवा शालू नेसून पृथ्वी सजलेली असते. ठिकठिकाणी धबधबे, ओढे, ओहोळ आनंदाने थुईथुई नाचत असतात. प्राणिमात्रांमध्ये नवसृजनाचा सोहळा सुरू असतो. हा सगळा आनंदीआनंद साजरा करण्यासाठी गृहिणीदेखील आसुसलेल्या असतात.

श्रावणाची चाहूल लागते त्याआधी घरोघरी आषाढ तळणी झालेली असते. कुंद पावसाळी वातावरणात कणीक, गूळ, तूप यांचा वापर करून खमंग पदार्थ केले आणि खाल्ले जातात. पाऊस चांगला स्थिरस्थावर होत असताना श्रावणाचे, चातुर्मासाचे वेध लागतात. आता हसरा, नाचरा श्रावण येणार म्हणून स्त्रियांच्या मनात आनंदाचं कारंजं नाचायला लागतं. कारण श्रावण येणार असतो तो नव्याची नवलाई घेऊन. सृष्टीचा सगळा आनंद तो सगळ्या सजीव चराचराच्या मनात ओतप्रोत भरणार असतो. रोजच्या जगण्याच्या उलाढालीत तो चैतन्याचं झाड लावणार असतो. ते झाड आनंदाचा वारा घालणार असतं. आनंदाची फुलं फुलवणार असतं आणि त्याला फळंही आनंदाचीच येणार असतात. श्रावणमासी हर्ष मनासी, हिरवळ दाटे चोहीकडे असं म्हणणाऱ्या बालकवींच्या क वितेतला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा होणार असतो.

या सगळ्याची सुरुवात होते दिव्यांच्या अमावास्येपासून. त्यानिमित्ताने सगळं घरदार घासूनपुसून लख्ख केलं जातं. अमावास्या असली तरी सगळा आसमंत प्रकाशमय करायचा असतो. त्यासाठी दिवेही घासूनपुसून लख्ख केले जातात. गूळ दुधात विरघळवून त्यात कणीक भिजवली जाते. या कणकेचे छोटेछोटे गोळे करून त्यांना पणतीचा आकार देऊन त्या पणत्या उकडल्या जातात. दिव्यांच्या अमावास्येचा हा खास पदार्थ. ती अमावास्या संपते आणि श्रावण सुरू होतो. आता सगळं वातावरण एकदम शुचिर्भूत व्हायला हवं असतं. मांसाहार करणारे मग शाकाहारी होतात. काहीजण श्रावणापुरते तर काहीजण संपूर्ण चातुर्मासात मांसाहार सोडतात. खरं तर हा काळ पावसाळ्याचा. वातावरण कुंद असतं. या काळात जड, मसालेदार अन्न पोटाला सोसत नाही. या काळात आहार सात्त्विक असणंच आवश्यक असतं. पण असं सांगितलं तर कुणी ऐकेलच असं नाही. म्हणून मग त्याला धर्माची जोड दिली गेली आहे. धर्मात सांगितलंय असं म्हटलं की लोक सहज ऐकतात म्हणून ही युक्ती. तर मांसाहारी या काळात शाकाहारी होतात तर शाकाहारी लोक कांदा लसूणही वज्र्य करतात. त्याबरोबर या काळात वेगवेगळे उपवासही केले जातात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा उपवास असतो सोमवारचा. श्रावणी सोमवारला धार्मिक जनांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यातही स्त्रियांना हा उपवास खूप महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे श्रावणी सोमवार करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठं आहे. सोमवारचा उपवास करून तो दुपारी सोडायचा आणि रात्री फराळ करायचा असं करणाऱ्यांचं प्रमाण एरवी मोठं आहे. पण श्रावणात या सगळ्या पळवाटा बंद करून नीट उपवास केला, शिवामूठ वाहिली जाते. श्रावणीसोमवारची कहाणी श्रद्धेने वाचली जाते. हा उपवास सोडायलाही खूप महत्त्व आहे. त्यासाठी आवर्जून गोड पदार्थ केले जातात.

श्रावणात सुरू झालेली वेगवेगळी व्रतवैकल्ये पुढे चार महिने सुरू असतात. त्यामुळे साहजिकच वातावरणात एक प्रकारचं भारलेपण असतं. मांगल्य असतं. आपल्या घरादारांत समृद्धी येऊ दे, मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभू दे यासाठी ही व्रतवैकल्ये असतात. त्यामुळे ती मन:पूर्वक केली जातात. नागपंचमीला नागाची पूजा करणं, श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळांना आरोग्य मागणं हे स्त्रिया मनापासून करतात. नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन सगळ्यांचे आवडते सण याच काळात येतात. कोळी बांधवांची नारळी पौर्णिमेची धामधूम तर बहीण-भावाची आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी राखीच्या धाग्याच्या बंधनात अडकण्याची लगबग याच दिवशी असते. कोळी बांधवांचा सण कोळी नसलेल्या सगळ्यांनाच आपला वाटतो. आणि राखी पौर्णिमेचं तर काय, बहीण आणि भाऊ हे नातं बहुतेकांच्या जीवनात या ना त्या रूपात असतंच. त्यामुळे प्रत्येकजण या ना त्या रूपात या सणांशी जोडलेला असतो. राखीच्या त्या धाग्याबरोबरच सुंदर भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. हल्ली फक्त भाऊरायाच नाही तर बहिणाबाईही कमावती असते. त्यामुळे मी भेटवस्तू घेणार आणि देणारही असाच तिचा बाणा असतो. त्यामुळे राखीचं नाजूक बंधन बांधून घेताना भाऊरायाला सुंदर भेटवस्तूही मिळते.

सगळ्याच सण उत्सवांचा खाण्यापिण्याशी अतूट संबंध आहे. त्यात श्रावण तर या सगळ्या उत्सवांचा राजा असलेला महिना. त्यानंतरचा चातुर्मासही उत्सवी वातावरण घेऊन येणारा. या सगळ्या काळात खाण्यापिण्याची रेलचेल असते. पण ती धार्मिक अंगाने. व्रतवैकल्ये, उपवास असल्यामुळे उपवासाच्या पदार्थाचे वैविध्यही असतेच. पण हे उपवास सोडताना श्रावणात महत्त्व असतं ते पुरणावरणाच्या नैवेद्याला. नुसतं पुरण घालून त्याचा नैवेद्य, नागपंचमीला आवर्जून केले जाणारे पुरणाचे दिंडे आणि पुरणाच्या पोळ्या. हे तिन्ही किंवा यातला एकतरी पदार्थ करून त्याचा नैवेद्य या काळात झाला नाही तर गृहिणींना अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अगदीच नेमकं सांगायचं तर आपली परंपरा पुढे नेण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत असंच तिला वाटतं. आपण या गोष्टी केल्या तर आपल्या मुलाबाळांना त्या समजतील, त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन तेही या सगळ्या गोष्टी करतील आणि आपली परंपरा पुढे तेवत राहील असा विश्वास मनात बाळगून त्या चातुर्मासातील सगळ्या गोष्टी आवर्जून करतात. त्यामुळेच मग श्रावणी सोमवारच्या काळात शिवमंदिरांसमोर दर्शनाला रांगा असतात. कुणी लक्ष बेल वाहण्याचा संकल्प करतं तर कुणी लक्ष प्राजक्त वाहण्याचा संकल्प करतं. कुणी वेगळा विचार करत शिवाला वाहण्याचं दूध गरीब मुलांना वाटतं आणि श्रावणी सोमवारची कहाणी सुफल संपूर्ण करतं.

लग्न होऊन वर्षही झालेलं नाही अशा मुलींसाठी तर लग्नानंतरचा पहिला श्रावण उत्साहाचा, आनंदाचा, उत्सवाचा. कारण पहिली मंगळागौर पूजायची असते. त्यासाठी माहेरी जाता येतं, मैत्रिणींना भेटता येतं, रात्रभर जागून खेळ खेळता येतात. मैत्रिणींशी हितगूज करता येतं. त्यानंतरची पाच वर्षे इतरजणींच्या मंगळागौरीला जाऊन ती पूजायची असते. पाचव्या वर्षी मंगळागौरीचं उद्यापनही थाटामाटात होतं. या काळात स्त्रिया आवर्जून सवाष्ण बोलावतात. ओळखीतल्या एखाद्या स्त्रीला बोलवून तिला जेवायला घातलं जातं. कुमारिकेलाही जेवायला बोलावलं जातं. पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. त्यानिमित्ताने एकमेकांकडे जाणं-येणं, जेवणं हा सगळा या उत्सवी वातावरणाचाच भाग असतो.

श्रावण संपतो आणि वेध लागतात ते गणपतीचे. हरितालिका पूजन, गणरायाचं आगमन, प्रतिष्ठापना, ज्येष्ठागौरींचं आगमन, त्यांचं पूजन, त्याचं जेवण, गणरायांसह त्यांचं विसर्जन हा सगळा काळ मोठाच धामधुमीचा असतो. गणेशोत्सवाला असलेल्या सामाजिक अंगामुळे तो फक्त कौटुंबिक सण उरत नाही तर सगळ्या समाजाचा सण होऊन जातो. त्या निमित्ताने एकमेकांकडे जातात, येतात. समूहाने जगण्याचा आनंद साजरा करतात. गणेशमूर्ती तयार करण्याच्या निमित्ताने मूर्तीकला, सजवण्याच्या निमित्ताने सजावटकला , सार्वजनिक उत्सवात सादर होणाऱ्या कला या सगळ्यांना या काळात भरपूर वाव मिळतो. त्यासाठी भरपूर प्रमाणात खरेदी-विक्री होते. बाजाराला उठाव मिळतो. उत्सवाशी संबंधित व्यावसायिकांच्या खिशात चार पैसे जातात. समाजात उलाढाल होते. अशा सगळ्या अर्थानी गणेशोत्सव महत्त्वाचा आहे.

त्यानंतर येतो तो दसरा. शेतात पेरलेल्या धान्यातून पहिलं पीक येण्याचा, त्याचा आनंद साजरा करण्याचा हा काळ. या दिवशी रामाने रावणाचा वध केला असं मानलं जातं. पांडवांनी याच दिवशी शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रं काढून घेतली आणि अज्ञातवास संपवला. म्हणून याच दिवशी रावणदहन, शस्त्रपूजन, सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. अर्थात दसरा साजरा करण्याआधी आठ दिवस असलेलं देवीचं नवरात्र स्त्रियांसाठी मोठं अपूर्वाईचं असतं. या नवरात्राआधी सगळं घर लखलखीत केलं जातं. नऊ दिवस देवीला रोज एक माळ चढवली जाते. देवीसमोर एखाद्या भांडय़ात धान्य पेरून ते उगवलं जातं. अलीकडच्या काळात नोकरदार स्त्रियांमध्ये नवरात्रीच्या काळात देवीच्या अंगावरील साडीच्या रंगांनुसार कपडे परिधान करण्याची प्रथा लोकप्रिय आहे.

दसरा संपता संपता दिवाळीचं वातावरण सुरू होतं. आता दिवाळी अगदी २०-२२ दिवसांवर आलेली असते. मुलींचे वडिलांकडे, पत्नीचे पतीकडे तर बहिणींचे भावाकडे दिवाळीला काय हवं याचे लाडीक हट्ट सुरू झालेले असतात. श्रावणापासून सुरू झालेल्या उत्सवी वातावरणावर दिवाळी कळस चढवणार असते. नातेवाईकांनी जमणं, एकत्र फराळ करणं, गप्पागोष्टी करणं, नवे कपडे परिधान करणं, दिवाळीच्या निमित्ताने स्वत:साठी, इतरांसाठी खरेदी करणं, एकमेकांना भेटवस्तू देणं या सगळ्यातून दिवाळीला धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक महत्त्व आहे. श्रावणात सुरू झालेला हा सगळा आनंदाचा सिलसिला दिवाळीसारखा सणांचा राजा अधिकच वृद्धिंगत करतो.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happiness in celebrating festivals
First published on: 31-08-2018 at 01:04 IST