‘दिवाळी’ या शब्दातच एक प्रकारचा उत्साह, चतन्य आणि आनंद ठासून भरलेला आहे.  वरवर पाहता दिवाळी हा एक सण दिसत असला तरी त्याचे चार दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचे आहेत. या चारही दिवसांविषयी ऐतिहासिक, पौराणिक व सांस्कृतिक माहिती भरपूर उपलब्ध होईल. पण त्यांचा एकत्रित संदेश असा दिसतो की दिवाळी हा दिव्यांचा, तेजाचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव आहे आणि आपल्या अवतीभवती दु:खाचा, दुरिताचा, दुर्मुखतेचा लवलेशही शिल्लक राहता कामा नये. पणत्या, आकाशकंदील यांमधून आपण हेच सूचित करीत असतो.

अर्थात, या आनंदोत्सवात सर्वाना सहभागी करून घेणे, ही सुसंस्कृत समाजघटक म्हणून आपणा सर्वाचीच जबाबदारी आहे. समाधानाची बाब अशी की शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत बहुतांशी लोकांना या गोष्टीचे भान आलेले दिसते. प्रदूषणाबद्दलच्या जागरूकतेतून व बालमजुरीच्या विरोधातून शाळकरी मुले फटाके वाजवायला विरोध करतात. फटाक्यांचे वाचलेले पसे शाळेत गरजू लोकांच्या निधीला देतात. कॉलेजवयीन मुले राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत किंवा स्वतंत्रपणेही खेडेगावांमध्ये किंवा लहानसहान पाडय़ांमध्ये जाऊन तेथील रहिवाशांबरोबर दिवाळी साजरी करतात. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याची आगळीवेगळी प्रचीती यातून येते.

Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व

आमची समविचारी स्नेहमंडळी अशा सर्व उपक्रमांचे मनापासून स्वागत करतात, पण त्याचबरोबर फटाके, फराळ व खरेदी यांच्या पलीकडे दिवाळीच्या संकल्पनेचा विस्तार करायचा प्रयत्न करतात. आम्हाला असे वाटते की आनंद, चतन्य हा दिवाळीचा गाभा आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. ते कसे घडवून आणावे याविषयीच्या विचारमंथनांतून दिवाळीच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळा उपक्रम करायचे निश्चित झाले.

महाराष्ट्रात दिवाळीचे किल्ले बांधण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरू आहे. आम्हाला असे वाटले की या प्रथेचा धागा पकडून आपल्या तरुण पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल सजग करता येईल. खेळातले किल्ले बांधण्याऐवजी मुलांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला खऱ्याखुऱ्या किल्ल्यांवर जाऊन पणत्या लावल्या तर आपल्या दीपोत्सवाची अगदी योग्य सुरुवात होईल. असा उपक्रम आम्ही गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आणि आमची तरुण मुले अगदी उत्साहाने त्यात सामील झाली. स्वत: ठरवून त्यांनी जवळपासच्या परिसरातील अज्ञात, दुर्लक्षित गड-गढया शोधून काढल्या, गिर्यारोहणाच्या दृष्टीने सर्व माहिती जमवली आणि स्थानिक मित्रांच्या संगतीने संध्याकाळी चढाई केली. जुनी प्रथा व नवा दृष्टिकोन यांचा हा सुंदर संगम पाहून आपण योग्य वाटेवर असल्याची खूण पटली.

दिवाळीच्या दिवसात पाहुणे, मित्रमंडळींचे परस्परांकडे जाणे-येणे, शुभेच्छा देणे, त्यासाठी प्रवास हे सुरूच असते. लोकांचा हा सण निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून वाहतूक पोलिस व शहर पोलिस दक्षतेने काम करत असतात. त्यांच्या स्वत:च्या सणाचे काय? याचा आपण कधी विचार करत नाही.

‘‘अहो, तुम्ही एवढे भाबडे कसे? हा तर त्यांच्या कमाईचा सण आहे. तुम्हा-आम्हाला काय मिळेल एवढा त्यांना ‘बोनस’ मिळतो. आणि तुम्ही त्यांच्या सणाची चिंता करता?’’

‘‘कमाई कितीही होऊ देत, तिचा उपभोग आपल्या मुलाबाळांबरोबर, परिवाराबरोबर घेता आला नाही तर कसला आनंद?’’

आम्हाला असे वाटले की आपल्या सणाच्या दिवशी जे कर्तव्यात मग्न असतात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यानुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी शहरातील सर्व वाहतूक नियंत्रण कक्षांमध्ये जाऊन वाहतूक पोलिसांना मिठाई द्यायची असे आम्ही ठरवले. त्यानुसार वाहतूक नियंत्रण आयुक्तांची रीतसर परवानगी घेतली, नियंत्रण कक्षांची, त्यांच्या वेळापत्रकाची माहिती काढून कुठल्या वेळेस जास्तीतजास्त संख्येने वाहतूक पोलिस भेटतील याचा अंदाज घेतला व त्यानुसार कार्यक्रम ठरवला. प्रत्येक कक्षातील वाहतूक पोलिसांच्या संख्येनुरूप फुले, शुभेच्छापत्रे व मिठाई घेऊन आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी गटागटाने सर्व वाहतूक कक्षांमध्ये गेलो व त्यांना दिवाळीचे अभिष्टचिंतन करून मिठाई दिली. आणि त्यांच्या अथक परिश्रमांबद्दल व त्यागाबद्दल त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. एरवी आपली उचललेली वाहने घेऊन येण्यासाठी येणारे लोक आणि सणाच्या दिवशी केवळ शुभेच्छा देण्यासाठी म्हणून वेळ काढून आलेले लोक यांच्यातला फरक त्यांना कळला, भिडला आणि ते मनापासून हरखले. आपल्या मनातील सल कुणाला तरी समजला याचे समाधान त्यांच्या देहबोलीतून, चेहऱ्यावरून व्यक्त झाले, त्याबरोबर आपल्या कामाची कुठल्याच पातळीवर दखल घेतली जात नाही, अंगमोड मेहनत करूनही कामचुकार, भ्रष्टाचारी म्हणूनच हिणवले जाते याचे दु:ख त्यांच्या शब्दातून व्यक्त झाले. आम्ही आमच्या प्रेमाने त्यांना जाणवून दिले की आपल्या सर्वाना त्यांच्या कामाविषयी आदर आहे व म्हणूनच सणाच्या दिवशी त्यांचे तोंड गोड केल्याशिवाय आम्हाला स्वस्थता लाभत नाही. जेथे जेथे आमचा मित्रपरिवार पसरलेला आहे, त्या सर्व गावाशहरांमध्ये गेली अनेक वर्षे दिवाळीचा प्रारंभ वाहतूक पोलिसांच्या सहवासात होतो, हेच आमचे अभ्यंगस्नान!

‘‘मग तुमची आता मज्जाच आहे. तुमचं लायसन्स कोणी मागणार नाही, तुमची गाडी कोणी उचलून नेणार नाही की सिग्नल तोडला म्हणून तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. करो करो, ऐष करो!’’

आमच्या या स्नेह्य़ांच्या मनातील हा गरसमज कसा दूर करावा, हे आम्हाला समजत नाही. वाहतूक पोलिसांकडून आम्हाला कसल्याच कृपेची अपेक्षा नाही. अपेक्षा ठेवून केलं तर ते प्रेम कसलं?

दिवाळीचा पाडवा आम्ही पोलिस स्टेशन्समध्ये जाऊन साजरा करतो. या कार्यक्रमासाठी आम्ही पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस आयुक्तांची परवानगी घेतो आणि त्यानंतर सर्व पोलिस स्टेशन्समध्ये जाऊन तिथल्या प्रमुखांच्या सोयीनुसार पाडव्याच्या भेटीची वेळ ठरवतो. सहसा सकाळच्या परेडची वेळच दिली जाते. त्या वेळेस आम्ही विभागांनुसार आमचे गट करून आपल्या पोलिस बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जातो. त्यांची नियमित परेड झाली की त्या सर्वासमोर आम्ही आमच्या येण्याचा उद्देश थोडक्यात सांगून त्यांना फुले, शुभेच्छापत्रे व मिठाई देतो. त्यांच्या प्रमुखांचा त्या सर्वाच्या उपस्थितीत सत्कार करतो.

हा कार्यक्रम अनेक दृष्टींनी आम्हाला उद्बोधक ठरला. पोलिस दलाची प्रतिमा आज चांगली राहिलेली नाही. ते ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ काम करतात यावर कुणाचाही विश्वास नाही. सामान्य मनुष्याला पोलिस आपला रक्षक वाटत नाही आणि हेच या दलाचे मोठे दु:ख आहे. आपल्याबद्दल केवळ वाक्प्रहार ऐकण्याची सवय असलेल्या पोलिसांना आणि केवळ तक्रारी, गुन्हेगार, मारपीट यांची सवय असणाऱ्या पोलिस चौक्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक नटूनथटून येतात, हा अनुभव धक्कादायक होता. नागरिकांना समाजाचे रक्षक म्हणून आपल्याविषयी आत्मीयता वाटते, यांवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आमच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी लाखमोलाच्या होत्या. यासंदर्भात दोन घटनांचा उल्लेख करायलाच हवा.

एका वर्षी शहरातील एका पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यावर दिवाळीच्या अगदी तोंडावर बलात्काराचा आरोप केला गेला होता आणि त्यावरून रणकंदन सुरू होते. तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे मनोधर्य पूर्णपणे खचलेले होते. अशा वेळी आम्ही त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गेलो आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांना दिलासा दिला की मूठभर नासक्या फळांवरून आम्ही सर्व दलाला टाकाऊ समजत नाही. हा त्यांचे मनोधर्य उंचावणारा क्षण होता.

दुसऱ्या एका पोलिस स्टेशनातील एका पोलिस बांधवाने दिवाळीच्या काही दिवस आधी मोठी मर्दुमकी गाजवली होती. भरगर्दीच्या रस्त्यातून चाललेल्या प्रवाशांनी खचून भरलेल्या बसमध्ये एका माथेफिरूने पिस्तूल काढून सर्वाना वेठीला धरले होते आणि त्या पोलिस बांधवाने स्वत:चा जीव धोक्यात घालून, इतरांना सुरक्षित ठेवून अतिशय कौशल्याने त्या माथेफिरूला पकडले होते. आम्ही त्या बांधवाचा विशेष सत्कार केला. त्यांना आनंदाने रडू कोसळले आणि आम्ही मूक झालो.

आमची ही लहानशी कृती आपल्या समाजाच्या, देशाच्या आधारस्तंभांना प्रोत्साहन देते, त्यांच्या सत्प्रवृत्तींना आवाहन करते आणि त्यांचा सण साजरा करते, याचे आम्हाला मनापासून समाधान आहे आणि यामुळेच या दोन्ही कार्यक्रमांत आमच्याबरोबर सहभागी होणाऱ्यांची संख्या वर्षांगणिक वाढत आहे.

भाऊबीजेच्या दिवशी आम्ही आपल्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी करतो. यासाठी परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या रेक्टरची भेट घेऊन कार्यक्रमाची संकल्पना सांगून परवानगी मिळवावी लागते. विद्यार्थ्यांच्या मनात कार्यक्रमाची संकल्पना रुजवावी लागते.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या संध्याकाळी सर्व परदेशी विद्यार्थ्यांचे कुंकुमतिलक लावून, औक्षण करून सनई-चौघडय़ांच्या मधुर स्वरांनी आणि दिवाळी फराळाचे पारंपरिक पदार्थ देऊन स्वागत केले जाते. समवयस्क मंडळी गप्पागोष्टींतून त्यांना दिवाळीची माहिती देतात. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही त्यांना त्यांच्या देशात राहणाऱ्या आई-वडिलांना फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन करतो. त्यानंतर कलादर्शनाचे, मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. त्यांच्यातील मुलांना आमच्या मुली आणि त्यांच्यातील मुली आमच्या मुलांना औक्षण करतात. आम्ही त्या सर्वाना भेटवस्तू देतो, प्रीतिभोजनाने कार्यक्रमाची सांगता होते. या परदेशातही आपल्या प्रेमाची, आपल्याला कुटुंबाचे सदस्य म्हणून सामावून घेणारी माणसे आहेत, ही आपल्या देशाच्या संस्कृतीची उदात्त ओळख घेऊन परदेशात शिक्षणासाठी आलेली मुले पुढच्या दिवाळीची वाट बघत आनंदाचा ठेवा घेऊन परततात.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com