News Flash

मुंबईच्या रस्त्यांवर तो धावला लंडन मॅरेथॉन…

या मॅरेथॉनमध्ये त्यानं पूर्ण केली ४२.१९ किलोमीटरची धाव

मुंबई : वडाळ्यातील रस्त्यावरुन लंडन मॅरेथॉनमध्ये व्हर्च्युअली सहभागी होत हिमांशू सरीन यानं ४२.१९ किमी अंतर पूर्ण केलं.

सुनिता कुलकर्णी

दरवर्षी वेगवेगळ्या मॅरेथॉन आवर्जून धावणाऱ्यांना यावर्षी करोना विषाणूचा अडथळा आला असला तरी माणसाच्या कल्पकतेने त्यावर मात करत व्हर्च्युअल मॅरेथॉनचा पर्याय शोधला आहे. त्यामुळेच दरवर्षी लंडन मॅरेथॉन धावणारा हिमांशू सरीन रविवारी मुंबईमधूनच लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ४२.१९ किलोमीटरची धाव पूर्ण करू शकला. असं करणारा तो एकटाच नव्हता तर मुंबईपासून ते बंगळुरूपर्यंत आणखी ७० जण आपापल्या शहरातून स्टॉप वॉचवर वेळ लावत पहिल्या वहिल्या व्हर्च्युअल लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. अर्थात फक्त भारतातूनच नाही तर जगभरातल्या १०९ देशांमधून ४३ हजार लोकांनी या व्हर्च्युअल पद्धतीने यावेळची लंडन मॅरेथॉन पूर्ण केली. इंडियन एक्स्प्रेसच्या शिवानी नाईक यांनी हे वृत्त दिले आहे.

३६ वर्षीय हिमांशू सरीनची ही पहिलीच व्हर्च्युअल मॅरोथान नाही तर तीन आठवड्यांपूर्वी तो याच पद्धतीने बोस्टन मॅरोथॉनमध्येही सहभागी झाला होता. म्हणजे बोस्टन असो की लंडन, तिथे मॅरेथॉन सुरू झाली तेव्हा हिमांशूदेखील इथून, मुंबईतून त्या स्पर्धेत सहभागी झाला. तिथे लोक तिथल्या रस्त्यांवर धावले तेव्हा तो इथे इथल्या रस्त्यांवर धावला.

बोस्टन, न्यूयॉर्क, लंडन, बर्लिन, टोकिया अशा वेगवेगळ्या शहरांमधल्या मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अनुभव असलेला हिमांशू हसत सांगतो, मी लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो असलो तरी स्पीड ब्रेकर्स, खड्डे यांनी मला मी मुंबईतच धावत असल्याचा एक सेकंदही विसर पडू दिला नाही. हिमांशूप्रमाणेच बंगळूरुमधून ४४ वर्षीय हरिश वसिष्ठदेखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. ते सांगतात की मी माझी धाव तीन तास ४८ मिनिटांमध्ये पूर्ण केली. त्यासाठी मी एक महिन्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. ही माझी माझ्याशीच स्पर्धा होती आणि माझी पत्नी, सहकारी, मित्रमंडळी यांनी मला त्यासाठी प्रोत्साहन दिलं.

बंगळूरूमधूनच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अनुभव करमरकर यांनी त्यांची धाव पूर्ण केली असली तरी त्यांना लंडनमधलं मॅरेथॉनदरम्यानचं ते वातावरण आपल्या आसपास नाही हे सतत जाणवत होतं. तर एम. नंजुनदाप्पा यांना याआधीच्या मॅरेथॉनमधलं त्यांचं स्वत:चंच रेकॉर्ड त्यांनी मोडलं याचा आनंद होत होता.

जगभरातल्या वेगवेगळ्या मॅरेथॉन धावणाऱ्यांना असं वाटत होतं की ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सगळं ठीक होईल आणि आपण या स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकू, पण तसं झालं नाही. त्यामुळे स्पर्धकांनी आपापल्या शहरांमधून मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा पर्याय पुढे आला. तो स्वीकारत अनेकांनी अनेक महिने खंडित झालेलं व्यायामाचं रुटिन पुन्हा सुरू करून आपला फिटनेस आजमावून घेतला.

पण आपण आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहोत आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याच शहरात, आपल्याच घराच्या आसपास धावत आहोत हे त्यांनी कुणीच कधीच स्वप्नात देखील बघितलं नव्हतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:27 pm

Web Title: he ran the london marathon on the streets of mumbai aau 85
Next Stories
1 त्याची जगात कुठेही ‘शाखा’ नाही…
2 मिर्झापूर…नवा सिझन, नवे वाद
3 सावळा गं रंग तुझा…
Just Now!
X