26 September 2020

News Flash

हिरोबद्दल बोलू काही!

‘हिरो’ हा इंग्रजी चित्रपटातच असतो असा लहानपणी माझा गैरसमज होता.

हिरोचा अभिनयही बघायचा असतो हे बलराज सहानी, संजीवकुमारसारख्या अभिनेत्यांमुळे, दिलीपकुमारमुळे नव्याने उमगू लागलं.

मनपंखी
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com
‘हिरो’ हा इंग्रजी चित्रपटातच असतो असा लहानपणी माझा गैरसमज होता. तो घोडय़ावरूनसुद्धा यायचा. न कळणारं फास्ट इंग्लिश बोलायचा. हाणामाऱ्या करायचा. त्या निरागस वयात ‘कायपण दाखवतात’ अशी आम्हा पोरांची प्रतिक्रिया खेचणारी आलिंगने, चुंबने  हे हिरो लोक बिनधास्तपणे करायचे. जेम्स बॉण्ड तर अतिच होता. तरी थर्मासवरसुद्धा त्या काळी त्याचा फोटो दिसायचा. त्याचं धाडस, धैर्य, गुप्त कामगिरी, प्रणय हे सगळंच भन्नाट असायचं. सुपरमॅन, स्पायडरमॅन, फँटम, टारझन, रॉबिन हूड हे सगळे हिरोलोक आजही मुलांना जाम आवडतात. जे आपण करू धजत नाही, ते सगळं हे लोक करतात. त्यात यश मिळवतात हे पाहून आपणही त्यांच्यासारखे आहोत किंवा बनू शकतो अशा फँटसीच्या जगात मुलं जातात. कुणी स्वत:ला शाहीद कपूर समजू लागतो.

हिरोचा अभिनयही बघायचा असतो हे बलराज सहानी, संजीवकुमारसारख्या अभिनेत्यांमुळे, दिलीपकुमारमुळे नव्याने उमगू लागलं. नायक आणि खलनायक यांच्यातला संघर्षच तेव्हा सिनेमाचा खरा ‘प्राण’ असायचा. ‘राम और श्याम’ किंवा ‘आराधना’ अथवा ‘अंदाज’मधली गाणी धडाधड पाठ होऊन जायची. हे हिरो वयाने मोठे असत. काहीजण तर काका, मामा वाटत, पण अभिनयाच्या जोरावर ते रसिकांच्या मनावर राज्य करत.

हिरो हा आपल्यासारखा बँकेत नोकरी मिळाली म्हणून पेढे वाटणारा, (फार फार तर) टॅक्सीने फिरणारा असेल तर काय मजा येईल असं मला वाटण्याची खोटी, अमोल पालेकरने ती चाकरमानी मध्यमवर्गीय अपेक्षाही पूर्ण केली. ‘सुपरस्टार’ राजेश खन्नाची रोमँटिक प्रतिमा आणि अमिताभची अँग्री मॅन इमेज यांत अमिताभ जिंकला आणि खन्नाचा पराभव झाला हा इतिहास आहे. तरुण पिढीचं वैफल्य आणि अंडरवर्ल्डचं वाढतं वर्चस्व या दोन्ही गोष्टींचं प्रतिबिंब तुम्हाला अमिताभच्या चित्रपटांतून दिसेल. ‘पोलीस इन्स्पेक्टरला असा पगार मिळून किती पगार मिळणार?’ अशी भावना निर्माण व्हायची. याउलट डॉन म्हणजे राज्य करणार असं बच्चे लोकांना वाटू लागायचं.

मिथुन चक्रवर्तीने ‘मृगया’ या पहिल्याच चित्रपटात शरीरसौष्ठवाचं असं प्रदर्शन आदिवासी व्यक्तिरेखेच्या भूमिकेतून घडवलं की, मीही व्यायामशाळेत नाव घातलं (आणि स्वत:चं हसं करून घेतलं.) हा ‘बिल्ट ट्रेण्ड’ हळूहळू वाढला. नटाचं ‘ओपन एक्सपोझर’ पूर्वी नव्हतं. आता फिल्म इंडस्ट्री म्हणजे जिमच वाटते. एक मुलगी मला परवा म्हणाली, ‘सर गश्मीरचा (महाजनी) मला कधी नुसता स्माइल मिळाला, तरी मी आनंदाने बेशुद्ध पडेन.’ इतकं जिम बॉयला आता ग्लॅमर, महत्त्व आहे. सलमान खान हे टॉपचं उदाहरण झालं. अविवाहित हिरोबद्दल गॉसिप असणं तर ओघाने आलंच. मात्र, शरीरसौष्ठवाच्या स्पर्धेत अभिनयाचे काय असाही प्रश्न आहेच. संतोष जुवेकरचा चित्रपट बघण्यासाठी आम्ही जातो, तेव्हा आमची तहान त्याचा बोलका अभिनय बघण्याची असते, शरीरसौष्ठव नव्हे। भूमिकेची गरज म्हणून तब्येत ‘पंप’ करावी लागत असेल आणि त्यासाठी परुळेकरांसारख्या तज्ज्ञाची मदत घेतली जात असेल, तर वेगळा भाग!

हिरोचे वय गेल्या काही वर्षांत कमी झालं. हिरो हा आदिनाथ कोठोरे, अनिकेत विश्वासराव किंवा आकाश ठोसर यांच्याएवढा, तशा वयाचाच हवा. राजा गोसावी, राजा परांजपे, दादा कोंडके यांना आपण उत्तम कलाकार, अभिनेते म्हणू शकतो. पण ‘हिरो’ ही संकल्पना स्मार्टनेस, देखणं सेक्स अपील सोबत घेऊनच येते. देखणेपणात रांगडेपणा मिसळला, उसळला तर अजिंक्य देवचा ‘सर्जा’ उभा राहतो. हृतिक रोशन तर हॉलीवूडमधला वाटतो. कोणताही नवा नट नायक म्हणून पुढे येताना ‘मराठी’ असेल, तर आम्हाला जाम आनंद व्हायचा. अगदी हेमंत बिर्जेचा ‘टारझन’ बघतानाही एक मराठी तरुण पुढे आला असं मला आणि वर्गमित्रांना वाटायचं. शिवसेनेचा मुंबईतला प्रभाव हे तेव्हा त्याचं एक कारण असू शकतं.

आपल्या आसपास सिनेनट होण्याइतपत देखणी किंवा स्टंटबाजी करू शकतील, जोखीम घेतील अशी धाडसी मुलं नक्की असतात. नेहमी सहवासात असल्यामुळे त्यांचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. आपल्या मित्राचे प्राण वाचवणारा, स्वत:चा जीव धोक्यात टाकून नदीच्या पुरात उडी मारणारा पोरगा हासुद्धा वेगळ्या अर्थाने ‘हिरो’च नसतो का? मला वाटतं, अशा हिरोंनाही आपण भरपूर महत्त्व दिलं पाहिजे. काही हिरो कधी आले, कधी गेले कळत नाही. त्यांचीही कधीतरी आम्ही रसिक प्रेक्षक (समीक्षक) नको रे बाबा!) आठवण काढतो. ‘एक राहुल रॉय पण होता बरं का’ म्हणतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 1:02 am

Web Title: hero
Next Stories
1 सोशल मीडियावर एक दिवस..
2 साडी भारताचीच!
3 खासगी वाहिन्यांची पंचवीस वर्षे
Just Now!
X