News Flash

हायटेक बळीराजा

राज्यामधले लाखो शेतकरी आता ‘होय, आम्ही शेतकरी’ या ऑनलाइन चळवळीशी जोडले गेले आहेत.

‘होय, आम्ही शेतकरी’ नावाचा ग्रुप. फेसबुक, व्हॉट्स अॅंप, यू-टय़ूबसारख्या माध्यमांतून काही तरुण शेतीतज्ज्ञांनी, यशस्वी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फेसबुक पेज तसंच व्हॉट्स अॅापवर ग्रुप सुरू केला.

उपक्रम
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करायचा असं ठरवून शेती क्षेत्रातील काही तज्ज्ञ गेली पाचेक वर्षे काम करत आहेत. राज्यामधले लाखो शेतकरी आता या ‘होय, आम्ही शेतकरी’ या ऑनलाइन चळवळीशी जोडले गेले आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांच्या अतिवापराची, लोक या माध्यमांच्या कसे आहारी गेले आहेत याची चर्चा अलीकडच्या काळात सातत्याने होताना दिसते. पण या माध्यमांचा चांगला उपयोग करून घ्यायचा ठरवलं तर काय होऊ शकतं याचं चांगलं उदाहरण म्हणजे ‘होय, आम्ही शेतकरी’ नावाचा ग्रुप. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, यू-टय़ूबसारख्या माध्यमांतून काही तरुण शेतीतज्ज्ञांनी, यशस्वी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फेसबुक पेज तसंच व्हॉट्स अ‍ॅपवर ग्रुप सुरू केला. पाहता-पाहता सात लाख शेतकरी त्याच्याशी जोडले गेले आहेत.

समाजमाध्यमांचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्याचा सुयोग्य कारणासांठी उपयोग करता येईल का हा विचार कृषी विषयांत तज्ज्ञता मिळविलेले डॉ. अंकुश चोरमुले (कीटकशास्त्र) आणि प्रगतिशील शेतकरी अमोल पाटील यांनी २०१५ साली केला. त्यातून त्यांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि फेसबुक पेज तयार केले अन महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे तसेच फेसबुक पेजचे सभासद झाले. या ग्रुपवर कोणत्याही पिकांसंबंधी इत्थंभूत माहिती दिली जाते. तसेच अभ्यासकांचे शेतीविषयीचे विचार आणि सरकारची आताची धोरणे चिकित्सा केली जाते. शासनाच्या विविध योजनांची माहिती, त्याचे फायदे-तोटे, प्रक्रिया या बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन या ग्रुपमधील शेतीतज्ज्ञ शेतकऱ्यांना देत आहेत.

फेसबुक लाइव्हद्वारे थेट शेतातून शेतीविषयक सल्ले, मार्गदर्शन डॉ. चोरमुले आणि त्यांचे सहकारी या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतात. त्यातून विनामूल्य मिळणाऱ्या माहितीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. यासंदर्भात शेतकरी अमोल पाटील सांगतात की, ‘सुरुवातीला आमच्या परिसरातील शेतकऱ्यांची आपसांत चर्चा व्हावी, या उद्देशाने हा ग्रुप सुरू केला. नंतर तो महाराष्ट्रभर पसरला. आता राज्यातून अनेक शेतकरी आपल्या शेताची माहिती आणि समस्या ग्रुपवर मांडतात. त्यावर अनुभवी शेतकरी आणि शेतीतज्ज्ञांमार्फत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. पिकावरील किडीची अडचण आली, तर संबंधित शेतकरी पिकाचे फोटो पाठवतो. त्यानंतर ग्रुपमधील शेतीतज्ज्ञ त्याची सविस्तर माहिती देतात. त्यामुळे दुकानदारांकडून केली जाणारी फसवणूक कमी झाली आहे. विनाकारण अनेक औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जायची, ते कमी झाले आहे. ग्रुपमधून औषधांविषयी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने शेतकरी हवे असलेले औषधच दुकानदारांकडून मागवू लागला आहे. त्यातूनच अप्रत्यक्षपणे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. मध्यंतरी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ऊसशेतीविषयी माहिती विचारली होती. परिणामी, आज ‘होय, आम्ही शेतकरी’ या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी पहिल्यांदाच १०० टन ऊस घेणारा शेतकरी विदर्भात तयार झाला आहे. विदर्भातील राजेश बगल नावाच्या शेतकऱ्याने ४५ अंश सेल्सियस तापमानातदेखील १०३ टन ऊसाचे उत्पादन घेतले. फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून पिकांची शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही पिकांचे जास्त उत्पादन कसे घ्यायचे याचे मार्गदर्शन मिळते. शेतकऱ्यांशी लाइव्ह संवाद साधला जातो. शेतकऱ्यांनी केलेले विविध प्रयोग प्रत्यक्ष व्हिडीओच्या माध्यमातून दाखविले जातात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथले शेतकरी एकामेकांशी जोडला जात आहे.’

सततच्या वाढत जाणाऱ्या ग्रुप सभासदांच्या मागणीमुळे विविध पिकांच्या नावे स्वतंत्र फेसबुक ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र द्राक्षे उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, महाराष्ट्र हळद उत्पादक शेतकरी असे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आपल्या हातातील मोबाइलचा वापर करत संबंधित शेतकरी फेसबुक लाइव्ह, फोटो सेंड, व्हिडीओ, मॅसेजस या पर्यायांचा वापर करत थेट शेतीतज्ज्ञांना आपल्या समस्या सांगत आहे. त्यांच्या शंकांचे शास्त्रीय पद्धत्तीने निराकरण करण्याचा प्रयत्न ग्रुप प्रमुखांकडून आणि शेतीतज्ज्ञांकडून केला जात आहे.

असंख्य शेतकरी आपल्या शेतीचा पोत लक्षात न घेता पिके घेतात. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना  सामोरे जावे लागते. हे मार्गदर्शन त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन उदाहरणांसहित देता आले, तर त्याचा फायदा होऊ  शकतो. त्यानुसार विविध प्रकारची खते, औषध फवारणी, वेगवेगळी पिके, बाजारभाव, उत्पादन यांविषयी माहिती, शेतकरी बांधवांना मोठय़ा प्रमाणात दिली जात आहे. आता महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी या ग्रुपला जोडले गेले आहेत. या ग्रुपचे विधायक कार्य पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यातील शेतकरी आणि अधिकारीदेखील ग्रुपमध्ये सामील झाले आहेत.

ग्रुपचे प्रबंधक डॉ. अंकुश चोरमुले म्हणतात की, ‘या ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातून विविध समस्या लाइव्ह दाखवितात. आम्हालाही व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो. आम्ही मातीचे परीक्षणे, पाण्याची उपलब्धता, कमी भांडवलात जास्त उत्पन्न, शेतीचा पोत, विविध कीटकनाशकांचा वापर कसा करावा, याविषयी शेतकऱ्यांना सांगतो. पूर्वीच्या अभ्यासकांचे शेतीविषयक विचार आम्ही ग्रुपवर शेअर करतो. तसेच विविध पिकांविषयी लाइव्ह चर्चासत्र आम्ही घेतो. शासनाच्या योजनांमधील त्रुटी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या यांविषयी लाइव्ह परिसंवाद घेतले जातात.’’

कर्नाटकाच्या सीमेवरचे यशस्वी शेतकरी विजय मगदूम या ग्रुपबद्दलचे आपले अनुभव सांगतात, ‘मी माझ्या शेतात उसाचं पीक घेतो. माझ्या  शेतात अनेक समस्या होत्या. २०१४ नंतर मी ‘होय, आम्ही शेतकरी’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून माझा शेतीतज्ज्ञांशी संवाद सुरू झाला. मी माझे प्रश्न नेहमी त्यांना मेसेज करून पाठवत होतो. त्याचे उत्तर लगेचच येत होते. त्यांनी दिलेल्या उत्तरातून मी शेतात तसतसे बदल करत गेलो. त्यामुळे पहिल्या वर्षी उत्पन्न नेहमीपेक्षा जास्त आले. माझ्याकडून शेती करताना ज्या चुका व्हायच्या, त्याबद्दल ग्रुपमधील शेतीतज्ज्ञ संध्याकाळपर्यंत सांगायचे. त्यावर उपाययोजना सुचवायचे. मी लगेचच त्याची अंमलबजावणी करायचो. पाण्याचे नियोजन, कोणत्या कीटकनाशकांचा वापर करावा, उसांच्या कांडय़ांची माहिती हे सगळे योग्य पद्धत्तीने ग्रुपमधून सांगितले जात होते, त्यामुळे उसाचे उत्पन्न वाढायला मदत झाली. आता चांगले उत्पन्न देणारी माझी शेती पाहायला शेजारी असणारे शेतकरी, बाहेरच्या गावातील शेतकरी येऊ लागले आहेत. तेदेखील या ग्रुपचे सभासद झाले. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांच्याही शेतीत सुधारणा होत आहे.’

असं म्हणतात की, काळानुसार बदणारा नेहमी दूरदृष्टी बाळगून असतो. अशीच दूरदृष्टी ठेवून नवे तंत्रज्ञान स्वीकारून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे विधायक काम ‘होय, आम्ही शेतकरी’ हा ग्रुप करतो आहे. अशा विधायक उपक्रमात सहभागी होऊन सगळ्यांनी एकमेकांना सहकार्याचा हात दिला, तर शेतीच्या समस्या सुटतील, हे नक्की!

ग्रुपवरून असे होते मार्गदर्शन…

ऊस, केळी, डाळिंब, कोबी, हळद यांसारख्या पिकांबाबत शास्त्रीय सल्ला देण्याचे काम हे फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप करतो. या ग्रुपवर शेतकरी आपल्या शेतातील पीक, माती, पाण्याचे फोटो टाकून त्याबद्दलच्या समस्या, प्रश्न आणि सल्ले विचारतो. ग्रुप प्रमुख त्याच्या प्रश्नांची चर्चा घडवून आणतात. प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रश्न-उत्तरे स्वरूपात चर्चा होते. पाण्याचे नियोजन, बियाणांची माहिती, बाजारभावांचे मूल्यमापन, तंत्रज्ञानाचा वापर, पिकांचे एकरी नियोजन, शिवार पेरणी, खतांची माहिती, कीटकनाशके, माती परीक्षण यासारखी उपयुक्त माहिती आणि उपाययोजना ग्रुपमधून सांगितल्या जातात. वाढता प्रतिसाद पाहता विविध जिल्ह्य़ांत, तालुक्यांत आणि गावांत चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा होतात. कृतिशील प्रयोग दाखविले जातात.

समूहाचे शिलेदार

या समूहात डॉ. अंकुश चोरमुले (कीटकशास्त्र), डॉ. ओमप्रकाश हिरे (मृदा शास्त्र), डॉ. विश्वजीत कोकरे (मृदा शास्त्र), गणेश सहाणे, रोहित डुबे, शरद अवटी, राजू गाडेकर, विजय पवार, इरफान शेख हे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, तर अमोल पाटील, सुरेश कबाडे, विजय मगदूम, प्रसाद पवार, प्रसाद सभासद, सूरज चाळके, कृष्णात पाटील, सूर्यकांत दोरुगडे, विनोद चव्हाण, सुजय कुमठेकर, प्रकाश खोत हे सर्व जण एकत्रितपणे काम करत आहेत. या सर्व लोकांच्या कामाची विभागणी केल्यामुळे आपापली नोकरी आणि शेती सांभाळून ग्रुपचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होते. ‘होय, आम्ही शेतकरी’ समूहाच्या फेसबुक पेजशी सुमारे सव्वा लाख शेतकरी जोडले आहेत. तसेच फेसबुकवरील ऊस उत्पादक समूहाला सुमारे दोन लाख शेतकरी जोडले गेले आहेत. त्याचसोबत समूहांमार्फत यूटय़ूब चॅनेल चालवले जात आहे. त्यामध्ये शेतीविषयक, दुग्धव्यवसाय, शेतीपूरक उद्योग, सरकारी धोरणे याविषयीचे व्हिडीओ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:03 am

Web Title: high tech farmers
Next Stories
1 आईची स्थित्यंतर
2 खबर राज्यांची : तांडा स्थिरावतोय… (तमिळनाडू)
3 स्क्रीन टाइम नव्हे, ‘कोकेन’
Just Now!
X