एखादं उंची हॉटेल किंवा टिपिकल कॉटेजपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर दक्षिण भारताच्या  अभयारण्यातले ट्री हाऊसेस हा हनिमूनर्ससाठी भन्नाट पर्याय आहे.

हनिमून म्हटले की, डोळ्यासमोर मॉरिशस, स्वित्र्झलड, अंदमान, काश्मीर, सिमला, कुलू-मनाली अशीच ठिकाणे येतात. अनेक टूर कंपन्या आपल्या हनिमून टूर्स अशाच ठिकाणी घेऊन जातात. आमचे लग्न ठरल्यावर हनिमूनसाठी कुठे जायचे याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही दोघेही वन्यजीव छायाचित्रकार! निसर्गाच्या सान्निध्यात जास्त रमणारे. साहजिकच नेहमीची तीच ती प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा, माणसांपासून दूर, जंगलामध्ये शांत, निवांतपणा अनुभवावा, असे एखादे ठिकाण शोधत होतो.

मी वन्यजीव चित्रण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी फिरले. तसेच भारताबाहेरील आफ्रिका, श्रीलंका, अमेरिका अशा देशांतील जंगलांनाही भेटी दिल्या होत्या. भारतातील प्रसिद्ध अशा कॉर्बेट, काझिरंगासारख्या अनेक वन्यजीव अभयारण्याजवळ अनेक सोयीसुविधांनी युक्त अशी भरपूर रिसॉर्ट्स आहेत. त्यांच्याकडेदेखील विशेष हनिमून पॅकेजेस मिळतात, मात्र हल्ली या सर्वच ठिकाणांचे अति व्यापारीकरण झाले आहे. त्यातच अशा अभयारण्याकडे इतर पर्यटकांचा लोंढादेखील तुलनेने खूप असतो. त्यामुळे तो पर्याय आम्ही बादच केला. एकदा आफ्रिकेत गेले असताना मातीने बांधलेल्या कॉटेजमध्ये राहिले होते. संपूर्णपणे लाकडाने बांधलेल्या लॉगहटमध्येही राहिले होते. त्यामुळे हनिमूनला जाताना नेहमीच्या हॉटेलपेक्षा असं काहीतरी वेगळे ठिकाण असावे असेच आम्हाला वाटत होते.

त्या दृष्टीने आमचा शोध सुरू झाला. अर्थातच भारतातल्या दक्षिणेतील जंगलांचा विचार सुरू झाला. उंची रिसॉर्ट किंवा टिपिकल कॉटेज आम्हाला नको होतं. म्हणूनच ट्री हाऊस (झाडावर बांधलेली खोली) मिळते का पाहू लागलो. केरळमधील वायनाड येथे ट्री हाऊस असलेले रिसॉर्ट मिळाले; पण किंमत जास्त असल्याने अन्य पर्याय शोधणे भाग होते. पण त्या रिसॉर्टची छायाचित्रं पाहताना भारतातदेखील इतके उंची असं काही असू शकते याची जाणीव झाली.

तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतरांगांतील मदुमलाई नॅशनल पार्कमध्ये अनेक रिसॉर्ट्स वेगळेपणा जपून असल्याचे माहीत होते. कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यांना लागून असणाऱ्या या नॅशनल पार्कचे पाच भाग आहेत. मसिनागुडी, थेपाकडू, मदुमलाई, करगुडी आणि नेनाकोटा. मसिनागुडी येथील एक रिसॉर्ट आम्ही ऑनलाइनच शोधले. भारतातील ‘टॉप टेन ट्री हाऊस रिसॉर्ट्स’ मध्ये याचा समावेश होतो अशी माहितीदेखील मिळाली. तिथले ट्री हाऊस, त्याचे फोटो सर्वच आवडले. किंमतही योग्य असल्याने आम्ही त्यांचे हनिमून पॅकेज बुक केले.

कालिकत विमानतळावरून मसिनागुडी १३० कि.मी. आहे. तेथून गाडीने चार तासात मसिनागुडीला पोहोचलो. आजूबाजूला उंच निलगिरी पर्वतरांग, वळणदार रस्ता, चहुबाजूला पसरलेले हिरवेगार जंगल, सर्वच खूप सुंदर! रिसॉर्टची जागा खूपच सुंदर होती. सगळीकडे झाडी व काही झाडांवर नारळांपासून बनवलेली पक्ष्यांसाठीची घरटी लटकत होती. दुपारची दोनची वेळ होती; पण अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते.

या रिसॉर्टला हनिमून ट्री हाऊस, फॅमिली ट्री हाऊस, स्कायस्क्रॅपर ट्री हाऊस, एक्सक्लुसीव ट्री हाऊस, ट्विन ट्री हाऊस असे ट्री हाऊसचे पाच प्रकार आहेत. आम्ही हनिमून ट्री हाऊस बुक केले होते. आमच्या ट्री हाऊसपाशी पोहोचलो. आमच्या स्वागतासाठी जिन्याचे दोन्ही कठडे गुलाबी बोगनवेलीने सजवले होते. तिची नाजूक मोहक गुलाबी फुले वाऱ्यावर मंद डोलत होती. आमच्या गुलाबी जीवनाची चाहूल लागल्याने जणू ती खटय़ाळपणे हसत होती. थोडय़ा पायऱ्या चढून गेल्यावर एक प्लॅटफॉर्म होता. त्यावर एक छोटे टेबल व दोन खुच्र्या होत्या. त्याच्या शेजारूनच दुसरा जिना थेट ट्री हाऊसमध्ये जात होता.

संपूर्ण ट्री हाऊस बांबूने बांधलेले होते. ही वरची खोली जशी आम्हाला हवी अगदी तशीच होती. या खोलीला सिमेंटच्या भिंती नव्हत्या. लाकडाच्या भिंती, लाकडी जमीन, यामुळे एक नैसर्गिकपणा होता. लोखंडी ग्रीलच्या खिडक्या नव्हत्या. खिडक्या होत्या पण त्या चहूबाजूंनी पूर्णत: उघडय़ा! खिडक्यांना वेताचेच पडदे होते. ते गुंडाळून वर केल्यावर भोवतालचा निसर्ग आमच्याशी जवळीक साधत होता. इथे भिंतीवर कोणतेही लॅण्डस्केप नव्हते. चहुबाजूंनी दिसत होता तो साक्षात जिवंत निसर्ग!

झाडे आपला विशाल पर्णसंभार सांभाळत, फांद्या पसरून आमचे स्वागत करत होती. ट्री हाऊसच्या जवळून पाण्याचा झरा वाहत होता. त्याच्या खळाळत वाहणाऱ्या पाण्याने त्या रम्य वातावरणात संगीताचा ठेका धरला होता.

ट्री हाऊसच्या खालच्या खुच्र्यावर बसून बर्ड वॉचिंग खूप छान प्रकारे करता आले. बारबेट, फ्लायकॅचर्स, मिनीवेट्स, सनबर्ड्स, लीफ बर्ड असे अनेक पक्षी बघायला मिळाले. झऱ्याकाठी मुंगुसाची जोडीही बघायला मिळाली. त्याशिवाय तेथेच बसून हरणांचा कळपही बघितला.

संध्याकाळी कॅम्प फायरशेजारी बसलेलो असताना जंगलातून हरणांचा अलार्म कॉल ऐकायला येत होता. त्याचप्रमाणे ‘कॉलर्ड स्कूप आऊल’ या घुबडाचा आवाज व बेडकांचा आवाज तर येत होताच. दाट झाडीमुळे आकाश, त्यातील चांदण्यांची नक्षी दिसत नव्हती, पण मधूनच झाडावर चमचमणारे काजवे जणू उडत्या चांदण्यांचा भास निर्माण करत होते. एरवी ओरडणाऱ्या बेडकाचा आवाज किती कर्कश वाटतो, पण त्या रात्री त्या बेडकांच्या ‘डराव डराव’ने जणू त्या साऱ्या वातावरणात तबल्याचा ठेका धरला होता. आसपासचा निसर्ग जणू जिवंत झाला होता. अशा वातावरणात केलेल्या कॅण्डल लाइटची मजा काही औरच! ही मजा हॉटेलात कॅण्डल लाइट डीनरला कशी येणार?

सकाळची दुनिया तर काही औरच! सर्व जंगलच कोवळ्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाले होते. सगळीकडे विविध पक्ष्यांच्या आवाजांची जणू जुगलबंदीच सुरू होती. आजूबाजूच्या रम्य निसर्गाइतकाच रिसॉर्टमधील पाहुणचारही तितकाच आपुलकीचा होता. जेवण तर लाजवाबच! आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात अशी निसर्गाच्या कुशीत केल्याने झालेला आनंद अविस्मरणीय होता.

केव्हा जाल : ऑक्टोबर ते फेब्रुवारीकसे जाल : कालिकत -मसिनागुडी/ म्हैसुर-बंदीपूर-मसिनागुडी / कोएंबतूर-मसिनागुडी. मसिनागुडीला राहून बंदिपूर आणि मदुमलाईच्या जंगल सफारी करता येतील. तसेच मसिनागुडीलादेखील जंगल सफारी उपलब्ध आहेत.
वेदवती पडवळ – response.lokprabha@expressindia.com