12 July 2020

News Flash

पृथ्वीवर सजीव सृष्टी का निर्माण झाली?

विश्वात कुठेतरी जीवसृष्टी असूही शकेल, पण पृथ्वीवर ती निर्माण झाली याला काय कारणं आहेत?

सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रहाचं ताऱ्याभोवतीचं स्थान.

खगोल चक्र
प्रदीप नायक – response.lokprabha@expressindia.com

हे विश्व अब्जावधी दीर्घिका, त्यातले अब्जावधी तारे आणि त्यांच्याभोवतीचे अब्जावधी ग्रह यांनी तयार झालेलं आहे. विश्वात कुठेतरी जीवसृष्टी असूही शकेल, पण पृथ्वीवर ती निर्माण झाली याला काय कारणं आहेत?

केवळ सूर्यमालेतच नव्हे तर सूर्यमालेच्या परिसरातल्या शेकडो ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांपकी केवळ पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे. असं का? सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. त्यापैकी काहींचा आपण इथे ऊहापोह करू.

सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रहाचं ताऱ्याभोवतीचं स्थान. ताऱ्यापासून ग्रह विशिष्ट अंतरावर असेल तर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्यासारखं द्राव्य द्रव स्वरूपात आढळतं. पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर पाणी तिन्ही म्हणजे घन, द्रव आणि वायू स्वरूपात आढळू शकतं. ताऱ्यापासून ज्या अंतरावर ग्रहाच्या पृष्ठभागावर एखादे द्राव्य दीर्घकाळापर्यंत राहू शकतं आणि ज्या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते त्या अंतराला ‘हॅबिटेबल झोन’ असं म्हणतात. पृथ्वी सोडल्यास सूर्यमालेतला एकही ग्रह हॅबिटेबल झोन नाहीये.

दुसरा महत्त्वाचा घटक जो जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे पाणी. पाण्याला वैश्विक द्रावण- ‘युनिव्हर्सल सॉल्व्हन्ट’ असं म्हणतात. अनेक द्रव्यं पाण्यात सहज विरघळतात. पाणी हे एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण द्रव्य आहे. पाण्याचं विसंगत वर्तन, पाण्याची विशिष्ट उष्णता, क्षमता यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे सजीव निर्मितीसाठी हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली कारण पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात आहे. सजीव पाण्यातच  निर्माण झाले आणि पृथ्वीच्या आणि सजीवांच्या ४०० कोटी वर्षांच्या अस्तित्वापकी जवळजवळ ३५० कोटी वर्षे सजीव केवळ पाण्यातच होते. पाण्यासारखे गुणधर्म असलेलं दुसरं कोणतंही द्रव्य आपल्याला माहीत नाहीये.

सजीव सृष्टीसाठी तिसरा घटक बुद्धिमान आणि प्रगत असण्याचा आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आपापल्यापरीने बुद्धिमान आहे. ही बुद्धिमत्ता त्या सजीवांना स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी उपयोगी पडते. पण मानवानं त्याहीपलीकडे जाऊन वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती केली. सर्वात आधी आपण हे मान्य केलं पाहिजे की बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी सजीव बहुपेशीय असला पाहिजे. पृथ्वीवर केवळ ६० कोटी वर्षांपूर्वी बहुपेशीय सजीव निर्माण झाले. मानवाला उत्क्रांत होऊन फक्त ४० ते ५० लाख वष्रे झाली. या ५० लाख वर्षांपकी गेल्या १० ते २० हजार वर्षांत शेतीचा शोध, आगीचा शोध लागला आणि अलीकडच्या ४०० वर्षांत प्रचंड वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती झाली. या प्रगतीमुळे आपण परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहोत.

चौथा घटक ग्रहावरील खडकाळ जमिनीचा आहे. पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे. संपूर्ण पृष्ठभाग कायमचा पाण्याने व्यापला असता तर एका मर्यादेपलीकडे सजीव सृष्टी प्रगत होऊ शकली नसती. तांत्रिक प्रगती होण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते. खनिजांवर प्रक्रिया करून वेगवेगळी बांधकामं करण्यासाठी, साधनं निर्माण करण्यासाठी कठीण भूभाग असला पाहिजे. पृथ्वीवर आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्याचं कारण आपण म्हणजे सजीव पाण्यातून जमिनीवर आले, हे आहे. या स्थलांतरालादेखील जो खगोलीय घटक कारणीभूत आहे तो म्हणजे चंद्र. चंद्रामुळे पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओहोटी येते. त्यामुळेच पाण्यातले काही सजीव कालांतराने जमिनीवर येऊ शकले.

पृथ्वीभोवती असलेलं वातावरणाचं सुरक्षित कवच, गुरू-शनीसारखे अवाढव्य ग्रह ज्यांच्यामुळे धूमकेतू तसेच भटक्या लघुग्रहांचा अंतग्र्रहावरील बराचसा मारा अडवला जातो, अशा आणखी अनेक घटकांमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून आहे आणि उत्क्रांत होत आहे. परग्रहांवर हे सर्व घटक जुळून येऊन सजीव सृष्टी निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु विश्वातल्या अब्जावधी दीर्घिका, त्यातले अब्जावधी तारे आणि या ताऱ्यांभोवती असलेले अनेक अब्जावधी ग्रह यांचा विचार करता विश्वात अनेक ग्रहांवर सजीव सृष्टी असू शकेल. पण यापकी किती सजीव आपल्याशी संपर्क करण्याइतपत तांत्रिकदृष्टय़ा प्रगत असतील? कदाचित एकही नाही!?

पृथ्वीच्या विनाशाची चाहूल

आपल्या हे लक्षात आलंय का की गेल्या वर्षभरात ५० पेक्षा जास्त लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेले आहेत. ही संख्या गेल्या ४०-५० वर्षांशी तुलना करता खूपच जास्त आहे. हा योगायोग आहे की खरंच पृथ्वीचा विनाश जवळ येतोय? की उगाचच काहीजण या घटनेचा बाऊ करत आहेत? खगोल मंडळाचे खगोल अभ्यासक अभय देशपांडे यांच्या मते सातत्याने प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे खूप लहान आकाराच्या लघुग्रहांचा मागोवा घेणे आता शक्य झालं आहे. त्यामुळे अर्थातच अशा लघुग्रहांच्या शोधाची संख्याही वाढत आहे.

आपल्या सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरू ग्रहाच्या मधल्या अवकाशात असलेल्या लघुग्रहांच्या पट्टय़ाच्या व्यतिरिक्त इतस्तत: भटकणारे हजारो-लाखो लघुग्रह आहेत. त्यांचे आकार पाच मीटरपासून ५० किलोमीटपर्यंत आहेत. यातले काही लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेला छेदतात. असे सुमारे २० हजार लघुग्रह आहेत आणि यात सातत्याने भर पडत आहे. जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत ५५ लघुग्रह पृथ्वीजवळून गेले. यातले काही लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेल्यानंतर शोधले गेले. यापकी एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर प्रचंड उत्पात झाला असता. यांच्या आघाताची शक्ती हिरोशिमा-नागासाकी अणुबॉम्बच्या शक्तीपेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. अर्थात ही विनाशी शक्ती लघुग्रहाच्या आकारावर अवलंबून आहे. २०१३ मध्ये रशियात चेल्यािबस्क येथे एका मोठय़ा अशनीचा वातावरणातच स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की कित्येक किलोमीटर अंतरावरील घरांच्या काचा फुटल्या. अनेक जण जखमी झाले. एका अंदाजानुसार हा २० मीटर आकाराचा लघुग्रह होता.

गेल्या महिन्यात २५ जुलला १०० मीटर व्यासाचा एक लघुग्रह पृथ्वीच्या खूप जवळून गेला. विशेष चिंतेची गोष्ट म्हणजे हा लघुग्रह ६५ हजार किलोमीटर अंतरावरून जात असताना शास्त्रज्ञांच्या तो नजरेस पडला. म्हणजे शास्त्रज्ञांना या लघुग्रहाची काहीच माहिती नव्हती. खगोलशास्त्राच्या दृष्टीने ६५ हजार किलोमीटर हे अंतर अत्यंत नगण्य आहे. फेकलेला दगड माणसाच्या केसाला स्पर्शून जाण्याएवढं हे अंतर आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर दाट वस्तीच्या शहरात आदळला असता तर हिरोशिमा अणुबॉम्बच्या १० लाख पट ऊर्जा मुक्त झाली असती. ५० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात कोटय़वधींची जीवितहानी झाली असती.

साडेसहा कोटी वर्षांपूर्वी दहा किलोमीटर व्यासाच्या लघुग्रहाच्या आघाताने डायनोसॉरच्या सर्व प्रजातींसह अनेक प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या. अशा एखाद्या लघुग्रहाच्या आघातापासून आपल्याला स्वत:चा बचाव करायचा असेल तर निदान पाच वर्षे आधीपासून तयारी करावी लागेल. पण २५ जुलसारख्या अचानक येणाऱ्या लघुग्रहांचं काय? येत्या ९ सप्टेंबरला ४० मीटर व्यासाचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. त्याची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आठ हजारांत एक आहे. अशा लघुग्रहांपकी पाच ते दहा किलोमीटर व्यासाचा लघुग्रह पृथ्वीचा विनाश नाही, पण मानवाच्या प्रजातीसह अनेक प्रजाती कायमच्या नष्ट करू शकेल.

मंगळ पृथ्वीपासून किती अंतरावर आहे?

या प्रश्नाचं उत्तर वाटतं तितकं सरळ नाही. मंगळ आणि पृथ्वी हे दोन्ही ग्रह सूर्याभोवती फिरतात. दोन्ही ग्रह आपापल्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. कधी हे ग्रह एकमेकांच्या बरेच जवळ असतात तर कधी सूर्याच्या विरुद्ध दोन दिशेला असताना प्रचंड दूर असतात. पृथ्वीसापेक्ष मंगळ सूर्याच्या विरुद्ध दिशेला आला तर आपण त्याला मंगळाची प्रतियुती असं म्हणतो. साधारणपणे दर दोन वर्षांनी मंगळाची प्रतियुती होते. या प्रतियुतीच्या वेळी मंगळ रात्रभर आकाशात दिसतो आणि तुलनेने खूप तेजस्वी दिसतो. या वेळी मंगळ पृथ्वीपासून केवळ पाच कोटी ४६ लाख किलोमीटर अंतरावर असू शकतो. याविरुद्ध दोन्ही ग्रह सूर्यसापेक्ष एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात तेव्हा त्या दोघांमधील अंतर ४० कोटी किलोमीटर असू शकतं.

नोंद :

श्वेतखुजा प्रकारचे तारे म्हणजे सूर्यासारख्या ताऱ्यांचे मृत अवशेष.  साधारणपणे १० ते १५ हजार किलोमीटर व्यासाच्या या ताऱ्यांमध्ये सूर्याएवढं वस्तुमान सामावलेलं असल्यामुळे त्याची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा दहा लाख पटीने जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 1:02 am

Web Title: how life originated on earth
Next Stories
1 गणेशपूजनाची परंपरा
2 मी मुख्यमंत्री म्हणून परत येतोय – देवेंद्र फडणवीस
3 अफगाणिस्तान अधिक महत्त्वाचे
Just Now!
X