18 February 2019

News Flash

पैसे योग्य ठिकाणी कसे गुंतवावेत?

सोपे  आणि फायदेशीर असे गुंतवणुकीचे पर्याय...

गृहिणी या खरं तर मुळातच चांगल्या तऱ्हेने बचत करणाऱ्या असतात. कमीत कमी पैशात घर चालवून बचत कशी करता येईल, हे त्यांना नीट माहीत असतं.

किरण हाके – response.lokprabha@expressindia.com
आपल्याकडे असलेल्या पैशातून सोनं घेऊन ठेवणं, भिशीमध्ये पैसे गुंतवणं असे प्रकार गृहिणी करत असतात. पण यापेक्षा सुरक्षित, सोपे  आणि फायदेशीर असे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.

गृहिणी या खरं तर मुळातच चांगल्या तऱ्हेने बचत करणाऱ्या असतात. कमीत कमी पैशात घर चालवून बचत कशी करता येईल, हे त्यांना नीट माहीत असतं. परंतु अशा प्रकारे परिश्रम घेऊन वाचविलेल्या पशांची त्या भिशी, चिटफंड अथवा सोनाराकडे महिन्याच्या हप्त्याच्या स्वरूपात गुंतवणूक करतात. अशा प्रकारच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची मुख्यत: कारणे पुढीलप्रमाणे असतात –

  • हे पैसे रोकड स्वरूपात गुंतवता येतात.
  • कोणताही कागदोपत्री व्यवहार करावा लागत नाही.
  • लहान लहान रकमेची रोकडही येथे स्वीकारली जाते.
  • असा व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत सहज पोहोचता येते.

यामुळे भिशी, चिटफंड यासारखे गुंतवणूक पर्याय त्यांना सहजसोपे विनाकटकटीचे वाटतात व म्हणूनच गुंतवणुकीसाठी त्या यातले पर्याय निवडतात. परंतु हे गुंतवणूक पर्याय सहज सोपे वाटले तरी ते धोकादायक ठरू शकतात. अशा गुंतवणुका या कुठल्याही कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्यामुळे त्यात फसवणूक होऊन नुकसान सोसावे लागले तर, कितीही लहान किंवा मोठी रक्कम असली तरी कोणताही कायदा तुम्हाला मदत करू शकत नाही व झालेले नुकसान भरून देऊ शकत नाही. संसारात काटकसर करून जमा केलेले पैसे अशा प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतविण्याआधी थोडा विचार करा. तसेच भिशीवर कुठलेही व्याज मिळत नाही किंवा नफा होत नाही. फक्त भरलेली रक्कम एकरकमी परत मिळते. चिटफंडसारख्या गुंतवणुकीत व्याज देण्यात येत असले तरी संबंधितांनी त्यामध्ये गुंतवलेले पैसे परत नाही दिले तरी तुम्ही काहीच करू शकत नाही. तसंच चिटफंडसारखी गुंतवणूक केल्यावर पैसे भरल्याच्या पुरावा म्हणून जे काही जे काही सर्टिफकेट अथवा कागदपत्र देतात ते एकदा वाचून पाहा. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या कराराप्रमाणे अटी आहेत किंवा नाही हे तपासा. आपण विचार करतो की सर्टिफकेट मिळाले म्हणजे झाले. पण ते चुकीचे असेल तर ते असण्याला काहीच अर्थ उरात नाही.

काही भगिनी सोनाराकडेही भिशी करतात. सोनाराकडे त्या दरमहा असे १२ महिने जे पैसे भरतात, त्यात १३ वा हप्ता सोनार भरतो. हा आपला फायदा आहे, असे या भगिनींना वाटत असते. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ती एका हप्त्याची रक्कम त्यांनी गुंतवलेल्या एकूण रकमेच्या बाजारातील व्याज दरापेक्षाही कमी असते? म्हणजेच हे पैसे त्यांनी रिकिरग डिपॉझिट करून बँकेत जमा केले असते तरीही त्या जादाच्या मिळालेल्या एका हप्त्याच्या रकमेपेक्षा व्याज जास्त असले असते. शिवाय, शेवटी जमा झालेल्या रकमेएवढे सोने त्या सोनाराकडून घेतात. त्या काळात त्यांना काही वैयक्तिक अडचण आली तर पैशाच्या स्वरूपात परतावा मिळत नाही. पुढे काही वर्ष त्यांनी सोनाराकडची भिशी अशीच ठेवली तर त्याला एक कायमचं गिऱ्हाईक मिळतं. काही वर्षांनी त्या ते सोने घेऊन त्याच सोनाराकडे एखादा दागिना बनविण्यासाठी गेल्या, तर तो सोनार ते सोने घेऊन दागिना तयार करून देतो. ते करताना त्यात आणखी करणावळ किंवा मजुरी जोडतो. परिणामी दिलेल्या सोन्यापेक्षा कमी वजनाचा दागिना घ्यावा लागतो. आता यात फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचं? दुकानदार त्याचा फायदा बघणारच. परंतु आपले काही नुकसान तर होत नाही ना, याकडे आपणच जरा लक्ष द्यायला हवे.

त्यामुळे गुंतवणूक करताना ती गुंतवणूक कायद्याअंतर्गत आहे किंवा नाही हे जरूर पाहावे. कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुंतवणुकीत केवायसी करणे बंधनकारक असते. आपला ओळख व पत्ता रजिस्टर करून घेण्यासाठी ‘केवायसी’ ही एक कार्यपद्धती आहे. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड (ओळखीसाठी) व आधार कार्ड (ओळख व पत्ता दोन्हीसाठी) बरोबर असले पाहिजे. त्यामुळे तुमच्या नावाने झालेली गुंतवणूक तुमच्याशिवाय कोणालाही दिली जात नाही. हे दोन महत्त्वाचे दस्तावेज बरोबर असतील तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत. व अशा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुंतवणुकींमध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते. समजा झालीच तरी केवायसी व इतर गुंतवणुकीचे पुरावे तुमच्याजवळ असल्यामुळे तुम्ही कायदेशीर कार्यवाही करून आपले पसे परत मिळवू शकता.

गुंतवणूक ही भविष्यात लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून केली जाते; जेणेकरून ज्या कारणासाठी ही गुंतवणूक आपण करत आहोत ती कालांतराने वृद्धिंगत होऊन आपल्या गरजेप्रमाणे ते पसे आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु वर उदाहरण दिले आहे, तशा माध्यमातून केलेली गुंतवणूक नुकसानकारकच असेल. अशा गुंतवणुकीचा फायदा होणार नाहीच, कदाचित झाले तर नुकसानच सोसावे लागेल. हे नुकसान छुपे असल्यामुळे ते सहज लक्षात येत नाही. त्यामुळे हे गणित आपण सहसा विचारात घेत नाही. थोडा समंजसपणे विचार करून गुंतवणूक करायची ठरविल्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणादाखल काही ध्येय पुढे ठेवून त्याप्रमाणे निवडता येणारे गुंतवणूक पर्याय पुढे देत आहे. तरी आपल्या भविष्यातील गरजांप्रमाणे योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे अधिक चांगले.

वर्षांतून एकदा येणाऱ्या खर्चासाठी बँक आरडी किंवा म्युच्युअल फंडमधील एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) जिथे दर महिन्याच्या ठरावीक तारखेला ठरावीक रक्कम एक किंवा दोन वर्षांसाठी गुंतवू शकता.

चार ते पाच वर्षांनंतर मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या मोठय़ा खर्चासाठी बँक एफडी अथवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

सेवानिवृत्तीसाठी नोकरी व्यवसायात असेपर्यंत दर महिन्याला काही रक्कम दीर्घकालीन म्युच्युअल फंडमधील एसआयपीमध्ये करू शकता, शिवाय पीपीएफ किंवा नवीन पेन्शन योजने (एनपीएस) मध्ये गुंतवू शकता.

सर्वात आधी तुमचे गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा. तुम्ही करत असलेली गुंतवणूक तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी वापरणार आहात, हे पक्कं ठरवा. त्यामुळे आíथक सल्लागार तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे योग्य तो गुंतवणूक पर्याय सुचवू शकेल. आपली पिळवणूक करू देऊ नका. बदलत्या काळानुसार गरजा जशा बदलत चालल्या आहेत तसेच त्या पूर्ण करण्यासाठी नवीन नवीन पर्यायही उपलब्ध होत आहेत. गृहिणींनो सतर्क राहा, जागरूक राहा. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच आहे, ‘आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन अचिव्हड’ यामुळे, या गोष्टी आवाहनात्मक वाटल्या तरी शिकण्याची जिद्द ठेवा. समजून घेतले तर अवघड काहीच नाही. आपल्या घरातली पुढची पिढी आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालते. तुम्ही योग्य पावले उचला, पुढची पिढी आपोआप अर्थसाक्षर घडेल.

(लेखक आर्थिक नियोजनातील पात्रताधारक असून ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on July 27, 2018 1:04 am

Web Title: how to invest money properly