सचिन दिवाण – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
जम्मू-काश्मीरमधील हिवाळा म्हणजे सर्वत्र बर्फाची चादरच. पण याच बर्फाच्या चादरीवर गेल्या काही वर्षांत आइस हॉकीचा अनोखा खेळ विकसित झाला आहे. इतकेच नाही तर लेहमधील संघ आइस हॉकीच्या मोठय़ा स्पर्धामध्ये उतरत आहेत.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यांतील बर्फाचे वर्णन करताना भारतीयांच्या मनांत १९६२ सालच्या चिनी आक्रमणाच्या आणि १९९९ सालच्या कारगिल युद्धाच्या आठवणी जाग्या होतात. ‘बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते’ या काव्यपंक्ती चिनी युद्धाच्या वेळी गाजल्या होत्या. मात्र जे हिमकडे आजवर आपल्या सैनिकांच्या रक्ताने सिंचले गेले त्यांच्याच पायथ्याशी आता नवा खेळ मांडला जात आहे. हिवाळ्याच्या मोसमात जम्मू-काश्मीरमधील पर्वतरांगा हिमाच्छादित होतात. सरोवरे, नद्या-नाले गोठतात. मैदानांवर बर्फ साचलेले असते. क्रिकेट, फुटबॉलसारखे मैदानावरील पारंपरिक खेळ खेळणे शक्य होत नाही. मात्र यातून एक नवी संधी राज्याला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वर्षांच्या अन्य काळात पर्यटन बहरलेले असतेच. आता गोठवणाऱ्या थंडीतही तेथे पर्यटकांचा अव्याहत ओघ सुरू आहे. त्याला कारण आहे तेथील साहसी खेळ आणि पर्यटनाच्या (अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स आणि टुरिझम) संधींचे. या काळात तेथे आइस हॉकी, स्कीइंग, आइस स्केटिंग, स्लेजिंग यांसारख्या खेळांचा बहर येतो. त्यामुळेच जम्मू-काश्मीरची आता आइस हॉकीचे नंदनवन अशी नवी ओळख तयार होत आहे.

गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये काही अपवाद वगळता एकंदर दहशतवाद नियंत्रणात राहिला आहे. त्यामुळे पर्यटनाला अनुकूल वातावरण पुन्हा तयार होऊ लागले आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राइक्स आणि बुरहान वाणी या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती काहीशी चिघळली असली तरी राज्याच्या लेह-लडाख आणि अन्य प्रदेशात तुलनेने शांतता आहे. याचा फायदा पर्यटनाला मिळत आहे. यंदाच्या हंगामासह गेल्या काही वर्षांत राज्यात हिमवृष्टीही चांगली होत आहे. त्याचा वापर करून लडाख, कारगिल, द्रास, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आदी ठिकाणी बर्फातील खेळ खेळण्याच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी आता अनेक देशी-विदेशी खेळाडू, पर्यटक कडक हिवाळ्यातही काश्मीरला भेट देत आहेत.

आइस हॉकी हा खेळ भारतीयांना तसा नवा आहे. पण राज्याच्या अनेक भागांत आता आइस हॉकीने चांगलेच मूळ धरले आहे. त्यामुळे देशाच्या हॉकी संघातही जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंचा प्रामुख्याने भरणा असतो. त्यात लडाखने विशेष आघाडी घेतली आहे. लडाखचा प्रदेश भौगोलिकदृष्टय़ा फ्रोझन ड्राय डेझर्ट म्हणून ओळखला जातो. येथील भूप्रदेश उघडा-बोडका आहे. झाडे सहसा दिसत नाहीत. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा आणि वैराण प्रदेश. त्याचेही अनोखे सौंदर्य आहे. त्यात काश्मीर खोऱ्यापेक्षा येथे खूपच शांतता आहे. वस्ती प्रामुख्याने बौद्ध आहे आणि अनेक बौद्ध मठ पर्यटकांना आकर्षित करतात. साहसी पर्यटकांना आणि बाइकर्सना हा प्रदेश नेहमीच खुणावत आला आहे. त्यात आता आइस हॉकीची भर पडत आहे.

स्थानिक प्रशासनाबरोबरच सीमावर्ती भागातील सुरक्षा दले आणि पोलिसांनी हा खेळ सामान्य नागरिकांमध्ये रुजवण्यास मदत केली आहे. त्यामुळे आता कारगिल, द्रास, लेह येथे घरोघरी आइस हॉकी खेळणारे उत्साही तरुण-तरुणी तयार होत आहेत. त्यातून चांगल्या खेळाडूंचीही जडणघडण होत आहे. लडाख वुमेन आइस हॉकी फाऊंडेशन (एलडब्ल्यूआयएचएफ) आणि स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (एमईसीएमओएल) यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षी जानेवारीत लडाखच्या लेहपासून जवळच असलेल्या गुफुक आइस हॉकी रिंकवर १८ वर्षांखालील १२० मुलींसाठी आइस हॉकी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात या मुलींना खेळाची मूलभूत आणि प्रगत कौशल्ये शिकवण्यात आली. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल (एलएएचडीसी) मार्फत आइस हॉकीच्या प्रसारासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत.

यंदा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत कारगिल पोलिसांनी कारगिल आइस अँड स्नो स्पोर्ट्स क्लबच्या (केआयएसएससी) संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आइस हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच जम्मू-काश्मीर पोलीस सब-ज्युनिअर आइस हॉकी चँपियनशिपचा उद्घाटन सोहळा कारगिलजवळ बेमाथांग आइस हॉकी रिंकवर आयोजित करण्यात आला.

लडाखमधील चुशुल भागात १९६२ च्या युद्धात जोरदार लढाई झाली होती. भारतीय जवानांच्या असाधारण बलिदानामुळे चुशुल आणि रझांगला ही ठिकाणे भारतीयांच्या स्मरणात आहेत. आता तेथे आइस हॉकी फुलू लागली आहे. चुशुलजवळील चिब्रा या ठिकाणी फेब्रुवारीच्या सुरुवातीला तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा भरत आहे. त्यात अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि स्लोव्हाकियासह लडाखचाही संघ सहभागी होत आहे. या संघांचे साधारण १०० खेळाडू तेथे पोहोचले आहेत. त्यांचे खेळाचे साहित्य श्रीनगरहून हवाईमार्गे तेथे पोहोचवण्यात आले आहे. चिब्रा लडाखमध्ये लेहच्या पूर्वेला १६० किमी अंतरावर वसले आहे. तेथे पोहोचण्यासाठी समुद्रसपाटीपासून १७,००० फूट उंचीवरील चांग ला खिंड पार करून जावे लागते. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंचावरील वाहन जाऊ शकेल अशी खिंड (सेकंड हायेस्ट मोटरेबल पास) आहे. आइस हॉकीमुळे तेथे गेल्या काही दिवसांत तेथे ४०० हून अधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे.

स्थानिक प्रशासन, लष्कर, पोलीस यांच्या जोडीने आइस हॉकी असोसिएशन ऑफ जम्मू अँड काश्मीर, कारगिल आइस अँड स्नो स्पोर्ट्स क्लब, हिमालयन स्पोर्ट्स अँड कल्चरल ऑर्गनायजेशन आदी संघटनांनी एकत्र येऊन गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आदी भागांतही आइस हॉकी रुजवली आहे. पहलगामच्या नुनवान येथे आणि गुलमर्गला आइस स्केटिंग रिंक तयार झाली आहे. येथे मैदानाला छतासह आकर्षक प्रकाश योजनेचीही सोय आहे. येथेही हिवाळ्याच्या मोसमात देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आइस हॉकीने जम्मू-काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाला वर्षभर कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आइस हॉकी कशी खेळतात…

आइस हॉकीसाठी बर्फाच्छादित मैदानाची गरज असते. त्यावर नेहमीप्रमाणे दोन संघ हॉकी खेळतात. नेहमीच्या हॉकीप्रमाणेच एक संघाने दुसऱ्या संघावर गोल करायचा असतो. त्यासाठी मैदानावर गोल पोस्ट असतात. मात्र नेहमीच्या हॉकीपेक्षा आइस हॉकीच्या स्टिक्स थोडय़ा वेगळ्या आकाराच्या असतात. तसेच हॉकीच्या कठीण बॉलऐवजी येथे रबराच्या चपटय़ा सोंगटीचा वापर करतात. तिला ‘पक’ असे म्हणतात. ‘पक’ साधारण १५० ते १७० ग्रॅम वजनाची आणि काळ्या रंगाची असते. खेळाडूंना बर्फात संचार करण्यासाठी स्केट्स आणि उबदार कपडे वापरावे लागतात. पायात स्केट्स घालून गोठलेल्या बर्फावरून वेगाने घसरत, फिरत, प्रसंगी अचानक थांबत प्रतिपक्षावर गोल नोंदवण्याचा वेगळाच थरार या खेळात अनुभवता येतो.
छायाचित्र : आत्माराम परब