उन्हाळा आला की अनेकांना थंड हवेच्या ठिकाणी जायचे वेध लागतात. कुणाला कुलू मनालीला जायचं असतं, कुणाला नैनितालला, तर कुणाला जम्मू काश्मीरला. आपल्या उन्हाळ्यात या सगळ्या बाहेरच्या ठिकाणी असणाऱ्या बर्फाचं अनेकांना आकर्षण असतं. आता ऐन उन्हाळ्यात हाच बर्फ आपल्या अगदी जवळ, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर, खोपोलीजवळ असलेल्या इमॅजिकामध्ये अनुभवायला मिळणार आहे, अ‍ॅडलॅब इमॅजिकाने अ‍ॅक्मे एन्टरटेन्मेंटबरोबर सुरू केलेल्या स्नो पार्कमध्ये.

कंटाळा आला तर पूर्वी लोक मुलांना घेऊन एखाद्या पार्कमध्ये जायचे. आता मॉलमध्ये फिरतात, एखादा सिनेमा बघतात, पण त्यापलीकडे त्यांच्याकडे मनोरंजनाचे फारसे पर्याय उपलब्ध नसतात. अ‍ॅडव्हेंचर पार्क उभं करून अ‍ॅडलॅब इमॅजिकाने लोकांना मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध करून दिला. तिथे आता अ‍ॅडव्हेंचर गेम्स, वॉटर स्पोर्ट्स आणि बाकी सगळ्या मौजमजेबरोबरच आता स्नो पार्कची भर पडली आहे. ३० हजार स्क्वेअर फूट एवढय़ा जागेत विस्तारलेलं हे भारतातलं सगळ्यात मोठं स्नो पार्क आहे, असा इमॅजिकाचा दावा आहे. पर्यटकांच्या आरोग्याला प्राधान्य देत इथलं बर्फ डिस्टिल्ड वॉटरमध्ये तयार केलं जातं, त्यात कोणतीही घातक रसायनं किंवा प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् नसतात, असं अ‍ॅडलॅबचे संचालक कपिल बागला सांगतात.

या स्नो पार्कमधलं तापमान उणे पाच (मायनस फाइव्ह) ठेवण्यात आलं आहे. सकाळी दहा वाजल्यापासून स्नो पार्कमध्ये जाता येतं. तिथे दर ४५ मिनिटांचं एक सेशन असतं. प्रत्यक्षात स्नो पार्कमध्ये तुम्ही ३० मिनिटंच असता. उरलेली पंधरा मिनिटं जर्किन, बूट, हातमोजे घालणं, प्रत्यक्ष पार्कमध्ये शिरण्याआधी थोडं थंड हवेशी अ‍ॅक्लमटाइज होणं यासाठी लागतात. आत घालून जाण्यासाठी जर्किन, बूट, हातमोजे हे सगळं इमॅजिकाकडूनच पुरवलं जातं. एकदा वापरून झाल्यावर हे सगळं दर तासांनी धुऊन स्वच्छ केलं जातं. उणे पाच अंश तापमानात आपण तीसेक मिनिटंच आरामात थांबू शकतो, त्याहून जास्त काळ थांबलं तर त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा वेळ निश्चित करण्यात आला आहे. आत गेल्यावर आपण प्रत्यक्ष बर्फात उतरतो. तिथे एक एस्किमो लोकांचं इग्लू तयार केलेलं आहे. त्यात आत जाऊन आपण इग्लू कसं असतं, याचा अनुभव घेऊ शकतो. पेंग्विन, बर्फातलं अस्वल यांच्या प्रतिकृतींबरोबर फोटो काढून घेऊ शकतो. बर्फाची सुंदर स्क्लप्चर पाहू शकतो. बर्फातला व्हॉलीबॉल, राफ्टिंग, माऊंटन क्लायंबिंग, बर्फाचे गोळे करून एकमेकांवर टाकणं, बर्फावरून घसरगुंडी हे सगळे खेळ तिथे खेळता येतात. डान्स फ्लोअरवर डान्स नृत्य करता येतं. त्यासाठी तुम्हाला ठेका धरायला लावेल असं संगीत सुरू असतं. वरून भरपूर बर्फ भुरभुरत असतो. वातावरण मस्त थंड असतं. त्यामुळे आसपास असलेल्या स्नो कॅफेमधून गरमागरम चहा, कॉफीचा, खाद्यपदार्थाचा आस्वादही घेता येतो. तुमच्याबरोबर असलेल्या ज्येष्ठ मंडळींना बर्फात उतरायचं असेल तर त्यांच्यासाठी प्रेक्षक गॅलरी आहे. तिथे बसून ते तुमची मौजमजा बघू शकतात. लहान मुलांसाठी खेळ,मौजमजेबरोबरच बर्फ कसा तयार होतो, इतक्या थंड हवेत कसं तग धरून राहायचं, कसं वावरायचं, इग्लू कसं असतं, तिथे एस्किमो लोक कसे वावरतात हे शिकण्यासाठी स्नो पार्क ही चांगली संधी आहे.
response.lokprabha@expressindia.com