04 July 2020

News Flash

खाल तसे व्हाल…

सध्या खाद्यपदार्थाबाबत ‘ऑरगॅनिक’ हा परवलीचा शब्द झाला आहे.

अन्नधान्याच्या अतिरिक्त उत्पादनासाठी रसायनांचा अवाजवी वापर केल्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्रगत देशांत जागरूकता वाढू लागली आहे. त्याबाबत आपल्या देशातली परिस्थिती आधीच गंभीर आहे. आपण कधी जागे होणार?

सध्या अमेरिकेतच नव्हे तर जवळपास इतर सर्व विकसित देशांमध्ये खाद्यपदार्थाबाबत ‘ऑरगॅनिक’ हा परवलीचा शब्द झाला आहे. जे जे ऑरगॅनिक आहे ते आरोग्यासाठी चांगलं आहे यावर आता विकसित देशातली जनता गाढ विश्वास ठेवू लागली आहे. ऑरगॅनिक खाद्यपदार्थाना अर्थातच प्रचंड मागणी आहे, तर मागणीप्रमाणे पुरवठा वाढवून आणि अशा वस्तूंच्या किमतीही चढय़ा ठेवून संबंधित कंपन्या स्वत:चं उखळ पांढरं करत आहेत.

मूलत: ऑरगॅनिक हा शब्द रसायनशास्त्राशी संबंधित आहे. मात्र ‘ऑरगॅनिक फूड’मधल्या ‘ऑरगॅनिक’ या शब्दाचा रसायनशास्त्रामधल्या ‘ऑरगॅनिक’ या शब्दाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.

‘ऑरगॅनिक फूड’ म्हणजे नक्की काय? तर कोणतीही रासायनिक द्रव्ये उदा. अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटक वा जंतुनाशके, रोग रोखण्यासाठी वापरलेली प्रतिजैवके (antibiotic), मांसवृद्धीसाठी वापरलेली संप्रेरके (growth hormones) इत्यादींचा वापर न करता नैसर्गिकरीत्या पिकवण्यात वा त्यापासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ हा ‘ऑरगॅनिक फूड’ या संकल्पनेचा शब्दश: अर्थ होऊ शकतो. ऑरगॅनिकसाठी मराठीत सेंद्रिय हा शब्द वापरला जातो.

वनस्पती जगताकडून मिळणारे विविध प्रकारचे खाद्य हा निसर्गाने मानवासह इतर प्राणिमात्रांना त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी बहाल केलेला आवश्यक असा अन्नाचा मुख्य स्रोत आहे. यात सर्व प्रकारच्या वनस्पती, झाडे, पाने, फळे, फुले, भाज्या, फळभाज्या, फळे त्याचबरोबर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरीसारखी मानवाने विकसित केलेली धान्ये, विविध डाळी व कडधान्ये यांचा अंतर्भाव होतो.

तर प्राणिजन्य खाद्यपदार्थ हे मानवाने स्वत:च्या निरीक्षणशक्तीचा व बुद्धीचा वापर करून स्वत:साठी तयार केलेले अन्न आहे. यात दूध व त्यापासून बनविण्यात आलेले दही, पनीर, चीज, खवा इ. दुग्धजन्य पदार्थ व अंडी, मांस, मासे यांसारख्या प्राणीजन्य खाद्यपदार्थाचा अंतर्भाव होतो.

वनस्पती आणि प्राणिजगताकडून मिळणारे खाद्य मानवास खाण्यायोग्य होण्यासाठी ठरावीक कालावधी आवश्यक असतो. शिवाय वनस्पती आणि प्राणी यांची होणारी वाढ ठरावीक काळात विशिष्ट मर्यादेतच होते. उदाहरणार्थ गाईची वाढ पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागतो, तर गर्भधारणेनंतर २८० ते २९० दिवसांत वासरू जन्माला येतं. गाई-म्हशींपासून मिळणारे दूध वासरांच्या जन्मानंतरच निर्माण होऊ  शकतं. अशी होणारी दूधनिर्मिती ही गाई-म्हशींना झालेल्या वासरांसाठी निसर्गाने उत्पन्न केलेलं अन्न आहे.

आजची ‘ऑरगॅनिक फूड’बाबतची उभी झालेली चळवळ ही का चालू झाली? याचं एकमेव कारण म्हणजे खाद्यपदार्थाच्या उत्पादनाचे दुर्दैवाने झालेले औद्य्ोगिकीकरण! दुर्दैवी अशासाठी की या औद्योगिकीकरणामुळे या क्षेत्रातही दरवर्षी उत्पादनाची व विक्रीची उद्दिष्टे ठरवली जाऊ लागली. ती पूर्ण करण्यासाठी खाद्यपदार्थनिर्मितीच्या वाढीसाठी सजीवसृष्टीच्या नियमांनाच आवाहन दिले जाऊ  लागले.

खाद्यपदार्थाच्या उत्पादनाच्या कालावधीवर निसर्गाचे असलेले नियंत्रण झुगारून देऊन त्यात हवा तसा बदल करण्यासाठीचे विविध प्रयोग सुरू झाले. जसं कोंबडीच्या पिल्लापासून पूर्ण वाढीची कोंबडी होण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागतो. कोंबडी उत्पादनाचा कालावधी येनकेनप्रकारेण कमी व्हावा आणि त्यांच्या वजनातही वाढ व्हावी यासाठी प्रयोग आणि प्रयत्न सुरू झाले. यासाठी कोंबडय़ांच्या खाद्यामध्ये बदल करण्यात आले. निसर्ग नियंत्रणाच्या कक्षेत ही मानवाची कुरघोडी होती. प्रतिजैवके (antibiotic), संप्रेरके (growth hormones) इत्यादींचा अंतर्भाव या खाद्यांमध्ये सर्रास केला जाऊ  लागला. रोगांमुळे मरणाऱ्या कोंबडय़ांमुळे उत्पादनात होणारी घट कमीच नव्हे, तर शून्यावर येण्यासाठी प्रतिजैवकांचा अर्निबध वापर केला जाऊ लागला. परिणामी उत्पादनाचा कालावधी ९० दिवसांवरून ४९ दिवसांवर आला, शिवाय एवढय़ा छोटय़ा कालावधीत त्यांच्या वजनामध्येही भरघोस वाढ झाली, विक्रीची उद्दिष्टे साध्य होऊ  लागली!

याच बरोबरीने गाई-म्हशींपासून मिळणारे दूध आणि मांस यांच्या उत्पादनवाढीसाठीही प्रयोग सुरू होते. चारा, कडबा, भुशी, पेंड, सरकी यांसारखे गुरांचे पारंपरिक अन्न कमी वा बंद करून त्यांच्यासाठी ‘योग्य’ असे कृत्रिम खाद्य तयार करण्यात आले. अशाच प्रकारची खाद्ये शेळ्या, मेंढय़ा, बकऱ्या, डुकरे अशा जनावरांच्या मांसवाढीसाठी तयार केली गेली. रोगांपासून दूर राहण्यासाठी प्रतिजैविक रसायनांचा वापर तर मांसवृद्धीकरता ग्रोथ हार्मोनचा उपयोग व त्याचबरोबरीनं प्राण्यांच्या आनुवांशिकतेत बदल करणारी संप्रेरके वापरणेही सुरू झालं. हा सर्व खटाटोप उत्पादनाची व विक्रीची सर्व उद्दिष्टे गाठण्यासाठी होता.

या झंझावातातून अन्नधान्ये, फळे, विविध भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, धान्ये, कडधान्येही सुटू शकली नाहीत. कृत्रिम रासायनिक खतांचा अर्निबध वापर आणि उत्पादनवाढीसाठी आनुवांशिकतेत बदल केलेल्या बियाणांचा वापर (genetically modified seeds) यातून मोठाल्या आकाराची कलिंगडे, साच्यातून काढल्याप्रमाणे असणारे सारख्या आकाराचे कांदे, अधिक धान्योत्पादन देणारी गहू, मकासारख्या धान्यांची बियाणे यांचा मुक्त वापर सुरू झाला.

खाद्यपदार्थाच्या औद्योगिकीकरणात जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी सजीव जगतावर अनेक प्रयोग केले जात होते. निसर्गाचे मूलभूत नियम धाब्यावर बसवून खाद्यपदार्थाच्या निर्मितीची उद्दिष्टे गाठली जात होती. उत्पादनवाढीच्या धुंदीत निसर्ग नियमांमध्ये ढवळाढवळ केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटणे हे मानवाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देण्यासारखे होते.

ऑरगॅनिक खाद्यपदार्थाबाबत आग्रही भूमिका मांडणाऱ्या चळवळीची सुरुवात व्हायला १९८६ साल उजाडावे लागले. इंग्लंड देशात घडलेली एक अभूतपूर्व घटना अशी चळवळ सुरू व्हायला कारणीभूत झाली. तेथल्या गाईंना एका विचित्र रोगाची लागण झाली. तो रोग होता ‘मॅड काऊ  डिसिज’. काय होता हा रोग आणि कशामुळे झाला असावा?

गाईंच्या मेंदू व मज्जासंस्थेला रोगसंसर्ग होऊन त्यांच्या वागण्यात भयावह असा बदल झाला. गाईंना झालेल्या रोगामागचं कारण धक्कादायकच होतं. गाय, बैल, बकऱ्या, शेळ्या, मेंढय़ा हे सर्व प्राणी शाकाहारी आहेत. त्यांच्या वजनात कमी काळात भरघोस वाढ व्हावी अशा अट्टहासाने त्यांच्या खाण्यात मांस व तशाच प्रकारच्या पदार्थाचा समावेश केला गेला. अर्थात असं खाणं खाण्यायोग्य आहे असं भासविण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया करण्यात आल्या. थोडक्यात या मुक्या प्राण्यांना फसवून मांसाहारयुक्त खाणं दिलं गेलं. त्याचाच दुष्परिणाम म्हणजे मॅड काऊ  या रोगाचा झालेला प्रादुर्भाव!

यावरची तात्कालिक उपाययोजना या रोगाची लागण झालेली हजारो गुरे मारून करण्यात आली. गाईंना झालेला ‘मॅड काऊ  डिसिज’ म्हणजे निसर्ग नियमांमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या मानवासाठी निसर्गानेच वाजवलेली धोक्याची घंटा होती.

अन्नधान्यातून मानवाच्या शरीरात प्रवेशणाऱ्या एखाद्या घटकाचा काय विपरीत परिणाम होऊ शकतो या संदर्भात मुंबईतल्या एका सरकारी रुग्णालयात प्रसूती विभागाचे अधिष्ठाता, तसंच स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. बी. एन. पुरंदरे यांच्या अनुभवास आलेली एक घटना नमूद करावीशी वाटते. १९७२ सालात जन्माला आलेल्या बाळांमध्ये जुळ्यांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. डॉ. पुरंदरे यांनी त्या वर्षी ठरावीक कालावधीत बाळंतपणासाठी आलेल्या सर्व महिलांचा एक सव्‍‌र्हे घेतला. त्यातून असा निष्कर्ष आला की सर्व महिलांच्या खाण्यापिण्यातले पदार्थ वेगवेगळे असले तरी या सर्वाच्या खाण्यात तांबडा मेक्सिकन गहू हा एक समान पदार्थ होता. तो अमेरिकेने १९७१-७२च्या आपल्या राज्यातल्या दुष्काळात मदत म्हणून पुरवला होता अन् तो ‘अधिक धान्य पिकवा’ या मोहिमेखालची बियाणं वापरून पिकवला गेला होता!

‘अधिक पिकवा’ योजनेखाली पिकवलेलं धान्य खाऊन शरीरात आपल्या शरीरात एवढी उलथापालथ होत असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की, वनस्पती व प्राणीजन्य खाद्य निर्माण करताना वापरली जाणारी अनेक प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खते, प्रतिजैवके, संप्रेरके हे सर्व घटक अल्पांशाने का होईना पण शरीरात गेल्यानंतर कोणते विपरीत परिणाम घडवत असतील याची कल्पना करणंदेखील भयावह आहे. ‘मॅड काऊ  डिसिज’च्या घटनेनंतर केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांचा रोखही याच दिशेने झाला. मग मात्र सर्व संबंधित यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.

सध्या अमेरिकेत ग्रास फेड काऊज मिल्क अशी ‘विशेष सूचना’ लिहिलेलं दूध विकावं लागावं यातच ऑरगॅनिक फूड चळवळीचं गांभीर्य अधोरेखित होतं.

आपल्या देशातली या संदर्भातली समस्या नुसतीच गंभीर नाही तर जटिलही आहे. दुधापासून अन्नधान्यापर्यंत करण्यात येणारी भेसळ आमच्या पाचवीलाच पूजलेली आहे. आपल्या देशात ऑरगॅनिक खाद्यपदार्थाबाबत जनतेमध्ये थोडीफार जागरूकता येऊ लागली आहे. गुळाचा पिवळा धमक रंग हा घातक रासायनिक द्रव्यांचा वापर करून आणण्यात येतो, हे लक्षात आल्यावर पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या गुळाच्या मागणीत वाढ झाली. अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी करण्यात येणारा रासायनिक खते, कीटकनाशके आणि जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे यांचा दुष्परिणाम आपल्याकडेही दिसू लागला आहे. यामुळेच या समस्येचे आपल्या देशातले स्वरूप काळजी करण्याइतपत भीषण होऊ लागले आहे.

मधुमेह, उच्चरक्त दाब, हृदयविकार आणि कॅन्सर या रोगांमध्ये दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. वाढत्या रोगांचे खापर बव्हंशी आजच्या जीवनशैलीवर फोडलं जातं. त्यात आनुवंशिकतेची शक्यताही गृहीत धरली जाते. मात्र रोजच्या आहारातून अल्पप्रमाणात पण सातत्याने शरीरात प्रवेश करणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार दुर्दैवाने केला जात नाही. पूर्वी उतारवयात होणारे हे विकार आता कोठल्याही वयात उद्भवून शरीरात ठाण मांडू लागले आहेत. तरुण पिढीच्या जीवनाचा नूर आणि सूरच बिघडू लागला आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आजपर्यंत खाल्लेल्या अन्नाचा काय परिणाम झाला असेल या प्रश्नाचं खरं उत्तर मिळणं अवघड आहे. मात्र मागच्या एक-दोन पिढय़ा या रेटय़ात आल्या असाव्यात असा निष्कर्ष निघू शकतो.
प्र. अ. जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:08 am

Web Title: importance of organic food
Next Stories
1 शोध नव्या ‘पाचक’ जीवाणूचा
2 प्रश्न तुमचे उत्तर डॉक्टरांचे!
3 सरदार पटेल : एक मुत्सद्दी नेतृत्व
Just Now!
X