संस्कृती

विशाखा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना. या महिन्यात रोजे पाळण्याबरोबरच आणखीही काही बंधनं स्वत:वर घालून घ्यायची असतात. त्याविषयी मुस्लीम तरुणाईशी केलेली चर्चा

रमजानचा पवित्र महिना सध्या सुरू आहे, आणि त्यासोबतच इफ्तार पार्टी, रोजा संपताना खाण्यासाठीच्या वेगवेगळ्या पदार्थाची रेलचेलदेखील दिसून येत आहे.  रमजान महिन्यात मुस्लीम घरांमध्ये इतर धर्माच्या मित्र-मत्रिणींना आवर्जून आमंत्रण दिले जाते.

रमजानच्या या महिन्यात रोजे पाळणारे दिवसभर पाण्याचा घोटसुद्धा घेत नाहीत. मुस्लीम तरुणाई उत्साहाने रोजे करते. या उपवासासोबत रमजानमध्ये आणखी काही नियम आहेत. त्यानुसार या महिन्यात खोटे बोलणे, कुणावरही चिडणे, रागावणे, अगदी डोळ्यांनीसुद्धा दटावणे निषिद्ध आहे. या महिन्यात कुणाबद्दल कुचाळक्या करणेसुद्धा अयोग्य आहे.  इतक्या सगळ्या गोष्टी खरोखरच साध्य होतात का, उपवास करणं हेच खूप नाही का, असं मुस्लीमेतरांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे तरुणाईलाच याबद्दल विचारले.

कुराणामध्ये सांगितलेल्या पाच मूळ तत्त्वांपकी एक म्हणजे रमजान महिन्यातले उपवास. त्यामुळे अगदी फार धार्मिक नसलेल्या मुस्लीम व्यक्तीलाही या उपवासांची संपूर्ण माहिती असते. घराघरामध्ये उपवास केले जात असल्याने लहानपणापासून त्यांची माहिती होते. उपवास करत नसेल त्या व्यक्तीलासुद्धा चांगले-वाईट, धर्मात सांगितलेल्या गोष्टींमागची कारणे यांची शिकवण दिली जाते. लहानपणी इतरांचे पाहून रोजे ठेवले तरी तरुणाईला यामागचे नेमके कारण माहिती असतेच. अनेकदा हे उपवास केवळ इतर करतात म्हणून नाही, तर अल्लाहच्या अधिक जवळ जाण्यासाठी, आपल्या वाईट कर्माचे प्रायश्चित म्हणून अल्लाहकडे माफी मागण्यासाठी केले जातात. यंदा भर उन्हाळ्यात रमजान सुरू आहे, त्यातच काही जणांच्या परीक्षा देखील सुरू आहेत. याबद्दल विचारले असता जवळजवळ सगळ्यांनी एकच उत्तर दिले, ते म्हणजे आजारपण, गरोदरपण, परीक्षा या गोष्टींना या उपवसातून सवलत मिळते. त्यामुळे तरुणाईला उपवासाची सक्ती वाटत नाही. अगदीच शक्य नसतं ते किमान अर्धा दिवस उपवास करून सुरुवात करतात आणि हळूहळू उपवासाची सवय होऊन जाते.

याविषयी बोलताना बीडीएसच्या तिसऱ्या वर्षांला असणारी मुंबईतली मसुदा मुल्ला सांगते, अगदी लहानपणीपासून उपवास केल्याने खरेतर परीक्षेच्या काळातही उपवास करणे सोपे जाते. परीक्षेच्या काळात रोजा करणे वेगळे आहे. कारण अशावेळी अभ्यासाचा कंटाळा येतो. पण दुसऱ्या दिवशी पेपर असल्याने ते होऊ न जाते.

रमजानच्या उपवासाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे या उपवासात अन्न-पाणी ग्रहण न करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच व्यसनं कटाक्षाने टाळणे, शिवराळ आणि वाईट भाषा न वापरणे, आपल्या तोंडून शत्रूबद्दलही वाईट शब्द येऊ न देणे या गोष्टींना फार महत्त्व आहे. रमजान महिन्यात रोजे केल्यामुळे सिगरेटसारखी व्यसने सोडणे तरुणाईला सोपे जाते, कारण या महिन्यात आजूबाजूला सगळीकडेच पवित्र वातावरण असते असे मुंबईतला, पर्यावरणशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा अब्दुल्ला खान सांगतो. मैत्रीमध्ये बोलण्याच्या भरात, प्रेमाने  मित्राला सहज शिवी दिली जाते. बाहेर फिरतानाही नकळत तोंडी शिव्या येतात. अशा वेळी वाईट न बोलणे आणि शिव्या न देणे हे अर्थात तरुणाईच्या संयमाची परीक्षा घेणारे ठरते! रस्त्यात कुणी भेटले तर गप्पांच्या ओघात सहज तिसऱ्या व्यक्तीविषयी कुचाळक्या सुरू होतात. याविषयी विचारले असता, रमजान महिन्यात कुणाहीविषयी त्याच्या पाठीमागे बोलणे कटाक्षाने टाळले जाते, असे उत्तर मिळाले. याविषयी बोलताना जैवतंत्रज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या फिजाह सय्यद आणि आलिया खान या मैत्रिणी सांगतात, ‘रमजानच्या पवित्र महिन्यात या गोष्टी अर्थातच निषिद्ध आहेत.’ खरेतर या गोष्टी एरवीच्या आयुष्यातही आपण टाळल्या तर आयुष्य कितीतरी शांततामय होईल. रमजानच्या महिन्यात कुणावरही चिडणेसुद्धा चुकीचे असल्याने या महिन्यात आपापसात झालेली भांडणेही संयमाने मिटवली जातात. आयुष्यात शांततामय मार्गाचा वस्तुपाठ घालून देणारी ही जीवनशैली रमजानमध्येच नव्हे तर कायम आचरणात आणावी अशीच आहे. आजकाल कुठल्याही गोष्टीवरून लगेच चिडणाऱ्या तरुणाईला धर्माने घालून दिलेला संयमाचा हा बंध अशा वेळी अगदी योग्य वाटतो.

रमजानच्या काळात गरजू व्यक्तींना मदत करणेदेखील पुण्याचे मानले जाते. रमजानच्या काळात केलेले पुण्य थेट अल्लाहपर्यंत पोहोचते अशीदेखील मान्यता आहे. इतर काळात केलेल्या पुण्यापेक्षा हे पुण्य जास्त महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे इफ्तारच्या वेळी आजूबाजूला ज्यांना अन्न मिळत नाही किंवा पुरेसे मिळत नाही अशांना खायला दिले जाते. अशा गोष्टी करण्यात तरुणाईचा पुढाकार असतो. प्रत्येकाला इफ्तारच्या वेळी काही कमी पडणार नाही याची खात्री केली जाते, असे सध्या आपले शास्त्र शाखेचे शिक्षण संपवून नुकताच नोकरीला लागलेला मुंबईतला फैजान कुरेशी सांगतो. तो म्हणतो सर्वाना अन्न मिळेल याची काळजी घेऊन मगच रोजा सोडला जातो. यामुळे  इतरांना आपल्यातील वाटा आधी देण्याची शिकवण मिळते.

दिवसभर अन्नपाणी न घेतल्यामुळे जगात अनेकांना दोन घासही मिळत नाहीत याची जाणीव होते आणि अन्नाची किंमत कळते. तरुणाईच्या दृष्टीने आयुष्यभर आपल्याला मिळत आलेल्या गोष्टींचे मूल्य समजण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते. लहान वयापासून सगळे काही सहज मिळत जाते, त्यामुळे ज्या गरिबांना अर्धपोटी राहावे लागते त्यांच्या वेदना तरुण वयात समजल्याने पुढे आयुष्यभर ही शिकवण इतरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडते. महिनाभराच्या उपवासाने श्रीमंत व्यक्तीला अन्नपाण्यावाचून राहणाऱ्या असहाय लोकांच्या वेदनांची जाणीव होते.

रमजान महिना कुराणाने सांगितलेल्या धार्मिक तत्त्वांवर आधारलेला असला तरी नवी पिढी या प्रत्येक गोष्टीमागे असलेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करते.

सध्याच्या धावपळीच्या जगात, रमजान महिन्यात पाळले जाणारे हे नियम तरुणाईच्या संयमाची परीक्षा घेतात. रमजानमधून आत्ताच्या काळातल्या तरुण पिढीने काय शिकवण घ्यावी यावर फिजिओथेरपीच्या तिसऱ्या वर्षांला असलेली शिफा बक्षी भरभरून बोलते. दिवसभराच्या उपवसानंतर पुढय़ात आलेले चमचमीत पदार्थ आधी प्रार्थना करून मगच खायचे असतात. हा संयम जीवनातही एरवीही गरजेचा आहे. स्वतआधी इतरांचा विचार करणे आजच्या तरुणाईला खरोखर आले पाहिजे. त्यासाठी आपल्या धर्माशी जोडले गेले पाहिजे. जेणेकरून त्यातील शिस्त, संयम, सत्कर्म अशा उत्तम गुणांची शिकवण आपण आचरणात आणू शकतो. हल्लीच्या काळात मुले आत्मकेंद्रित असतात, वयात आलेली मुले िहसक वागतात, तिथे अशी शिकवण गरजेची आहे. अर्थात यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण पाळू शकतोच असे नाही. पण रमजानच्या महिन्यात आपण केलेल्या चुकीच्या गोष्टींची कबुली देऊन अल्लाहकडे माफी मागायची असते.

तरुणाईच्या मते या सगळ्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखे आहे. सर्व धर्म खरेतर अशीच शिकवण देत असतात! आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून योग्य त्या गोष्टी आचरणात आणायची गरज आहे!