अनेक क्रिएटिव्ह क्षेत्रांपैकी अ‍ॅनिमेशन हे एक क्षेत्र. छोटय़ा-मोठय़ांना भुरळ घालणारी कार्टून्स तयार करण्याची प्रक्रिया, त्यांचे रंग, त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांची रचना अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी अ‍ॅनिमेशनच्या विश्वात जावंच लागेल.

शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना किंवा त्याहीपेक्षा लहान वयाच्या मुलांना काय करायला आवडतं? याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर असेल खेळणं नाहीतर टीव्ही बघणं. यातही जर पालकांना मुलांनी काही काळ शांत एकाजागी बसायला हवं असेल तर दुसऱ्याच पर्यायाचा विचार होऊ शकतो. टीव्हीवरदेखील मुलांना बघण्यासारख्या कुठल्या मालिका आहेत, कुठले कार्यक्रम आहेत तर चटकन कार्टून हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. लहान मुलांना कार्टून आवडतं असं जरी सर्व मोठय़ांचं म्हणणं असलं तरी लहानांबरोबर मोठेसुद्धा कार्टून बघण्यात कधी गुंततात आणि त्याचा आस्वाद कधी घ्यायला लागतात हे बहुधा त्यांच्याही लक्षात येत नाही. आपण मोठे झालो कीलहानपणीच्या ज्या काही चांगल्या-वाईट आठवणी आपल्याबरोबर असतात त्यात आपल्याला आवडलेली कार्टून्स आणि कार्टून कॅरेक्टर्स यांनीदेखील मनाच्या एका कोपऱ्यात घर केलेलं असतं.

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

40-lp-cartoon

लहानपणीच्या आपल्या वागण्यावर बऱ्याचदा या कार्टून कॅरेक्टर्सचा प्रभाव असतो. खेळ खेळतानासुद्धा हे कार्टून्स अधेमधे डोकावतात. या कार्टून कॅरेक्टर्सचे टी-शर्ट्स, घडय़ाळं, डबे, वॉटरबॅग्स्, बूट, दप्तरं असे अनेक प्रकार मग बाजारात उपलब्ध होतात. कुठल्या कार्टूनचे दप्तरं, बूट घ्यायचे हे छोटय़ा दोस्तांचं ठरलेलं असतं. या सगळ्याचा प्रभाव छोटय़ांप्रमाणे मोठय़ांवरही असतो. मोठी माणसंही कार्टूनचे टी-शर्ट्स, घडय़ाळं वगैरे वापरताना दिसतात.

लहान तसंच मोठय़ांच्या मनाला भुरळ घालणारी ही कार्टून्स नक्की तयार तरी कशी होतात? याकडे करिअर म्हणून बघता येईल का? कार्टूनिस्ट होण्याकरता कुठले गुण आपल्यात असायला हवेत? या आणि अशा प्रश्नांचं निरसन केलंय अनेक वर्ष अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात वावरणारे अ‍ॅनिमेटर चेतन शर्मा यांनी. चेतन सांगतात, ‘अनेकांना असं वाटत असतं की विनोदी कथा, प्रसंग याचसाठी अ‍ॅनिमेशन वापरतात किंवा अ‍ॅनिमेशन म्हणजे विनोदी काहीतरी. पण प्रत्येक वेळी असं नसतं. ‘राजू अ‍ॅन्ड आय’ हा तीस मिनिटांचा चित्रपट आम्ही केला होता हा चित्रपट बालहक्कांवर आधारलेला होता. विषय गंभीर असल्याने अर्थातच अ‍ॅनिमेशन असलं तरी त्यात गंभीर कथानक होतं.

41-lp-cartoon

अ‍ॅनिमेशनमध्ये ज्या व्यक्तिरेखा डिझाइन करतात त्या पूर्णपणे काल्पनिक असतात की कोणाला तरी बघून ही पात्रं सुचतात असं विचारलं असताशर्माकडून ‘बऱ्याचदा ही पात्रं आपल्या आजुबाजूलाच सापडतात’ असं उत्तर मिळतं. एक उदाहरण ते सांगतात,  ‘एका जाहिरातीकरता पंजाबी बाईचं पात्र हवं होतं तेव्हा मला माझ्या शाळेतल्या पंजाबी शिक्षिका आठवल्या. मग त्या कशा हातवारे करतील, बोलतील किंवा त्यांच्या इतर लकबींची कल्पना करून ते कागदावर साकारलं. हे करताना फक्त एक चित्र काढून चालत नाही, कारण यात जर दाखवायचं असेल की एक मुलगा उजवीकडे बघतो मग सरळ बघतो आणि नंतर डावीकडे बघतो, त्याला काहीतरी भयानक दिसतं म्हणून तो ओरडतो तर प्रत्येक ठिकाणी बघतानाचं चित्र काढायला लागतं. तरच त्या पात्राची एक अ‍ॅक्शन पूर्ण होते. अ‍ॅनिमेशनमुळे पात्रं सजीव होताना दिसतात. वेगवेगळ्या अ‍ॅक्शन करणाऱ्या पात्रांच्या चित्राच्या फ्रेम्स पुढे-मागे करून जे तयार होतं ते म्हणजे अ‍ॅनिमेशन. मग ते तैलचित्र असो, कठपुतळी असो, हाताने काढलेले चित्र असो किंवा कॉम्प्युटरवर केलेलं असो. एखाद्या निर्जीव वस्तूला जर वेगवेगळ्या स्थितीत शूट केलं तर ती वस्तू पुढे पुढे जाताना दिसते, हेही अ‍ॅनिमेशनच.’

या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना बरेचदा व्हीएफएक्सवर काम करायला आवडतं. चित्रपटांमध्ये जे स्पेशल इफेक्ट्स दाखवतात म्हणजे हिरो चाललाय आणि मागे गाडय़ांचा स्फोट होतो, बॉम्ब फुटतो वगैरे हेसुद्धा वेगवेगळ्या फ्रेम्सनी साकारलेलं अ‍ॅनिमेशनच आहे. आपण जे काही प्रत्यक्ष करू शकत नाही ते सगळं आपण अ‍ॅनिमेशनद्वारे साकारू शकतो. तरुणांना अर्थातच टीव्ही आणि चित्रपटांमध्ये खूप संधी आहेत. तरुण मंडळींचा कल या क्षेत्राकडे भरपूर आहे.

39-lp-cartoon

कालानुरूप प्रत्येक क्षेत्रात काही बदल होतात. नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होत असते. प्रत्येक क्षेत्रात अशी प्रगती आवश्यकच असते. त्या त्या क्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या की तिथल्या करिअरच्या संधी वाढतात. विशिष्ट चौकटीत काम केलं तर नवं काही करण्याची प्रेरणा मिळत नसते. कार्टूनच्या क्षेत्रात चौकटीत काम करून चालत नाही. तिथे दिवसागणिक नवनवे बदल होत असतात. या बदलांचे प्रेक्षक नेहमीच स्वागत करतो. कारण या बदलांमुळेच त्यांच्यासमोर येणारी कलाकृती आकर्षक, आनंद देणारी असते. सुरुवातीला कार्टून टूडी म्हणजेच टू डायमेन्शनल होती, पण साधारण वीस वर्षांपासून बरीच कार्टूस् थ्रीडीमध्ये बनवली जाऊ लागली. जपानी अ‍ॅनिमेशन हे अजूनही अ‍ॅनिमेशनच्या जुन्या पद्धतीप्रमाणे टूडीप्रमाणे करतात. टुडी आणि थ्रीडीमधील फरकाविषयी शर्मा सांगतात, ‘लायन किंग, जंगल बुक, मिकी माऊस, बग्ज् बनी, टॉम अ‍ॅण्ड जेरी यांसारखी कार्टूनस् टुडी अ‍ॅनिमेशन अंतर्गत येतात. याला क्लासिकल अ‍ॅनिमेशन असंही म्हणतात. कुंग फू पांडा, टॉय स्टोरी, जंगल बुक हे चित्रपट सर्व थ्रीडीमध्ये बनवलेले आहेत. थ्रीडी हे लाइव्ह अ‍ॅक्शन चित्रपटात वापरलं जातं. थ्रीडी हे फोटो वास्तवदर्शी असतं. बऱ्याचदा चित्रपटांकरता वापरलं जातं ते थ्रीडी आणि कार्टूनकरता वापरलं जातं ते टूडी. तरी कुम्फू  पांडा हे थ्रीडीमधलं
कार्टून आहे. कार्टून आता थ्रीडीमध्ये पण करता येतं. हे तंत्र आता विकसित झालं आहे. पण काही कार्टूनस टुडीमध्येच छान वाटतात. काढलेल्या चित्राचं अ‍ॅनिमेशन करण्याची मजाच काही और आहे. चिंटू, टॉम अ‍ॅण्ड जेरी यासारखी कार्टून टुडीमध्येच छान वाटतात.’

कोणत्याही कलाकाराची निरीक्षणक्षमता चांगली असायलाच हवी. सभोवताली घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण, परीक्षण, त्यातून मिळणारा दृष्टिकोन या सगळ्यांचा अभ्यास त्याने करायला हवा. चित्रकार, अ‍ॅनिमेटरमध्ये तर हा गुण असायलाच हवा. त्याबाबत चेतन शर्मा सांगतात, ‘वेगवेगळी पात्रं कशी वागतील, बोलतील, हसतील वगैरे दाखवायला चांगलं निरीक्षण हवं. अ‍ॅनिमेटरला एखादं पात्र साकारताना त्यात थोडी अतिशयोक्ती आणावी लागते. उदाहरणार्थ चित्रपटात जेव्हा एखादा मनुष्य दमलेला दाखवायचा असतो तेव्हा तो दमला आहे हे त्याच्या देहबोलीवरून कळतं. अ‍ॅनिमेशन करताना मात्र त्या पात्राचे अधर्वट मिटलेले डोळे, उतरलेला चेहरा, पडलेले खांदे असं दाखवावं लागतं. अ‍ॅनिमेटरला सगळंच्या सगळं निर्माण करायचं असतं. काही वेळा काही गोष्टी काल्पनिक असतात तर काही वेळेला कठीण अ‍ॅक्शन्स करून बघाव्या लागतात. त्या करताना शूट केल्या तर मग काम करताना त्या अ‍ॅक्शन डोळ्यासमोर राहतात.’

चांगलं चित्र काढता येत असेल आणि निरीक्षणही चांगलं असेल तर तुम्ही अ‍ॅनिमेटर होऊ शकता. यात रस असलेले इच्छुक अ‍ॅनिमेशनच्या या विश्वातली मजा प्रत्यक्ष त्या जगात जाऊन घेऊ शकतात. लहानपणी आपल्याला अवडलेला सुपरहिरो तुमच्या कल्पनेतून नव्याने सजीव करण्याची मजा वेगळीच असते!
ग्रीष्मा जोग-बेहेरे – response.lokprabha@expressindia.com