News Flash

गरज आण्विक पाणबुडीची

१९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या हृदयात भरविलेली धडकी आजही कायम आहे.

संरक्षण
विनायक परब –  @vinayakparab / response.lokprabha@expressindia.com
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर अशा आपल्या तिन्ही बाजूंना किमान तीन आण्विक पाणबुडय़ा कार्यरत असणे ही भारतीय नौदलाची गरज आहे. या तिन्ही ठिकाणी वाढलेल्या चीनच्या कारवायांमुळे तर या गरजेची तीव्रता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकच वाढलेली आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आता पुरत्या स्पष्ट झाल्या आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या सोबत झालेली सर्व युद्धे आपणजिंकलो. मात्र आपली अवस्था ही युद्धातजिंकलो आणि तहात हरलो अशी होती. कारण युद्धजिंकल्यानंतरही आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये आपण खूपच कमी पडलो आणि बदनामी मात्र आपल्या वाटय़ाला आली. कारगिलच्या वेळेस बदनामी फारशी वाटय़ाला आलेली नव्हती, पण फायदाही त्याचा फारसा उठवता आला नाही. पुलवामाच्या वेळेस मात्र आपण पाकिस्तानच्या आधीच अनेक चाली खेळलो आणि पाकिस्तान मुत्सद्देगिरीमध्ये काय करू शकते, याची कल्पना करून आपल्या चालींची रचना केली. त्याचा चांगला फायदा आपल्याला या खेपेस झाला. सध्या युद्धनीतीमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण असा बदल झाला आहे तो म्हणजे, यापुढे छुपे युद्ध खूप मोठय़ा प्रमाणावर लढावे लागणारं आहे तेही सातत्याने. त्यात माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लढाव्या लागणाऱ्या आभासी युद्धाचा भाग खूप मोठा असणार आहे. या माहिती युद्धाचा वापर पाकिस्तानने पुलवामानंतरही केला. भारतीय पाणबुडीने पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केलेला नव्हता. असे असतानाही पाणबुडीच्या माध्यमातून भारत थेट कराचीवर हल्ला चढविण्याच्या प्रयत्नात आहे, अशी बोंब पाकिस्तानने ट्विटरवर ठोकली. हा माहिती युद्धाचाच भाग होता. मात्र त्याचे खंडण भारताने तेवढय़ाच वेगात केले. यामध्ये लक्षात आलेली महत्त्वाची बाब म्हणजे १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या हृदयात भरविलेली धडकी आजही कायम आहे.

भारतीय नौदलाचे हे सामथ्र्य कायम राखायचे असेल तर आपल्याला आपल्या पाणबुडी विभागाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण त्यांची सद्यस्थिती फारशी आशादायक नाही. आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीच्या झालेल्या अपघाती स्फोटानंतर तिला जलसमाधी मिळाली त्या घटनेनंतर तर पाणबुडी विभाग अतिशय अडचणीत आला. पाणबुडय़ांच्या अपघातांचे प्रमाणही खूप मोठय़ा प्रमाणावर वाढले. सध्या पाणबुडी विभागामध्ये तर आयुर्मान संपलेल्या पाणबुडय़ा आपण वापरत आहोत. गेल्या १५ वर्षांमध्ये आपण नवीन पाणबुडय़ांची खरेदी केलेली नाही. पाणबुडी ही नौदलासाठी महत्त्वाची नजर म्हणून महत्त्वाची असते. शिवाय तिला शोधणे हे युद्धनौकांचा शोध घेण्यापेक्षा तुलनेने कठीण असते. सागरतळाशी राहून सागरातून सागरतळी, जमिनीवर किंवा हवेत मारा करण्याची तिची क्षमता ही शत्रूसाठी घातक असते. मात्र सध्या पाणबुडय़ांची संख्या कमी होणे आणि आयुर्मान संपलेल्या पाणबुडय़ा चालविणे ही भारतीय नौदलासाठीची नामुष्की आहे. या पाश्र्वभूमीवर चार आठवडय़ांपूर्वी एक चांगली घटना घडली ती म्हणजे भारताने अकुला-१ वर्गातील आण्विक पाणबुडी रशियाकडून भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला. हा भाडेकरार १० वर्षांसाठीचा असणार आहे.

पाणबुडय़ांच्या बाबतीत येणारा काळ हा आण्विक पाणबुडय़ांचा असणार आहे. या पाणबुडय़ा तीन गोष्टींसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. त्यावरून अण्वस्त्र डागण्याची असलेली त्यांची मारकक्षमता, त्यांचा वेग आणि शत्रूपासून लपून राहण्याचे त्यांचे असलेले अंगभूत कौशल्य.  पाणबुडय़ांचा शोध घेण्यासाठी सोनार नावाची यंत्रणा वापरली जाते. सागरतळाशी असतानाही पाणबुडीमधील यंत्रणांचा येणारा आवाज तिचा शोध घेण्यासाठी पुरेसा असतो. मात्र आण्विक पाणबुडीमध्ये हा आवाज तुलनेने खूप कमी असतो. शिवाय ती अणुइंधनावर चालणारी असल्याने या पाणबुडय़ांना त्यांच्या बॅटरीज चार्ज करण्यासाठी सागराच्या पृष्ठभागावर येण्याची गरज भासत नाही. इतर सर्वसाधारण पाणबुडय़ांना मात्र बॅटरी चार्जिगसाठी सात-आठ दिवसांनी पृष्ठभागावर यावे लागते. आण्विक पाणबुडीचा सागरतळाशी राहण्याचा असलेला कालावधीही खूप मोठा असतो. त्यामुळे या आण्विक पाणबुडय़ा संरक्षणाच्या दृष्टीने आपल्या नौदलाच्या ताफ्यात असणे महत्त्वाचे असते. सध्या भारताकडे आयएनएस चक्र दोन आणि आयएनएस अरिहंत या दोन आण्विक पाणबुडय़ा आहेत. यातील अरिहंत नोव्हेंबर महिन्यात पूर्णपणे कार्यरत झाली, ही आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर अशा आपल्या तिन्ही बाजूंना किमान तीन आण्विक पाणबुडय़ा कार्यरत असणे ही भारतीय नौदलाची गरज आहे. या तिनही ठिकाणी वाढलेल्या चीनच्या कारवायांमुळे तर या गरजेची तीव्रता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकच वाढलेली आहे. चक्र तीन ही रशियन आण्विक पाणबुडी २०२५ पर्यंत भारतीय नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे. ती ताब्यात घेतल्यानंतर डागडुजी करून त्या पाणबुडीवर भारतीय सेन्सर्स आणि इतर महत्त्वपूर्ण यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. शिवाय नौसैनिकांना तिच्या हाताळणीचे विशेष प्रशिक्षणही द्यावे लागेल. त्यामुळे २०२५ नक्कीच उजाडेल. याशिवाय या पाणबुडीच्या संदर्भात आपल्याला एक अडचण भासणार आहे ती म्हणजे आपल्याला या संदर्भातील आंतरराष्ट्रीय करारामुळे तिच्यावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बसविता येणार नाहीत. त्यामुळे तिच्यावर पारंपरिक युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे आणि पाणतीरच असतील. असे असले तरी आण्विक पाणबुडी आपल्या भात्यात असणे महत्त्वाचेच असेल. त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:03 am

Web Title: india need of nuclear submarine
Next Stories
1 महाराष्ट्राचे प्रज्ञावंत ‘तरुण तेजांकित’
2 आजच्या तरुणाईची प्रतिभा आशादायक!
3 प्रज्ञावंत, ऊर्जावंत.. ‘तरुण तेजांकित’!
Just Now!
X