22 March 2019

News Flash

मचाणावर एक रात्र!

ज्या जंगलात वाघाचं अस्तित्व आहे, ते जंगल परिपूर्ण समजलं जातं.

अनुभव
देशभरात सगळ्या जंगलांमध्ये दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणिगणना केली जाते. त्यासाठी जंगलात मचाणावर बसून रात्रभर प्राण्यांचं निरीक्षण करणं हा अद्भुत अनुभव असतो. या अनुभवाला लेखकाने दिलेले शब्दरूप.

दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला होणाऱ्या जंगलातील प्राणिगणनेची प्राणी-पक्षिप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. मचाणावरची अशीच एक रात्र माझ्या जीवनातसुद्धा आली. मे महिन्याचे दिवस. मेळघाटातील वन विभागात दुपारी अडीचला पोहोचलो. तापमान ४५ अंशाच्या वर गेलेले. सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून वन विभागाचा कर्मचाऱ्यासोबत मचाणवर पोहोचेपर्यंत सायंकाळचे पाच वाजले होते. मचाणाजवळ पोहोचताच हरणाचं (स्पॉटेड डीअर) दर्शन झालं. पळसाच्या झाडावर १२ फूट उंचीवर बांधलेल्या अगदी मजबूत अशा मचाणावर शिडीच्या साहाय्याने पोहोचलो. दुर्बीण, कॅमेरा, वही, पेन बाहेर काढून तयार झालो. पाणवठय़ाच्या जवळच उंच गवतात आठ-दहा रानगव्यांचा समूह निवांत चरत होता. आम्ही पाणवठय़ाकडे तोंड करून बसलेलो होतो.

वाघाशिवाय जंगलाचं अस्तित्व नाही. ज्या जंगलात वाघाचं अस्तित्व आहे, ते जंगल परिपूर्ण समजलं जातं.  या जंगलच्या राजाला त्याच्या अधिवासात मुक्त संचार करताना पाहण्यासारखं सुख नाही. मेळघाटातील वाघाचं दर्शन घेण्यासाठी हजारो निसर्गप्रेमी मेळघाटात येतात. परंतु प्रत्येकालाच राजा दर्शन देईल याची शाश्वती नसते. मेळघाटातील वाघाचं दर्शन थोडं दुर्लभच कारण येथील उंचसखल भाग आणि झाडांची दाटी.

मचाणावर चढल्या चढल्या  वाघाचं दर्शन होईल, असा विचारसुद्धा केला नव्हता. पण आमच्या मचाणाच्या मागील बाजूला एक जुनी विहीर होती. वाघ त्या विहिरीला वळसा घालून आमच्याकडे येत होता. आम्ही सर्व समोर पाणवठय़ाकडे लक्ष देऊन पाहत बसलेलो. का कुणास ठाऊक मला मागे वळून पाहण्याची इच्छा झाली. पाहतो तर काय जंगलाचा राजा ऐटीत चालत येत होता. मचाणपासून अगदी वीस पावलावर आल्यानंतर त्याचं लक्ष आमच्याकडे गेलं. माझं हृदय जोराने धडकलं. वाघ माझ्याकडे आणि मी वाघाकडे पाहत होतो. आमचा अंदाज घेऊन तो परत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी वन विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कळलं की तो वाघ नव्हता तर दीड ते दोन वर्षांची वाघीण होती. वाघाचे बछडे दोन वर्षांचे झाल्यानंतर आईपासून वेगळे होऊन स्वतंत्र प्रदेश शोधतात आणि स्वतंत्र शिकार करू लागतात. बऱ्याच वेळा आईसोबत भांडण करून आईचा प्रदेशसुद्धा बळकावतात. इथंही असंच काही झालं असावं. कारण मी घेतलेल्या वाघिणीच्या बछडय़ाच्या छायाचित्रात तिच्या समोरील उजव्या पायावर आणि मानेवर जखम दिसत होती. आणि काही दिवसांपासून तिची आई एका वेगळ्या नरासोबत फिरताना दिसली होती. कदाचित ही बछडी वाघीण आईपासून वेगळी होऊन नवीन प्रदेश शोधत बाहेर निघाली असावी. काय ऐट होती तिची. प्राणिगणनेचा श्री गणेशा वाघाच्या दर्शनाने झाला होता.

गवतात चरणारा रानगव्यांचा समूह पाणवठय़ाकडे वळला. गवतातून बाहेर मोकळ्यात रानगव्याच्या नराचे रूप पाहून मी थक्क झालो. धिप्पाड भरभक्कम असं रानगव्याचं रूप पाहून सामथ्र्य म्हणजे काय असतं जाणवलं.

सूर्य मावळतीला लागला. या संधिप्रकाशात शिकारीची संधी शोधण्यासाठी शिक्राचा नर पाणवठय़ाच्या आजूबाजूला उडताना दिसत होता. मोर, लांडोर, कोतवाला, होला, टिटवी, टकाचोर, तितर मधून मधून पाणवठय़ावर पाणी पिऊन जात होते. समोरच्या डोंगराआडून पौर्णिमेचा चंद्र वर येऊ लागला. जंगल हळूहळू जागं होत होतं. अंधार पडू लागला होता. पाणवठय़ावरील पाण्यावर तरंग उठलेला दिसला. दुर्बीण लावून पाहिलं तर लक्षात आलं छोटी वटवाघळं उडतच अलगद पाणी पिऊन जात असावीत. हळूहळू एकामागून एक वटवाघळाचा सर्व थवा पाणवठय़ावर पाणी पिऊन संथ पाण्यावर असंख्य तरंग निर्माण करत होता. वटवाघळाच्या अशा वागण्याने पाण्यातील छोटे छोटे मासे घाबरले. ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेत उडय़ा मारत होते. चांगलाच अंधार पडला होता.

चंद्र डोंगराआडून बराच वर आला होता. चंद्राच्या जवळच दोन प्रकाशी तारे दिसत होते. या ताऱ्यांनी चंद्राची सोबत सकाळपर्यंत केली. पाहावे तिकडे अंधारच अंधार दिसत होता आणि वर आकाशात प्रकाशमान चंद्र. या चंद्राचा प्रकाश अंधाराला चिरत जमिनीवर पडत होता जणू. डोळ्यांसमोर काळा पडदा धरला आहे, असा भास होत होता. एवढय़ात या काळ्या पडद्यावर दोन स्वयंभू प्रकाशी तारे पाणवठय़ाच्या दिशेने जाताना दिसत होते. अंधाऱ्या रात्री चमकणारे प्राण्यांचे डोळे किती सुंदर दिसतात. पण तुम्ही आम्ही शहरवासी प्रकाशाच्या प्रदूषणात या सुखाला कायमचे मुकलो आहेत. ते दोन डोळे होते उदमांजराचे. पाणवठय़ावरच पाणी पिऊन ती मांजरं आली तशी निघून गेली.

गाडीच्या प्रकाशाने रोडच्या कडेला बसलेला रातवा पक्षी उडून जाताना खूपदा पाहिला परंतु आज माझा समोरच्या झाडाच्या फांदीवर रातवा बसून चु-च चु च असा आवाज करत होता. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात रातव्याला पाहत होतो. शांततेच्या सुखसागरात रातव्याच्या आवाजाने उठणाऱ्या लाटा कानावर पडत होत्या.

मचाणाच्या डाव्या बाजूकडे नदीचं पात्र होतं आणि या पात्राच्या दोन्ही बाजूने विशाल अर्जुनाची झाड वाढलेली होती. याच झाडामधून हुमा घुबडाचा आवाज येत होता.

अंधारात पुन्हा दोन डोळे चमकले. या वेळी रानमांजर होती. पाणवठय़ावर पाणी पिऊन ती निघून गेली. चंद्र डोक्यावर आला होता. पहिल्यापेक्षा आता चंद्रप्रकाश जास्त वाटत होता. मचाणवरील सोबती आतापर्यंत झोपी गेले होते. मी एकटाच बसून, कधी पाणवठय़ाकडे तर कधी चंद्राकडे पाहत शांतता कानात सामावून घेत होतो.

अरण्यात तपश्चर्या करणारे साधू दिवस दिवस एकाच जागेवर कसे बसून राहत असतील आणि त्यांना समाधी अवस्था कशी प्राप्त होत असेल याचं कोडं मला नेहमीच पडत असे. परंतु आज पौर्णिमेच्या रात्री या नादमधुर शांततेत मला स्वत:चा विसर पडू लागला होता. मी तास-दोन तास तरी स्थिर, मनात कसल्याच विचारांची गर्दी न होता बसून राहिलो असेन. अरण्यातील हीच शांतता तपस्वी साधूंना समाधी अवस्थेकडे घेऊन जात असावी का?

शब्दात सांगता येणार नाही पण मी अनुभवलं आहे. शांततासुद्धा विविध प्रकारची असते. जांभूळ पडाव येथील मेळघाटच्या जंगलातून जाताना अनुभवलेली शांतता आणि वाणच्या जंगलात आज अनुभवत असलेली शांतता खूप वेगळी होती. आजसुद्धा त्या रात्रीच्या शांततेकडे मन ओढ घेतं. प्रत्येक माणसाच्या मनात एक तपस्वी साधू असतो का?

लागलेली ही तंद्री आवाजाने मोडली. जवळच झोपलेला वन कर्मचारी आवाजाने खडबडून जागा झाला आणि सांगू लागला की हा अस्वलाचा आवाज आहे. नदीच्या पात्राकडून हालचालीचा आवाज येत होता. कदाचित आमच्या अस्तित्वाची जाणीव अस्वलाला झाली होती म्हणून ते पाणवठय़ाकडे न येता आमच्या डाव्या बाजूने मागील बाजूस येत निघून गेले.

अंधाऱ्या रात्रीपेक्षाही काळी असलेली रानहेल्याची पाठ दुरूनसुद्धा दिसत होती. जवळजवळ रानहेल्याचा कळप रात्रभर चरत होता. अधूनमधून काही रानहेले स्थिर उभेच दिसायचे तर काही दिसेनासे व्हायचे. कदाचित मधेमधे थोडा वेळ खाली बसून आराम करत असावेत.

चंद्र मावळतीला लागला होता. पाणवठय़ावर ससा पाणी पिऊन उडय़ा मारीत निघून गेला. दुरूनच चौकसपणे पाणवठय़ाकडे काही तरी येताना दिसत होतं. एकटंच सांबर पाणवठय़ावर येऊन पाणी पिऊ लागलं. तितक्यात रानगव्याचा कळप पाणी पिण्यासाठी आला. सांबर बाजूला झालं आणि जवळ उभं राहिलं. रानगव्याच्या कळपाचं पाणी पिऊन झाल्यावर सांबर पुन्हा पाणवठय़ावर येऊन पाणी पिऊन निघून गेलं. सकाळची चाहूल लागली होती. आकाशात तांबडा रंग पसरला होता. उंच झाडाच्या फांदीवर रात्र काढलेला मोर म्याऊ-म्याऊ करत होता. दिवसभर जमिनीवर चरणारा मोर रात्री झोपेसाठी अति उंच झाडावर जाऊन बसतो. सकाळी सकाळी उंच झाडावरून मोराचा आवाज सर्वदूर जंगलात पसरतो.

सूर्याची सोनेरी किरण मचाणावर पडू लागली होती. दुरूनच चार नीलगायी कान उंचावून मचाणाकडे पाहत होत्या. हरीण पिल्लासोबत पाणवठय़ाला आलं. पिल्लू पाणी पिताना घसरून पाणवठय़ात उतरलं, थोडं घाबरलं आणि उडय़ा मारत आईजवळ येऊन उभं राहिलं.

मचाणावर असलेले सोबती हळूहळू जागे झाले होते. त्यांची पहाट झाली होती तर माझ्या जीवनात चैतन्य आणि समाधी अवस्थेची आस लागलेली पहाट झाली होती.
डॉ. संदीप साखरे – response.lokprabha@expressindia.com

 

First Published on February 23, 2018 1:02 am

Web Title: india wildlife sanctuary melghat