आपल्याकडच्या कथक (उत्तर प्रदेश), भरतनाटय़म (तामिळनाडू), ओडिसी (ओरिसा), मणिपुरी (मणिपूर), कथकली (केरळ), मोहिनीअट्टम (केरळ), कुचीपुडी (आंध्र प्रदेश), सात्रेय (आसाम) या भारतीय शास्त्रीय नृत्यशैली म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी कथक, भरतनाटय़म, मोहिनीअट्टम आणि कुचीपुडी यांची तोंडओळख आपण करून घेऊ.
कथक- अयोध्या, नाथद्वारा या उत्तरेकडील देवळातील रासधारी कीर्तनकारांच्या परंपरेतून कथक या नृत्यशैलीचा उगम झाला असे मानण्यात येते. महारास, नाटय़रासक या तऱ्हेची लोकाभिमुख नृत्यपद्धती त्या काळात अस्तित्वात होती. त्यातूनच पुढे ‘कथक’ ही परिवर्तित शास्त्रीय नृत्यशैली जन्म पावली.  देवळात सांगितल्या जाणाऱ्या कथांना ‘कथा काहे सो कथक कहलावे’ या नियमाने पुढे ‘कथक’ हे नाव पडले.  पुढे याच उद्देशाने लहान मुलांची समूहनृत्ये व त्यांना कृष्ण गोपी अशा भूमिका देऊन थोडेसे नाटय़ त्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला. काही काळ तिला राजाश्रय मिळाला आणि नंतर मात्र दुरवस्था प्राप्त झाली. ब्रिटिश काळामध्ये इथल्या कला व संस्कृतीचे महात्म्य व महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्ण पण नजीकच्या काळात मॅडम मेनका यांनी कथकच्या पुनरुज्जीवनासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
भरतनाटय़म- भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमधील एक महत्त्वाची नृत्यशैली म्हणजे भरतनाटय़म ही शैली. भरतनाटय़म हे मूळ दक्षिण भारतातील तामिळनाडू प्रांतातील नृत्य आहे. परंतु आता ते केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतात अतिशय लोकप्रिय आहे. पूर्वी ही नृत्यशैली मुळात देवदासी करत असत. भरतनाटय़म हे शुद्ध स्वरूपात व आपल्या मूळ रूपात टिकवून ठेवण्यात देवदासींचा फार मोठा वाटा आहे. तंजावर प्रांतामध्ये जन्म झालेल्या भरतनाटय़म नृत्यशैलीमध्ये घराणे पद्धती नाही; परंतु तंजावर, कलाक्षेत्र, पंडनल्लूर आणि वळवूर या पद्धतीत ही शैली नाचली जाऊ  लागली. चिन्नय्या, पुनय्या, शिवानंद, वडिवेल्लू या तंजावर बंधूंना तर रुक्मिणी देवी यांना कलाक्षेत्राच्या आणि मीनाक्षी पिल्लई यांना पंडनल्लूर पद्धतीचे जनक मानले जाते. भारतनाटय़म नृत्यशैलीत कर्नाटक संगीताचाच उपयोग जास्त केला जातो. मराठी भाषेतही ही नृत्यशैली प्रस्तुत करण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत आणि ते यशस्वीही झाले आहेत. कन्नड, तामीळ, तेलगू, संस्कृत इ. भाषेमध्ये ही नृत्यशैली प्रस्तुत केली जाते. भरतनाटय़मची तालपद्धती ही कर्नाटक शैलीची आहे. या नृत्यशैलीसाठी मृदंगम, तालम, वीणा, व्हायोलीन आणि बासरी या वाद्यांची साथसंगत महत्त्वाची असते.
मोहिनीअट्टम- हा केरळमधील शास्त्रीय नृत्यप्रकार आहे. ‘मोहम’ म्हणजे आकर्षित करणे किंवा मोहात पडणे त्यावरून मोहिनी हा शब्द तयार झाला. अत्यंत मोहक अशा स्त्रीने डौलदारपणाने सादर केलेले नृत्य म्हणजे मोहिनीअट्टम नृत्य. १७५ वर्षांंपूर्वी स्वामी तीरुनालांच्या काळी ही शैली उत्कर्ष पावलेली होती; परंतु पुढे राजाश्रय संपल्यानंतर तिचे शास्त्रीय स्वरूप लोप पावून प्रदर्शनात उत्तानता आली. २० व्या शतकात प्रसिद्ध कवी वल्लथोळ यांनी या नृत्यशैलीचे पुनरुज्जीवन केले व केरळमध्ये ‘कलामंडलंम’ नावाची सर्व नृत्यशैलींचा अभ्यास करणारी नृत्यसंस्था सुरू केली. आपण आत्ताचे जे रंगमंचीय स्वरूप बघतो ते गेल्या ५०/६० वर्षांतील आहे. अत्यंत नाजूक, डौलदार, मृदू आणि लयबद्ध हालचाली हे मोहिनीअट्टमचे वैशिष्टय़ असल्यामुळे ही नृत्यशैली फक्त स्त्री नर्तकींपुरतीच मर्यादित आहे. या नृत्यशैलीची मूळ भाषा मल्लय़ाळम आहे. तसेच या शैलीमध्ये कोणत्याही प्रकारची जोरदार हालचाल नसते. म्हणजेच ‘ताण्डव’चा संपूर्णपणे अभाव असून ‘लास्य’ अंगाला प्राधान्य अशी ही नृत्यशैली आहे.
कुचीपुडी-  कुचीपुडी या आंध्र प्रदेशातील पारंपरिक नृत्य नाटय़ाचा  आज भारतीय नृत्यशैली म्हणून बराच विकास झाला आहे. तिथे दीवी तालुक्यात कुचीपुडी नावाचे एक गाव आहे. हे संपूर्ण गाव गेल्या अनेक वर्षांपासून कुचीपुडी नृत्यशैलीची साधना करत आहे आणि या गावावरून या शैलीचे कुचीपुडी हे नाव पडले असावे. भरतमुनींच्या नाटय़शास्त्रावर आधारित ही शैली आहे. कुचीपुडी नृत्य स्वतंत्र, लचकदार आणि उमलत्या फुलाप्रमाणे आहे. अंगसंचलन स्प्रिंगप्रमाणे वरखाली पद्धतीचे असल्याने कंबरेखालील भागावर अधिक मेहनत घ्यावी लागते. ताण्डव आणि लास्याचा समन्वय या नृत्यशैलीत आढळतो. कुचीपुडी हे मुख्यत: ‘नाटय़’ असल्यामुळे यात अभिनयाला अधिक प्राधान्य दिले जाते.
शीतल कपोले – response.lokprabha@expressindia.com

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..