00-lp-devi-logoडायमंड मार्केटचे नाव आपण ऐकलेले असते, मार्केट बाहेरून पाहिलेलेदेखील असते. पण कधी आतमध्ये डोकावलेले नसते. हिऱ्यांच्या या बाजारात नेमके काय चालते त्याची एक झलक..

सोन्याबद्दल आपण भारतीय अगदी वेडे असलो तरी डायमंडबाबत आपण तितके वेडे नसतो. कदाचित ते वंशपरंपरागतच असावे. पण असे असतानादेखील जगातील हिऱ्याच्या संपूर्ण खाणींतून जितके हिरे काढले जातात त्यातील जवळपास सर्वच्या सर्व हिरे थेट आपल्या देशात येतात. याला कच्चा हिरा असेदेखील म्हटले जाते. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पण हे अगदी शंभर टक्के कागदोपत्री सत्य आहे. पण असे असूनदेखील जगातील हिऱ्याच्या सर्वात मोठय़ा बाजारपेठांमध्ये आपला नंबर लागत नाही. हाँगकाँग, ब्रुसेल्स आणि दुबई या बाजारपेठा त्यामध्ये आघाडीवर आहेत. तर अमेरिका, युरोप या देशांमध्ये हिऱ्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. हिऱ्यांच्या बाजारपेठेचे असे चित्र असताना खाणीतून थेट आपल्या देशात हे हिरे येतात कशासाठी, असा एक साहजिक प्रश्न पडू शकतो.

येथे संदर्भ येतो तो आपल्या कला-कौशल्याचा. आपल्याकडे हिरा येतो तो त्याचे कटिंग पॉलिश करण्यासाठी. म्हणजेच पैलू पाडण्यासाठी. आपण भारतीय त्यासाठी जगात प्रसिद्ध आहोत. अर्थात केवळ प्रसिद्ध असून उपयोग नाही, तर आपण त्यातील अर्थकारणात पुरते मुरलेलो आहोत. बेल्जियममधील अँटवर्प हे खाणीतून काढलेले हिरे विकण्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. आपल्या देशातील अनेक हिरे व्यापाऱ्यांच्या पाच-दहा पिढय़ा त्या देशात स्थिरस्थावर झाल्या आहेत. आणि आपल्या देशात हा हिरे व्यापार इतका संघटित झाला आहे की, आजवर सोन्याचा व्यापारदेखील इतका संघटित होऊ शकलेला नाही.

या सर्वाची एक ओझरती झलक पाहायला मिळते, ती मुंबईतल्या डायमंड मार्केटमध्ये. चर्नी रोडचे ऑपेरा हाऊस हे एके काळी अगदी जगप्रसिद्ध होते. पण आज हा सारा व्यापार एकवटला आहे तो बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ‘भारत डायमंड बोर्स’मध्ये. बोर्स म्हणजे सराफा व्यापार.

तब्बल वीस एकरांवर असलेल्या या जागेत कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण जगातून कच्चे हिरे येथे येत असतात. हा सारा व्यापार किती मोठा असावा, तर २०१५-१६ मध्ये तब्बल        ५ हजार २०३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कच्चे हिरे आयात झाले तर कटींग-पॉलिश करुन १४ हजार ३१२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या हिऱ्यांची निर्यात झाली. भारतातून होणाऱ्या एकूण हिऱ्यांच्या आयात निर्यातीच्या अध्र्याहून अधिक व्यापार हा भारत डायमंड बोर्समध्ये होत असतो.

या वीस एकरांतील आठ भल्या मोठय़ा टॉवरमध्ये दिवसाला किमान ४० हजार लोकांची ये-जा होत असते. किमान तीन हजार व्यापाऱ्यांची येथे दुकाने आहेत. आणि इतर पाच-दहा हजार व्यापारी नियमित येथे येत असतात. इतकेच नाही तर हिरे परखण्यासाठीच्या प्रयोगशाळा, त्यासाठी लागणारी साधनसामग्री, हिऱ्यांची कुरिअर सेवा, एक्साइजचे स्वतंत्र कार्यालय असे सर्व घटक येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत. पण येथे अधिकृत व्यापाऱ्यांच्या संमतीनेच प्रवेश करता येतो अशी कडेकोट व्यवस्था आहे.

जगात जेथे जेथे हिऱ्यांचा व्यापार चालतो तेथे एक व्यवस्था परिपूर्णपणे काम करीत असते. ती पारदर्शकदेखील असते. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असतात. पण आपल्याकडे अगदी वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत हा सर्व व्यापार अगदी कडेकोट कुलपात बंदिस्तपणे सुरू असायचा. त्यातच मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. १९८० पासूनच हे मार्केट स्थलांतराच्या प्रतीक्षेत होते. पण त्याला वेग आला तो हिरे व्यापाऱ्यांच्या नव्या पिढीमुळे. बेल्जियममधील बाजारपेठेचे प्रारूप डोळ्यासमोर होतेच. त्यातूनच वेग आला आणि २०१० मध्ये हा सारा व्यापार बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एकवटला.

अर्थात इतक्या मोठय़ा प्रमाणात हा व्यापार सुरू असला तरी यातल्या एकासुद्धा हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम मुंबईत होत नाही. त्यासाठी येथे येणारा प्रत्येक हिरा गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद येथे जातो आणि पैलू पाडून परत मुंबईत येतो. व्यापार होतो तो मुंबईतच. जगभरातून अनेक व्यापारीदेखील येथे येत असतात. पण येथील व्यापाऱ्यांचा बहुतांश भर आहे तो पारंपरिक पद्धतीने निर्माण झालेल्या विश्वासाच्या साखळीवरच अवलंबून आहे. त्याचे प्रत्यंतर येथील ट्रेडिंग हॉलमध्ये येते. भारत डायमंड बोर्समध्ये मुंबई डायमंड र्मचट असोसिएशनचा एक विशेष ट्रेडिंग हॉल आहे. एकाच वेळी तब्बल ५०० हून अधिक व्यापाऱ्यांसाठी येथे व्यवहाराची सोय करण्यात आली आहे. प्रत्येकाला टेबल, त्यावर हिरे तपासणीचे आयग्लास आणि खास दिवा. जो तो आपला आयग्लासमध्ये डोळे खुपसून तासन्तास हिऱ्याची पारख करीत असतो. पण व्यवहार होतो तो वर्षांनुवर्षे बांधलेल्या व्यापाऱ्यांबरोबरच. एका व्यापाऱ्याने नाही म्हटले की लगेच दुसरा व्यापारी हिरे विकत घेईल असे सहसा होताना दिसत नाही.

म्हटले तर भूलभुलैया वाटावा असा हा सारा परिसर. पण जगातील व्यापारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ठिकाण आहे.

अशी होते हिऱ्यांची चाचणी

हिऱ्याची पारख करता आली पाहिजे अन्यथा काचेचा तुकडादेखील तसाच चमकतो. त्यामुळे या व्यवसायातील प्राथमिक आणि पारंपरिक पात्रता ही हिरे परखणे हीच होती. केवळ व्यापार करता येतो यावर रेटून नेणारा हा व्यवसाय नाही. पण यातदेखील गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे, तो मुख्यत: तंत्रज्ञानामुळे. भारत डायमंड बोर्समध्ये आज जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे एक अद्ययावत असे परीक्षण केंद्र आहे. अगदी मोहरीच्या कणाएवढय़ा बारीक हिऱ्यापासून ते मोठय़ा आकाराच्या कोणत्याही हिऱ्याचे येथे परीक्षण केले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे सारे परीक्षण मानवविरहित आहे. म्हणजे यंत्र चालवण्यासाठी तंत्रज्ञांची गरज असते, मात्र हिरा खरा की खोटा हे सांगायचे काम यंत्रच करते. अर्थात अनेक व्यापारी नजरेने हिरा पारखतात हेदेखील आहेच.

हिरे पारखण्याची मुख्य गरज सध्या निर्माण झाली ती सिंथेटिक हिऱ्यांच्या उत्पादनामुळे. मानवनिर्मित सिंथेटिक हिरे वेगळे करणे हे महत्त्वाचे काम यात करावे लागते. दुसरे असे की, हा सारा व्यापार निर्यातीशी निगडित आहे. त्यामुळे प्रमाणीकरणाचे जागतिक प्रमाण वापरणे अनिवार्य असते. तीन-चार वेगवेगळ्या परीक्षणांचा यासाठी आधार घेतला जातो. हिऱ्यातील विविध रासायनिक संयुगांची परीक्षा यात केली जाते. मानवी शरीराचा कार्डिओग्राम असावा अशा पद्धतीने हिऱ्यातील रासायनिक घटकांच्या नोंदीचा आलेख थेट संगणकावर उमटतो. तर सिंथेटिक आणि खऱ्या हिऱ्यांचा दर्जा ठरवण्यासाठीचे तंत्र इतके अद्ययावत आहे की, शंभरेकबारीकबारीक हिरे जरी मशीनमध्ये टाकले तरी पंधरा-वीस मिनिटांत त्याची छाननी होऊन त्या त्या विशिष्ट ट्रेमध्ये विभागले जातात.

या सर्वामध्ये जाणवलेली आणखी एक बाब म्हणजे हिरे परीक्षणाचे एक यंत्र सी व्ही रामन यांच्याच एका संशोधनावर आधारित आहे. खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे हिरे परखण्याचे मानवी कौशल्य असले तरी आपल्याकडील रामन यांच्या तंत्राचा वापर करुन यंत्र तयार केले ते मात्र बाहेरच्या लोकांनी.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2