भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीला सध्या घरच्या मैदानांवरून आलेल्या बाऊन्सर्सनी चीतपट केलं आहे. त्याची बायको हसीन आणि त्याच्यामधला वाद नेमका काय आहे?

एखाद्या परीकथेप्रमाणेच त्यांच्या आयुष्याची कहाणी होती.. खडतर परिस्थितीमुळे प्लास्टिक बॉलपासून खेळाला सुरुवात करणारा एक मुलगा पुढे जाऊन भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर एक सुंदर तरुणी त्याच्या आयुष्यात येते. ‘एक हसीना थी.. एक दिवाना था..’ याच शब्दांत वर्णन व्हावं, अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग सेलिब्रेटींप्रमाणे समाजमाध्यमांवर आपली छायाचित्रं टाकतात. तिथं जातीयवाद्यांच्या टीकेला भीक न घालता आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात. पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं. कथेला भलं मोठं वळण येतं. सध्या सर्वात चर्चेत असलेली ही कथा आहे मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हिची.

‘पैशाचा मला अजिबात मोह नाही. परंतु जमेल तितक्या वेगात चेंडू टाकायचा आणि समोरच्या फलंदाजाच्या यष्टय़ा उद्ध्वस्त करायच्या, हे मात्र माझं लक्ष्य असतं. त्या उडल्यावर उमटणारा ध्वनी ऐकण्यासाठी माझे कान नेहमी आतुर असतात, नव्हे ते माझ्या आयुष्याचं टॉनिक आहे!’ हे उद्गार आहेत मोहम्मद शमीचे. तो गेल्या काही वर्षांत भारतीय संघातील एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज म्हणून स्थिरावला आहे. शमीच्या यशस्वी कारकीर्दचं खरं श्रेय जातं ते त्याचे वडील तौसिफ अली यांना.

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यपासून २० किलोमीटर अंतरावरील साहसपूर अली नगर या गावी तौसिफ यांचं ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या साहित्य-सामुग्रीचं दुकान आहे. तौसिफ यांनासुद्धा वेगवान गोलंदाजीचा नाद. परंतु पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष अधिक केंद्रित झाल्यामुळे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. परंतु आपल्या मुलानं वेगवान गोलंदाज होऊन देशाचं नाव मोठं करावं, असं स्वप्न मात्र त्यांनी जिवापाड जोपासलं होतं. शमीचे तिन्ही भाऊ वेगवान गोलंदाजी करायचे. परंतु मोठय़ा भावाची कारकीर्द आजारपणामुळे अकालीच संपुष्टात आली. त्यानं वडिलांच्या व्यवसायात रस घेतला. मात्र शमीच्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी त्याचं महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच तौसिफ यांनी त्याला बद्रुद्दिन सिद्धिकी यांच्याकडे नेलं. कारण साहसपूरला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. ना मैदाने होती, ना खेळपट्टय़ा. फक्त चिखलाचं साम्राज्य होतं. आजही तिथं २४ तासांतले बरेचसे तास लोडशेडिंग असतं.

२००५मध्ये उत्तर प्रदेशच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी शमीसुद्धा मोठय़ा उत्साहात सहभागी झाला. परंतु तिकडच्या राजकारणाचा फटका बसल्यामुळे त्याच्या नावाचा विचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचं वर्ष वाया जाणार होतं आणि वर्षभरानंतरसुद्धा संधी मिळेलच याची खात्री नव्हती. या परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे सिद्धिकी यांनी शमीला कोलकाता येथे पाठवण्याचा सल्ला त्याच्या वडिलांना दिला. त्याने तो शिरसावंद्य मानला.

तेज गोलंदाज होण्याचं स्वप्न घेऊन शमी कोलकातामध्ये आला. डलहौसी अ‍ॅथलेटिक क्लबकडून त्यानं खेळायला सुरुवात केली. प्रत्येक सामन्याला पाचशे रुपये मानधन मिळायचं आणि रात्री झोपण्यासाठी मैदानाच्या सीमारेषेबाहेरील तंबूचा आसरा असायचा. आयुष्याशी असा झगडा सुरू असताना एके दिवशी डलहौसी क्लबच्या सुमन चक्रवर्ती यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव देवव्रत दास यांना शमीची गोलंदाजी दाखवली. ‘नया हिरा है, ध्यान दो, नहीं तो खो जायेगा’ हेच शब्द चक्रवर्ती यांनी उद्गारले होते. क्रिकेटमधील पारखी असलेल्या दास यांना चक्रवर्ती यांच्या शब्दाचे मोल कळले. त्यांनी शमीसमोर टाऊन क्लबकडून खेळायचा प्रस्ताव ठेवला. ७५ हजार रुपये वर्षांचे मानधन आणि प्रत्येक दिवशी भोजनासाठी १०० रुपये असा हा करार होता. परंतु शमीनं धीटपणे ‘मी राहायचं कुठे?’ अशी आपली अडचण त्यांच्यासमोर मांडली. दास यांनी क्षणाचीही उसंत न घेता, ‘माझ्या घरी!’ असं त्याला सांगितलं. त्यानंतर शमीला घेऊन दास घरी गेले आणि पत्नीला आपला निर्णय सांगितला, ‘हा मुलगा आजपासून आपल्यासोबत राहील!’

मग शमीनं आपल्या मेहनतीनं बंगालच्या २२ वर्षांखालील संघात स्थान मिळवलं. त्यानंतर दास यांनी शमीला मोहन बागान क्लब या कोलकातामधील नामांकित संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी एके दिवशी ईडन गार्डन्सच्या नेटमध्ये शमीला साक्षात सौरव गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. शमीच्या गोलंदाजीच्या कौशल्यानं गांगुली भलताच प्रभावित झाला आणि त्यानं बंगालच्या क्रिकेटधुरिणांना सांगितलं की, ‘शमीची काळजी घ्या, तो भारताचं भविष्य आहे!’

त्यानंतर २०१० मध्ये शमी बंगालच्या रणजी संघात सामील झाला. २०११ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएलसाठी त्याला करारबद्ध केलं. तर २०१२ मध्ये भारत ‘अ’ संघात त्याची वर्णी लागली. २०१३ मध्ये अशोक दिंडाला दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून शमीला पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर त्यानं कसोटी पदार्पण केलं. पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत त्यानं संधीचं सोनं केलं. आता शमीच्या खात्यावर ३० कसोटी सामन्यांत ११० बळी आणि ५० एकदिवसीय सामन्यांत ९१ बळी जमा आहेत.

शमी कोलकातामध्ये आला, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नव्हतं. फक्त वेगवान गोलंदाजी आणि स्वप्न या दोनच गोष्टी त्याच्याजवळ होत्या. एकेकाळी डलहौसी क्लबच्या प्रांगणातील शमीची निवासव्यवस्था असणाऱ्या तंबूचं आता सदस्यांसाठी अलिशान रेस्टॉरंट आणि बारमध्ये रूपांतरण झालं आहे. शमीचे दिवसही आता पालटले आहेत. कोलकातामध्ये आता त्याचं स्वत:चं घर आहे, दिमतीला गाडी आहे. शमीच्या कर्तृत्वाचा जसा बंगालवासीयांना अभिमान आहे, तसाच उत्तर प्रदेशमधील नागरिकांनाही आहे.

मोहम्मद आणि हसीन यांनी साहसपूरपासून काही अंतरावर एक भूखंड घेतला होता. त्याचं नाव हसीन फार्महाऊस असं ठेवलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत हसीननं या साऱ्या सुखस्वप्नांची होळी करून टाकली आहे. सर्वप्रथम हसीननं फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं. नंतर तिनं सर्व प्रसारमाध्यमांसमोर आपण जगत असलेल्या वास्तवाची (सत्य की असत्य?) करुण कहाणी सांगितली. प्रसारमाध्यमांना चघळण्यासाठी नवं खाद्य मिळालं. घरगुती हिंसाचार, मारहाण, विषप्रयोग, हत्येचा प्रयत्न, दिराकडून बलात्कार आणि एका व्यक्तीकडून पैसे घेणे अशा असंख्य आरोपांची लाखोली तिनं वाहिली.

स्वाभाविकपणे प्रश्न उभा राहतो, कोण आहे ही हसीन जहाँ? ती मोहम्मदच्या आयुष्यात कशी आली? या काही प्रश्नांचीही आता उकल होऊ लागली आहे. हसीन कोलकाताचीच. एका बंगाली मुस्लीम कुटुंबातली. तिच्या वडिलांचा वाहतूक व्यवस्थेचा व्यवसाय आहे. एक मॉडेल म्हणून तिनं कारकीर्दीला प्रारंभ केला. चित्रपटात अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवावा, असं स्वप्न घेऊन ती जगत होती. कालांतरानं आयपीएलसाठी चीअरलीडर म्हणून ती काम करू लागली. २०१२ च्या आयपीएल हंगामाच्या वेळी मोहम्मद आणि हसीन यांची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत तो तिला हृदय देऊन बसला. आजच्या युगाला साजेसं डेटिंग वगैरे सुरू झालं. २०१४ मध्ये त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक दडपणामुळे नंतर हसीननं आपल्या कारकीर्दीची स्वप्नं बासनात गुंडाळली. आता हसीनच्या आरोपसत्रांची मालिका सुरू असताना हा तिचा दुसरा विवाह असून, पहिला विवाह झाल्याचं समोर येत आहे. तिच्या पहिल्या पतीच्या दाव्यानुसार, शाळेत असतानाच त्यांचं प्रेम फुललं, मग दोघांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत. मात्र काही वर्षांपूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे.

हसीनच्या या ताज्या वादळात शमीची कारकीर्द बेचिराख करण्याची ताकद आहे. त्याच्यामागे सध्या बीसीसीआयचा लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोलकाता पोलीस यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार रोखला आहे. काही दिवसांवर आलेल्या आयपीएलमध्येसुद्धा तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. शमी कोणत्या तरुणींना भेटतो, त्याचे त्या तरुणींशी असलेले विवाहबाह्य़ संबंध, तो त्यांच्यासोबत कसा व्यभिचार करतो, अशा अनेक गोष्टींचा हसीननं पर्दाफाश केला आहे. शमी या आरोपांच्या फैरींमुळे खचला आहे. ‘हसीनचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. माझी कारकीर्द संपवून टाकण्यासाठी हा डाव रचला गेला आहे,’ अशा शब्दांत तो स्वतची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

तूर्तास, शमी आणि हसीनच्या कहाणीत नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कोणत्या वळणावर जाईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.