X
X

उत्सव विशेष : भारतीय परंपरेतील चातुर्मास

चातुर्मासात म्हणजेच श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांच्या काळात अतिशय धार्मिक वातावरण असते.

गौरी पाटील – response.lokprabha@expressindia.com

चातुर्मासात म्हणजेच श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांच्या काळात अतिशय धार्मिक वातावरण असते. या काळात भरपूर सण साजरे होतात तसेच व्रतवैकल्ये केली जातात. त्यातील काही निवडक व्रतवैकल्यांचा परिचय.

चातुर्मासाला भारतीय समाजात फार महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांत म्हणजेच चातुर्मासात व्रतवैकल्ये, सणवार यांची रेलचेल असते. या सगळ्यामुळे निर्माण झालेले उत्सवी वातावरण समाजात चैतन्य निर्माण करणारे ठरते. तरीही अनेकांना सर्वसामान्यपणे चातुर्मासातील ठळक व्रतवैकल्यांची माहिती असते. या ठळक गोष्टींशिवायही धार्मिक महत्त्वाची अशी अनेक व्रतवैकल्ये या काळात असतात आणि ती ठिकठिकाणी नित्यनेमाने साजरी होतात. त्यांची तपशीलवार माहिती.

श्रावण

श्रावण महिन्यात सर्वाधिक महत्त्वाचे व्रत असते ते श्रावणी सोमवारचे. त्याला दोन-तीन विशेष संदर्भ आहेत. एक म्हणजे श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ. हे व्रत प्रामुख्याने ब्राह्मण स्त्रिया करत असत. पण आता तसे राहिलेले नाही. समाजाच्या सर्व थरांतील शंकराच्या भक्त असलेल्या स्त्रिया हे व्रत करतात. लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे ते करतात. त्यानुसार श्रावण महिन्यातील सगळ्या सोमवारी उपवास करतात. या दिवशी शिवलिंगाची पूजा क रून त्यावर एका साोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी तूप, चौथ्या सोमवारी मूग, जवस अशा धान्याची एक मूठ वाहायची असते. पाच वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. याशिवाय श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. त्यात श्रावणात दर सोमवारी उपवास केला जातो. तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. श्रावणी सोमवार आणखीही वेगळ्या प्रकारे केला जातो. त्यात शंकराचे ध्यान केले जाते. ओम नम शिवायचा जप केला जातो. शंकरपार्वतीची पूजा केली जाते. एका वेळेलाच जेवण करून दुसऱ्या वेळेला उपवास केला जातो. चौदा वर्षे फ क्त श्रावणातच नाही तर दर सोमवारी उपवास क रून मग त्याचे उद्यापन केले जाते. श्रावणी सोमवारच्या आणखी एका प्रकारात महत्त्वाचे आहे ते हिमाचल प्रदेशातील चंबा हे ठिकाण. इथे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी एक जत्रा भरते. ती पुढे अनेक दिवस सुरू असते. शेवटच्या दिवशी गोडाधोडाचे जेवण असते. त्या दिवशी मिरवणूक निघते. नदीवर जाऊन वरुण देवाला मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ वाहत्या पाण्यात सोडतात. मग एकमेकांना अत्तर लावून आणि मिठाई वाटून या व्रताची सांगता होते. याशिवाय महाराष्ट्रात श्रावणी सोमवार करण्याची आणखी एक पद्धत आहे. तीनुसार नाशिक जिल्ह्य़ात पांडवलेणींमध्ये असलेल्या बुद्धाच्या मूर्तीलाच धर्मराज मानून तिची पूजा केली जाते.

श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहित स्त्रियांची मंगळागौर असते. नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत पहिल्या वर्षीच्या मंगळवारी माहेरी तर पुढच्या चार वर्षी सासरी करतात. नवविवाहित स्त्री स्नान क रून चौरंगावर गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करते. हा चौरंग केळीचे खांब चारही बाजूंनी बांधून पानाफुलांनी सजवलेला असतो. गौरीच्या मूर्तीची षोडषोपचारे पूजा केली जाते. या पूजेमध्ये चण्याची डाळ, धणे, जिरे, तसेच तांदळाचे प्रत्येकी १६ दाणे देवीला वाहिले जातात. सोळा प्रकारच्या पत्री तसेच बेलाची पाने वाहिली जातात. चौरंगाशेजारी पाटा वरवंटा ठेवलेला असतो. सोळा वाती किंवा सोळा निरांजने घेऊन आरती केली जाते. मग ती नवविाहिता आणि इतर स्त्रिया हातात अक्षता घेऊन मंगळागौरीची कथा ऐकतात. ती ऐकून झाल्यानंतर हातातील अक्षता गौरीला वाहून तिला नमस्कार केला जातो. यानंतर मौन राहून जेवण करायचे असते. रात्री उपवास करायचा असतो. मंगळागौरीची रात्र मैत्रिणी तसेच जमलेल्या इतर स्त्रिया यांच्याबरोबर गाणी गात, वेगवेगळे खेळ खेळत जागवायची असते. पाच किंवा सात वर्षांनी मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन करायचे असते.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारी काही ना काही व्रत आहे. त्यानुसार श्रावणातल्या बुधवारी बृहस्पतीची म्हणजे गुरूची पूजा सांगितलेली आहे. त्यासाठी बुध आणि गुरूचे चित्र घेऊन त्यांची पूजा करतात. त्या चित्राला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. सात वर्षे हे व्रत क रून त्याचे उद्यापन करतात.

श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यासाठी चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीला आवाहन केले जाते. तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून आलेल्या स्त्रियांना वाण दिले जाते आणि वरदलक्ष्मीची कहाणी सांगितली जाते. याशिवाय श्रावणातल्या शुक्रवारी जरा जिवंतिका तसंच जीवतीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात श्रावणातल्या शुक्रवारी जीवतीचे चित्र भिंतीवर लावून दुर्वा, फुले, आघाडा यांची माळ क रून ती वाहून तिची पूजा केली जाते.

श्रावणातला शनिवारदेखील महत्त्वाचा असतो. या दिवशी अश्वत्स्थाची पूजा केली जाते. त्यासाठी दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाला घालतात. पिंपळाची पूजा विष्णूला पोहोचते असे मानण्याची प्रथा आहे. त्याशिवाय श्रावणात मारुतीला तेल, रुईच्या पानांची माळ घातली जाते. काही जण संपूर्ण चातुर्मासात मिळून पिंपळाला एक लाख प्रदक्षिणा घालतात. श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी आणखी एक व्रत केले जाते. त्यात शनीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालतात. तिची पूजा करतात. शनीच्या नावांचा किंवा शनैश्वर स्तोत्रामधील पहिल्या श्लोकाचा जप करतात. खीर, पुरी, खिचडी असा नैवेद्य दाखवतात. याचबरोबर श्रावणातल्या शनिवारी नृसिंहाचे चित्र काढून त्याची पूजा क रून कुंजरा नावाची पालेभाजी आणि डाळतांदुळाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. शनीची साडेसाती कमी व्हावी म्हणून शनीव्रतदेखील केले जाते. त्यासाठी श्रावणी शनिवारी लोखंडाच्या शनीप्रतिमेला पंचामृताचे स्नान घालून तिची पूजा केली जाते. फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

श्रावणातील रविवारही विशेष महत्त्वाचा असतो. श्रावणातील पहिल्या रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत केले जाते. हे व्रत स्त्रिया करतात. त्या दिवशी सकाळी उठल्यापासून मौन पाळायचे असते. आंघोळ क रून विडय़ाच्या पानावर रक्तचंदन उगाळून सूर्याचे चित्र काढायचे असते. शेजारी एका गोलात षटकोन काढायचा असतो. मग सहापदरी दोऱ्याला गाठी मारून या सगळ्याची एकत्र पूजा करायची असते. राणूबाईची म्हणजेच सूर्यपत्नीची पूजा करायची असते. याशिवाय रविवारी करायचे दुसरे व्रत म्हणजे श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्य म्हणजेच सूर्याची पूजा करायची असते.

याव्यतिरिक्त श्रावणात करायची विशेष व्रतवैकल्ये आहेत. श्रावण पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते, तेव्हा हा विधी करतात. महाराष्ट्रातील अनेक कुळांमध्ये श्रावणात पतीर भरणे हा कुलाचार पाळला जातो. त्यासाठी भोपळ्याचे किंवा तांब्याचे पात्र घेतले जाते. घरी साधूंना बोलावून एका पाटावर पतीर म्हणजे हे पात्र ठेवले जाते. त्यात शिजवलेला भात भरला जातो. त्याची पूजा क रून नेवैद्य दाखवला जातो. जोग्याला भोजन आणि ते पतीर दिले जाते.

श्रावण शुक्ल प्रतिपदेला म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्धश्रावणिक व्रताची सुरुवात केली जाते. पूर्ण महिनाभर एकवेळ जेवून हे व्रत केले जाते. महिनाभर पार्वतीची पूजा क रून महिन्याच्या शेवटी त्याचे उद्यापन केले जाते. श्रावण महिन्याच्या द्वितीयेला अशून्य व्रताची सुरुवात करतात. त्यासाठी चंद्राला दह्य़ाचे अघ्र्य देतात. मनोरथ द्वितीया हे व्रत करतात तेव्हा दिवसभर उपवास क रून रात्री चंद्राला अघ्र्य देतात. श्रावण शुक्ल तृतीयेला नंदाव्रत या व्रताची सुरुवात केली जाते. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल तृतीयेला देवीची पूजा आणि जप करतात. श्रावण शुक्ल चतुर्थीला दुर्वागणपती व्रत करतात. त्यासाठी स्नान क रून सर्वतोभद्र मंडल रेखाटतात. त्यावर कलश ठेवून त्यावरील पात्रात दूर्वा पसरवून त्यांच्यावर गणेशमूर्तीची स्थापना करतात. तिची पूजा करतात. आघाडा, शमी यांच्यासह पत्री वाहतात. आरती केली जाते. हे व्रत दोन, तीन किंवा पाच वर्षे करतात. श्रावण शुक्ल चतुर्थीला कपर्दि विनायक व्रत केले जाते. त्यात व्रत करणाऱ्या व्यक्तीने आदल्या दिवशी एकवेळच जेवायचे असते. चतुर्थीच्या दिवशी स्नान क रून चंदनाने मंडल काढून त्याच्या मध्यभागी अष्टदल काढून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवतात. तिची पूजा क रून फुले, अक्षता वाहतात. तांदळाची भाकरी, तांदळाची खीर, दहीभात असा प्रत्येक वेळी वेगवेगळा नेवैद्य दाखवतात. याशिवाय श्रावण शुक्ल चतुर्थीला २१ दिवसांच्या गणपती व्रताला सुरुवात करतात. त्यात गणपतीला २१ दूर्वा, २१ पत्री, २१ प्रदक्षिणा, २१ अघ्र्य, २१ मोदकांचा नेवैद्य दाखवला जातो. याच दिवशी महिनाभराच्या गणेश पार्थिव पूजाव्रताला सुरुवात केली जाते. हे व्रत भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीपर्यंत करतात. स्नान क रून चिकणमातीची गणेशमूर्ती करतात. तिची स्थापना क रून पूजा करतात. गणेशनामाचा जप करतात. या व्रताची सांगता करताना गणेशयाग क रून लोकांना जेवण घालून दक्षिणा देऊन गणेशमूर्तीचे विसर्जन करतात.

श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी. या दिवशी पाटावर नागाचे चित्र काढतात. किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करतात. त्यांना दूध आणि लाह्य़ांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काहीही चिरू, कापू, तळू, भाजू नये असा संकेत आहे. नागपंचमीच्या दिवशीच सर्पविषापह पंचमी हे व्रतही केले जाते. त्यात घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना गोमयापासून केलेल्या सर्पमूर्ती ठेवतात. त्यांना दही, दूध, फुलं, चणे वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी जाग्रदगौरीचे व्रतदेखील केले जाते. त्यात गौरीची पूजा करायची असते आणि रात्रभर जागरण करायचे असते.

श्रावण शुक्ल षष्ठीला वर्णषष्ठी हे व्रत करतात. हे व्रत पाच वर्षे करायचे असते. या दिवशी घरी किंवा मंदिरात जाऊन शंकराची पूजा करतात. वरणभाताबरोबर खारवलेला बाळआंबा नैवेद्यात दाखवतात. हे या व्रताचे वैशिष्टय़ आहे. बंगाली स्त्रिया याच दिवशी लोटणषष्ठी हे व्रत करतात. यात षष्ठीदेवीची पूजा करून तिला लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी रांधनछट नावाचे व्रतदेखील केले जाते. दुसऱ्या दिवशी शीतलासप्तमीला स्वयंपाक केला जात नाही. म्हणून आदल्या दिवशी गोडाधोडासह संपूर्ण स्वयंपाक केला जातो.

श्रावण शुक्ल सप्तमीला स्त्रिया शीतला सप्तमी व्रत करतात. या दिवशी शितलादेवीची पूजा करतात. आठ वर्षांखालील सात मुलींना जेवू घालतात. शितला देवीला थंड आवडते म्हणून आदल्या दिवशी स्वयंपाक करून त्याचा दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवतात.

श्रावण शुक्ल अष्टमीला दुर्वाष्टमी व्रत करतात. त्यात दुर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करायची असते. ती झाल्यावर आठ गाठी मारलेला दोरा डाव्या मनगटाला बांधायचा असतो. या दिवशी फ क्त फलाहार घ्यायचा असतो. उद्यापनाच्या वेळी तीळ आणि कणीक घालून पदार्थ क रून भोजन करायचे असते. याशिवाय श्रावण शुक्ल अष्टमीला दुर्गाव्रत करतात. त्यात दुर्गादेवीची पूजा आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो. गुजरातमध्ये यासारखेच धारो आठे नावाचे व्रत केले जाते. तर दर महिन्याच्या अष्टमीला केल्या जाणाऱ्या पुष्पाष्टमी व्रताची सुरुवात श्रावणातील अष्टमीपासून करायची असते. या व्रतात शिवाची पूजा करतात. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहतात.

श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी स्नान आटोपून पूजा क रून नैवेद्य दाखवून आरती करायची असते. रात्री कीर्तन वगैरे ऐकत जागरण करायचे असते. दुसऱ्या दिवशी व्रताचे उद्यापन करायचे असते, तर श्रावण शुक्ल दशमीला दधिव्रत केले जाते. या दिवशी केवळ दही खाऊन राहायचे असते.

श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. कोळीबांधव या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळापासून गोड पदार्थ करतात. नृत्य क रून नारळी पौर्णिमेचा आनंद साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेइतकाच महत्त्वाचा सण असतो तो रक्षाबंधनाचा. या दिवशी बहीण-भावाला राखी बांधते आणि या नाजूक बंधनाच्या माध्यमातून भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करण्याची हमी देतो.

यानंतर शुक्ल पक्ष संपून कृष्ण पक्ष सुरू होतो. श्रावण कृष्ण प्रतिपदेला मृगशीर्ष व्रत केले जाते. श्रावण कृष्ण अष्टमीला गोकुळाष्टमीचा सण येतो. काही जणांसाठी हा उत्सव असतो तर काही जणांसाठी ते व्रत असते. व्रत करणारे त्या दिवशी रात्री बारा वाजता कृष्णजन्म होईपर्यंत उपवास करतात.

श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्या. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी एखाद्या पाटावर आठ कलशांची स्थापना केली जाते. त्यात अष्टमातृकांची स्थापना केली जाते. त्यानंतर ६४ योगिनींना आवाहन क रून त्यांची पूजा केली जाते. श्रावण अमावास्येला येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त  करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलांना सजवून- धजवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. शेतकरी बांधवांमध्ये या सणाचे खूप महत्त्व आहे. याशिवाय श्रावणी पौर्णिमेला मातृदिन साजरा केला जातो.

भाद्रपद

तमाम गणेशभक्त ज्याची आवर्जून वाट पाहात असतात असा महिना म्हणजे भाद्रपद. हरितालिका, गणेशाची प्रतिष्ठापना, ज्येष्ठागौरींचे पूजन, गणेश विसर्जन, अनंत चतुर्दशी या सगळ्यांमुळे या महिन्यात धामधुमीचे वातावरण असते. याव्यतिरिक्तही या महिन्यात वेगवेगळी व्रतवैकल्ये केली जातात. भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला चातुर्मासात केले जाणारे फल व्रत केले जाते. ते करताना मौन पाळायचे असते. काही विशिष्ठ फळांचेच सेवन करायचे असते. तर महत्तम व्रतामध्ये शंकराच्या जटायुक्त मूर्तीची एका कलशावर स्थापना क रून पूजा करतात. जो काही नैवेद्य दाखवायचा असेल तो संख्येने ४८ अपेक्षित असतो. उदा. ४८ मोदक असतील तर, त्यातील १६ मोदक देवांना, १६ इतरेजना तर १६ मोदक स्वत: खायचे असतात. या दिवशी एकाच वेळेला जेवायचे असते. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. त्यासाठी हरितालिकेच्या बाजारात मिळणाऱ्या मूर्ती आणून किंवा तयार करून त्यांची पूजा करतात. उपवास करतात. हरितालिकेची कथा ऐकली-वाचली जाते. दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. याशिवाय कोटी संवत्सर व्रत, गिरीतनया व्रत, सुवर्णगौरी व्रत, गौरीतृतीया व्रत, गौरी व्रत अशी वेगवेगळी पार्वतीशी संबंधित व्रते केली जातात.

भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. या दिवशी गणपतीची शाडूच्या मातीपासून केलेली मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली जाते. नंतर तिची पूजा केली जाते. गणपतीला २१ पत्री, २१ दुर्वा वाहिल्या जातात. २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीची आरती केली जाते. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक कुटुंबाप्रमाणे गणपती बसवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यानुसार तेवढय़ा दिवसांनंतर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाटावर तांदळाचे सात छोटे ढिगारे ठेवून त्याच्यावर सप्तर्षीचे प्रतीक म्हणून सात सुपाऱ्या ठेवतात. या सप्तर्ष्ीची पूजा करतात. त्या दिवशी बैलाने क ष्ट क रून पिकवलेल्या नसतील अशा भाज्या खातात. हे व्रत सात वर्षे करतात. आठव्या वर्षी त्याचे उद्यापन करतात. भाद्रपद शुक्ल षष्ठीला सूर्यषष्ठी नावाचे व्रत केले जाते. या दिवशी सूर्याची पूजा करतात. त्याच्या नावाचा जप करतात. या दिवशी ललिताषष्ठी, चंपाषष्ठी ही व्रते केली जातात. चंपाषष्ठीचा योग दर २० वर्षांनी येतो. या दिवशी सकाळी स्नान क रून कलश स्थापून त्यावर ताम्हण ठेवतात. त्यात सूर्य प्रतिमा रेखाटून तिची पूजा केली जाते.

भाद्रपद शुक्ल नवमीला अदु:ख नवमीचे व्रत केले जाते. त्यात स्नान क रून मौन पाळले जाते. कलशावर ताम्हण ठेवून गौरीची प्रतिष्ठापना करतात. मग तिची पूजा करतात. या दिवशी उपवास केला जातो. रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी गौरीची उत्तरपूजा बांधतात आणि मग विसर्जन करतात. हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात. त्याचे नवव्या वर्षी उद्यापन केले जाते.

भाद्रपद शुक्ल दशमीला दशावतार व्रत केले जाते. त्यात स्नान क रून मग कणकेचा एखादा गोड पदार्थ करतात. देवाच्या दहा अवताराचे पूजन क रून मग त्यांना हा गोड पदार्थ वाहून मग भोजन करतात. हे व्रत दहा वर्षे करतात. भाद्रपद शुक्ल एकादशीला एक वेगळा विधी असतो. तो म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला चार महिन्यांसाठी झोपी गेलेले भगवान विष्णू भाद्रपद शुक्ल एकादशीला कूस बदलतात. त्यामुळे या दिवशी देवाला स्नान घालतात. त्याची महापूजा बांधून आरती करतात. रात्री देवाला उजव्या कुशीवर झोपवले जाते.

भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्र असेल तर तिला महाद्वादशी म्हणतात. याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. आणि दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. ही तिथी बुधवारी आली तर अधिकच महत्त्वाची मानतात. या दिवशी वामन द्वादशी हे व्रत केले जाते. हा दिवस म्हणजे विष्णूच्या वामनरूपातील अवताराच्या जन्माचा. हा जन्म मध्यरात्री झाला म्हणून या व्रताची पूजा मध्यरात्री केली जाते. नदीवरून पाणी आणले जाते. त्याची स्थापना केली जाते. ताम्हणामध्ये तीळ, गहू जव यापैकी काहीही भरून त्यावर वस्त्र ठेवून त्यावर वामनाच्या प्रतिमेची स्थापना करतात. तिची यथासांग पूजा करतात. दुसऱ्या दिवशी या प्रतिमेचे विसर्जन करतात.

भाद्रपद शुक्ल त्रयोदशीला अशोकव्रत केले जाते. हे स्त्रियांनी करायचे व्रत आहे. हे व्रत तीन दिवस करायचे असते. त्याचा प्रारंभ त्रयोदशीला होतो. त्या दिवशी स्नान क रू न अशोकवृक्षाजवळ जातात. व्रताचा संकल्प करतात. तीन दिवस अशोकवृक्षाला रोज १०८ अशा प्रदक्षिणा घालतात. पौर्णिमेला वृक्षाखाली शंकर, नंदी, राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीची स्थापना क रून  त्यांची पूजा करतात. आपल्या कुळातील सर्वाच्या शोकाची समाप्ती कर अशी अशोकाला प्रार्थना करतात.

यानंतरचा दिवस अनंत चतुर्दशीचा. या दिवशी ठिकठिकाणी गणपती विसर्जन केले जाते. त्याशिवाय या दिवशी अनंताचे व्रत केले जाते. हे पुरुषांनी करायचे व्रत आहे. ते सलग १४ वर्षे केले जाते. व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी स्नान क रू न चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात. त्याच्यावर ताम्हण ठेवले जाते. त्यात दर्भापासून केलेला अष्टफण्यांचा शेषनाग ठेवतात. त्याच्यासमोर चौदा गाठी बांधून तयार केलेला अनंताचा दोरा ठेवतात. कलशपूजा करतात. ध्यानधारणा करून विष्णूचा मंत्र म्हणतात. त्यानंतर विविध पूजा, पुष्पांजली होते. चौदा गाठींचा दोरा व्रत करणारी व्यक्ती आपल्या हातात बांधते. त्याआधीच्या वर्षीच्या दोऱ्याचे विसर्जन केले जाते. चौदा वर्षे झाली की व्रताचे उद्यापन केले जाते.

भाद्रपद अमावास्या ही हिंदू धर्मीयांमध्ये विशेष मानली जाते. कारण भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंतचे दिवस पितृकार्यसाठी योग्य मानले जातात. सद्गती प्राप्त झालेल्या आप्तेष्टांचे त्या त्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते. एखाद्याची तिथी माहीत नसेल तर त्याचे भाद्रपद अमावास्येला एकत्रित श्राद्ध केले जाते. म्हणून ती सर्वपित्री अमावास्या ठरते. या १६ दिवसांमध्ये पितर जेवायला येतात अशी समजूत आहे. भाद्रपद कृष्ण नवमीला अविधवा नवमी म्हणतात. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचा मृत्यू झाला असेल तिचे श्राद्ध या दिवशी केले जाते. तर जी माणसे प्राणीदंशाने किंवा विषबाधा होऊन गेली असतील त्यांचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला केले जाते. तर अमावास्येला सगळ्या ज्ञान-अज्ञात पितरांचे श्राद्ध करतात. भारतीय परंपरेत या सोळा दिवसांना अतिशय महत्त्व आहे. पूर्वजांचे ऋण मानण्याचा आणि फेडण्याचा प्रयत्न या दिवसांमध्ये केला जातो.

आश्विन

संपूर्ण आश्विन महिन्यात धार्मिक सणांची, व्रतवैकल्यांची चलती असते. या महिन्यात नवरात्र असतं, दसरा असतो, भारतीय मनाला कायमच व्यापून राहणारी दिवाळी असते. हा सगळाच महिना समाजात सांस्कृतिक तसंच धार्मिक पातळीवर उलाढाली सुरू असतात. खरं तर संपूर्ण चातुर्मासाच्याच बाबतीत असं म्हणता येईल की हा काळ एकदा सुरू झाला की ते चार महिने कसे संपले हे कळतदेखील नाही.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरुवात होते. घरोघरी घटस्थापना केली जाते. देवीला आवाहन करून तिची स्थापना केली जाते. विधिवत देवीची पूजा, आरती होते. देवीसमोर दीप लावला जातो. हा दीप आता पुढचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवायचा असतो. या नवरात्रात देवीला दररोज चढवली जाणारी झेंडूच्या फुलांची माळ आणि देवीसमोर एखाद्या पसरट भांडय़ात माती घेऊन, त्यात विविध धान्य पेरून पुढील नऊ दिवसांत उगवलेलं शेत या दोन गोष्टी वैशिष्टय़पूर्ण आहेत. या धान्याच्या लोंब्यांची जुडी क रून घराच्या दाराला तोरणांबरोबर बांधल्या जातात. हा सगळा शेतात नवीन धान्य येण्याचा काळ असतो. त्यातून येणारी समृद्धी सूचित करण्यासाठी दाराला या लोंब्याची जुडी बांधली जाते. नवरात्राचे व्रत करणारी व्यक्ती पुढचे नऊ दिवस उपवास करते. नऊ दिवस उपवास शक्य नसतील तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास किंवा एक वेळ जेवणे, एक वेळ उपवास अशा तडजोडी केल्या जातात. या काळात सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धत आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या वस्त्राच्या रंगानुसार त्याच रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत अलीकडच्या काळात स्त्रियांमध्ये रूढ आहे.

आश्विन शुद्ध पंचमीला उपांगललिता व्रत करतात. ललिता देवीचे प्रतीक म्हणून करंडय़ाचे झाकण घेतात. त्याची पूजा केली जाते. दिवसभर उपवास क रून रात्री गोडधोड क रून तो सोडला जातो. ललितादेवीच्या कहाणीचे वाचन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजा मोडून देवीचे विसर्जन करतात.

आश्विन शुद्ध सप्तमीपासून पुढचे तीन दिवस सरस्वती देवी शयनात जाते असे मानले जाते. ती शयनाला जाण्यापूर्वी तिच्या मूर्तीची, ग्रंथांची पूजा केली जाते. त्यानंतरचे तीन दिवस म्हणजे सप्तमी, अष्टमी, नवमी हे तीन दिवस तिच्याशी संबंधित सर्व व्यवहार म्हणजे वाचन, लेखन बंद ठेवले जातात.

आश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मी व्रत केले जाते. या दिवशीच देवीने महिषासुराचा वध केला असे मानतात. या दिवशी सकाळी स्नान क रून देवीची पूजा केली जाते. देवीला १६ प्रकारची पत्री, १६ प्रकारची फुलं अर्पण केली जातात. १६ प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. पिठापासून केलेले १६ दिवे घेऊन देवीची आरती केली जाते. देवीची महिषासुरमर्दनाची कथा ऐकली जाते. रात्री घागरी फुंकत नाच करतात. हे व्रत पाच वर्षे करतात.

आश्विन शुद्ध नवमीला महानवमीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये स्नान क रून देवीची पूजा, आरती केली जाते. तिला सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी कुमारिकेचेही पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी नऊ दिवस बसलेले घट हलवले जातात.

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीचा दिवस. लोकभाषेत याला दसरा असेही म्हणतात. या दिवसाला मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. त्याशिवाय या दिवशी सीमोल्लंघन करतात. शस्त्रांची पूजा करतात. अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. ती या दिवशी काढून घेतली आणि ते आपला अज्ञातवास संपवायला सिद्ध झाले असेही मानले जाते. रामाने याच दिवशी रावणाचा वध केला असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करतात. या दिवशी शेतात पिकलेले पहिलेवहिले धान्य घरी आणले जाते. त्याची नवलाई या दिवसाला आहे. या दिवशी आपटय़ाची पाने एकमेकांना देऊन प्रतीकात्मक सोने लुटले जाते.

या दिवशी कुष्मांड दशमी व्रत नावाचे व्रतही केले जाते. दहा दिवसांनी त्याची समाप्ती होते. हे दहा दिवस शंकराची, लक्ष्मीची पूजा करायची असते.

आश्विन पौर्णिमे दिवशी शक्रव्रत, गजपूजाविधी ही व्रते केली जातात. शक्रव्रतामध्ये उपवास करून इंद्राची पूजा करतात. तर गजपूजाविधीमध्ये हत्तीला ओवाळले जाते. याशिवाय काही ठिकाणी आश्विन पौर्णिमेला घरातल्या मोठय़ा मुलीला ओवाळले जाते.

कार्तिक

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच सर्वसामान्यांच्या भाषेत पाडवा हा सण असतो. बलिप्रतिपदा महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते. पाडवा हा पतीपत्नीचा सण आहे. सकाळी पत्नी पतीला तेल लावून अभ्यंगस्नान घालते. त्याला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेटवस्तू देतो. पतीकडून पाडव्याला मिळालेली भेटवस्तू हा पत्नीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी केल्या जाणाऱ्या शुभकार्याला मुहूर्त पाहावा लागत नाही अशी मान्यता आहे.

याच दिवशी विष्णुदेवकी व्रत केले जाते. या दिवशी या व्रताची सुरुवात केली जाते. आणि मग ते दर महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला केले जाते. या दिवशी वासुदेवाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवतात. नैवेद्य ग्रहण करताना मौन बाळगतात. महिनाभर व्रतस्थ राहतात. मद्य, मांसाचे सेवन करत नाहीत. कार्तिक शुक्ल प्रतिपदेलाच स्त्रिया महिनाभराचे कार्तिक व्रत सुरू करतात. रोज सकाळी उठून स्नान क रून विष्णूची पूजा करतात. मध आणि तूप यांचा वापर क रून तयार केलेल्या खाद्यपदार्थाचा नैवेद्य दाखवतात.

पाडव्याचा दुसरा दिवस म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज असते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ तिला ओवाळणी घालतो. बहीण त्याला गोडधोड क रून जेवायला घालते. पाडवा, भाऊबीज या सणांना सांस्कृतिक महत्त्व आहे. तो एक प्रकारचा नात्यांचा उत्सव आहे.

कार्तिक शुक्ल अष्टमीला गोपाष्टमी असते. या दिवसापासून कृष्ण गायी चरायला घेऊन जायला लागला असे मानले जाते. पूर्वी या दिवशी गायींची यथासांग पूजा केली जात असे. गायींना सजवून त्यांना चारा वगैरे घालून त्यांचे क ोडकौतुक केले जात असे.

कार्तिक शुक्ल नवमीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यांनी या दिवशी देवांना त्रास देणाऱ्या कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला, असे सांगितले जाते. या राक्षसाच्या शरीरातून क ोहळ्याच्या वेली बाहेर आल्या. या वेलींना कोहळे लगडले होते. त्यामुळे या दिवशी कोहळ्याची पूजा केली जाते. या दिवसाला कुष्मांड नवमी असेही म्हणतात.

कार्तिक शुक्ल एकादशीला प्रबोधिनी एकादशीचे व्रत केले जाते. आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान श्रीकृष्ण या कार्तिक एकादशीला जागे होतात, असे मानले जाते. म्हणून ही प्रबोधिनी किंवा देवऊठी एकादशी म्हणून ओळखली जाते. देवाचे झोपेतून उठणे भजन, कीर्तनाने साजरे केले जाते. या दिवसापासून तुलसीविवाह सुरू होतात. भगवान विष्णूंचा तुळशीबरोबर विवाह लावला जातो. घरोघरी लोक तुलसीविवाह थाटामाटात साजरा करतात.

कार्तिकी द्वादशीला असलेले योगेश्वर व्रत, कार्तिकी चतुर्दशीला असलेले वैकुंठ चर्तुदशीचे व्रत ही व्रतं भगवान विष्णूंशी संबंधित आहेत.

कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी स्नान क रून कार्तिकेयाचे दर्शन घ्यायचे असते. याशिवाय कार्तिकी पौर्णिमेला आवळीभोजन असते. या दिवशी आवळीच्या झाडाची पूजा करतात. सुहृदांसमवेत आवळीखाली बसून भोजन केले जाते. यातून आवळ्याचे औषधी उपयोग बिंबवण्याचा प्रयत्न होतो.

संदर्भ : धर्मबोध -ज्यार्तिभास्कर जयंत साळगावकर, आपले सण, आपले उत्सव – दा. कृ. सोमण तसंच इतर धार्मिक पुस्तके

सर्व रेखाचित्रे :  निलेश जाधव

20
First Published on: August 31, 2018 1:03 am
Just Now!
X