सुनिता कुलकर्णी

टाळेबंदीच्या काळात जे स्वत:च्याच शहरात, गावात, स्वत:च्याच घरात, आपापल्या मुलामाणसांमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ त्रासाचा असला तरी तसा सुसह्यच. अशा काळात इंटरनेटवर जगणाऱ्या भारतीय लोकांनी गुगलवर जाऊन काय काय शोधलं याची माहिती देणारा अहवाल गुगलने प्रसिद्ध केला आहे.

दुकानं वगैरे बंद असण्याचा हा काळ मोठा कठीण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांनी गुगलवर मार्च महिन्यात ‘निअर मी’, म्हणजेच माझ्या जवळपास अमूक मिळतं का, तमूक मिळतं का याचा सर्वाधिक शोध घेतला आहे. त्यात ‘मेडिकल स्टोअर निअर मी’ हा शोध ५८ टक्के भारतीयांनी घेतला आहे. तर जवळच्या किराणा मालाच्या दुकानाचा शोध ५५० टक्के जास्त वेळा घेतला गेला आहे. आपल्या जवळ रेशन दुकान आहे का? याचा शोध ३०० टक्के जास्त वेळा घेतला गेला आहे तर जवळ जनावरांचे डॉक्टर आहेत का? याचा शोध ६० टक्के भारतीयांनी घेतला आहे.

घरबसल्या काहीच करता येत नाहीये आणि काहीतरी करायचं तर आहे, पण जे करायचं ते उत्तमच असलं पाहिजे असं बहुधा भारतीयांना वाटतं. त्यामुळे ‘बेस्ट मूव्हीज’, ‘बेस्ट आर्ट प्लॅटफॉर्म’, ‘बेस्ट वेबसिरीज’ या शोधांमध्ये या महिन्यात भरपूर वाढ झाली आहे.

आपला वेळ सत्कारणी लावू इच्छिणारे भारतीय लोक  

रिकामा मिळालेला सध्याचा वेळ वेगवेगळी कौशल्य शिकण्यात घालवू इच्छितात. त्यामुळे पाच मिनिटांत होणाऱ्या रेसिपी, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, ऑनलाईन शिका, ऑनलाईन शिकवा, होमस्कुलिंग कसं करायचं या विषयांचे शोध घेतले गेले आहेत. कोविद १९ शी सगळ्यांनाच यशस्वी मुकाबला करायचा असल्यामुळे ‘प्रतिकारशक्ती’ या संकल्पनेचा शोध ५०० टक्के अधिक घेतला गेला आहे. त्याशिवाय ‘क’ जीवनसत्त्व, आयुर्वेदिक काढा या शब्दांचा शोधही मोठ्या प्रमाणात घेतला गेला आहे.

आत्तापर्यंत ऑनलाईनच्या वाटेला न गेलेल्यांना वेगवेगळी बिलं घरबसल्या भरावी लागत असल्यामुळे ती घरबसल्या कशी भरायची याचा शोध गुगलवर मोठ्या प्रमाणात घेतला जातो आहे. थोडक्यात काय तर नोटबंदीचं निमित्त घडून ‘कॅशलेस’ व्यवहार करणारे भारतीय करोनाच्या निमित्ताने अधिकाधिक ‘डिजिटल’ होण्याच्या मार्गावर आहेत.