18 February 2019

News Flash

विलक्षण जागतिक शोधपत्रकारिता

आयसीआयजेने या प्रकल्पाला नाव दिलं - पनामा पेपर्स!

द पनामा पेपर्स - ब्रेकिंग द स्टोरी ऑफ हाऊ द रिच अँड पावरफुल हाइड देअर मनी

निमित्त
तन्मय कानिटकर – response.lokprabha@expressindia.com
२०१६ मध्ये करचुकवेगिरीसाठी शेल कंपन्यांचा आधार घेणाऱ्यांचे प्रकरण जगभरातील प्रसिद्धीमाध्यमांमधून उघडकीस आले. ज्या दोन पत्रकारांना ही माहिती प्रथम मिळाली त्या ओबेरमायर यांच्या अनुभवाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, त्याबद्दल..

एका शांत रात्री १० वाजता जर्मनीतल्या बास्टीयन ओबेरमायर या पत्रकाराशी एका अनोळखी व्यक्तीने ऑनलाइन संपर्क साधला. जॉन डो असं त्याने स्वत:चं सांगितलं. हे टोपणनाव होतं. कर चुकवणाऱ्या आणि काळा पसा लपवणाऱ्या लोकांची माहिती दिली जाईल, असं त्याने जॉनला सांगितलं. बास्टीयनने मग आपला सहकारी फ्रेडरिक ओबेरमायर यालाही विश्वासात घेतलं. काही काळातच त्यांच्यावर माहितीचा धबधबाच कोसळू लागला. तब्बल २.६ टेराबाइट एवढा प्रचंड डेटा टप्प्याटप्प्याने पत्रकारांपर्यंत पोहोचला. पनामा या देशातील मोझाक-फॉन्सेका नावाच्या लॉ फर्ममधली ही माहिती होती. परदेशात ऑफिस थाटणाऱ्या दोन लाख १४ हजार कंपन्यांचे (ऑफ शोअर कंपनीज) व्यवहार, त्याबाबतचे ई-मेल्स, त्यांचे अनेक करार अशी सगळी मिळून एक कोटीपेक्षा जास्त कागदपत्रे यात होती. या कागदपत्रांच्या विश्लेषणानंतर जगभरातील राजकीय, आर्थिक क्षेत्राला हादरा बसला. अनेक ठिकाणी उलथापालथ झाली; पण हे सर्व एका दिवसात घडलं नाही. जगभरातील विविध माध्यमांतील शोधपत्रकार या विश्लेषणात उतरले. ही हकिकत बास्टीयन ओबेरमायर आणि फ्रेडरिक ओबेरमायर यांनी पुस्तकरूपाने मांडली आहे.

ही प्रचंड माहिती हाताळायला आपण अपुरे पडू याची कल्पना दोघा ओबेरमायरना होती. म्हणून त्यांनी इंटरनॅशनल  कॉन्सर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या शोधपत्रकारांच्या बहुप्रतिष्ठित संस्थेशी संपर्क साधला. जेरार्डराईलच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या आयसीआयजेने हा प्रकल्प हातात घ्यायचं ठरवलं आणि सुरू झाला एक थक्क करणारा प्रवास. जवळपास ८० देशांतली १०७ प्रसिद्धी माध्यमे आणि त्यातल्या ४०० पेक्षा जास्त शोधपत्रकारांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपापल्या देशातल्या काळा पसा लपवणाऱ्या, गरव्यवहार करणाऱ्या मंडळींची माहिती अक्षरश: खणून काढली. हे सगळं जगभर, एकाच वेळी ३ एप्रिल २०१६ या दिवशी उघड केल. आयसीआयजेने या प्रकल्पाला नाव दिलं – पनामा पेपर्स!

अनेक देशांतले राजकीय नेते, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, त्यांचे नातेवाईक, मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, फिल्मस्टार्स, माफिया, ड्रगलॉर्डस अशा काही हजार मंडळींची नावं या कागदपत्रांमध्ये आहेत. शेकडो कोटी डॉलर्सचे व्यवहार यात आहेत. जवळपास ५०० वेगवेगळ्या बँकांनी १५ हजारपेक्षा जास्त बनावट कंपन्या (शेल कंपनीज) तयार करण्यात कसा हातभार लावला हेही या पनामा पेपर्समध्ये उघड झालं. १२ देशांच्या आजी किंवा माजी प्रमुखांची नावं या कागदपत्रात आहेत.  राष्ट्रप्रमुखांचे नातेवाईक, मित्र वगरे असलेल्या ६० पेक्षा जास्त व्यक्ती आहेत. पनामा पेपर्स उघड झाल्यापासून पाकिस्तानच्या नवाझ शरीफ यांच्यासह अनेक देशांच्या पंतप्रधान, मंत्री, प्रमुख राजकीय नेत्यांना आपापली पदं सोडावी लागली आहेत. जागतिक फुटबॉल संघटनेतील प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. असंख्य देशांमध्ये चौकशी समिती बसल्या, आíथक गुन्ह्य़ांचा शोध सुरू झाला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचं इतक्या मोठय़ा प्रमाणात परस्परसहकार्य तयार होत जगभरातला गरकारभार उघड करण्याचं, तसंच इतकी प्रचंड माहिती फुटण्याचं हे जगातलं आजवरचं एकमेव उदाहरण. ते दोघा ओबेरमायर यांच्या शब्दांत वाचायला मिळणं हा एक भन्नाट अनुभव आहे. पुस्तक लिहिताना ते वर्तमानकाळातलं कथन असल्यासारखं लिहिलंय. या शैलीने मजा येते. जणू हे दोघे तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेत नेतात.

सामान्यत: आíथक घोटाळे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. बनावट कंपन्यांमार्फत पसा परदेशात साठवणं या स्वरूपाचा घोटाळा असतो तेव्हा तर हे सगळं समजून घेणं अधिकच कठीण. मुळात कुठल्या तरी गरमार्गाने कमावलेला पसा लपवणं यासाठीच बनावट कंपन्यांचा उपयोग केला जात असल्याने भरपूर कष्ट आणि काळजी घेत लपवलेली गोष्ट खणून काढणं हे काम सोपं नाही. पसा लपवण्यासाठी आणि बनावट कंपन्या उभारण्यासाठी मदत करणारी मोझाक-फॉन्सेका ही लॉ फर्म पनामा देशात असल्याने अनेक कागदपत्रं स्पॅनिश भाषेत होती. त्यात एक कोटी कागदपत्रं समोर असतात, तेव्हा मती गुंग न झाली तरच नवल.

आयसीआयजेने प्रकल्प हातात घेतल्यावर मरिना वॉकर यांना प्रमुख समन्वयक म्हणून नेमलं. दक्षिण अमेरिकी मार्लकाबरा हा डेटा एक्स्पर्ट नेमला. एकाच वेळी जगभरातले पत्रकार एवढा प्रचंड डेटा बघणार असल्यामुळे सगळ्यांसाठी एक सुरक्षित ऑनलाइन सिस्टीम उभारली गेली. त्यातच माहिती आणि प्रत्येकाने शोधलेल्या गोष्टीही टाकल्या गेल्या. इतकी सगळी माहिती वाचायला गेलं की नेहमीच्या वापरातले कॉम्प्युटर्स बंद पडत होते. मग ओबेरमायर आणि त्यांच्या टीमसाठी त्यांच्या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने नवीन सुपर कॉम्प्युटर घेण्याची परवानगी दिली. पुढे तर तोही कमी पडू लागल्यावर तब्बल १७ हजार ५०० डॉलर्स किमतीचा अजूनच ताकदवान सुपर कॉम्प्युटर घ्यावा लागला. एवढी प्रचंड माहिती शोधायची तर अधिक चांगल्या सिस्टीमची- सॉफ्टवेअरची गरज होती. न्युइक्स नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी अशा प्रकारची प्रणाली बनवते; पण ती प्रचंड महाग होती. सहसा पोलीस खाती, गुप्तहेर यंत्रणा, शेअर बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणा न्युइक्स वापरतात; पण आयसीआयजेचा संचालक – जेरार्डराईल ऑस्ट्रेलियन असल्याने त्याने न्युइक्सशी संपर्क साधून त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याची विनंती केली. आयसीआयजेच्या या टीमला न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर मोफत वापरायला मिळाला!

आपल्या ओळखीतली नावं मोझाक-फॉन्सेकाच्या फुटलेल्या माहितीत दिसू लागल्यावर आपला पुस्तकातला उत्साह वाढत जातो. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन, चीनचे झी जिनिपग, सीरियाचे असाद, लिबियाचे गदाफी, पाकिस्तानचे नवाझ शरीफ असे राजकारणी, त्यांचे नातेवाईक किंवा इतर सहकारी, त्यांच्याशी संबंधित उद्योगपती या नावांबरोबर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, युनायटेड नेशन्सचे माजी जनरल सेक्रेटरी कोफी अन्नान यांचा मुलगा कोजो अन्नान अशी नावं आपल्याला धक्का देऊन जातात.

ओबेरमायर ज्या ज्या घोटाळ्यांच्या शोधात स्वत: गुंतले होते त्याचीच मुख्यत्वे यात थोडी सविस्तर माहिती आहे. बाकीच्यांचे नुसते उल्लेख आहेत. भारतातील इंडियन एक्स्प्रेस समूह या संशोधनात सहभागी होता. पुस्तकात याचा उल्लेख आहे; परंतु तपशील नाहीत आणि ते स्वाभाविकच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक घोटाळा तपशिलात लिहायचा तर पुस्तकाच्या ३५० पानांत ते कधीच मावलं नसतं. इंडियन एक्स्प्रेसने पनामा पेपर्सचा अभ्यास करून त्यात ५०० पेक्षा जास्त भारतीय असल्याचं उघड केलंय. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफ कंपनीचे के. पी. सिंग आणि त्यांचे काही नातेवाईक, इंडिया बुल्सचे समीर गेहलोत आणि याबरोबरच आपल्या पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांची नावं या यादीत आहेत. २०१३ मध्येच मृत पावलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा साथीदार इक्बाल मिरची याचंही नाव या यादीत आहे.

ज्याला काही तरी लपवायचे आहे, तोच परदेशात बनावट कंपन्या स्थापन करतो, असं हे लेखक ठासून सांगतात. केवळ कर चुकवून बाहेर नेलेला पसा इतकं हे साधं नाही हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. सीरियामध्ये चालू असणाऱ्या यादवी युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तींचा पसा फिरवला गेला आहे. तिथे हजारो निष्पापांचं शिरकाण सुरू आहे आणि एक प्रकारे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मदतच केली जात आहे. लोकशाही देशांत काळा पसा निवडणुकीत ओतून पुन्हा आपली सत्ता स्थिर करण्यासाठी वापरला जातो हेही हे लेखक सूचित करतात. आफ्रिकन देशांची त्यांच्याच हुकूमशहा आणि नेत्यांनी कशी आणि केवढय़ा प्रचंड प्रमाणात लूटमार केली आहे, आइसलॅण्डसारख्या श्रीमंत देशाचं बघता बघता दिवाळं कसं वाजलं या सगळ्याचं तपशिलांसह वर्णन या पुस्तकात आहे. ड्रगमाफियांचा पसा बनावट कंपन्यांमार्फत परदेशात नेला जातो, तेव्हा ती फक्त करचुकवेगिरी नसते किंवा तो नुसताच आíथक घोटाळा नसतो, हे लेखकांचं म्हणणं पटल्याशिवाय राहात नाही. आíथक घोटाळे तसे समजायला कठीण वाटू शकतात. म्हणूनच काही तांत्रिक शब्द आणि त्याचे नेमके अर्थ असे पुस्तकाच्या शेवटी एका यादीत दिले आहेत. पुस्तकाची भाषा सोपी, सुटसुटीत आणि प्रवाही आहे. एकूण पशाचे आकडे, समोर येत जाणारी नावं, कशा पद्धतीने बनावट कंपन्यांच्या साहाय्याने पसा परदेशात नेला जातो. या सगळ्याचा पुस्तक वाचून अंदाज येईल.

शोधपत्रकारांवर येणाऱ्या दबावाचा उल्लेख पुस्तकात वारंवार येतो. दोघे लेखक हे जर्मनीचे रहिवासी असल्याने स्वत:ला सुदैवी मानतात; परंतु इतर देशांमध्ये भयानक स्थिती असल्याचंही निदर्शनाला आणून देतात. पनामा पेपर्स प्रसिद्ध करून काही शोधपत्रकार अक्षरश: जिवाची बाजी लावत आहेत. या टीममधल्या रशियामधल्या दोघा पत्रकारांचे फोटो देशद्रोही आणि अमेरिकेचे एजंट असं म्हणत टीव्हीवर दाखवले गेले. पनामा पेपर्सबाबतचं एक कार्टून प्रसारित करणाऱ्या चिनी वकिलाला अटक झाली. हाँगकाँगमधल्या एका वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकाला काढून टाकण्यात आलं. व्हेनेझुएलामधल्या पत्रकाराला नोकरीवरून कमी केलं गेलं. टय़ुनिशियामधल्या पनामा पेपर्सची बातमी देणाऱ्या ऑनलाइन मासिकाची वेबसाइट हॅक केली गेली. खुद्द पनामामध्ये ३ एप्रिलचं वर्तमानपत्र िहसाचार होईल या भीतीने वेगळ्या गुप्त ठिकाणी छापावं लागलं; पण जगभर या पनामा पेपर्सने उलथापालथ घडवली आणि अजूनही घडतेच आहे. त्या कागदपत्रांच्या आधारे, नवीन चौकशांच्या आधारे रोज नवनवीन गोष्टी सातत्याने समोर येत आहेत आणि हे सगळं घडलं मोझाक फॉन्सेका या केवळ एका लॉ फर्मच्या कागदपत्रांच्या आधारे. अशा बनावट कंपन्या स्थापन करून देणाऱ्या इतर असंख्य संस्था जगभर सर्वत्र आहेत. म्हणजे काळा पसा देशाबाहेर नेण्याची यंत्रणा केवढी प्रचंड मोठी आणि व्यापक असेल याचा अंदाजसुद्धा करवत नाही.

जॉन डो याने सगळी माहिती देऊन झाल्यावर सगळ्यात शेवटी जगासाठी एक संदेशदेखील पाठवला. जगात वाढत जाणाऱ्या ‘आíथक विषमते’मुळे अस्वस्थ होऊन हे कृत्य केल्याचं त्याने म्हटलंय. त्या आधीच्या प्रकरणात लेखक काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. आधुनिक लोकशाही समाजातसुद्धा पशाच्या जोरावर देशांचे कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या एक टक्के लोकांमुळे कायद्याचं इमानेइतबारे पालन करणाऱ्या ९९ टक्के सामान्य जनतेवर अन्याय होत असतो हे या पनामा पेपर्समधल्या माहितीमुळे उघडय़ावागडय़ा रूपात समोर येतं. हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ठेववतच नाही. अर्थकारण-समाजकारण-राजकारण यात रस असणाऱ्याने अगदी आवर्जून वाचावं आणि समजून घ्यावं असं हे पुस्तक  आहे.

द पनामा पेपर्स – ब्रेकिंग द स्टोरी ऑफ हाऊ द रिच अँड पावरफुल हाइड देअर मनी. लेखक : बास्टीयन ओबेरमायर आणि फ्रेडरिक ओबेरमायर, प्रकाशक : वन वर्ल्ड पब्लिशर, किंमत : रु. ४९९/-

First Published on July 6, 2018 1:03 am

Web Title: international investigative journalism