‘तू तिथे मी’मधला सत्यजित, ‘तू माझा सांगाती’मधले तुकाराम महाराज, ‘लोकमान्य’मधला पत्रकार, ‘समुद्र’मधला भास्कर या आणि अशा विविध भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरला आता वेध लागले आहेत दिग्ददर्शनाचे.
त्याच्याशी या मनसोक्त गप्पा-
* कलर्स मराठीच्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेचे पाचशे भाग नुकतेच पूर्ण झालेत. कसं वाटतंय?
– कलर्स मराठीची ‘तू माझा सांगाती’ ही मालिका सुरू होण्याच्या एक महिना आधी ‘तू तिथे मी’ ही मालिका संपली होती. सत्यजित ही व्यक्तिरेखा दोन वर्ष साकारत असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावरही ती भूमिका रुजली होती. तुकाराम या व्यक्तिरेखेसाठी माझा विचार करून दिग्दर्शक संगीत कुलकर्णी मोठं आव्हान पेलताहेत असं मला वाटलं होतं. पण, आता प्रेक्षक मला सत्यजितपेक्षा तुकाराम म्हणूनच ओळखतात. संगीत दादाने तेव्हा माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचं अप्रूप वाटतं. मी आजवर केलेल्या मालिकांपैकी ही मालिका सर्वार्थाने कठीण आहे. या दोन वर्षांच्या प्रवासात अशी एक फेज आली होती की आता बास हे काम, असं वाटलं होतं. पण, ते तात्पुरतं होतं. असं वाटण्याचं कारण म्हणजे त्या काळात मी फक्त तुकाराम करत होतो. सिनेमे करत नव्हतो. मला लुकवर प्रयोग करता येत नव्हते. वीस-वीस दिवस शुट करत होतो. आपलं करिअर थांबलं असं वाटू लागलं. पण, हे सगळं तेवढय़ापुरतं होतं. डेली सोपमधल्या बहुतांश कलाकारांना असं वाटत असावं. कारण ते रोज तेच काम करतात. पण, या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट होती की, मी चांगल्या दर्जाचं काम करत होतो. काय आणि का करतोय असं मनात कधी आलं नाही. याचं श्रेय दिग्दर्शक, लेखक आणि मालिकेच्या टीमला जातं.

b
*  चिन्मयमध्ये काय बदल झालाय?
तुकारामांची व्यक्तिरेखा साकारताना बऱ्याच गोष्टींचे कनेक्शन सापडत गेले. त्यांच्या मोठय़ा कुटुंबातली एकेक व्यक्ती हळूहळू मृत्युमुखी पडली. नंतर ते जबाबदार झाले. त्यांचं मुलं-बायकोसोबतचं असलेल्या नात्याशी मी काही प्रमाणात रिलेट करू शकत होतो. ही मालिका केल्यानंतर मला कशाही मागे धावाधाव करावीशी वाटत नाही. तिशीत असताना भरपूर काम केलं पाहिजे असं कलाकाराचं असतं. मी सगळ्याकडे तटस्थपणे बघायला शिकलो. कदाचित माझ्या व्यक्तिमत्त्वातही ठहराव आला असेल. तो आता मला जाणवणार नाही. कालांतराने जाणवू शकतो.
* ‘तू तिथे मी’ या मालिकेतली सत्यजित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की तुला तुकारामांच्या भूमिकेत बघणं प्रेक्षकांना सुरुवातीला थोडं खटकलं. या टीकेला कसा सामोरा गेलास?
– अशा प्रकारची टीका, प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली होती. पण, मी माझं काम करत राहिलो. टीकेकडे फारसं लक्ष दिलं नाही असं मी म्हणणार नाही. विधायक टीकेचा जरूर विचार केला. ‘अमुक टाळलं तर बरं होईल’, ‘असं करून पहा’ या गोष्टींकडे लक्ष दिलं. मला खूप आठय़ा पडतात. त्याचा रागाशी किंवा चिडचिडेपणाशी काहीही संबंध नाही. मालिकेचे दिग्दर्शक संगीत कुलकर्णी यांनी मला सांगितलं की त्या आठय़ा थोडय़ा कमी करण्याचा प्रयत्न कर. कारण तू चिडलेला नसतानाही इतरांना या आठय़ांमुळे तसा वाटतोस. मी ते खूप कमी केलंय. टीका स्वीकारत गेलो पण, त्याचा कामावर परिणाम होऊ देणार नाही असं ठरवलं होतं. कदाचित त्याचं फळ मिळत असेल.
* सत्यजितमधून बाहेर पडून तुकाराम साकारताना तुला किती अवघड गेलं?
– सत्यजितमधून बाहेर पडणं तसं कठीण नव्हतं. मालिकेची एक प्रक्रिया असते. मालिका संपायच्या दोन महिने आधी मालिकेच्या टीमला कळवलं जातं. त्यामुळे कलाकार विशिष्ट व्यक्तिरेखेतून आपोआप अलिप्त होत जातो. त्यामुळे सत्यजितमधून बाहेर पडणं इतकं कठीण नव्हतं. पण, हो, तुकारामांची व्यक्तिरेखा साकारताना अभ्यास, वाचन करावं लागलं. एका वेळेनंतर मी तेही सगळं बाजूला ठेवलं. संगीत दादाने याबद्दल चांगलं समजवलं, ‘तुकाराम ही बऱ्यापैकी सधन कुटुंबातली सामान्य व्यक्ती. दुष्काळ येतो. कुटुंबातले सदस्य एकामागे एक मृत्युमुखी पडतात. घरामध्ये भक्तीची परंपरा असते. त्या घटनेनंतर ते अनेक प्रश्न विचारू लागतात आणि उत्तरं शोधू लागतात एवढंच लक्षात ठेव. ती व्यक्ती वेडी नाही. तिरसट नाही.’ मी एवढंच सूत्र लक्षात ठेवलंय.’ एनएसडीमध्ये एकदा एका लेक्चरला सांगितलं होतं की, ताजमहल एका दिवसात बांधला नव्हता. एकेक वीट ठेवून बांधला होता. त्यामुळे एका विटेकडे एकावेळी बघा. तुकाराम साकारायचे आहेत असं दडपण मी घेतलं असतं तर काहीच शक्य झालं नसतं. त्यांचं आयुष्य मी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलं. दुष्काळापर्यंतची चांगली परिस्थिती हा एक टप्पा. नंतर कुटुंबातले सदस्य जातात, हा दुसरा टप्पा. त्यानंतर आध्यात्मिक टप्पा सुरू होतो. आता आम्ही मध्यावर आलोय. शेवटाकडे जाण्याचा प्रवास सुरू झालाय.
* तू मालिका, सिनेमा, नाटकात अभिनय आणि लेखन, करतोस. सगळ्या गोष्टी कशा जमून येतात?
– मी याचं श्रेय मालिकेच्या वेळापत्रक आखणाऱ्याला देतो. ‘तू माझा सांगाती’ या मालिकेच्या पहिल्या वर्षी मी काहीच करू शकलो नाही; हे खरंय. ‘समुद्र’ हे एकच नाटक त्या वेळी सुरू होतं. त्या दरम्यान एकही सिनेमा केला नाही. ‘लोकमान्य’ नंतर दीडेक वर्ष सिनेमा केला नाही. त्याचं मला वाईट वाटलं नाही. योग्य नियोजनामुळे मालिकेच्या एपिसोड्सची बँक असते. त्यामुळे आम्हा कलाकारांनाही इतर कामांच्या वेळेचं नियोजन करता येतं. मी ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तिरेखा साकारली तरी ती माझी ओळख होऊ देणार नाही असं मी पक्कं ठरवलं होतं. म्हणूनच तुकाराम साकारताना जाणूनबुजून ‘समुद्र’सारखं नाटक केलं. त्यात मी वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आलो. ते नाटक यशस्वी झालं. तुकाराम ही व्यक्तिरेखा डोक्यात ठेवून प्रेक्षक नाटक बघायला येत नव्हते.
* एकीकडे तुकाराम ही भूमिका आणि दुसरीकडे आजच्या काळात घडणाऱ्या ‘सरस्वती’ या मालिकेचं लेखन; कसं जमवतोयस दोन्ही?
– जमवायला हवं! ‘तू माझा सांगाती’च्या सेटवर शूट करताना मोकळ्या वेळेत मी लिहीत असतो. ‘सरस्वती’ची गोष्ट मला खूप आवडली. ‘तू तिथे मी’ या मालिकेनंतर दीड-पावणे दोन वर्षांनी मालिका लिहीतोय. मला खूप मजा येतेय. ‘तू माझा सांगाती’मध्ये मी फक्त अभिनय करतोय आणि ‘सरस्वती’साठी लेखन करतोय. दोन्ही कामांचं स्वरूप वेगळं असल्यामुळे एकमेकांमध्ये गुंतले जात नाही. ‘तू तिथे मी’ या मालिकेच्या वेळी मात्र दमछाक व्हायची. अभिनय आणि लेखन असं दोन्ही करत असल्यामुळे कधी कधी ताण यायचा.
* ‘मालिकेच्या लेखनात काही तरी हॅपनिंग असायला हवं’ या मागणीचं तू लेखक म्हणून किती समर्थन करशील?
– हे सगळीकडे आहे. तीस मिनिटांची एकांकिका केली तरी त्यात काही तरी घडायला हवं, दोन तासांच्या सिनेमातही काही तरी घडायलाच हवं असतं. मालिका दररोज असते. मग त्यात काही तरी घडायला हवं हा विचार स्वाभाविक आहे. आता हे ‘घडायला हवं’ म्हणजे दरवेळी हिंसा, कारस्थानं, अतिनाटय़मय असं घडायला हवं असं नाही. एखादा संघर्षांचा प्रसंग, रोमँटिक प्रसंग, संवादप्राधान्य प्रसंग हेही घडणंच आहे. काही घडतंच नसेल तर तुम्हीही कंटाळाल. ‘घडायला हवं’ याची व्याख्या निश्चित करणं जास्त महत्त्वाचं आहे. घडायला हवं म्हणून अतक्र्य गोष्टी दाखवण्यावर माझा कधी विश्वास नव्हता आणि आजही नाही. ‘तू तिथे मी’ ही मालिका मी लिहिली. ती थोडी ओव्हर द टॉप होती. कारण ती सात वाजता सुरू व्हायची. सातच्या स्लॉटची मागणी थोडी वेगळी असते. सात वाजता मालिकांच्या दिवसाची सुरुवात होत असते. तरी ‘तू तिथे मी’ ही मालिका वास्तवाला सोडून कधीच नव्हती. ‘आमच्यासोबत असं वागलं गेलंय’ हे सांगण्यासाठी स्त्रियांचे फोन यायचे; तर ‘बायको दुसऱ्यासोबत गेली तर काय’ अशी शंका असणारे पुरुषांचेही फोन आले. प्रेक्षकांच्या मनातला विषय होता म्हणून ती मालिका दोन वर्षे यशस्वीरीत्या सुरू होती. ‘असंभव’ ही मालिका लिहिताना पुनर्जन्म, भूतकाळ या सगळ्यांकडे वैज्ञानिकदृष्टय़ा बघितलं गेलं. त्यामुळे ‘घडणं’ दरवेळी कटकारस्थानं, कुरघोडी वगैरे नसू शकतं. चॅनलसोबत मी मीटिंगला बसलो की नेहमी एक उदाहरण देतो. चकली करताना साच्यात पीठ असलं तरच चकली चांगल्या प्रकारे पाडता येते. तसं मालिकेचं आहे. मालिकेत गडबड होताना दिसली की ‘पीठ संपत चाललंय. त्यात काही तरी भरा नाही तर बंद करा’, असं मी चॅनलला सांगतो. ‘तू तिथे मी’ बंद होत होती, तेव्हा तिचा टीआरपी चांगला होता. पण, त्यातलं पीठ संपलं होतं. त्यात आता आणखी वेगळं काही करायचं उरलंच नव्हतं. त्यामुळे बंद करण्याचा निर्णय योग्य होता. घटनाक्रम घडवण्याची क्षमता कथेतच असते. ती जर नसेल तर डेली सोप पाणी घातल्यासारखे असतात.
* मालिकेचं लेखन मधल्या दीड-दोन वर्षांमध्ये थांबलं. या काळात लिखाण मिस करत होतास का?
– अजिबात नाही. २००३ मध्ये ‘वादळवाट’ पासून मी लिहायला लागलो. २०१४ पर्यंत सतत अकरा वर्षे मी लिहीत होतो. कधी कधी दोन मालिका एकाच वेळी लिहायचो. एक प्रकारचा ताण आला होता. त्यामुळे दीड-दोन वर्षांचा गॅप माझ्यासाठी सुखाचा होता. मधल्या काळात ‘कच्चालिंबू’ हा सिनेमा लिहिला. त्याला मला पूर्ण वेळ देता आला.
* तुला मालिका, नाटकांमधून जितकी लोकप्रियता मिळाली तितकी सिनेमातून नाही.
– हो! ‘झेंडा’ आणि ‘मोरया’ हे माझे दोन सिनेमे लोकप्रिय झाले. ‘गजर’ तेव्हा प्रेक्षकांना पसंत पडला नाही पण, आता टीव्हीवर अनेकदा दाखवत असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याचं वेगळं स्थान निर्माण झालंय. याशिवाय मी २८ सिनेमे केले. त्यात ‘लोकमान्य’सारखा सिनेमा आहे. अनेक सिनेमांमध्ये साहाय्यक भूमिकेत काम केलं. मालिकेत मात्र सगळ्या कामांना उत्तम प्रतिसाद मिळाला. भविष्यात बघू या कितपत यश मिळतंय ते.
* ‘रेती’ या आगामी सिनेमाविषयी सांग..
– ‘रेती’ हा सिनेमा वाळू माफिया या विषयावर आधारित सिनेमा आहे. तो वास्तवदर्शी सिनेमा आहे. आजूबाजूच्या घटनांचं प्रतिबिंब या सिनेमात दिसेल. गेल्या काही वर्षांपासून मी करत असलेल्या सिनेमांपैकी काही मनासारखे बनत नव्हते किंवा जे मनासारखे बनत होते ते रिलीज होत नव्हते. त्यामुळे मी स्वत: सिनेमांपासून लांब राहिलेलो. दोन-तीन महिने रक्त आटवून केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचतच नाही किंवा आपल्या मनासारखं काम होत नाही, याचं वाईट वाटतं. अनेकदा नरेशनच्या वेळी सिनेमा आवडतो. पण, प्रत्यक्षात तसं अजिबात घडत नाही. अशा वेळी वाटतं की, सिनेमा कळत असणाऱ्या लोकांसोबतच काम करूयात. ‘रेती’चे दिग्दर्शक सुहास भोसले यांचं काम मी पूर्वी बघितलं होतं. आता सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. चांगला झालाय. आता तो चांगल्या प्रकारे प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला हवा.
* एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर; हा सिनेमा आपण उगाच केला; असं वाटतं का?
– प्रदर्शित झाल्यानंतर? ही खंत काही वेळा शूटिंगच्या पहिल्या दिवशी अगदी पहिल्या शॉटपासूनसुद्धा वाटते. पण, कलाकार सिनेमाला बांधील असतो. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्याचं प्रमोशन करताना सिनेमा फार बरा झाला नाहीये असं काही वेळा जाणवत असतं. पण, मी आता स्वत:पुरतं ठरवलंय की, माझ्या बाबतीत हे होऊ देणार नाही. गेल्या दीड-दोन वर्षांत दोन सिनेमे केले. शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ आणि ‘रेती’ या सिनेमांमध्ये काम केलं. मी माझं काम कमी केलंय. मला खंत वाटेल असं कोणतंच काम मला करायचं नाही.
*  मराठी सिनेमांच्या बदलत्या चित्राविषयी तुला काय वाटतं?
– सर्वप्रथम ‘मराठी सिनेमांना चांगले दिवस आलेत’ असं म्हणण्यापेक्षा ‘आधीपेक्षा चांगले दिवस आलेत’; असं म्हटलं पाहिजे. आता आपण विहिरीतून तळ्यात आलोय. हिंदी, कन्नड, तमीळ सिनेमे नदी आणि समुद्रासारखे आहेत. मराठी सिनेमांच्या कथा, विषयांमध्ये प्रायोगिकता आहे. आपल्याकडे झालेल्या सिनेमांच्या काही विषयांचा हिंदूीमध्ये विचारही होत नाही हे खरंय. पण, आपल्याला आणखी सुधारणा करायला हवी. त्यासाठी आणखी मेहनत घेतली पाहिजे. हिंदीमध्ये लहान भूमिकांसाठीसुद्धा ऑडिशन घेतली जाते. प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनला वेळ दिला जातो. गाणं शूट करण्यासाठी तिथे तीन दिवस दिले जातात. मराठीमध्ये गाण्याचं शूट अनेकदा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असं होतं. या नियोजन, तांत्रिक गोष्टी अजूनही बदलायला हव्यात. मला वाटतं, या दहा पायऱ्या असतील तर आपण आता दुसऱ्या पायरीवर आहोत.
*  टीव्ही माध्यमात झपाटय़ाने बदल होताहेत. तुला खटकणारा आणि आवडणारा बदल कोणता?
– काही चॅनल्सची गणितं प्रमाणाबाहेर आकडेवारीवर अवलंबून आहे. चॅनल्ससोबत लेखकांची किंवा तत्संबंधित जाणकारांची मालिकेच्या एखाद्या विषयावर चर्चा होते. ‘अशी मालिका बघायला लोकांना आवडणार नाही’ असं सांगितल्यावर ‘आवडेल. आमची आकडेवारी असं सांगतेय’ असं चॅनल्सकडून सांगितलं जातं. मध्यंतरी मी एकदा एका चॅनलमध्ये एका मैत्रिणीला एक कथा ऐकवली होती. कर्तृत्ववान स्त्री असा कथेचा विषय होता. त्यावेळी तिने मला सांगितलं की, ‘कथा चांगली आहे. पण, प्रेक्षकांना मुलगी, तिचं लग्न आणि येणाऱ्या अडचणी याशिवाय काही बघायचं नसतं. त्यामुळे ही कथा चालणार नाही.’ हे मला खटकतं. प्रेक्षक बघणार नाही हे तुम्ही का ठरवता? त्यांना वेगळ्या विषयांच्या मालिका दाखवल्या तर ते बघणारच. बदललेल्या टीव्ही माध्यमाच्या स्वरूपाविषयी ही बाब मला खटकते. तर; मर्यादित भाग, पर्व असे ट्रेंड येताहेत आणि पुढेही येतील. हा बदल आवडणारा आहे.
*  पुढचं नाटक कधी आणि कोणतं?
– पुढचं नाटक मी माझ्या अत्यंत लाडक्या, ज्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा वर्षांनुवर्षे होती अशा चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकासोबत काम करतोय. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा दुसरा भाग येतोय. ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकात मी प्रमुख भूमिकेत असेन. हे नाटक माझ्यासाठी व्यावसायिक नसून एक वर्कशॉप आहे. एनएसडीला जाण्याआधीपासून मी चंद्रकांत सरांचं काम बघतोय, त्यांच्याकडून शिकतोय. त्यामुळे माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आता पूर्ण होतेय. मे महिन्यात नाटकाच्या प्रयोगांना सुरुवात होईल. ‘समुद्र’ हे नाटक पुन्हा सुरू करण्याचा माझा विचार आहे. हे नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची क्षमता त्या नाटकात आहे. पण, यासाठी मी थोडा वेळ घेईन.
*  नाटय़गृहांच्या वाईट अवस्थेवर कलाकार बोलतातच. पण, काही बेजबाबदार प्रेक्षकांबद्दलही कलाकार नाराजी व्यक्त करतात.
– हो, हे खरंय. काही प्रेक्षकांचा बेजबाबदारपणा मी स्वत: अनुभवलाय. पाचशे प्रेक्षकांमध्ये दोन जण त्रास देणारे असतात. इतर प्रेक्षक प्रेमाने, आदराने नाटक बघायला आलेले असतात. मोबाइलसाठी जॅमर बसवणं अत्यंत आवश्यक आहे. कितीही कल्पकपणे ‘मोबाइल बंद ठेवा’ असं सांगितलं तरी प्रेक्षक ऐकत नाहीत. यात दुसरा मुद्दा येतो लहान मुलांचा. मोबाइल वाजून बंद तरी होतो. पण, मुलांचं काय? ‘समुद्र’ या नाटकाच्या जाहिरातीत ‘बारा वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही’ असं लिहिलं जायचं. तरी काही प्रेक्षक मुलांना आणायचे. अशा वेळी मी प्रयोग थांबवायचो आणि मुलांना बाहेर घेऊन जा असं सांगायचो. इथे नाटक, कलाकार आणि प्रेक्षक या तिघांची लिंक तुटते.
* सकलहृदया असा हॅशटॅग वापरून फेसबुकवर विचार मांडतोस. ते नेमकं काय आहे?
– मी दीड वर्ष एका साप्ताहिकात सकलहृदया या नावाने सदर लिहायचो. एकदा ओम राऊत आणि मी गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा तो म्हणाला तू नेहमी काहीतरी वैचारिक बोलत असतोस तर ते लिहीत जा फेसबुकवर. शिवाय त्याला एखादा हॅशटॅग दे. म्हणून मी ‘#सकलहृदया’ असं करून विविध विचार मांडू लागलो. लोकांना ते आवडूही लागलं. नंतर यात आणखी एक पाऊल पुढे जावंसं वाटलं. ‘#ऐंशीनव्वदीचा काळ सुखाचा’ असा आणखी एक प्रयोग केला. काही वस्तू अलीकडे अगदी आत्तापर्यंत अस्तित्वात होत्या. पीसीओ, पेजर, अँटिना अशा अनेक गोष्टी आता खूप कमी प्रमाणात दिसतात. आजच्या पिढीला या गोष्टींविषयी सांगितलं तर त्यांना कळणारही नाही. ‘टीव्हीला मुंग्या आल्या’ या वाक्याचा अर्थ आताच्या पिढीला कळणार नाही. २००३ साली इनकमिंग कॉल फ्री झाले. मला वाटतं, १९५० ते २००० या काळात आपण ज्या वेगाने पुढे आलो त्याच्या जवळजवळ दहा पट वेगाने गेल्या दहा वर्षांत पुढे आलोय. आता सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत. तेव्हा याबाबत आपण विचारही केला नव्हता. मला कधीकधी भीती वाटते या सगळ्याची. हे सगळं अनुभवताना निरागसता हरवत चालली आहे. माझ्या लहानपणी मोठी माणसंही निरागस असायची. आता लहान मुलंही निरागस वाटत नाहीत.
* या क्षेत्रात काम करताना कलाकारासाठी कुटुंबाची साथ किती महत्त्वाची आहे?
– अर्थातच खूप महत्त्वाची आहे. या क्षेत्रात असुरक्षितता आहे हे खरंय. पण, पाठिंबा असला की गोष्टी सोप्या होतात. मी या क्षेत्रात काम करतो म्हणजे मी खूप काही जगा वेगळं करतोय असं अजिबात नाही. माझं ते काम आहे आणि मी ते आवडीने करतो. मी बारा तास शूट करून आलोय, आता मला स्पेस द्या, असं मी करत नाही. मी बारा तास घरी नसल्यामुळे कुटुंबीयांनीही माझ्याशिवाय तेवढा वेळ घालवलेला असतो. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा. त्यांच्या जडणघडणीचा, मोठं होण्याचा मी साक्षीदार असायला हवं असं मला नेहमी वाटतं. करिअरचा विचारही मी त्याच दिशेने करतो. ‘तू माझा सांगाती’ ही मालिका संपल्यानंतर पुढची काही वर्ष मी मालिकांमध्ये काम करणार नाही हे मी ठरवलं आहे. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये बायकोची महत्त्वाची साथ लाभली आहे. घरातल्या महत्त्वाच्या कामांमध्ये तिचा मोठा वाटा असतो. ती एकटीने सगळं करते. तो मला आधार वाटतो. अक्षय कुमारच्या एका मुलाखतीत मी वाचलं होतं की, तो वर्षांतले १५० दिवस काम करतो, ५० दिवस इतरत्र कामं करतो आणि उर्वरित १०० दिवस कुटुंबासोबत असतो. हे नियोजन मला प्रेरणा देऊन गेलं. कमी काळात जास्त आणि चांगलं असं काम करावं.

चिन्मय मांडलेकर
चिन्मय मांडलेकर

* या क्षेत्रात येण्यासाठी सर्वाधिक काय खुणावत होतं? लेखन, अभिनय की दिग्दर्शन?
– खरंतर असं ठरवून काहीच झालं नाही. सतराव्या वर्षी एनएसडीमध्ये जायचं ठरवलं होतं. चोविसाव्या वर्षी तिथून पदवी घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर अभिनयासाठी खूप स्ट्रगल करत होतो. हा स्ट्रगल सुरू असतानाच लेखनाची संधी आली. त्यापूर्वी मी कधीच लेखन केलं नव्हतं. ‘वादळवाट’ या मालिकेसाठी मी लिहू लागलो. सुरुवातीला गंमत म्हणून करत असलेल्या लेखनात गांभीर्य येत गेलं. मला ते आवडूही लागलं. तिथून लेखनाचा प्रवास सुरू झाला. त्याच दरम्यान अभिनेता म्हणूनही कामं करत होतो. ‘बेचकी’, ‘समुद्र’ या नाटकांचं दिग्दर्शन करताना मला दिग्दर्शनात जास्त आनंद मिळतोय, असं लक्षात आलं. पुढच्या काही ठरवलेल्या कामांमध्ये दिग्दर्शनाचाही विचार आहेच.
* करिअरच्या या टप्प्यावर उभं असताना कोणतं स्वप्न मनात आहे?
– बरीच स्वप्नं, इच्छा आहेत. या क्षेत्रात येताना मी असा कधीच विचार केला नव्हता की, ‘मला हिरो व्हायचंय.’ पण, प्रेक्षकांनी मला मध्यवर्ती भूमिकांमध्येही पसंती दिली. मी दोनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. आता विविध भाषांमध्ये काम करायची खूप इच्छा आहे. तसंच आता दिग्दर्शक म्हणून करिअर सुरू करायला नक्की आवडेल.
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11