विदर्भातलं उमरेड कऱ्हांडलाचं जंगलं अलीकडच्या काळात जय नावाच्या देखण्या वाघामुळे हे जंगल बऱ्यापैकी चर्चेत होतं. याचाच अर्थ वाघासाठी लागणारी अन्नसाखळी या संपन्न जंगलात शाबूत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विभागाची कुठलीही जाहिरात विदर्भातले वाघ दाखवल्याखेरीज पूर्ण होत नाही. याचं कारण आपल्या राज्यातले बहुतांश व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. महाराष्ट्रातला वाघ बघायचा तर चला ताडोबा असं एक पक्कं समीकरण बनलेलं असताना, गेल्या काही वर्षांत, नागपूरजवळ भंडारा आणि नागपूर तालुक्यातल्या १८० किलोमीटर्सच्या एका जंगलाला वाघ दिसण्यामुळे भरपूर महत्त्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्राची व्याघ्रनगरी नागपूर शहरापासून अवघ्या ५८ आणि भंडारा शहरापासून ६० किलोमीटर्स अंतरावर विसावलेलं उमरेड कऱ्हांडला जंगल जवळच असलेल्या ताडोबा अंधारीच्या जंगलाला जोडलेली कडी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे जंगल अनारक्षित आणि उपेक्षित होतं. इथे सर्रास शिकारी, जंगलतोड असे प्रकार व्हायचे. मात्र, सॅटेलाइट निरीक्षणात दिसून आले की हा भाग, वाघांच्या प्रजननाचा आणि नियमित हालचालींचा पट्टा आहे आणि मग सुरू झाली अव्याहत धडपड या जंगलाला वाचवण्याची. या प्रयत्नांना २०१३ साली यश प्राप्त झालं आणि अगदी चिमूटभर म्हणावा असा हा भाग उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य नावाने आरक्षित केला गेला. जवळच असलेल्या दादा व्याघ्र प्रकल्पामुळे इथे येऊन जाणाऱ्या वाघांची संख्या नजरेत भरणारी आहे. भंडारा जिल्ह्यातल्या पौनी इथे वैनगंगा नदीवर बांधलेलं गोसेखुर्द धरण जंगलाजवळून वहाणाऱ्या नदीला वर्षभर पाणी पुरवण्याचं काम करतं. वर उल्लेख केल्याप्रमाणे, उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलापासून उत्तरेकडे चाळीस किलोमीटर्स अंतरावर असलेलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं जंगल आणि दक्षिण पश्चिम दिशेला ५० किलोमीटर्स अंतरावरचं नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचं जंगल तर उत्तर-दक्षिणेस ऐंशी किलोमीटर्सवर पेंच व्याघ्र प्रकल्प असल्याने या सर्व जंगलांना जोडणारी ही कडी लहानशी असली तरीही अतिशय महत्त्वाची भूमिका निभावण्याचं काम करते.

MLA Abhimanyu Pawar request to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding contract recruitment in MPSC Pune
एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?
crime
मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
BJYM, National Convention, Nagpur, Lok Sabha Elections, Prominent Leaders, Attend,
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन, जे पी नड्डांसह भाजपचे मोठे नेते येणार
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

12-lp-bird

आपल्या शालेय पुस्तकांमध्ये आपण अन्नसाखळीबद्दल शिकलेलं असतं. पुढे कालांतराने, ही अन्नसाखळी विसरली जाते. पर्यटनाच्या निमित्ताने किंवा एखाद्या पर्यावरणीय समस्येमुळे विस्मरणात गेलेल्या या अन्नसाखळीचं कधीतरी स्मरण केलं जातं. या अन्नसाखळीत वाघाला सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं असल्याने त्याच्या अधिवासाची, खाण्याची जिथे उत्तम सोय असेल तिथे वाघोबा आनंदाने राहून जातात. विदर्भातल्या जंगलांमध्ये वाघाला अतिशय पोषक वातावरण असल्याने या जंगलांमध्ये फिरताना एक वेगळाच अनुभव मिळतो. गेल्या वर्षी ज्या वाघामुळे उमरेड कऱ्हांडलाचं जंगल चच्रेत आलं तो जय वाघ नागझिऱ्याच्या जंगलातून, एक नदी, दोन हमरस्ते आणि अनेक गावं ओलांडून  २०१३ साली उमरेडच्या जंगलात स्थलांतर करून आला होता आणि इथेच राहिला होता. नागझिऱ्याच्या जंगलात जन्माला आलेला जय हा अतिशय बिनधास्त आणि तगडा म्हणून पर्यटकांना परिचित झाला होता. भारतातील सर्वात मोठय़ा नर वाघांपकी एक समजला गेलेला जय २०१३ मध्ये नागझिऱ्याच्या जंगलातून गायब झाला आणि गजबजलेल्या मानवी पट्टय़ातून फिरत फिरत या जंगलात प्रकट झाल्याने हे जंगल चच्रेत आलं. जयने केलेल्या १५०-२०० किलोमीटर्सच्या फेरफटक्यामुळे दोन वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांमधले वाघ, त्यांचे भ्रमण आणि उमरेडच्या जंगलातून होणारा त्यांचा  वावर अधोरेखित झालाच पण त्यावर बराच ऊहापोहही झाला. म्हणूनच, हेच ते वर्ष, जेव्हा हा भाग संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आणि उमरेड कऱ्हांडलाचं जंगल सुरक्षित झालं. जय वाघाला दणकट तगडेपणा त्याच्या पित्याकडून मिळाला होता. कुठलाही वाघ तरुण व्हायला लागल्यावर साथीदार शोधताना स्वत:ची हद्दही बनवत असतो. नागझिऱ्याच्या जंगलात, आपल्या पित्यासोबत आणि भावासोबत हद्द वाटून घेण्याऐवजी, त्याने उमरेडच्या जंगलाला आपली हद्द बनवून त्यावर शब्दश: राज्य केलं. उमरेडच्या जंगलाच्या हद्दीत असलेल्या दोन गावांना त्याचं दर्शन नियमित होत होतंच. हमरस्त्यावर अनेकदा जयला बघितलं जायचं. जयने या जंगलातल्या सर्व माद्यांबरोबर प्रियाराधन करून अनेक पिल्लांचा तगडा पिता होण्याची आपल्या पित्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. जयच्या सोबत या जंगलात राहाणारी चांदी नावाची वाघीण इथल्या बहुतेक सर्व वाघ प्रजेच्या वाढीला जबाबदार आहे. या चांदीने आत्तापर्यंत जयचे एकूण सतरा बछडे जन्माला घातले. उमरेडच्या जंगलात वाढत असलेली ही वाघ प्रजा आशादायक वाटत असतानाच, अठरा एप्रिल २०१६ पासून जय वाघ उमरेडच्या जंगलातून अचानक गायब झाला. त्याच्या गळ्यात दोनदा बसवलेली रेडिओ कॉलरही खराब झाल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. याच सुमारास, जयची पिल्लं देखील अर्धवट तरुण वयाचे वाघ बनत असल्याने हद्दीच्या समस्येवर उतारा म्हणून तो गायब झाला असेल असा विचार जोर धरत होता. मात्र लगेच काही महिन्यांनी, यातली काही पिल्लं गायब झाल्याने त्या हद्दीत नव्या तगडय़ा नराचे आगमन झाल्याची शंका उपस्थित केली गेली. मग सुरू झाली जयला शोधायची धडपड. अनेक वन्यजीव संघटना आणि अगदी सामान्य मंडळीही वनखात्याला जयच्या शोध सत्रात मदत करायला पुढे आली. दुर्दैवाने, जयचा कुठेही मागमूस आजतागायत लागला नसून, वन्यजीव अभ्यासक आणि संस्थांचा विश्वास बसत चाललाय की जय गायब झालाय, कारण त्याचा मृत्यू झालाय. अगदी उपाशी नसला तरीही जयला उगाचच गुरं मारून टाकायला आवडायचं, जणू हा त्याचा ट्रेडमार्कच होता.  इतक्या महिन्यात, कुठेच असा प्रकार आजुबाजूच्या परिसरात किंवा शेजारील राज्यांत घडला नसल्याने जयचा मृत्यू झालाय यात शंका नाही. त्यानंतर, बरोबर एका वर्षांने, जयचा मुलगा, श्रीनिवास जो आता तरुण होऊ घातलेला नर होता, तोही गायब झाला. शोध कार्यात निष्पन्न झालं की गावकऱ्यांनी शेतीच्या बचावासाठी घातलेल्या विजेच्या तारांचा झटका बसून श्रीनिवासाचा मृत्यू झाला.  गेल्या काही वर्षांत नागपूरचा ‘वाघांचे शहर’ असा प्रचार केला जात असतानाच, विदर्भातल्या जंगलांमधून अनेक वाघ कायमचे गायब  होत आहेत आणि त्यांचा पुन्हा थांगपत्ताही लागत नाहीये ही अतिशय चिंतेची बाब आहे.

13-lp-animals

जय आणि श्रीनिवासच्या गायब होण्यामुळे उमरेडचं जंगल प्रकाशझोतात आलं. उमरेड कऱ्हांडलाचं जंगल, अगदी तद्दन वैदर्भीय जंगलाचा प्रकार असून उन्हाळ्यात सुकणारं हे जंगल वाघाला लागणाऱ्या भक्ष्याने समृद्ध आहे. भारतीय वन्यजीव संस्थान, डेहेराडूनने केलेल्या सर्वेक्षणानुसार टिक, ऐन, तेंदू, भिरा, आचरा, मोह, पळस, शेवरीसारखी मुबलक झाडं असलेल्या या जंगलात पाच ते सहा वाघ असून, जोडीला बिबळे आणि रानकुत्र्यांसारखे तगडे भक्षक या जंगलात रहातात. या भक्ष्यकांना लागणारं भक्ष्य अर्थातच, चितळ, नीलगाई, सांबर, पिसोरीच्या रूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सकाळी आणि संध्याकाळी पर्यटकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सफारींमध्ये, पर्यटकांना मोर, माकडं, अस्वलं, हरणं, कोल्हे, रानडुकरं सहज दिसून येतात. इथल्या कोरडय़ा जमिनीवर झुडपांमध्ये अनेकदा भारतीय अजगरासकट घोणस, धामणी, नाग दिसून येतात. या जंगलात साप, सरडे, पाली, घोरपडींचे सुमारे १९ प्रकार नोंदवले गेले असून पक्षी निरीक्षणासाठी उमरेडचं जंगल उत्तम आहे. इथे सुमारे १५०हून जास्त प्रकारचे पक्षी नोंदवले गेले असून, यात सुमारे दहा स्थलांतरित प्रकारचे पक्षी आहेत. दुर्मीळ प्रकारच्या नऊ जातींबरोबर इथे विविध प्रकारच्या घारी, गरुड, शिकऱ्यांसारखे शिकारी पक्षी, खंडय़ा, स्वर्गीय नर्तक, कोतवाल, वेडे राघू, सुतार पक्षी नियमित दिसतात. बारकाईने जंगल वाचत फिरलं तर या पक्ष्यांना लागणारे अनेक प्रकारचे किडेमकोडे, फुलपाखरं इथे आपल्याला आढळून येतात. राज्यातल्या प्रसिद्ध व्याघ्रप्रकल्पांना जोडणारी ही कडी जपताना, स्थानिकांचा सहभाग इथल्या संवर्धन आणि संरक्षणात असेल हे पाहात, वनखात्याने, उमरेड जंगलाच्या परिसरात वसलेल्या गावातील स्थानिकांना जंगलातल्या वाटाडय़ांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिलं आहे. काही सेवाभावी पर्यावरण संस्थाच्या मदतीने, वनखात्याने, जंगलाच्या परिसरात पाणी व्यवस्थापन प्रभावीपणे केले असून इथे पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली आहे. याच जोडीला, या लहानशा जंगलाला राखण्याच्या दृष्टीने जवळपास शंभर किलोमीटर्सचा वाहनांना योग्य असा रस्ता बनवला आहे. या रस्त्यांवर, सफारींसाठी येणारी चाळीस वाहनं दिवसभर ठरावीक वेळात वाहतूक करतात.

12-lp-tiger

उमरेड कऱ्हांडला जंगल जय वाघामुळे चच्रेत आलं खरं पण त्याच जोडीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बाजूच्या संवेदनशील असलेल्या मोठय़ा व्याघ्रप्रकल्पांवर येणारा पर्यटकांच्या लोंढय़ाचा ताण हे जंगल हल्ली कमी करतंय.   वनखात्याच्या सतर्कतेमुळे इथे वणव्याचं भय भेडसावताना दिसलं नाहीये. सहज दिसणाऱ्या वाघोबाला आणि इतर वनसंपदेला वाचवणं म्हणजे आपलं भविष्य आणि त्याच्याशी जोडला गेलेला रोजगार वाचवणं हे स्थानिकांच्या मनावर ठसवायला वनखात्याला आणि वन्यजीव कार्यकर्त्यांना बऱ्यापकी यश लाभतेय. या जंगलाचे वेगवेगळ्या रेंजेसमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून या जंगलात प्रवेश करण्यासाठी कऱ्हांडला गावाजवळ आठ किलोमीटर्सजवळ मुख्य गेट आहे. याखेरीज उमरेड शहरापासून ३३ किलोमीटर्सवर असलेलं गोठणगाव गेट, उमरेड शहरापासून पस्तीस किलोमीटर्स अंतरावर असलेलं पौनी आणि तितक्याच अंतरावर असलेलं पुल्लर गेटमधून जंगलात शिरता येतं. पर्यटकांनी निवडलेल्या भागातच त्यांना सफारींसाठी फिरता येतं व महत्त्वाचं म्हणजे, न सांगता सफारी  सुरू असताना एका गेटमधून आत शिरून दुसऱ्या गेटमधून बाहेर पडता येत नाही. अशा मनमानीला, इथे बंदी असून, तसे केल्यास गंभीर गुन्हा समजला जातो. विविध ऋतूंमध्ये जंगलात सफारीसाठी जाण्याच्या वेळा असून, त्यांचे बुकिंग आता फक्त ऑनलाइनच करता येतं. यामागचं कारण म्हणजे, पर्यटकांचा लोंढा जंगलात येऊन इथल्या व्यवस्थेवर ताण पडून, वाहतुकीचा प्राण्यांना त्रास होऊ नये हे पाहिलं जातं. सकाळच्या सफारीसाठी २० आणि संध्याकाळच्या सफारीसाठी २० अशी फक्त ४० वाहनं जंगलात सोडली जातात. यासाठी प्रत्येक वाहनाबरोबर स्थानिक वाटाडय़ा नेणं बंधनकारक असतं. जंगलात येणाऱ्या वाहनांऐवजी आपलं स्वत:चं नोंदणी केलेलं वाहन आपण जंगलात नेऊ शकतो. वनखात्याने निर्धारित केलेलं शुल्क भरून इथे चित्रीकरण करता येतं. उमरेड कऱ्हांडला जंगलच्या परिसरात हल्ली वाढती पर्यटक संख्या पाहता, या लहानशा जंगलावर दिवसेंदिवस ताण वाढत असल्याचं सहज जाणवतं. जंगलाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाघ बघायचा असतो. हे वाघ इथल्या जंगलात मोकळेपणाने, नििश्चत मनाने वावरण्यासाठी वनखात्याला अखंड सतर्क राहून अपार मेहेनत घ्यावी लागत असते. एखाद्या वेळेस वाघ न दिसल्यास, तिथे गेलेले पर्यटक बाहेर येऊन लगेच जंगलावर आणि वनखात्यावर टीका करताना दिसून येतात. एखाद्या जंगलात वाघाचं वास्तव्य असल्यावर, त्या  वाघाला संरक्षण देताना, सगळं जंगल राखताना प्रशासनावर येणारा ताणतणाव, त्या संरक्षण व्यवस्थेचा भाग नसल्याने आपण जाणवून, समजून घेत नाही आणि सहज टीका करतो. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या कामात जनसहभाग वाढल्यास त्याचा उपयोग सर्वाना होतो. जय वाघ गायब झाल्यावर, सर्वसामान्य जनतेने शासनाच्या जोडीने शोध मोहिमा राबवल्या होत्या. जयच्या  सुरक्षित असण्यासाठी लोकांनी अगदी यज्ञ, हवन, प्रार्थना सभाही आयोजित केल्या होत्या याचं कारण म्हणजे जयचं जंगलातलं अस्तित्व आणि त्याचं महत्त्व समाज मनावर ठसलं गेलं होतं. जय असो, श्रीनिवास असो, अल्फा असो की गायब होणारा प्रत्येक वाघ असो, मारला जाणारा हत्ती असो की गेंडा असो, काळवीट असो की मोर असो किंवा हरीण, साप अथवा मगर असो, आपल्या जंगलातली ही आपली वनसंपदा आपणच आपल्यासाठी राखायला हवी हे जनमानसात ठसेल, तेव्हा उमरेड कऱ्हांडलासारखी नवनवीन जंगल राखीव केली जातील आणि निसर्ग संरक्षण करताना करताना त्याचं संवर्धनही शक्य होईल.
रूपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com