आपण आपल्याला हवे तेव्हा दुकानांत जाऊन दागिने विकत घेतो. पण सतत बदलणारी दागिन्यांची डिझाइन्स पाहता हे सगळं येतं तरी कुठून असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असणार. त्याचाच हा शोध-

एक सण संपत नाही तोपर्यंत दुसरा सण येतोच. अशाच सगळ्या सणांना लोक आवर्जून कपडे, सोनं, दागिने, मोठय़ा वस्तू खरेदी करतात. असंच दसऱ्याच्या निमिताने लोकांचा सोनं, सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने खरेदीवर भर असतो. त्यामुळे यंदा दागिन्यांचा काय ट्रेण्ड आहे, कोणत्या दागिन्यांना जास्त मागणी आहे, कोणता वयोगट कोणत्या दागिन्यांना पसंती देतोय, दागिने घडवण्याच्या नवीन पद्धती अशा अनेक गोष्टींच्या माहितीसाठी मुंबईतले ‘इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी’ गाठले. डिझाइन विभागाच्या प्रमुख शिल्पा देवरुखकर यांना बोलतं केलं.

आता आपल्याला कोणत्या प्रकारचे दागिने डिझाइन करायचे आहेत, हे कसे ठरवले जाते याबद्दल सांगताना शिल्पा देवरुखकर  म्हणाल्या की कोणताही ट्रेण्ड सेट होण्याआधी मार्केट सर्वे केला जातो. डिझाइनमध्ये नेमकी कशाला, कोणत्या गोष्टीला मागणी आहे हे समजून घेण्यासाठी डिझायनरला या सर्वेची आवश्यकता असते. या सर्वेमधून ग्राहक नवीन डिझाइनकडे वळतोय की जुन्याच डिझाइनना पसंती देतोय, वर्षभरात आलेल्या सिनेमा, टीव्ही सीरिअल यामध्ये दाखवल्या गेलेल्या दागिन्यांची मागणी ग्राहक करतोय का, कोणता वयोगट कोणत्या पद्धतीच्या दागिन्याला पसंती देतोय, ग्राहकांला जड दागिने जास्त आवडतात की हलके अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेतली जाते.

शिल्पा देवरुखकर सांगतात की अशी सगळी माहिती मिळाल्यानंतर दागिना घडवण्याच्या प्रक्रियेला खरी सुरुवात होते. सुरुवातीला ग्राहकांच्या सगळ्या मागण्या लक्षात घेऊन डिझायनर दागिन्यांचे डिझाइन बनवतो. अर्थात ही झाली पहिली पायरी. डिझाइन बनवतानाच त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर होणार आहे याचीसुद्धा तयारी त्याबरोबर होते. या पहिल्या टप्प्यानंतर ते डिझाइन थ्रीडी स्वरूपात हाताने स्केच करणे किंवा सॉफ्टवेअरवर बनवणे हे दोन पर्याय असतात. या थ्रीडी स्वरूपामुळे दागिना तयार झाल्यावर प्रत्यक्षात तो कसा दिसणार आहे याचा अंदाज सहज येतो. कॅम मशीनमध्ये कॅड या सॉफ्टवेअरमध्ये बनवलेलं डिझाइन वॅक्सच्या बॉक्समध्ये थ्रीडी स्वरूपात कट होऊन येतं. आणि त्यानंतर त्या वॅक्स थ्रीडी डिझाइनला मोल्डमध्ये बनवलं जातं. मग त्यातून दागिना घडवला जातो.

शिल्पा देवरुखकर यांच्या मते यंदा नवीन लुकमधल्या पारंपरिक दागिन्यांचा ट्रेण्ड आहे. लोकांना जड, मोठे दिसणारे पारंपरिक दागिने आवडतात पण प्रत्यक्षात त्यांना हलके दागिने घालायचे असतात. त्यामुळे काही मशीनमध्ये जड दिसणारा पण प्रत्यक्षात वजनाला हलका असणारा दागिना बनवला जातो. असे दागिने घडवताना दागिना आतल्या बाजूने पोकळ ठेवला जातो. त्यामुळे तो जड दिसला तरी तो हलका असतो. त्यामुळे त्या दागिन्याची किंमतही कमी होते. येत्या वर्षांत येणाऱ्या ऐतिहासिक सिनेमांचा आधार घेऊनही अनेक डिझाइन्स बाजारात आली आहेत. अत्तरदाणी अंगठी, कंठमणी, राणी हार अशा दागिन्यांना खूप मागणी आहे. या पारंपरिक दागिन्यांना नवीन लुक देण्यात आला आहे. या दागिन्यांवर जास्त कलाकुसर नसते. पण आता बाजारात असलेल्या या दागिन्यांवर बारीक कलाकुसर, िपट्र दिसून येते. सोन्याचे भाव कितीही वाढले तरी लोक सोन्याच्या दागिन्यांनाच पसंती देतात. डायमंड ज्वेलरीची मागणी तरुण वर्गाकडून जास्त होते. सोन्याचे मोठे दागिने रोज वापरले जात नाही. म्हणून तरुणाई हलक्या डायमंड ज्वेलरीकडे वळली आहे. डायमंड ज्वेलरीमध्ये हलकी नाजूक डिझाइन्स ट्रेण्डमध्ये आहेत. आणि अशी डिझाइन्स रोजच्या वापरासाठी, पार्टी किंवा अजून कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमात सहज वापरता येतात, असं त्या सांगतात.

त्यांच्या मते दागिन्यांचा ट्रेण्ड, दागिन्यांची फॅशन ही पूर्णपणे गारमेंट्स इंडस्ट्रीवर अवलंबून असते. कपडय़ांची फॅशन बदलत जाते तसतशी दागिन्यांची फॅशन बदलते. पण कधीही दागिन्यांच्या फॅशनवरून कपडय़ांचा ट्रेण्ड सेट होत नाही. आता अनेक डिझायनर त्यांच्या कपडय़ांसोबत दागिनासुद्धा देतात. त्यामुळे ग्राहकालासुद्धा मॅचिंग दागिन्यांसाठी कुठे दुसरीकडे जाण्याची गरज भासत नाही. कपडय़ांच्या फॅशनची साखळी जशी फिरून पुन्हा जुन्या गोष्टीकडे जाते तसं मात्र दागिन्यांच्या बाबतीत होत नाही. दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिना हा अजूनही जसाच्या तसं विकत घेणारा वर्ग आहे. त्यामुळे पारंपरिक दागिने जाऊन पुन्हा काही वर्षांनी परत येतेय असं होत नाही. नवीन पिढीला काहीतरी नवीन हवं असलं तरी जुन्या दागिन्यांनाही त्यांची तेवढीच पसंती असते. आणि कितीही नवनवीन प्रकारचे दागिने बाजारात आले तरी पारंपरिक दागिन्यांचा ग्राहक कमी होणार नाही असं शिल्पा देवरुखकर यांचं मत आहे.
तेजश्री गायकवाड
response.lokprabha@expressindia.com