लहानपणी तुम्ही बिंदू जोडून ससा, हत्ती किंवा फूल अशी चित्रे रेखाटली असतीलच. एक एक बिंदू जोडून समोर उलगडत जाणारे चित्र आपल्यात उत्सुकता निर्माण करते. हे आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो, पण आपल्या पूर्वजांनी काय केले? आकाशातील चांदण्यांचे ठिपके जोडून बारा आकृत्या तयार केल्या आणि राशींचा जन्म झाला.

एखाद्या कापडावरच्या नक्षीकामापासून ते वास्तुशास्त्रापर्यंत कुठल्याही रचनेचा मूळ घटक असतो बिंदू. जसे पुरणाशिवाय पुरणपोळी होऊ शकत नाही, तसेच बिंदू शिवाय कुठलीच आकृती/रचना होऊ शकत नाही. बिंदू जेव्हा आपण पुढे खेचतो तेव्हा त्यापासून बनते ती रेघ. रेघ ही अशा न मोजता येणाऱ्या बिंदूंनी बनलेली असते. थोडक्यात आपण म्हणू शकतो की एखाद्या बिंदूंला मार्ग दाखवण्याचे काम ही रेघ करते. जेव्हा अनेक रेघा एकमेकांना जोडल्या जातात व परत मूळ बिंदूपाशी येतात तेव्हा बनते ती आकृती. जेव्हा बिंदू एकमेकांजवळ येतात तेव्हा एकसंध आकृतीचा आभास तयार होतो. कुठल्याही रचनेचे बिंदू, रेघ व आकृती हे मूळ घटक असतात.

बिंदूचे पहिले महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे लक्ष वेधून घेणे. मग हा बिंदू आपल्याला वाटतो तसा गोलच पाहिजे असे नाही. तो कुठल्याही आकाराचा, रंगाचा असू शकतो. एका मोठ्ठय़ा भिंतीवर टिकलीएवढा पडलेला डाग आपले लक्ष वेधून घेतो.. तो बिंदू. किंवा पिवळ्या जर्द हापूस आंब्यांमध्ये अर्धवट पिकलेली हिरवी कैरी आपल्याला पटकन दिसते. अशा वेळी तो हिरवा रंग बिंदूचे लक्ष वेधण्याचे काम करत असतो.

प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा यांनी बिंदूच्या याच वैशिष्टय़ांनी प्रेरित होऊन शेकडो चित्रे काढली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व गोष्टींच्या निर्मितीचे केंद्रस्थान बिंदू आहे. ज्यापासून बाकीचे लाखो प्रकारचे आकार, रंग, एवढेच नाही तर ऊर्जा विकसित झाली.

बिंदूचे दुसरे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे दिशा दाखवणे. बिंदू आणि आजूबाजूचे अवकाश यांच्या परस्पर संबंधांमुळे कुठलीही रचना अर्थपूर्ण होते. एक सोप्पे उदाहरण देते. जेव्हा आपण एका अम्युझमेंट पार्कमध्ये जातो तेव्हा प्रवेशद्वारा जवळच पार्कचा मोठ्ठा नकाशा असतो. कुठून कसे जायचे यासंबंधीचा. त्या एवढय़ा सगळ्या जंजाळात एक ठिपका आपल्याला बरोबर दिसतो, ज्याच्या बाजूला लिहिले असते की ‘तुम्ही इथे आहात’. या ठिपक्याच्या आधारावर आपण पाहिजे त्या दिशेला जाऊ शकतो आणि आपला मार्ग शोधू शकतो. अशा वेळी हा ठिपका आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम करतो. विस्तीर्ण वाळवंटात किंवा अथांग सागरात भरकटलेल्या जहाजाला लाखो मल दूर असलेला ध्रुव ताराच तर इच्छित स्थळी पोहचवतो. असा हा बिंदू एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्या या वैशिष्टय़ाचा उपयोग  फोटोग्राफी, आर्ट, वास्तुशास्त्र व कुठल्याही कलेच्या क्षेत्रात जाणीवपूर्ण केला जातो. अशा या बिंदूची वैशिष्टय़े गृहसजावटीमध्ये कशी वापरायची हे आपण आज बघणार आहोत.

सध्या गृहसजावट हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आजकाल आपण घराच्या किमतीच्या कमीत कमी एकचतुर्थाश पसा गृहसजावटीमध्ये खर्च करतो. पण भरपूर पसे खर्च करूनसुद्धा कुठेतरी काहीतरी चुकले आहे असे वाटत राहते. बरेच वेळेला आपल्याला पाहिजे तसे घर प्रत्यक्षात उतरत नाही याचे मुख्य कारण फोकल पॉइंट किंवा केंद्रिबदूचा अभाव. केंद्रिबदू किंवा ज्याच्याकडे सर्व लक्ष केंद्रित होईल अशी गोष्ट.. जी बिंदूची खासियत आहे. मग हा बिंदू कुठल्याही आकाराचा, रंगाचा असू शकतो. तो बिंदू एखादे फíनचर असेल, चित्र असेल किंवा एखादी फुलदाणी.. जी लक्ष वेधण्याचे काम करते. फक्त खूप महागडय़ा गोष्टी विकत घेतल्याने घर सुंदर दिसत नाही. उदाहरणार्थ कोणाला निळा रंग आवडतो म्हणून भिंतींना निळा रंग दिला व अतिशय महागातील चादरी, पडदे व इतर सजावटीच्या निळ्या वस्तू आणल्या तरीही त्याचा परिणाम शून्य होईल. कारण अशा खोलीत आपली नजर एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर नुस्ती भिरभिरत राहील. स्थिर राहणार नाही. कारण तिथे एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणारी जागा किंवा फोकल पॉइंटच नाही. याच खोलीत जर आपण निळ्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या रंगाचे पेंटिंग लावले किंवा केशरी/पिवळ्या रंगाची फुलदाणी मधोमध ठेवली तर केंद्रिबदू तयार होऊन तीच खोली जास्त उठावदार दिसेल.

सोबत दिलेल्या चित्रात ८० टक्के खोली काळ्या रंगाने रंगवली आहे. सोफासुद्धा गडद रंगाच्या कापडाने बनवला आहे. तरीसुद्धा ही खोली आकर्षक दिसत आहे कारण मधोमध ठेवलेल्या गडद गुलाबी रंगाच्या टेबलमुळे. या डेकोरेटरने सर्व गोष्टी मॅचिंग करायच्या नादात जर मधले टेबल व मागील चित्र पण त्याच रंगाचे केले असते तर ही खोली एवढी जिवंत वाटली नसती. या खोलीत आपली नजर टेबलाला केंद्रस्थानी ठेवून आजूबाजूला फिरते व परत टेबलापाशी येऊन थांबते. या अशा रचनेमध्ये एक प्रकारची स्थिरता येते.

फोकल पॉइंट/ केंद्रिबदू हा वेगळ्या रंगाने, आकाराने, आकारमानाने पण निर्माण करू शकतो. दुसऱ्या चित्रात साध्या चौकोनी खोलीमध्ये नेहमीच्या आकारातील दारे-खिडक्या केल्या असत्या तर ती खोली कुठल्याही नेहमीच्या साधारण खोलीसारखीच दिसली असती. पण वेगळ्या आकाराच्या दारे-खिडक्यामुळेो केंद्रिबदू तयार झाला आहे.

केंद्रिबदूची  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या परिसरानुसार त्याचे आकारमान व त्यातील त्याची जागा. ज्या गोष्टीकडे आपल्याला वाटते की लोकांचे लक्ष जावे त्या वस्तूचे आकारमान जागेशी प्रमाणशीर असावे. एखाद्या छोटय़ा जागेत सहा फुटी मूर्ती शोभणारच नाही, मग ती कितीही महागाची असो. ती अंगावर आल्यासारखी वाटेल. तिची जागा अशा ठिकाणी पाहिजे जिथे तिचे दुरूनसुद्धा दर्शन होईल. त्याच प्रमाणे मोठय़ा जागेत एकदम पिटुकला केंद्रिबदू असून उपयोग नाही. त्याचे अस्तित्वच नाहीसे होईल. बरेच वेळेला उत्साहाच्या भरात गणपती बाप्पापेक्षा त्याच्या आजूबाजूची आरासच इतकी मोठ्ठी असते की केंद्रस्थानी असलेली देवाची मूर्तीच दिसत नाही. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कंपनीचा लोगो आणि नाव ठळकपणे दिसणे अपेक्षित असते. या दोन गोष्टींना केंद्रिबदू ठेवून बाकीची ऑफिसची सजावट केली पाहिजे. आपला केंद्रिबदू काय आहे हे लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. नाहीतर अंगापेक्षा बोंगा जास्त अशी अवस्था होते.

समजा एकच मोठ्ठे पेंटिंग सोफा किंवा पलंगामागे लावायचे असेल तर त्याची लांबी सोफ्याच्या दोन-त्रितियांश तरी पाहिजे. म्हणजे सात फूट लांबीच्या सोफ्यामागे कमीतकमी साडेचार फूट लांबीचे पेंटिंग पाहिजे. म्हणजे सोफा व पेंटिंग एकमेकांशी सुसंगत दिसतील.

लक्ष वेधून घेण्यासाठीची जागा अगदी नेमकी असणे फार गरजेचे आहे. एखादे सुंदर कलाकुसर केलेले शिल्प हे चिंचोळ्या पॅसेजच्या बाजूच्या िभतीवर लावण्यापेक्षा, प्रवेश द्वारासमोरच्या िभतीवर लावल्यास नक्कीच जास्त भाव खावून जाईल. नेहमीच दुर्लक्षित होणारा एखादा कोपरा, एखादा कोनाडा जाणीवपूर्वक सुशोभित केला तर घराला उठावतर येईलच आणि केंद्रिबदूसुद्धा तयार होईल.

तर असा हा िहदू संस्कृतीत मानाचे स्थान मिळवलेला बिंदू. अध्यात्मामध्ये याचे महत्त्व आपण जाणतोच. ध्यान धारणेच्या वेळी एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करायला सांगतात. गृहसजावटीमध्ये बिंदूचे हेच वैशिष्टय़ आपण कसे वापरू शकतो हे आपण बघितले. पुढच्या लेखात बिंदूपासून तयार झालेली रेघ, त्याचे वेगवेगळे प्रकार व त्याचा गृहसजावटीमध्ये कल्पकतेने केलेला वापर आपण बघणार आहोत.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com