फेब्रुवारी १४ ची अर्थात व्हॅलेंटाइन्स डेची सगळे लव्ह बर्डस् आतुरतेने वाट बघत असतात. खरं तर हा दिवस नुसता मित्र-मैत्रिणींचा नसून आपण ज्याच्यावर निस्सीम प्रेम करता ते प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मग तो कुणीही असो आईवडील, भाऊबहीण किंवा कुणी व्यक्ती जिला आपण आदर्श मानतो. पण आज याचं स्वरूप नुसतं मित्र-मैत्रिणींसाठी किंवा प्रेमवीरांसाठी सीमित झालं आहे किंवा त्यांनीच ते आरक्षित केलं आहे, असं वाटतं.

‘प्रेमदिवस’ साजरा करणं ही खरं तर चांगली गोष्ट आहे, जसा आपण आपला वाढदिवस साजरा करतो, तसाच हा दिवस साजरा करायला काय हरकत आहे. आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो, त्याला अशा खास दिवशी काही भेटवस्तू देणं, त्याला सांगणं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे या गोड नात्याला परत ताजं, टवटवीत केल्या सारखंच नाही का. आयुष्यात हे असे भाविक, हळवे क्षण खूप काही सांगून जातात. मनात हक्काचा कोपरा करून रुजून बसतात. परत कधीही आठवले तरी, नुकत्याच पूर्ण उमलेल्या फुलांचा टवटवीतपणा सर्वागाला देवून जातात.

रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच जणांना कुणाप्रती प्रेम व्यक्त करायला वेळ मिळत नाही आणि काही जणांना त्याची गरजही वाटत नाही. पण अशा खास दिवसात ते परत व्यक्त करायला, अनुभवायला खरंच खूप मजा वाटते. आयुष्याची मरगळच दूर होऊन, त्यात प्रेमाचा रंग दिसायला लागतो, खरंच..

याला खरं तर वयाचंही बंधन नसावं, नाही का? कारण आजी-आजोबांनाही अशा खास दिवशी, आपले जुने दिवस न आठवणार तर नवलच. नातं कितीही जुनं झालं तरी, प्रेम नेहमीच टवटवीत, ताजं राहातं किंबहुना ते राहावं.

याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे ‘तू तिथे मी’ चित्रपट. मोहन जोशी आणि सुहास यांच्या अभिनयाने त्यांच्या व्यक्तिरेखेत अजूनच रंग भरल्यासारखा वाटतो. मुलांचं संगोपन करण्यात, त्यांना शिकवण्यात, चांगले संस्कार करण्यात, आपल्या आयुष्याचे तीस-पस्तीस वर्ष कोणतेही आई वडील सहज घालवितात व नंतर त्यांचे विवाह व नातवंडांना सांभाळणं हे असं सगळं. आपण सर्व गृहीतच धरून चालतो. पण मग त्यांच्या स्वत:साठी, अशा काही निवांत क्षणासाठी कधी वेळ काढणार ते.

म्हणूनच व्हॅलेंटाइन्स् डेसारखे दिवस त्यांना ही गोड संधीच आणून देतात. तारुण्यातले प्रेमाचे क्षण अशा वयाच्या संध्याकाळीही अनुभवता आले तर आयुष्याचा कंटाळा कुठल्या कुठे पळून जाईल व परत एकदा नव्याने प्रेमात पडल्याचा आनंद होईल, नाही का.

तेव्हा जिंकण्याच्या गर्दीत स्वत:चं आयुष्य हरवलेल्यांना, मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त असलेल्या जोडप्यांना, नातवांना सांभाळणाऱ्या आजी-आजोबांना माझ्या व्हॅलेंटाइन्स् डेच्या हार्दिक शुभेच्छा या कवितेच्या रूपात…

तू माझा, मी तुझी..

तू माझा, मी तुझी

जेव्हा आपण एकमेकांना सांगतो

तेव्हा खरंच का आपण एकमेकांवर प्रेम करतो..

करतही असतो कदाचित..

मग हळूहळू प्रेमाचं फूल उमलू लागतं

फुलाची प्रत्येक पाकळी प्रेमाच्या बहरात

चिंब भिजायला लागते.

तेव्हा खरंच का आपण एकमेकांवर प्रेम करतो..

करतही असतो कदाचित..

चिंब भिजणाऱ्या प्रत्येक पाकळीवर

सूर्याची मग प्रखर किरणं पडायला लागतात.

तू माझा, मी तुझी म्हणताना

एकमेकातल्या उणिवा, चुकाच दिसायला लागतात.

अपेक्षांचे काळे दाट ढग आयुष्य

अंधकारमय करू लागतात..

तेव्हा खरंच का आपण एकमेकांवर प्रेम करतो..

करतही असतो कदाचित..

हळूहळू आयुष्याची संध्याकाळ

डोकवायला लागते,

एकमेकांचे दोषही आता

स्वीकारू लागतो

तेव्हा एकमेकांचे हात हातात धरावेसे वाटतात..

हरवलेले प्रेमाचे क्षण परत सोबतीने घालवावेसे वाटतात..

तेव्हा मात्र खरंच आपण एकमेकांवर प्रेम

करतो आणि तेही अपेक्षाविरहित, निस्सीम..

उत्तरा डोंगरे
response.lokprabha@expressindia.com