02 June 2020

News Flash

ऋतुरंग : कालिदासाचा वैशाख

कालिदासानं ‘ऋतुसंहार’मध्ये वैशाखाचंही वर्णन तितकंच मनोज्ञ असं केलं आहे.

कालिदास म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो आषाढ.. पण पाऊसधारांचं अनुपम वर्णन करणाऱ्या कालिदासानं ‘ऋतुसंहार’मध्ये वैशाखाचंही वर्णन तितकंच मनोज्ञ असं केलं आहे.

आषाढ आणि कालिदास हे रूढ समीकरण आहे; परंतु ऋ तू जेव्हा जेव्हा कूस बदलतात त्या वेळी कालिदासाचं स्मरण होतं!

आषाढात, आकाशात गर्दी करणाऱ्या निळ्या-सावळ्या ढगांत जसा कालिदास दिसतो तसाच, तितकाच स्पष्ट वैशाखातील निरभ्र आकाशातही गोचर होतो.. काळे- सावळे मेघ जणू आकाशरूपी नेत्रांचं अंजन अशी कल्पना करणारा हा निसर्गाचा चितेरा त्याच सौंदर्यदृष्टीने ‘भिन्नाञ्जनसन्निभं नभ:’ असं ग्रीष्मातील आकाशाचं वर्णन करतो.

मृगा: प्रचण्डातपतापिता भृशं तृषामहत्या परिशुष्क तालव:।

वनान्तरे तोयमिति प्रधाविता निरीक्ष्य भिन्नाञ्जनसन्निभं नभ:॥११॥

अर्थ : प्रखर उष्म्याने अतिशय तापून तहानेने टाळू कोरडा पडलेले हरीण चूर्ण केलेल्या अंजनाप्रमाणे दिसणारे आकाश पाहून दुसऱ्या वनांत पाणी असेल असे समजून धावतात.

सहा ऋ तूंचे सहा सोहळे समदृष्टीने साजरे करणारे ‘ऋ तुसंहार’ हे कालिदासाचे पहिले वाङमयीन अपत्य. ऋ तूंचा सृष्टी आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम यात अभिव्यक्त झाला आहे. कालिदासाच्या प्रारंभीच्या काळातील सहा सर्गातील हे काव्य वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आहे. वंशस्थ, वसंततिलका, मालिनी उपजाति अशा अनेक वृत्तांचा उपयोग केलेला आहे. पहिलंच काव्य असल्यामुळे काव्य विलासाची हौस, उत्साह आणि आपले काव्यगुण दाखवण्याचा सोस यात भरपूर आहे, असं विद्वानांचं मत आहे.

‘ऋ तुसंहार’विषयी आचार्य अत्रे त्यांच्या ‘सूर्यास्त’मध्ये म्हणतात- कालिदासाचे ऋ तुसंहार हे काव्य निसर्गसौंदर्याच्या विविध नि रमणीय वर्णनांनी उचंबळून गेलेले आहे. त्यात वृक्षांची पल्लवराजी आहे. प्रफुल्ल पुष्पांचा सुगंध आहे. कोकिळांचे मधुर कूजित आहे. मेघांचा गडगडाट आहे. विद्युल्लतांचा कडकडाट आहे. मयूरांचे नृत्य आहे. जलप्रवाहांच्या क्रीडा आहेत आणि चंद्र किरणांचे लास्य आहे. ही सर्व वर्णने वाचून मन धुंद होते. ऋ तुसंहारचा प्रारंभ ग्रीष्म ऋ तूने होतो आणि शेवट वसंत ऋ तूमध्ये होतो. शिशिर ऋ तूत होत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. वर्षांचा शेवट शिशिर होतो असे सर्वसामान्य जग समजते. पण वर्षांची समाप्ती वसंतामध्येच व्हावी हे कलिदासाच्या महान प्रतिभेचे स्वप्न आहे. ऋतुक्रमातील ‘ध्वन्यार्थ’ लक्षात घेता कालिदासाला लाभलेलं महाकविपद किती सार्थ होतं याची कल्पना येते. षड्ऋ तूंकडे ममत्वानं पाहणाऱ्या या महाकवीनं मात्र ऋ तुसंहारात अग्रपूजेचा मान ‘ग्रीष्मा’लाच दिलाय!

ग्रीष्माच्या दाहकतेचा प्रत्यय देणारा प्रथम सर्गातील पहिला श्लोक-

प्रचण्ड सूर्य: स्पृहणीय चन्द्रमा सदावगाह क्षतवारिसञ्चय:।

दिनान्तरम्योड भ्युपशान्त मन्मथ: निदाघकालोऽयमुपागत: प्रिये॥१॥

अर्थ : प्रिये, हा ग्रीष्म ऋ तू आला आहे. (या ऋ तूत) सूर्य प्रखर, उष्ण असतो, चंद्र सुंदर असतो, नित्य स्नान करण्यास पुरेसे पाणी (जलाशयात) नसते. सायंकाल रम्य असतो. मन्मथमदन शांत झालेला असतो.

वैशाख वणवा वर्णन करणारा आणखी एक श्लोक –

पदुतरदवदाहोच्छुष्क सस्य प्ररोहा: परुषपवनवेगोत्क्षिप्त संशुष्कपर्णा:।

दिनकरपरितापक्षीणतोया: समन्ता द्विदधति भयमुच्चर्वीक्ष्यमाणा वनान्ता:॥

अर्थ : वनातील भयंकर वणव्याने धान्याचे कोंब जळाले आहेत. सुकलेली पाने अतिशय वेगवान वाऱ्याने उंच उडाली आहेत. सूर्याच्या प्रखर उष्णतेने पाणी कमी झाले आहे. सर्व वनप्रदेश भयाण दिसत आहेत.

ग्रीष्म ऋ तुच्या जहाल स्वरूपामुळे निसर्गशत्रूसुद्धा आपले वैर विसरून आत्मरक्षणासाठी एकत्र येतात.

खेर्ममुखरभितापितो भृशं विदह्य़मान: पथि तप्तपांसुभि:।

अवाङ्मुखोऽजिव्हगति श्वसन्मुह: फणी मयुरस्य तले निषीदती॥१३॥

अर्थ :  आभाळातले कडक ऊन वरून आग ओकीत असते आणि खाली धुळीने माखलेली जमीन आपल्या स्पर्शाने भाजून काढीत असते, अशा रस्त्यावरून फसाफस दम टाकीत भुजंग सावलीच्या शोधात आहे.  अखेर त्याला सावली सापडतेही आणि अगतिक होऊन तो तिचा आश्रय घेतो. त्या बिचाऱ्याला विसावा कुठे मिळतो? तर चक्क त्याचे हाडवैर असते त्या मोराच्या पिसाऱ्याखाली. म्हणजे उन्हाने केलेल्या हालांमुळे प्राणिमात्र आपले शतजन्माचे शत्रुत्वसुद्धा विसरून जातात नाही का?

कालिदास एवढय़ावरच थांबत नाही तर यापुढं तो म्हणतो –

सर्प तर बिचारे वरच्या उन्हाने, आतल्या विषाने व भवतीच्या वणव्याने किती कावून गेले आहेत! आधीच सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या शीर्षमण्यांची कान्ती निस्तेज झाली आहे. तहानेने त्यांना इतके व्याकूळ करून टाकले आहे, की आपणहून जवळ आलेल्या बेडकांकडे त्यांचे लक्षही जात नाही. केवळ सळसळत्या जिभांनी वारा खात त्यांना पडून राहावे लागते. आणि बेडूक तरी काय करतात? कडक उन्हाने वैतागून जाऊन कढत झालेल्या सरोवरातील चिखलातून ते बाहेर पडतात आणि नेमके तृषार्त सर्पाच्या फण्याखालीच विश्रांती घेतात.

पशुपक्ष्यांप्रमाणेच ऋ तूंचा मानवी जीवनावरील, जीवनक्रमावरील आणि विशेषत: शृंगारलीलांवरील परिणामही त्याने रसिकतेने टिपला आहे. पण कालिदासीय काव्यातील स्त्री, पुरुष कोणताही ऋ तू असला तरी तरुण वयात आवडेल तेच करतात. ग्रीष्माच्या प्रचंड उकाडय़ात रात्रीसुद्धा प्रेमी एकमेकांच्या सहवासाची अपेक्षा करताना वर्णिले आहेत.

सुवासितं हम्र्यतलं मनोहरं प्रियामुखोच्छासविकम्पितं मधु।

सुतन्त्रिगीतं मदनस्य दीपनं शुचौ निशीथेऽनुभवन्ति कामिन:॥३॥

अर्थ : या ग्रीष्म ऋ तूत कामीजन, मध्यरात्री घरच्या सौघांवर प्रियेच्या मुखाच्या उच्छ्वासाने उसळणारे मद्य पिऊन, वीणावादनाने काम उद्दीपित करणाऱ्या गोड संगीताचा आस्वाद घेतात. तपशिलाच्या अशा दाटीवाटीने      ऋ तुसंहाराचा मनावकाश व्यापून राहिला आहे. तात्पर्य- कलाकाराने कलावस्तूच्या शरीरात कलीसारखा प्रवेश करून त्याच्या रंगात, सुगंधात, आवेशात सर्व काहीत मिसळून राहिले पाहिजे. प्रत्येक कलाकाराला एखाद्या कलावस्तूमधील सौंदर्य पछाडते व त्याचा मनावकाश व्यापून टाकते. हे आकर्षण एकतर्फी नसते, तर त्या वस्तूमधील सौंदर्यालाही कलाकाराच्या मनाचे मनस्वी आकर्षण असते व त्याच्या मनाला ते अक्षरश: झपाटून टाकते. या अनुभवाच्या भोवताली कलाकाराच्या गर्भरेशमी व्यक्तित्वाचे नाजूक धागे गुंफलेले असतात.

चित्रकार रेम्ब्रांटला चेहऱ्याचे अतीव आकर्षण असे;  व्हॅन गॉगला सूर्याच्या तेजाने पिसाटले होते; टर्नरचे मन सागरलाटांबरोबर आंदोळत असे; कॉन्स्टेबलच्या मनाचा ताबा आकाशातील सौंदर्याने घेतला होता;  शेलीचे मन ढगांनी व्यापले होते. तो बिचारा वाल्मीक मुनी तर अरण्यातील वृक्षांच्या आणि त्यांना वेढून राहिलेल्या कोळोखाच्या लयीत मिसळून राहतो आणि तो भवभूती दु:खाशी समरस होऊन आपल्याशी बोलतो. आणि साक्षात चित्रकलेला चित्रकलामर्मज्ञ कालिदासाच्या मनाचे वेड होते!

एखादी व्यक्तीच जर कलावस्तू असेल तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्ती- प्रवाहाचा नूर जाणला पाहिजे. चित्रकार रीएबर्न प्रत्यक्षात चित्र रंगविण्यापूर्वी आपले प्रतिमान घटका-घटका टक लावून बारकाईने पाहत बसे. असे सांगतात की, हा त्याचा अध्ययनकाळ प्रत्यक्ष चित्र रंगविण्यास लागणाऱ्या अवधीपेक्षा पटीने अधिक असे. तुमच्या अवधानाचा विस्तार म्हणजेच मनाचा विस्तार! कालिदासाने तर आपले मन विस्तृत करून आकाशात नुसता जानोसा दिला नाही, तर तो आकाश लपटून- वेढून राहिला व अखेर स्वत:च आकाश बनला आणि मग स्वत:चे वर्णन अगदी मन लावून सर्व बारकाव्यानिशी कुशलतेने करू लागला. जे रसिकतेला दिसले व जे अस्सल नंबरी होते ते चिमटीने उचलून, त्याला व्यक्तिमत्त्वाचा मुलामा चढवून कवीने ते ‘ऋ तुसंहार’च्या माध्यमातून रसिकांच्या सेवेला सादर केले आहे. ऋ तुवर्णन करताना अंतर्बाहय़ निसर्ग होणाऱ्या आधुनिक कवींनाही ही भावावस्था नवखी नाही. श्याम पेठकर यांच्या ‘ऋ तुस्पर्श’मध्ये ग्रीष्माचा ‘ताप’ ही सर्जनास ‘मारक’ न ठरता ‘तारक’ ठरतो. ‘ग्रीष्माचे अवतरण’ यात ते म्हणतात-

‘कुठल्याही नवनिर्मितीसाठी वासनेचे ऊन इतके तापू द्यावे लागते, आटून आटून शेवटी त्याचे सोने झाले पाहिजे.’ ग्रीष्मा, तुझ्या डोळय़ांतील प्रकाश आणि तुझ्या उरातील अग्नी नेहमीच पृथ्वीची कूस उजळण्याचे काम करीत असतो. पुढे हा ‘काम’ कलेचे रूप घेतो. खजुराहोतील  संभोग चित्रांना कोणी विकृती मानत नाही. या चित्रांचे रेखांकन ग्रीष्माच्या उन्हात आणि प्रकाशात झाल्याचे संशोधन आता नवीन नाही. एरवी पावसाळय़ात आणि हिवाळय़ात रंगांना चित्रांच्या अंगोपांगी इतके भिनता येणे शक्य नाही. रंगांना रंगत आणण्यासाठी कुठे तरी धग असावी लागते. त्रिविध तापांच्या रंगांनीच या कामचित्रांचे अधोरेखन झाले आहे. अंगांच्याही उपांगांनी ही लेणी कोरली गेली आहेत.

कुठल्याही क्रांतीचा रंग लाल आणि वैराग्याचा भगवा असतो. म्हणून ग्रीष्मा! तू हिरण्यगर्भाच्या वंशजांपैकी एक. म्हणून तुझ्या वैराग्याचा रंग उन्हाळी उष्ण; पण हे सारे आपल्या मनाचे खेळ असतात. मनाचे असे विविधरंगी खेळ फुलवायलाच वसंताचे नियोजन असावे असे कवीस वाटते. आपण निसर्गाकडे आपल्या नजरेने बघतो. नजरेच्या टप्प्यात येईल त्याला मानवी नजरेचे संदर्भ आपण चिकटवत जातो. डोळे असणे आणि नजर असणे यात तितकाच फरक असतो जितका पाहणे आणि दर्शन घेणे यात असतो. वसंत डोळय़ांना नजर देतो; पण दर्शन ज्याचे त्यानेच घ्यायचे असते. त्यासाठी वसंतात आंब्याचे झाड, कोकिळेचा कंठ अन् कडुलिंबाचे मोहोरदाटले झाड होता यायला हवे. किमान पळसफुलांचा केशर अंगावर लेवून घेता यायला हवा.

सूर्याच्या आगीत अक्षरश: भाजून निघालेला; पण अंगावर फुलापाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्यचिन्हे रूपाची, नादाची व सुगंधाची धारण करणारा चैत्रसखा वैशाखाचं वर्णन करताना दुर्गा भागवत म्हणतात –

मदनबाणाचे फूल हे वैशाखाचे मानचिन्ह. जाई, जुई, मोगरा, सायली, मदनबाण या फुलांतला सुगंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला. वसंताच्या मंददृष्टीचे पूर्ण वैभव वैशाखातलेच. जे जे म्हणून वसंताचे आहे त्याला त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचेही काम वैशाखाचेच आहे. वैशाख येतो आणि चैत्रात मुके असलेले गुलमोहोराचे झाड पालवते. वर्षभराने पुलकित होते आणि पानांपेक्षाही हिरव्या कळय़ांचे आणि तांबडय़ा फुलांचे मनोहर गुच्छ डोक्यावर नाचवू लागतात. ज्या गुलमोहोरांना फुलांचे पीक अमाप येते, त्यांची पाने फार उशिरा येतात. कधीकधी तर वैशाखाअखेपर्यंत ती उघडीच असतात आणि मग पावसाळय़ाच्या तोंडी एकदम फुलतात. वैशाखाच्या दुपारच्या कडकडीत उन्हातच फुलण्याचा अट्टहास करणाऱ्या खुरचाफ्याच्या झाडाचे त्यांना कौतुक वाटते. बाकीची फुले सांजसकाळी फुलतात, तर हे आपले दुपारचे ऐन माध्यान्हीस उमलते. या झाडाकडे पाहिले की पंचाग्निसाधनाच्या तपातच जिचे सौंदर्य प्रेमाच्या कोवळिकीमुळे अत्यंत खुलते होते म्हणून म्हणतात त्या पार्वतीची आठवण होते. दुपारच्या दुसऱ्या प्रहरात फुलणारी गुलबक्षीची फुलेही अशीच. वैशाखाचे दुपारचे ऊन खाऊनच कळय़ांचे तेज वाढीस लागते. सुगंधाचे भांडार परिपूर्णतेस येते. मग ती उमलतात केव्हाही. वैशाखाच्या प्रखर उन्हाने तापलेल्या दुपारसारखे चैतन्य वाढवणारे वातावरण दुसरे नाही. असे झाडांच्या या वेळच्या फलपुष्पांनी भरलेल्या रूपसुगंधांनी परिपूर्ण झालेल्या स्वरूपावरून वाटते. पक्ष्यांच्या आवाजातील माधुर्य, त्यांच्या शरीरातले लबलब करणारे ते चापल्य पराकाष्ठीस पोचते.

वैशाख लागतो आणि बुलबुलांचे गळे मोकळे होतात. ताज्या सुरेल बोलताना घेऊन हे अव्वल गवय्ये गाऊ लागतात. पहाट झाली की कधी आंब्याच्या, तर कधी शेवग्याच्या, तर कधी शिरीषाच्या डहाळीवर बसून मुक्तमनाने हे काळे, पण अति शोभिवंत पाखरू वर्षभर हृदयात साठवून ठेवलेली प्रेमकवने गाते.

ऋतू सर्जकांना सृजनास कायम प्रेरित करत आले आहेत. त्या काळातील निसर्गाविषयी मानवाच्या जाणिवा कशा जिवंत आणि समृद्ध होत्या हे कालिदास जसे सांगतो तसेच आधुनिक कवीही सांगू इच्छितात आणि म्हणूनच कालिदासाच्या कामांबद्दल असलेले प्रेम, आवड आणि काव्याचा रसिकतेने आस्वाद घेणारी वृत्ती त्याच्या चाहत्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या चाहत्यांमध्ये गायक, वादक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक इ. कलावंतही आहेत. विशिष्ट कलाप्रकारात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले असले तरी इतरही ललितकला प्रकारात अभिव्यक्त झालेले कालिदासाच्या वाङ्मयातील सौंदर्य आस्वादण्याची त्यांची उत्कट इच्छा त्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरणा देत असते.

कालिदासाचे साहित्य म्हणजे सर्जकांसाठी ऊर्जेचा अक्षयस्रोत!

प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी ‘मेघदूता’चा समश्लोकी अनुवाद केला आहे. त्यात त्या म्हणतात, ‘अनुवाद करून बघणं हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा सुंदर मार्ग आहे.’

खरंय ते. राजा रविवर्मा, एस. एम. पंडितसारख्या कलातपस्व्यांपासून एम. एफ. हुसेन, वासुदेव कामत, राजाराम शर्मा, जयप्रकाश जगताप, शफी कुरीहमानसारख्या प्रतिभावंत चित्रकारांपर्यंत साऱ्यांनी कालिदासाच्या साहित्यावर आधारित चित्रनिर्मिती केली ती याच मनोधारणेतून. प्रस्तुत लेखक-चित्रकारही महाकवीच्या साहित्याला चित्ररूप देऊन धन्य झाला आहे. कालिदास संस्कृत अकादमी, उज्जैनद्वारा निर्मित ‘ऋतुसंहार’ या संमित्र ग्रंथात ग्रीष्म ऋतूच्या पहिल्या श्लोकावर चित्रनिर्मितीचा मान मिळाला. या परते भाग्य ते कोणते?

‘ऋतुसंहार’ला दृक्श्राव्य रूप देऊन समग्र काव्याला एक उंची प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा, तसेच त्यातील नायिकाभेद सादर करणाऱ्या शोभना नारायण यांच्या नृत्याविष्कारातील ग्रीष्मतापाने दग्ध होणारी नायिका या साऱ्यांचा विचार करता ‘ग्रीष्म’ किती विविधतेने सादर होऊ शकतो याचीच प्रचिती येते. कालिदासाने वर्णन केलेले ऋतू आज आपल्याला तंतोतंत अनुभवायला येत नाहीत. हवामानातील बदल असेल किंवा कालिदासाने वर्णन केलेले ते ते ऋतू उत्तरेच्या बाजूला अधिक प्रमाणात अनुभवाला येत असतील, पण एक मात्र खरे की आज आपण निसर्गापासून अनेक योजने दूर गेलेलो आहोत. ग्लोबल वॉर्मिग नावाचा महाभयंकर राक्षस अवघा निसर्ग गिळंकृत करू पाहतो आहे. एवढंच काय तर ऋतुचक्राची तालबद्धता ही लयास गेली आहे. आज ऋतू एकमेकांवर कुरघोडी करताहेत.. कालिदासानं रंगविलेल्या निसर्ग चित्रातल्या रेषा आज पुसट झाल्यासारख्य वाटताहेत, रंगही मलीन झाल्यासारखे दिसत आहेत.. समग्र निसर्गचित्राची चौकटच खिळखिळी झाल्यागत भासत आहे.. आणि म्हणूनच आजच्या घडीला दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘ऋतूसंहारातील’ निसर्ग स्मरण्याचं प्रयोजन रास्त आहे. त्यातील रसभरित वर्णनांवरून का होईना निसर्गाशी एकतानता साधू शकू ही भावना.. याच भावनेतून या लेखाच्या निमित्ताने ‘ऋतुसंहार’चं स्मरण करण्याचा हा प्रयत्न.

निमित्त मात्र वैशाखाचं!
पंकज भांबुरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:19 am

Web Title: kalidas vaishak
Next Stories
1 सज्जता : थरारनाटय़
2 कथा : सायकल
3 कथा : वारी
Just Now!
X