वेगवेगळी युगं आणि त्यातही कलियुग ही खास भारतीय संकल्पना आहे. कलियुग कधी सुरू झालं ते  जसं पुराणकार निश्चितपणे सांगतात, तसंच ते संपणार कधी हेही सांगितलं जातं. पण मुळात या सगळ्याची आकडेमोड कशी केली गेली आहे? तिच्यामध्ये पाठभेद कसे झाले आहेत?

वेगवेगळ्या युगांच्या कल्पना आपल्या म्हणजे भारतीय माणसांच्या कानावरून लहानपणापासून गेलेल्या असतात. त्यातही सगळ्या चांगल्या गोष्टी संपून आता कलियुग सुरू झालंय, हे वाक्य तर बहुतेकांनी हमखास ऐकलेलं असतं. हे कलियुग सुरू झालेलं आहे तर ते केव्हा तरी संपणार हे उघडच आहे. त्याबद्दलही या विषयाच्या अभ्यासकांनी मांडणी केलेली आहे. त्यांच्या मते ६६६६ साली कलियुग संपणार आहे. कसं ते समजून घेण्याआधी आपण कलियुग या कल्पनेसंदर्भातल्या मूळ गोष्टी समजून घेऊ या.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

कलियुगाचा प्रारंभ कालावधी :

सगळ्यात पहिला मुद्दा असा असू शकतो की कलियुग नेमकं सुरू कधी झालं? आणि ते कसं ठरवलं गेलं? तर कलियुग सुरू होण्याचा कालावधी सर्वच तज्ज्ञांच्या अभ्यासांती इसवी सनपूर्व ३१०२ असा मानण्यात आला आहे. बायबलमध्ये इसवी सनपूर्व ३१०० मध्ये नवीन जगाची निर्मिती झाली आहे, असे म्हटले आहे आणि आपल्याकडेही त्याच वेळी कलियुग सुरू झाले आहे असे पुरातत्त्ववेत्ते, जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, पुराणज्योतिषकार यांनी मान्य केल्याचे दिसून येते. या सर्वाच्या मते इसवी सनपूर्व ३१०२ मध्ये कलियुगाची सुरुवात झालेली आहे.

13-lp-kalyug

मुळात आपल्या कालगणनेत चार युगे समजण्यात येतात. ती म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्वत्र उपलब्ध असलेल्या अवाढव्य लाखो वर्षांची वाढवून ठेवलेली युगांची वष्रे जी आज प्रचलित आहेत :

सत्ययुग किंवा कृतयुग = १७,२८,००० वष्रे

त्रेतायुग = १२,९६,००० वष्रे

द्वापरयुग = ८,६४,००० वष्रे

कलियुग = ४,३२,००० वष्रे

एकूण = ४३,२०,००० वष्रे.

चार युगांच्या एका चौकडीला चतुर्युग म्हणतात. परंतु येथे चतुर्युगाची जी ४३,२०,००० वष्रे धरण्यात आली ही अवाढव्य वष्रे वास्तवातील नसून ती अनेक पटीने वाढविलेली आहेत.

या सगळ्याबद्दल समजून घेण्याआधी एका-एका युगवर्षांची पूर्वी काय कल्पना होती आणि लाखो लाखो वर्षांचे एक युग म्हणून पुढे ती कशी बदलली आणि कोणी बदलली ते पाहू या.

युगाच्या एकूण वर्षांच्या कालगणनेतील सूक्ष्मता लक्षात घेता युग ही संज्ञा अतिप्राचीन काळी किमान तीन अर्थाने उपयोगात आणीत असत, असे दिसून येते.

एका-एका दिवसाची युगे :

प्राचीन काळी एका एका दिवसालाही एक युग मानीत असत. म्हणजेच पहिला दिवस कृतयुग, दुसरा दिवस त्रेतायुग, तिसरा दिवस द्वापरयुग आणि चौथा दिवस कलियुग. आणि पुन्हा नंतरच्या दिवशी कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी कालगणना होत असे. याचे उदाहरण म्हणून प्राचीन काळातील आध्यात्मिक साहित्यातील घटनांत कालगणनेची अशी नोंद मिळत आहे की एखादा राजा त्रेतायुगात निद्रेस जातो आणि तोच राजा द्वापरयुगात निजून उठतो. याचा अर्थ हे ग्रंथ असे सांगत आहेत की त्रेतायुगातील १२,९६,००० वष्रे संपून नंतरच्या द्वापरतील काही वष्रे खर्ची करून तो राजा निजून उठला आहे. लाखो वर्षांची निद्रा हा भाग विसंगतीचाच आहे. प्राचीन काळी हा कालखंड एक दिवसाचा होता, असे आपण समजू तेव्हा मग हे संगत होईल. म्हणजे जो राजा त्रेतायुगात रात्री निद्रेस गेला आणि द्वापारात निजून उठला तर यातील अंतर फक्त एका दिवसाचेच आहे.

आपण आता सात दिवसांचा आठवडा म्हणतो. सध्याच्या काळात चालत आलेली आठवडा ही संज्ञा पुढील काही शतकांनी तेव्हाच्या माणसांनी वाचली तर तेव्हा ते नक्कीच ग्रह करून घेतील की सन २००० काळात आठवडय़ाला सात दिवस नसून आठ दिवस असावेत.

महाभारत काळात एक-एक वर्षांलादेखील एक युग मानीत होते. मात्र, पुढील काळातील कोणाच्या तरी चुकीने युगांची ही वर्षसंख्या लाखो लाखो वष्रे अशी वाढली आहेत. िहदीमधील एक शब्द आहे ‘कल’. कल उच्चारल्यावर काल की उद्या असा आपल्याला लागलीच अर्थबोध होत नाही, परंतु पूर्ण वाक्य कानावर आल्यावर त्यातून काळाचा बोध होत असतो. तसे महाभारत आणि इतर ग्रंथांत अशा एका एका दिवसांसाठीसुद्धा युग म्हटले आहे, याचा अर्थ ही घटना एका दिवसाच्या अंतरात घडली आहे.

एके ठिकाणी पन्नास-साठ माणसे जमा झालेली असतात, तेव्हा त्रयस्थाला सांगताना ही संख्या सतराशे-साठ अशीही सांगितली जाते. दुसऱ्या ठिकाणी दहा-वीस हजार माणसांची गर्दी असते तेव्हा हा आकडा लाख बनत असतो. परंतु ही झाली गृहीत धरण्याची पद्धत. जसे महाभारतकाळी एका वर्षांला युग म्हटले गेले तसे रामायणकाळातही एका वर्षांला हजारो वष्रे धरली गेलेली आढळतात. उदा. रामराज्याचे वेळी मृत झालेला ब्राह्मणाचा मुलगा पाच हजार वर्षांचा होता असे म्हटले आहे. (या मृत मुलाचा रामायणात उल्लेख पाच हजार वर्षांचा असा आलेला आहे तर पद्मपुराणातील उत्तरकांडमध्ये त्याचे वय पाच वष्रे आले आहे.)

आनंदरामायणातही युगाला किंवा वर्षांला एक हजारने गुणले आहे.

रामाने अकरा हजार वष्रे राज्य केले, असा प्राचीन उल्लेख आढळतो. राम जेव्हा राज्यारूढ होतो तेव्हा काही काळाने रजकाच्या आरोपावरून सीतेस वनात सोडून देतो. त्या वेळी ती पाच-सहा महिन्यांची गरोदर होती. पुढे रामाने अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञाच्या प्रसंगी लवकुश आले तेव्हा त्यांचे वय १२ वष्रे अधिक थोडे असावे. यावरून मधील ११ वष्रेच रामाने राज्य केले असावे.

तसेच पांडवांच्या वनवासाच्या केवळ १२ वर्षांच्या अंतरात एकदा त्रेता-द्वापवनरचा संधी होता आणि एकदा द्वापर-कलीचा संधी होता असे महाभारतात म्हटले आहे. म्हणजे या केवळ १२ वर्षांत त्रेतायुगाची बारा लाख, द्वापरयुगाची आठ लाख आणि कलियुगाची चार लाख वष्रे असे आपल्याला मान्य करावे लागेल. मात्र, १२ वर्षांसाठीची आलेली ही लाख-लाख वर्षांची कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी गणना त्या काळी एका एका वर्षांचे एक युग होते, याचेच निर्देशक आहेत. अन्यथा केवळ बारा वर्षांच्या अंतरासाठी लाख-लाख वर्षांचा कालावधी आलाच नसता.

त्याचप्रमाणे महाभारत युद्ध झाले तेव्हा द्वापरांत होता असा उल्लेख आहे. महाभारताच्या काळी द्वापर व कली ही वर्षांची नावे होती, लाखो वर्षांचा कलियुग नव्हताच. द्वापरांत म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग यांचा संधी एकच वर्षांचा होता.

पुराणनिरीक्षणकार त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी त्यांच्या ग्रंथात एका-एका दिवसांची, एका-एका वर्षांची युगे पूर्वी मानली जात असत, याची उदाहरणे दिलेली आहेत.

’ लाख-लाख युग वर्षांची संख्या होण्यास कारणीभूत दिव्य वर्ष संकल्पना.

आपल्या कालगणनेत ‘दिव्य वर्ष’ अशी एक संज्ञा आहे. एक दिव्य वर्ष म्हणजे ३६० वष्रे. मात्र ख्रिस्ती सनापर्यंत दिव्य वर्षी अशी संकल्पना नव्हती. आपल्या कालगणनांच्या युग वर्षांना दिव्य वर्षांनी गुणण्याची व्यवस्था त्यानंतरच्या चौथ्या-पाचव्या शतकात कशी आणि कोणी केली ते आपण पाहणार आहोत.

सध्या प्रचलित असणारी लाखो वर्षांची जी एकेका युगाची संख्या आहे. म्हणजे कृतयुग १७,२८,०००; त्रेतायुग १२,९६,०००; द्वापरयुग ८,६४,००० आणि कलियुग ४,३२,००० अशी युग वष्रे इसवी सन पूर्वीच्या तिसऱ्या शतकातही नव्हती. त्या वेळी ग्रीक वकील मेगॅस्थेनिस भारतात आला होता तेव्हा अशी कालगणना त्याला दिसून आलेली नाही. त्याने तसा उल्लेख केलेला नाही. इसवी सनपूर्वीच्या पहिल्या शतकातील अश्वघोषाच्या वेळीही अशी लाखो वर्षांच्या युगांची कालगणना नव्हती.

मग ‘लाखो वर्षांचे एक युग’ ही चुकीची कालगणना कोणी केली?

आर्यभटच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या सुमारास गणितीचा व्यवहारात उपयोग होऊ लागला होता. आर्यभटच्या काळी १२ हजार वर्षांचे चतुर्युग मान्य करण्यात आले होते. आर्यभट यास चार युगांचे चार चढते पाद मान्य होते. म्हणजे चतुर्युग १२ हजार वर्षांचे आहे तर कलियुग नेहमी लहान असते म्हणून तो एक हजार २०० वर्षांचे आहे, द्वापरयुग त्याच्या दुप्पट म्हणजे दोन हजार ४०० वर्षांचे आहे. त्रेतायुग ३ हजार ६०० वर्षांचे आहे आणि कृतयुग ४ हजार ८०० वर्षांचे आहे हे आर्यभटच्या काळच्या किंवा त्यापूर्वीच्या पुराणज्योतिषकारांनी, गणिततज्ज्ञांनी मान्य केले होते.

इ.स. ४९० ते ५८५ या काळात जन्मलेल्या प्रख्यात गणितज्ञ वराहमिहिर याच्या आधी किंवा त्या सुमारास ही १२ हजार वर्षांची चतुर्युगाची संख्या ठरून गेली होती आणि त्यानुसार कलियुगाची एक हजार २०० वष्रे आहेत, हेही निश्चित झाले होते. परंतु याच काळात दिव्य वर्ष संकल्पना रुजू होती. एक दिव्य वर्ष = ३६० वष्रे. तेव्हा पुराणज्योतिषकारांनी चारही युगांना दिव्य वर्षांनी म्हणजे ३६० वर्षांने गुणून ही मनुष्याची वष्रे देवांची बनविली आणि चार युगांची वर्षसंख्या पुढीलप्रमाणे ठरविली :

कृतयुग – ४ हजार ८०० वष्रे x ३६० = १७,२८,००० वष्रे

त्रेतायुग – ३ हजार ६०० वष्रे x ३६० = १२,९६,००० वष्रे

द्वापरयुग – २ हजार ४०० वष्रे x ३६० = ८,६४,००० वष्रे आणि

कलियुग – १ हजार २०० वष्रे x ३६० = ४,३२,००० वष्रे.

आणि या चार युगांची बेरीज आली ४३,२०,००० वष्रे जी आजच्या काळात प्रचलित आहे.

वरील सर्व विवेचनाचा विचार करता या मूळच्या हजार संख्येने असलेल्या युग वर्षांना त्या काळात कैकपटीने गुणले गेलेले आहे, असे दिसून येते.

कलियुगाचा एकूण कालावधी

कलियुगाची सुरुवात हजारो विविध अभ्यासकांच्या संशोधनाअंती इसवी सनपूर्वी ३१०२ अशी मानली गेलेली आहे. जीवशास्त्रज्ञ, भूस्तरशास्त्रज्ञ, ज्योतिषी, पंचांगकत्रे आणि अन्य विशेषज्ञ यांच्या अथक अभ्यासाच्या समन्वयातून ही तारीख अगदी निश्चित मानली गेली आहे. पंचांगातही कलियुग सुरू झाल्याची तारीख इसवी सनपूर्व १८ एप्रिल ३१०२ अशी दिलेली आहे. आणि श्रीदत्तावधूत (सन १९९८ ते सन ३००० वर्षांपर्यंतचे जागतिक भविष्यकार- ‘अगम्यवाणी’ आणि इतर १४ सिद्धग्रंथकत्रे) यांनी त्यांच्या सिद्धग्रंथात कलियुगाची समाप्ती बहुधा सन ६६६६ अशी सांगितली आहे.

या दोन सनांचा आधार घेत कलियुगाचा कालावधी काढताना इसवी सनापूर्वीची कलियुगाची ३१०२ वष्रे + इसवी सनानंतरची ६६६६ वष्रे यांची बेरीज ९७६८ वष्रे येते. याचा अर्थ कलियुगाची एकूण ९७६८ वष्रे आहेत.

पुराणज्योतिषकारांनी पुढे जी लाखो वर्षांची अवाढव्य कालगणना वाढविली होती, त्यातील चुकीने वाढविलेल्या पटीच्या संख्येचा विचार न करता चतुर्युगाची मूळ बेरीज मात्र कमी आहे. अर्थात, आपल्या हाती असलेल्या सध्या प्रचलित युग कालगणना तक्त्यात चार युगांची एकत्रित बेरीज ४३,२०,००० आहे. ही लाखो-लाखो वर्षांची अवाढव्य युगकालगणना तत्कालीन ज्योतिषकारांनी, पुराणकार आणि अन्य तज्ज्ञांनी केली.

ज्योतिषपुराणकारांनी दिव्य वर्षांनी गुणलेली लाखो वर्षांची युगसंख्या वष्रे पुढील काळात पुराणांनी चुकून ग्राहय़ धरली.

पाचव्या शतकाच्या पूर्वी किंवा त्या काळसुमारास कलियुगाची कालगणना दिव्य वर्षांनी गुणून ४,३२,००० अशी अनेक पटीने वाढवून मोजली गेली होती. कलियुगाची त्यांनी ठरविलेली एक हजार २०० वष्रे गुणिले ३६० (दिव्य वर्ष) या गणिताने कलियुगाची ४,३२,००० वष्रे धरण्यात आली. कलियुगाची ही ४,३२,००० वष्रे आणि कलियुगाच्या दुपटीने वाढणारे द्वापरयुग ८,६४,००० वष्रे, त्रेतायुग १२,९६,००० वष्रे आणि कृतयुग १७,२८,००० अशी लाखोलाखो वर्षांची ही वाढीव झालेली एकूण ४३,२०,००० अशी चतुर्युगांची बेरीज वष्रे केवळ त्याच काळापुरताकरिता गणली गेली नाहीत तर पुराणांतदेखील ती वाढीव रूपाने आली, जी आज सर्वानीच ग्राहय़ धरली आहेत.

पुराणांत ही लाखो वर्षांची कालगणना कशी आली?

पुराणांनी दुसऱ्या बाजूने युगकालगणना बदलली. ती कशी बदलली याचा आपण विचार करू या.

महर्षी व्यासांपूर्वी अतिप्राचीन काळी देवलोकात शतकोटी श्लोकांचे असे एकच बृहद्पुराण होते. व्यासांनी बृहद्पुराणांतील श्लोकसंख्या संक्षिप्त करून ती चार लाखांवर आणून अठरा पुराणांत विभाजित केली. महर्षी व्यासकृत आदिपुराणांची प्रवृत्ती विक्रमादित्य राजा (इसवी सनपूर्वी ५७ वष्रे) स्वस्वरूपात कायम होती.

विक्रमादित्य राजा (इसवी सनपूर्वी ५७ वष्रे) याचे निधन झाल्यावर शौनकादी ऋषी सूताकडे जाऊन धर्म सांगण्याविषयी त्यास प्रश्न करू लागले. या वेळी पुराणांवर दुसऱ्यांदा संस्कार झाले. पुराणांवर संस्कार होताना ती सूतांकडून पुनरुक्त झाली. त्यात बदल झाले.

तिसऱ्या संस्करणात आर्यभटच्या पूर्वीच्या, समकालीन आणि त्यानंतर इ.स. ५००-६००च्या सुमारास निर्माण झालेल्या पुराणांत बदल करून काही पुराणांना भविष्यवर्णनाचे भाग जोडण्यात आले. यामुळे युगवर्षांची संख्या लाख लाख वष्रे झाली. वाढविलेल्या भविष्यवर्णनांची जोडणी होऊन तयार झालेली हीच पुराणे आज सद्यकाळात उपलब्ध आहेत. याचा आधार घेत कलियुगाची वर्षसंख्या ४,३२,००० वष्रे आणि पुढील सर्व युगांची लाख-लाख वर्षसंख्या अशी आहे, ती युग वर्षसंख्या चुकून वाढविलेली आहे.

कलियुग सुरू होण्याचे वर्ष इसवी सनपूर्वी ३१०२ असे आहे, तर कलियुग समाप्तीचे वर्ष इसवी सनानंतर ६६६६ असे आहे. (दर ३,११,०४० वर्षांनी येणारा मोठा प्रलय हा इ.स. ३३०३ या वर्षी सुरू होत आहे, त्या वर्षांपासून संपूर्ण पृथ्वीवर हिमयुग सुरू होणार आहे, असे प्रलय गणितज्ञांचे गणित आहे.) तरीही कलियुगाच्या ९७६८ वर्षांपकी इसवी सन ३३०३ वर्षांनी होणारा प्रलय पार करीत आणखी ३३६३ वष्रे कलियुग सुरू राहील, कारण कलियुगाची समाप्ती तितक्याच अधिकच्या वर्षांनी म्हणजे ३३०३ + ३३६३ = ६६६६ इसवी सनात होणार आहे, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.
मनोहर मांदाडकर – response.lokprabha@expressindia.com