सचिन दिवाण – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची : जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये या हंगामात जनजीवन कडक थंडीने गोठून जाते. अनेक ठिकाणी बर्फ साचते, दल सरोवर गोठते. या गारठय़ाने तिथल्या जनजीवनाचा वेग मंदावला असला तरीही जम्मू-श्रीनगर महामार्गावरील हलमुल्ला ते संगम या परिसरात मात्र उलट परिस्थिती असते. तेथील रहिवाशांसाठी हा काळ वेगाने कामे उरकण्याचा असतो. आता त्यांना उसंत नसते. कारण देशाच्या उर्वरित भागातील लोकांसाठी थंडीचा हंगाम म्हणजे प्रखर उन्हापासून मुक्ती. खाण्यापिण्यासाठी, फिरण्यासाठी, खेळासाठी हे अगदी पोषक वातावरण. याच काळात मुले भरपूर खेळतात, व्यायाम करतात, तब्येत बनवतात. भारतात खेळ म्हणजे प्रामुख्याने क्रिकेट आणि देशातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश मुलांच्या हातातील बॅट काश्मिरामधून येतात. त्यामुळे या लोकांसाठी थंडीचा हंगाम हा हातपाय जवळ घेऊन, शाल पांघरून बसून राहण्याचा नाही तर व्यवसायात जोरदार बॅटिंग करण्याचा काळ.

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील हलमुल्ला ते संगम या पट्टय़ातील साधारण १०० कुटुंबे क्रिकेटच्या बॅटनिर्मिती व्यवसायात आहेत. त्यातून ५० हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. देशातील एकूण बॅटनिर्मितीपैकी तब्बल ९० टक्केउत्पादन या परिसरात होते. जम्मू-काश्मीर जसे सफरचंद, अक्रोड आणि केशरासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते विलो नावाच्या झाडांसाठीही प्रसिद्ध आहे. याच विलो वृक्षांच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅट तयार केल्या जातात. जगात बॅटसाठी इंग्लंडमधील विलोच्या झाडाप्रमाणेच काश्मिरी विलोही प्रसिद्ध आहे. इंग्लिश विलोपेक्षा काश्मिरी विलोचा दर्जा थोडा कमी असला तरी ते तुलनेने स्वस्त आहे. त्यामुळे परवडणाऱ्या बॅटसाठी आपल्याकडे खेळाडू काश्मिरी विलोला प्राधान्य देतात. देशभरातील होतकरू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलींच्या मैदानावरील आशा-आकांक्षांना बळ देणारी ही काश्मिरी विलो आता स्वत:ची ‘विकेट’ टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या या उद्योगाला आता घरघर लागली आहे.

काश्मिरी विलोची लागवड प्रामुख्याने तेथील शेतकरी, सामान्य माणूस आपल्या खासगी जमिनीवर, शेतात, बांधावर करतो. लागवडीपासून पूर्ण वाढ होऊन कापणीला तयार होण्यासाठी या झाडाला साधारण १५ वर्षे लागतात. इतकी वर्षे झाडांची निगा राखल्यानंतर त्यांचे खोड लाकडासाठी उपयुक्त बनते. मात्र राज्यात २०१४ साली आलेल्या महापुरात विलोची अनेक झाडे आणि कारखान्यात साठवून ठेवलेले लाकूड वाहून गेले. लोकांचा विलोची लागवड करण्याचा कल कमी होऊ लागला आहे. १० ते १५ वर्षे विलोची निगा राखून मग त्याच्या लाकडातून उत्पन्न मिळण्याची वाट बघत बसण्यापेक्षा स्थानिक लोक आता ४ ते ५ वर्षांत उत्पन्न देऊ लागणाऱ्या पॉपलर वृक्षांची आणि सफरचंदाच्या बागांची लागवड करू लागले आहेत. त्यामुळे बॅट तयार करण्यासाठी विलोच्या लाकडाची कमतरता भासू लागली आहे. त्याने काश्मिरी विलोची किंमत वाढून इंग्लिश विलोच्या तुलनेत जो किमतीचा फायदा मिळत होता, तो कमी होऊ लागला आहे.

विलोच्या लाकडापासून बॅट तयार होऊन ती मैदानावर खेळाडूंच्या हाती पडेपर्यंत तिला साधारण ३० प्रक्रियांमधून जावे लागते. हे वेळखाऊ काम आहे. लाकूड कापून त्याला बॅटच्या पात्याचा (ब्लेड) आकार देतात आणि ते लाकूड वखारीत वर्षभर वाळवण्यासाठी ठेवून देतात. काश्मीरच्या मंद उन्हात लाकूड वाळण्यासाठी बराच वेळ लागतो. मग पुढील वर्षी त्याला आकार देऊन, इंग्रजी ‘व्ही’ अक्षराच्या आकाराची खाच पाडून त्यात बॅटचा दांडा बसवण्याचे काम केले जाते. बॅटचा हा दांडा वेताचा (केन) असतो आणि तो पंजाबमधून आणला जातो. ते ठोकून आणि चिकटवून बॅटला बसवले जातात. ही पकड घट्ट बसल्यावर पुढील काम करून बॅटला अंतिम रंगरूप दिले जाते. काश्मीरमध्ये पॉलिश केलेली बॅट साधारण १५०० रुपयांना मिळते. तेथून या बॅट देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या आणि परदेशांतील व्यापारी केंद्रांना पाठवल्या जातात. तेथे त्यांच्यावर स्टिकर आदी लावून ब्रँडिंग केले जाते. तोपर्यंत या बॅटची किंमत ५ ते ७ हजारांपर्यंत गेलेली असते. मात्र त्यातील खूप कमी फायदा काश्मीरमधील उत्पादकांना मिळतो. त्यात नव्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीने बॅट व्यावसायिकांच्या अडचणींत भर पडली आहे. पूर्वीच्या कर रचनेत बॅटवर ५ टक्के कर होता. जीएसटी प्रणालीत तो १२ टक्के झाल्यामुळे लहान व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.

जम्मू-काश्मीरमधील अशांत वातावरणाचाही या उद्योगावर बराच परिणाम झाला आहे. सततचे दहशतवादी हल्ले, सुरक्षा दलांकडून होणाऱ्या कारवाया, बंद, संचारबंदी, मोर्चे, दगडफेक, जाळपोळ यामुळे कामगार दररोज कामावर हजर राहू शकतील याची शाश्वती देता येत नाही. ज्या दिवशी कामगार असतील त्या वेळी यंत्रे चालवण्यासाठी वीज असेल की नाही हे सांगता येत नाही. श्रीनगर किंवा जम्मूपासून थोडे ग्रामीण भागात गेले की दर तासाला विजेचा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. दिवसातील फार कमी वेळ वीज टिकते. तेवढय़ाच वेळेत कामे उकरून घ्यायची आणि मोबाइलपासून अन्य उपकरणांच्या बॅटरी चार्ज करून घ्यायच्या. जनरेटर चालवण्यासाठी इंधनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे कारखान्यातील काम सलगपणे सुरू ठेवता येत नाही. विजेच्या अभावी काम बंद पडले आणि नशिबाने इंटरनेट सुरू असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवरून देशभरातील ग्राहकांना त्यांच्या बॅट आणखी काही दिवस उशिरा मिळतील असे संदेश पाठवत राहणे इतकेच काम हाती राहते. अशा वेळी मालाचा पुरवठा वेळेत होणार नसल्याने ग्राहक तुटण्याची भीती असते.

मात्र या सर्व अडचणींशी झगडा करत काश्मीरमधील विलो आणि क्रिकेट बॅट उद्योग कसाबसा तग धरून आहे. विरोधी संघातील गोलंदाजांच्या जोरदार माऱ्याला आणि बाऊन्सर्सना तोंड देत विकेट टिकवून ठेवण्यासारखाच हाच प्रकार आहे. ती विकेट अजून पडलेली नाही कारण काश्मिरी माणसाची वृत्तीही काश्मिरी विलोसारखीच चिवट आहे. विलो जशी प्रतिपक्षाच्या उसळत्या चेंडूंना सहजी टोलवून लावते तसाच काश्मिरी माणूसही चौफेर येणारी संकटे परतवून, पाय रोवून उभा आहे. त्या जोरावरच देशभरातील मुले मैदान मारण्याची आशा बाळगून आहेत.