News Flash

काश्मिरी केशराला जीआय टॅग

काश्मिरी केशर ही १६०० मीटर उंचीवर वाढणारी केशराची जगातील एकमेव प्रजात आहे

संग्रहीत

-जय पाटील
काश्मीरला जाऊन केशर खरेदी न करणारी व्यक्ती विरळाच! पण काश्मिरी केशराच्या नावाखाली कमी दर्जाचे किंवा भेसळयुक्त केशर अवाच्या सवा किमतीत विकले गेल्याचा अनुभवही अनेकांना येतो. आता या फसवणुकीवर चाप बसणार आहे. काश्मिरमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या केशराच्या खास भौगोलिक वैशिष्ट्यांना केंद्र सरकराने मान्यता दिली आहे. या केशराला जिओग्राफिकल आयडेंटिटी टॅग (जीआय टॅग) मिळाल्यामुळे त्याची विश्वासर्हता वाढून निर्यातीला चालना मिळण्याचा मार्ग तर मोकळा झाला आहेच, पण त्यामुळे केशर उत्पादकांना अधिक चांगला मोबदला मिळण्याचीही शक्यता दिसू लागली आहे.

सध्या काश्मिरी केशरात होत असलेली भेसळ जीआय टॅगमुळे थांबेल आणि विश्वासार्हता वाढल्यामुळे केशराला अधिक चांगली किंमतही मिळेल, असे मत कृषी उत्पादन विभागाचे मुख्य सचिव नवीन के चौधरी यांनी व्यक्त केल्याचे फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्तात नमूद आहे.

काश्मिरी केशर ही १६०० मीटर उंचीवर वाढणारी केशराची जगातील एकमेव प्रजात आहे. त्यामुळे या केशराचे गुणधर्म अन्य ठिकाणच्या केशरापेक्षा वेगळे आणि खास आहेत. लांब तंतू, नैसर्गिक गडद लाल रंग, उत्तम गंध, कडवट चव, रसायनरहित उत्पादन प्रक्रिया आणि अप्रतिम स्वाद यामुळे काश्मिरी केशर केशराच्या अन्य प्रकारांपेक्षा श्रेष्ठ ठरते.
केशराच्या शेतीसाठी तुषार सिंचन प्रक्रिया राबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. तिथे मसाल्याच्या पदार्थांचे एक उद्यानही विकसित करण्यात येत आहे. या सर्व प्रक्रिया पूर्णत्वास आल्यावर केशर उत्पादन आणि विक्रीच्या साखळीतीली सर्वांनाच त्याचा लाभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पर्यटन हा काश्मीरमधील रहिवाशांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा भाग आहे, मात्र दहशतवादाच्या सावलीत या व्यवसायाचे स्वरूप फारच अनिश्चित असते. काश्मीरमधील केशर लोकप्रिय आणि प्रसिद्ध तर आहेच, पण आता जीआय टॅग मिळाल्यामुळे तिथल्या केशर व्यवसायाच्या शिरपेचात विश्वाासार्हतेचा तुराही रोवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 9:46 am

Web Title: kashmiri kesar gi tag msr 87
Next Stories
1 निमित्त : एकमेव लोकमान्य! उत्तुंग नेतृत्वाचं चिरस्थायी स्मरण
2 हॉटेल व्यवसाय क्षेत्र आढावा : हॉटेल उद्योगाला हवे व्हिटॅमिन एम
3 प्रासंगिक : राम मंदिर आणि सोमपुरा
Just Now!
X