मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. मौज, मस्ती, समर कॅम्प, नवीन खेळ, भटकणे, सोबत पाहुणे आलेली मामे-आते, मावस भावंडे, बिल्डिंगमधील दोस्त. दिवसभर धमाल नुसती. मग काय भूकही खूप लागते. काही तरी चटपटीत खावेसे वाटते? चला तर मग घरीच काही छान आणि चविष्ट पदार्थ बनवू या! सोपे सोपे पदार्थ आहेत. थोडी आईची मदत मात्र लागेल हं!

चला तर मग स्वत: बनवून भरपूर खा.

इडली पिझ्झा

साहित्य :

दीड वाटी इडलीचे फुगलेले पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली पानकोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धी वाटी किसलेला गाजर, एक टेबलस्पून टोमॅटो सॉस, पाच-सहा ऑलिव्ह स्लाइसेस (आवडत असल्यास), अर्धी वाटी किसलेले चीज, अर्धा चमचा ओरिगानो,  चवीनुसार मीठ (पाव चमचा)

कृती :

कुकरमध्ये किंवा ढोकळापात्रात पाणी घालून उकळत ठेवावे. कुकरच्या लंगडीला किंवा ढोकळा थाळीला तुपाचा हात लावून त्यात इडली पिठाचा पातळ थर (अर्धा इंच अंदाजे) घाला. कापलेल्या भाज्यांवर टोमॅटो सॉस, ओरिगानो व चिमूटभर मीठ घालून नीट कालवा. या भाज्या हाताने हळुवार इडलीच्या पिठावर नीट पसरून घाला. त्यावर किसलेले चीज नीट पसरून घाला. वर ऑलिव्ह स्लाइस घालून पाच मिनिटे इडलीप्रमाणे वाफवा. पिझ्झा तयार! भांडे काढून सुरीने कडा सोडवून घ्या. एका थाळीत भांडे उलटे करून पिझ्झा काढून घ्या. पिझ्झा सुलट करून स्लाइसेस करा. छान चविष्ट, झटपट पिझ्झा तयार..!

चपाती भेळ

साहित्य :

दोन-तीन पोळ्या, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, एक चिरलेला लहान कांदा, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे तेल, एक चमचा घरातील कोणतीही लसणीची चटणी, चवीनुसार मीठ.

कृती :

पोळ्या हाताने बारीक करून घ्या. किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसणीची चटणी (आवडेल तितकी), कैरी किंवा लिंबाच्या लोणच्याचा खार दोन चमचे घाला, दोन चमचे तेल व चिमूटभर मीठ व शेंगदाणे घालून हाताने नीट चोळून मिसळा. ओलसर लागण्यासाठी गरज वाटल्यास लोण्याच्याचा खार आणखी एक चमचा घाला.

छान स्वादिष्ट! कधीही करता येणारी ही भेळ भरपूर खाल्ली जाते.

* आवडीप्रमाणे एखादा सॉस किंवा चटणी घालू शकता.

फ्रुट बॉल कस्टर्ड

साहित्य :

कस्टर्डसाठी – तीन कप दूध, चार चमचे साखर, तीन चमचे कस्टर्ड पावडर (व्हॅनिला फ्लेवर)

फ्रुट बॉलसाठी – गव्हाच्या ब्रेडचे चार स्लाइस, एक वाटी सफरचंदाच्या बारीक फोडी, अर्धी वाटी चिकूच्या बारीक फोडी, पाव वाटी डाळिंबाचे दाणे, पाच-सहा चेरी.

कृती :

एका पातेल्यात दोन कप दूध उकळण्यासाठी ठेवावे. अर्धा कप दुधात तीन चमचे कस्टर्ड पावडर नीट मिसळावी. गरज पडल्यास दूध घाला. गुठळी न होता मिसळून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात ही पेस्ट टाकून सारखे ढवळत तीन-चार मिनिटे शिजवा व गार झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. सफरचंद, डाळिंब, चिकू व चेरीच्या फोडी एकत्र करा. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून एका ताटलीत दूध घेऊन एक स्लाइस दुधात भिजवा. दोन्ही तळहातात स्लाइस घेऊन पिळून घ्या. स्लाइस हातावर घेऊन त्यात अंदाजे एक चमचा फळांच्या एकत्र केलेल्या फोडी घालून ब्रेड स्लाइसचा बॉल बनवा. थोडय़ा प्रयत्नाने बॉल बनतो. असे चार बॉल बनवा. कस्टर्ड घट्ट वाटल्यास दूध घालून ब्लेंडरने मऊ करून घ्या. एका बाऊलमध्ये फ्रुट बॉल ठेवून त्यावर कस्टर्ड ओता व चेरी ठेवा. चवदार कस्टर्ड बॉल्स खायला तयार!

कॅनॅपी चाट

साहित्य :

कॅनॅपी पॅकेट (शेवपुरीसारखे कुरकुरीत वाटीसारख्या कॅनॅपी किराणा दुकानात मिळतात. एका पॅकेटमध्ये २० असतात.), शिजवलेले चणे, शिजवलेले मोडाचे मूग, सिमला मिरचीचे तुकडे दोन चमचे (प्रत्येकी), पुदिना कोथिंबीर चटणी, चिंच चटणी, अर्धी वाटी दही-साखर मिश्रण, चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी बारीक शेव.

कृती :

शिजवलेल्या मोडाच्या मूग व चण्यांवर तसेच सिमला मिरचीच्या तुकडय़ांवर चिमूटभर मीठ घालून कालवावे. कॅनॅपीच्या वाटय़ा घेऊन त्या मूग-चणे, सिमला मिरचीचे तुकडे घाला. पाव चमचा चटणी, पाव चमचा दही घाला. त्यावर शेव घाला. कुरकुरीत आंबट गोड कॅनॅपी सर्व जण फस्त करतील!

कॉर्न बटाटा कटलेट

साहित्य :

एक उकडलेला मोठा बटाटा, पाव वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, एक मोठा चमचा जाड पोहे, एक ब्रेड स्लाइस, अर्धे लिंबू,  एक चमचा साखर, अर्धी वाटी कोथिंबीर, एक चमचा धने-जिरे पूड, पाव चमचा मीठ.

कृती :

बटाटा कुस्करून त्यात मक्याचे दाणे, खोबरे घाला. पोहे भिजवून घ्या. पाणी काढून टाका. बटाटा, मक्याचे दाणे पोहे, ब्रेड स्लाइस, लिंबू, साखर, कोथिंबीर, धने-जिरे पूड चवीसाठी चिमूटभर मीठ मिसळून हाताने मऊ करा. लहान गोळे करून हातावर चपटे करा.

नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून मंद गॅसवर दोन मिनिटे एका बाजूला व दोन मिनिटे दुसऱ्या बाजूने (उलटवून) शेका. छान खरपूस करून टोमॅटो सॉसबरोबर खा.

चना चटपटा

साहित्य :

एक वाटी चणे, पाव वाटी पनीरचे बारीक तुकडे, अर्धी वाटी शेंगदाणे भिजवून मीठ घालून मऊ शिजवलेले, दोन चमचे कैरीच्या फोडी (अगदी बारीक), पाव वाटी बारीक चिरलेली कांदा पात, पाव वाटी काकडीचे बारीक तुकडे, दोन चमचे पुदिना-कोथिंबीर चटणी, चवीपुरते मीठ

कृती :

एका मोठय़ा वाडग्यात चणे, शेंगदाणे, पुदिना-कोथिंबीर चटणी, पनीर, कांदापात, काकडी, कैरी मिसळून झाकण लावून नीट हलवावे. चटपटा चना चाट हाजिर!

पास्ता सॅलड

साहित्य :

एक वाटी पास्ता, अर्धी वाटी पास्ता सॉस, अर्धी वाटी उकडलेले मोडाचे मूग-मसूर, दोन चमचे काकडीचे तुकडे, एका छोटय़ा टोमॅटोचे बारीक तुकडे, अर्धी वाटी बारीक चिरलेला पानकोबी, एक चमचा किसलेला गाजर, एका उकडलेल्या बटाटय़ाच्या फोडी, अर्धी वाटी दही, एक चमचा साखर, पाव चमचा मिरपूड

कृती :

एका मोठय़ा पातेल्यात आठ-दहा वाटय़ा पाणी उकळत ठेवावे. त्यात पाव चमचा मीठ व अर्धा चमचा तेल घालून उकळी आल्यावर पास्ता घालावा. मधून मधून चमच्याने हलवत पास्ता शिजवून घ्या. पास्ता मऊ शिजला पाहिजे पण तुटायला नको. नंतर तो गाळणीत ओतून त्यावर गार पाणी ओता व अर्धा चमचा तेल घालून हलवा. दही, साखर, मीठ एकत्र करून फेटून घ्या. मिरपूड घाला. पास्ता व वरील सर्व भाज्या घालून छान मिसळा. पास्ता सॉस आवडीनुसार घाला. भरपूर खा.

दही भेळ

साहित्य :

दोन वाटी ज्वारीच्या लाह्य़ा, अर्धी वाटी बारीक शेव, अर्धी वाटी मुरमुरे, अर्धी वाटी काकडीचा कीस, दोन चमचे गाजराचा कीस, अर्धी वाटी जाडसर शेंगदाणा कूट, अर्धी वाटी घट्ट दही, अर्धा चमचा साखर, पाव चमचा मीठ, दोन चमचे कोथिंबीर-पुदिना चटणी, दोन चमचे डाळिंब दाणे.

कृती :

ज्वारीच्या लाह्य़ा पाण्याने धुऊन निथळत ठेवा. एका मोठय़ा वाडग्यात काकडी, गाजर किस, शेंगदाणा कूट, पुदिना-कोथिंबिरीची चटणी व डाळिंब दाणे एकत्र करा. दह्य़ात साखर व मीठ घालून नीट मिसळा. हे दही आधीच्या मिश्रणात घालून नीट चमच्याने एकत्र करा व लगेच शेव घालून खायला घ्या.

हेल्दी सॅलड

साहित्य :

अर्धी वाटी मोडाचे मूग, अर्धी वाटी बारीक चिरलेली लाल व पिवळी सिमला मिरची आणि टोमॅटो, काकडी, अर्धी वाटी घट्ट दही, दोन चमचे, मेयोनीज, पाव चमचा मिरेपूड, एक चमचा दुधाची साय, चवीनुसार मीठ

कृती :

दही चमच्याने फेटून त्यात मेयोनिज व साय घालून पुन्हा फेटा. त्यात मूग व सिमला मिरची, टोमॅटो, काकडीचे तुकडे, मिरेपूड, मीठ घालून हलवा व छान भरपूर खा. खूप फायबर व व्हिटॅमिन्स मिळतील.

ब्रेड पॅटीस

साहित्य :

गव्हाचा स्लाइस ब्रेड (चार स्लाइस), एक उकडलेला बटाटा, दोन चमचे शेजवान सॉस, एक चमचा पनीरचे बारीक तुकडे, एक चमचा किसलेले गाजर, पाव चमचा मीठ.

कृती :

उकडलेल्या बटाटय़ाच्या बारीक फोडी करून त्यात पनीरच्या फोडी, किसलेले गाजर, शेजवान सॉस, चवीपुरते मीठ घालून हाताने छान मिसळून त्याचे छोटे छोटे चार बॉल्स बनवा. ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या. एका ताटलीत पाणी घेऊन ब्रेड स्लाइस पाण्यात बुडवा व लगेच काढून दोन्ही तळहातात दाबून पाणी काढा. स्लाइस मोडणार नाही याची काळजी घ्या. ओले स्लाइस हातावर घेऊन त्यात बटाटय़ाचा बॉल भरून त्याचे चपटे पॅटीस बनवा. तोंड नीट बंद करून नॉनस्टिक तव्यावर मंद गॅसवर भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी तीन-चार मिनिटे भाजून खरपूस करा. सॉसबरोबर खा मस्त!

चीज-मशरूम कॅपस

साहित्य :

दहा-बारा मोठे मशरूम्स, पाव वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी किसलेले चीझ, पाव चमचा मिरेपूड, चवीपुरतं मीठ

कृती :

मशरूम्स स्वच्छ धुऊन त्याच्या दांडय़ा काढून फक्त कॅप्स घ्या. (दांडय़ा नंतर कोणत्याही भाजीत घालता येतील) मोठय़ा कॅप्स घ्या.

चीज व मिरपूड, मीठ एकत्र करा. मक्याचे दाणे धुऊन घ्या. ओव्हनच्या डिशला थोडे बटर लावून त्यावर मशरूम कॅप उलटी ठेवा. प्रत्येक कॅपमध्ये २, ३ मक्याचे दाणे व त्यावर चीज घाला. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये फक्त तीस सेकंद हीट करा. गार झाल्यावर खा. छान चीजयुक्त मशरूम्स तयार त्यात कॉर्नचा कुरकुरीतपणा..! मजाच.!
आशालता पाटील – response.lokprabha@expressindia.com