स्मरणगाथा
३ एप्रिल हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचे शिष्य तसंच व्हायोलिन साथीदार पंडित मिलिंद रायकर यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी.

किशोरीताई गेल्याची बातमी गोव्याला एका कार्यक्रमादरम्यान कळली. सुन्न झालो. डोळे मिटले तर ताईंबरोबर घालवलेल्या अनेक प्रसंगांचा कोलाज डोळ्यांसमोर तरळायला लागला.. ८६-८७ चा काळ, मला गोवा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पं. बबनराव हळदणकरांनी मुंबईत मला आणले. तोपर्यंत वेस्टर्न बऱ्यापैकी वाजवत होतो. गिटार/ व्हायोलिनशी दोस्ती झालेली होती. गोव्यात पं. बी. एस. मठ आणि पं. वसंतराव काडणेकरांकडे व्हायोलिनचे पहिले धडे गिरवले होते. माझ्या बाबांनी स्वरांची चांगली तयारी करवून दिली होती. माझा स्वत:चा ऑकेस्ट्रा होता. पैसेही चांगले कमवत होतो. पण बाबा म्हणायचे, व्हायोलिन वाजवताना शास्त्रीय गायनही शिकायला हवे, त्यांची इच्छा होती मी किशोरीताईंकडे शिकावे. दरम्यान, पं. प्रभाकर कारेकरांनी पं. डी. के. दातारांपर्यंत आणून सोडलं होतं. दातारांची गायकी अंगात मुरवत होतो. बऱ्यापैकी जमतही होते. किशोरीताईंचा दरारा, शिस्त ऐकून माहीत होती. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारावे यासाठी प्रयत्न करत होतो.

दातार गुरुजींकडे ग्वाल्हेर घराण्याचे व्हायोलिन वादन शिकताना जयपूर घराण्यातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकेकडे कसे शिकायला जायचे, हा मोठा प्रश्न होता. तो ताईंनीच सोडवला. दातार गुरुजींच्या सत्काराला ताई आल्या तेव्हा स्वत: दातार गुरुजींना म्हणाल्या की, मिलिंदला माझ्याकडे पाठवा. मी त्याला जयपूरची गायकी शिकवेन. अशा तऱ्हेने माझ्या आयुष्याला एक सुरेल वळण मिळाले.

सुरुवातीला फक्त रविवारी सकाळी आणि मग हळूहळू रोजच सकाळी, संध्याकाळी जायला लागलो. ताईंच्या सहवासातले वाढते टप्पे माझे आयुष्य समृद्ध करणारे होते.

मी शाळेत नोकरी करत होतो. ताईंनी मला तालमीतून मध्येच उठून शाळेत जाण्याची आणि संध्याकाळी उशिरा शाळेतून आल्यावर तालमीला येण्याची मुभा दिली होती. खरेतर ताईंनी मला भरपूर दिले पण मलाच ते घेता नाही आले. बऱ्याचदा ताईंनी शिकवलेले बरेचसे अलंकार, फेजेस मला वाजवताच आले नाहीत. खूपदा ताई सांगायच्या, पण मला ते समजायचे नाही. नुसती तडफड व्हायची. ताई मात्र सतत देण्याच्या मूडमध्ये असायच्या. या प्रवासात नंदिनी बेडेकर आणि रघुनंदन पणशीकर यांनी सतत माझी पाठराखण केली. ताईंची गायकी व्हायोलिनवर आणण्यातली तांत्रिक अडचण दूर करायला त्या दोघांनी मला खूप मदत केली.

शाळेचे नियम बदलले तेव्हा ताईंकडे पूर्वीसारखे जाणे जमेना. ताई म्हणायच्या, असे अधूनमधून येऊन तुला माझे गाणे कसे येणार? मला तुझी अडचण कळत नाही, असे नाही. पण माझीही स्वत:ची काही तत्त्वे आहेत, शिस्त आहे, बंधने आहेत. तू नेमाने येणार असशील तरच मी तुला शिकवेन. तालीम झाल्यानंतर लगेच म्हणायच्या, ‘उद्या सकाळी ये.’ मी शाळा आहे, असे सांगितल्यावर म्हणायच्या, ‘या शाळेमुळे तुझे बरेच नुकसान होते. माझ्यावर विश्वास ठेव, सोड ती शाळा. तरच उच्च प्रतीचा वादक बनशील. आपल्या वादनात अशी कुठलीही जागा असता कामा नये जी आपल्याकडे वाजत नाही. मग ती गझल असो, वेस्टर्न असो, शास्त्रीय असो.’ तरीही मला शाळा सोडून येता येणार नाही, म्हणून मी काकुळतीला आलो तेव्हा म्हणाल्या, ‘ठीक आहे, सुट्टी असेल, तुला वेळ मिळेल तेव्हा मात्र जरूर ये.’

एके दिवशी ताईंना मी म्हटले, ‘तुमच्याकडून ‘सहेला रे..’ शिकायचेय.’ ताईंनी स्वत:च तंबोरा लावला आणि तब्बल ४०-५० मिनिटे ‘सहेला रे..! ’ हीच ओळ विविध तऱ्हेने गाऊन दाखवली. ताईंच्या अनेक मैफिलीत मला त्यांना साथ करायला मिळाली हे माझे भाग्य होते. अशीच एकदा यमनची ‘येरी आली पिया’ ही जागा मला एकटय़ाला ४०-५० मिनिटे शिकवली तेव्हा मोहरून गेलो होतो. त्या म्हणायच्या यमन वाटतो तेवढा सोपा राग नाही बरे का! भूप आणि यमन रागाची अशा प्रकारे तालीम घेण्याचे भाग्य मला लाभले.

ताई एकटय़ाच असताना शिकायचा दुर्मीळ योग मला अनेकदा आला. शिकवताना त्या नेहमी चांगल्या मूडमध्ये असायच्या. एखादी जागा तीन-चार वेळा सांगूनसुद्धा माझ्याकडून वाजली नाही तर मात्र खूप रागवायच्या. एखादी जागा खरेच खूप कठीण असायची. मला वाटायचे माझ्यामुळे ताईंचा वेळ वाया जातोय. म्हणून मी म्हणायचो, ‘ताई, मी घरी रियाज करून येतो.’ तर म्हणायच्या, ‘इथेच कर’. असाच एकदा तालमीला पोहोचलो. ताई म्हणाल्या, ‘बाळा, तुला ललत पंचम येतो का रे?’ मी म्हणालो, ‘थोडा फार येतो.’ म्हणाल्या, ‘वाजवून दाखव.’ मी व्हायोलिन काढलं. टय़ुनिंग करून पहिला आलाप वाजवला. म्हणाल्या, ‘थांब’ आणि त्यांनी तीच ओळ अशी काही गाऊन दाखवली की, डोळ्यांत पाणीच आले. मग माझा आटापिटा सुरू झाला, ती ओळ आपल्याला व्हायोलिनवर वाजवता यावी यासाठी. ताई शेजारी बसलेल्या, अगदी लहान मुलाला शिकवावे तसेच त्या शिकवत राहिल्या. एकच ओळ, त्यातली ती एक जागा मला यावी म्हणून शिकवत राहिल्या. ललतची जागा ताईंच्या पद्धतीने दोन तारेवर वाजणे शक्य नसायचे. एका तारेवर वाजवताना तारांबळ उडायची. स्वरावर लक्ष द्यावे तर मिंड यायची नाही. ते बरोबर जमले की बो संपायचा. बो जमला की आवाज बारीक यायचा आणि हे सगळे जमायचे तेव्हा नेमका त्यातला भाव मात्र निसटून जायचा. तब्बल दीड-दोन तासांनंतर एकदाची मला ती जागा जमली. ती जागा ताईंच्या मनासारखी आली, तेव्हा कोकणी भाषेत म्हणाल्या, ‘‘आयले मरे, (म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!) अगदी बरोबर वाजवलेस. आता एक काम कर, ५०० वेळा वाजव आणि ते झाले की पुन्हा ५०० वेळा वाजव.’’

२००५ साली माझे बाबा वारले तेव्हा उदास होतो. मन सैरभर झालेले. स्वत:हून ताईंचा फोन आला. म्हणाल्या, ‘ये शिकायला.’ खूप प्रेमाने सांत्वन केले. विचारलं, ‘आपण आज काय शिकू या?’ ताईंनी माझ्यासमोर जयपूरचा पटबिहाग राग कधीच गायला नव्हता. मी म्हणालो, ‘पटबिहाग घेऊ या का?’ तर दोन दिवस निव्वळ मुखडाच वाजवून घेतला. असाच किस्सा माई वारल्यानंतरचा. ताईंनी घरीच राहायला बोलावले. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मनसोक्त गायला बसल्या. आपला राग, दु:ख, प्रेम निव्वळ गाण्यात व्यक्त होऊ शकते हे ताईंच्या सहवासात शिकलो. ताईंच्या सहवासात एक जादू होती. त्यांच्यासोबत आपण अंतर्बाह्य़ बदलून जातोय असे नेहमी वाटायचे. त्यांच्यातली ऊर्जा जाणवायची. ताई रागवायच्या, ओरडायच्या, प्रेमही करायच्या. त्यांचे सारेच राग-लोभ तीव्र असायचे. आपल्या आतल्या ब्रह्मतत्त्वाला साद घालणारे त्यांचे गाणे असायचे. त्यांच्या सहवासात आपल्या आतून कसली तरी प्रचंड ताकद वाहत आहे, त्यातून काही तरी भव्यदिव्य आपल्या आतही आकारत आहे असा अनुभव नेहमी यायचा.

एकदा ताईंचा दिल्लीत कार्यक्रम होता. त्याच वेळी माझ्या शाळेचे गॅदरिंग होते. संगीत शिक्षक या नात्याने शाळेच्या गॅदरिंगची माझी जबाबदारी टाळता येत नव्हती. मी ताईंना इतकेच म्हणालो, की मी सकाळच्या विमानाने येतो. वास्तविक एकत्र जायचे, एकत्र यायचे, एकाच ठिकाणी राहायचे ही ताईंची शिस्त! त्यामुळे त्यांना ते आवडले नसावे. एक-दोनदा फोन केला तर माझा फोन उचलला नाही. फोनवर मला निरोप मिळायचा की, ताईंना वेळ नाही. माझा जीव तुटत होता. असाच दीड महिना गेला. एके दिवशी फोनवर आल्या आणि म्हणाल्या, ‘उद्या संध्याकाळी ये.’ मी थोडासा निर्धास्त होऊन ताईंकडे संध्याकाळी पोहोचलो. ताई झोपाळ्यावर बसलेल्या. मी दारात उभा राहिलो. आत जाणार तर म्हणाल्या, ‘तिकडेच थांब. तू इकडे कशासाठी आलास, ते अगोदर सांग, नंतरच आत ये’ आणि आत निघून गेल्या. माझी हवाच गेली. उत्तरात जोर नव्हता. संध्याकाळची तालीम सुरू होती. मी आपला दरवाजातच चुळबुळत उभा. नऊ-साडेनऊला ताई बाहेर आल्या. म्हणाल्या, ‘आता बोल, काय ठरलं तुझं?’ मी काय बोलणार. ताईंचे पाय धरले, डोळ्यांतून पाणी वाहत होते. म्हटलं, ‘मला माफ करा, मला तुमच्याकडेच शिकायचं आहे.’ तर म्हणाल्या, ‘असं तुझ्या मनमर्जीने मी नाही शिकवणार. शिकायचं असेल तर रोज यावं लागेल.’ दुसऱ्या दिवसापासून माझी तालीम परत सुरू झाली.

मध्यंतरी पुन्हा एकदा मला शाळेच्या अडचणींमुळे त्यांच्या दिल्लीच्या मैफलीत त्यांच्याबरोबर जाता आले नाही. मैफलीला जाताना सर्वानी एकत्र प्रवास करायचा, एकत्र राहायचे हा ताईंचा शिरस्ता माझ्यामुळे मोडला गेला. मग बरेच दिवस माझी तालीम परत बंद होती.

नंतर एकदा गोव्यातील कुर्डीला माईंच्या देवळात सेवा करण्याचा योग आला. त्यावेळी जेवण झाल्यानंतर माझ्या बाबांनी ताईंना सांगितले, ‘माझ्या मुलाला पदरात घ्या. त्याच्या चुका माफ करा. आपली कृपादृष्टी त्याच्यावर असू द्या.’ तर ताईंनी उत्तर दिले, ‘काय आहे, तुमचा मुलगा समजूतदार आहे, सुरेल वाजवतो. माझे गाणे त्याला यावे असे मलाही वाटते. पण त्यानेही तसा त्याग करायला शिकले पाहिजे. आमची टीम बनलेली आहे. ती अशी तुटली तर मी खपवून घेणार नाही.’ असे म्हणून माझ्याकडे बघून म्हणाल्या, ‘परवा मुंबईला ये. सात वाजता नेहरू सेंटरमध्ये पोहोच.’ त्यानंतर ताईंकडे माझी तालीम परत सुरू झाली ती कायमचीच!

एकदा एका कार्यक्रमात आयोजकांनी जाहिरात केली की ‘किशोरीताईंचा शिष्य मिलिंद रायकर यांचं व्हायोलीनवादन.’ ताईंनी दुसऱ्याच दिवशी बोलावलं, ‘म्हणाल्या माझं नाव कसे लावलेस?’ मी म्हणालो, ‘तुमच्याकडे शिकतो ना.’ तर म्हणाल्या, ‘तुला काय येतं?’ म्हणालो, ‘थोडेसे येते.’ उत्तरल्या, ‘थोडंसं येतं म्हणजे काय तू माझा शिष्य झालास? मला चालणार नाही.’ पुढच्या एका कार्यक्रमात आयोजकांनी ‘पं. डी. के. दातारांचा शिष्य’ अशी जाहिरात केली होती, तेव्हा ताईंनी जाहिरातीचा कागद दाखवून मला विचारलं, ‘काय रे माझे नाव लावायला लाज वाटते का?’ म्हणालो, ‘अहो, मागच्या वेळी तुमचे नाव लावले तर तुम्हीच रागावला होतात.’ तर म्हणाल्या, ‘त्यावेळी तू रोज येत नव्हतास. आता रोज येतोस आणि चांगले वाजवतोस तेव्हा माझे नाव लावायला हरकत नाही.’

ताईंचा दरारा कसा होता याचा एक वेगळाच अनुभव लंडनच्या कार्यक्रमाला जाताना मला आला. ताई, त्यांची शिष्या विद्या, पं. बाळकृष्ण अय्यर, पं. पुरुषोत्तम वालावलकर आणि मी असे सगळे रात्री दहा-साडेदहाला विमानतळावर जमा झालो. ताई आणि विद्या सलग पॅरिसला पोहचणार, आम्ही तिघे लंडनमार्गे पॅरिसला पोहचणार असेच ठरलेले होते. पण ताईंना हे माहीत नव्हते. सामान चेक इन करून झाले तेव्हा ताईंना कळले की, आमची तिकिटे वेगवेगळ्या विमानात आहेत. तेव्हा ताई अस्वस्थ झाल्या. ताईंनी आयोजकांना फोन लावण्याची आज्ञा केली. रात्रीचे दोन वाजलेले. विमानतळावर ताईंच्या नावाची उद्घोषणा सुरू होती. आंतरराष्ट्रीय विमानं कुणासाठी खोळंबत नाहीत. ताई आयोजकांना म्हणाल्या, ‘आमची तिकिटं एका विमानात करा, नाहीतर इथूनच मी घरी जाते.’ शेवटी आम्ही सारे एकाच विमानाने एकत्रच गेलो. ताई आपल्या साथीदारांची नेहमी खूप काळजी घ्यायच्या. ताई नेहमी आयोजकांकडे प्रवासात व हॉटेलमध्ये राहताना आपले साथीदार आपल्याबरोबरच असायला हवेत असा आग्रह धरायच्या. आमचे सामान परत बाहेर काढण्यासाठी विमान १५ मिनिटे खोळंबले होते. ताईंच्या शब्दातली ताकद यावेळी अनुभवायला मिळाली.

मी बाहेर कुठे वाजवत नाही, तेव्हा माझे नुकसान होते हे ताईंनी स्वत:च जाणले. मग त्यांच्या कार्यक्रमात मला नेहमी अधिकची बिदागी देण्याचा त्या प्रयत्न करायच्या. खरे तर ताईंनी मला जे काही दिले, शिकवले ते माझ्यासाठी अनमोल आहे. त्याची गणती कधीच होऊ शकत नाही. त्यांच्याकडून बिदागी घेण्याचा प्रश्नच नसायचा. पण ताई मोठय़ा मनाने मला जेव्हा अशी बिदागी द्यायच्या तेव्हा मी नेहमी ओशाळून जायचो, अपराधी वाटायचे.

गुरुवंदना ही सीडी (गुरुवंदना- अ ट्रिब्युट टू माय गुरू- गानसरस्वती किशोरी आमोणकर) ताईंना समर्पित केली होती. अमेरिकेतील अरविंद ठक्कर एकदा मला म्हणाले, ‘तू ताईंचा रागेश्री वाजवणार असशील तर त्या सीडीचा सगळा खर्च मी करेन.’ मी ताईंसमोर हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी त्याचे स्वागतच केले. सीडीमध्ये काय वाजवणार हेही विचारलं. मी म्हणालो, ‘रागेश्री वाजवायचा विचार आहे.’ तर दुसऱ्या दिवसापासून तब्बल दहा दिवस त्या रागाची तालीम सुरू झाली. नंतर म्हणाल्या, ‘तू आणखी एक राग का वाजवत नाहीस?’ मला खरे तर बसंतीकेदार वाजवायचा होता, पण ताईंना सांगायची हिम्मत होत नव्हती. आता त्याच विचारत होत्या म्हटल्यावर काय! मग मी माझी इच्छा सांगितली आणि त्यांनीही बसंतीकेदार वाजवायला होकार दिला. १०-१२ दिवस आमची तालीम चालली. मी ताईंना म्हणालो, ‘त्यातली ‘खेलन् आयी नवेली नार..’ (पं. मोगुबाईंनी स्वत: रचलेली व संगीतबद्ध केलेली) ही बंदिश व्हायोलिनवर वाजवायला कठीण वाटते. तेव्हा मी विलंबित वाजवून थांबेन.’ ताई म्हणाल्या, ‘मला कळते आहे ती बंदिश व्हायोलिनसाठी योग्य नाही, पण राग अर्धवट सोडू नकोस. मी तुला व्हायोलिनला शोभेल अशी बंदिश बांधून देते.’ दुसऱ्याच दिवशी ताईंनी नवी बंदिश मला शिकवली. तीच रेकॉर्ड केली आहे. ‘म्हारो प्रणाम’ वाजवण्यास सुचविले, तेही रेकॉर्ड केले. कार्यक्रमाचा प्रकाशन सोहळा जोरदार व्हायला हवा, एखाद्या मोठय़ा कलाकाराच्या हातून सीडीचे प्रकाशन व्हायला हवे असे म्हणत त्या सीडीसाठी नावही त्यांनी स्वत:च ठरविले. आपली स्वाक्षरी आशीर्वाद म्हणून दिली. म्हणाल्या, ‘माझ्याबरोबर तुझाही फोटो आला पाहिजे.’ प्रकाशनाच्या वेळी आपला कार्यक्रम समजून स्वत: सगळी उस्तवार करत राहिल्या. विजयाबाई मेहतांना प्रकाशनासाठी बोलवायला लावले. अगदी शाल, बुके आणण्यापासून ताईंचा चोखंदळपणा जाणवत राहिला.

एकदा एनसीपीएला कार्यक्रम होता. साधारण २००० सालातली मैफल असावी. ताई नायकी कानडा गात होत्या. त्या कोमल गंधारमधील आंदोलन गायल्या. ती जागा माझ्या लक्षात नाही आली. मी जागा वाजवली पण ताईंना काहीतरी खटकले असावे. त्यांनी पुन्हा तीच जागा घेतली. मी बहुतेक पुन्हा चुकीची जागा वाजवली. ताई काही सेकंद गायच्या थांबल्या. माझ्याकडे वळून म्हणाल्या, ‘अरे, तुझे डोके ठिकाणावर आहे का? काय वाजवतो आहेस?’ आणि ताईंनी पुन्हा एकदा तीच जागा घेतली. मी ताईंच्या भडिमाराने भर मैफिलीत सर्द झालो होतो. पण तिसऱ्या वेळी मात्र मला ती जागा नीट जमली आणि मलाच हायसे वाटले. त्यानंतर कधीही मैफिलीत माझ्याकडून अशी चूक होऊ नये म्हणून मी अधिकच सजग होत गेलो. धारवाडला ताई बिलासखानी तोडी गाणार होत्या. कार्यक्रमाच्या अगोदर मी तणावाखाली होतो. मला धीर देताना म्हणाल्या, ‘तू खूप छान वाजवतोस, हे काय मी लिहून देऊ का?’ स्टेजवर हळूच म्हणाल्या, ‘रिषभ आणि गंधार हे स्वर जरा जपून लाव.’ ही त्यांची सांभाळून घेण्याची वृत्ती मला हळवे करून टाकायची.

दोन कार्यक्रम अगदी लक्षात राहणारे. साधारणपणे ताईंचा कार्यक्रम असेल तर सुरुवातीची २५-३० मिनिटे सगळ्यांचे टय़ुनिंग करण्यातच जायची. ताईंचा कार्यक्रम सुरू होण्यास विलंब होण्याचे बऱ्याचदा मुख्य कारण ताईंचा प्रत्येक गोष्टीचा चोखपणाचा आग्रह. ताईंना प्रत्येक गोष्ट चोख हवी असायची. यावर त्यांची चित्रकार मैत्रीण प्रफुल्ला डहाणूकरदेखील ताईंना छेडायची. पण एकदा नेहरू सेंटरला प्रफुल्लाताईंनी आयोजित केलेला सकाळचा कार्यक्रम अगदी वेळेत सुरू करून ताईंनी आपल्या मैत्रिणीला सुखद धक्का दिलेला मी अगदी जवळून बघितला आहे. त्या वेळी ताईंनी गायलेली अप्रतिम बिलासखानी तोडी अनेक रसिकांना ऐकताच आली नाही. कारण ताई नेहमीप्रमाणे उशिरा कार्यक्रम सुरू करतील असे गृहीत धरून अनेक रसिक  त्या दिवशी उशिरा आले. याच प्रफुल्ला डहाणूकरांच्या स्मृती सभेत त्यांना श्रद्धांजली म्हणून ताईंनी गायलेला हुसैनीतोडी कोण विसरू शकेल? एकदा असाच बांगलादेशात ताईंचा कार्यक्रम होता. तब्बल ६० हजार श्रोते जमलेले. आम्हाला ट्रॅफिक जॅममुळे उशीर झालेला. ग्रीन रुममध्ये पोहोचलो आणि लगेचच आयोजकांनी स्टेजवर बोलावून घेतले. मी स्टेजवर स्वरमंडल टय़ुनिंग करून ताईंच्या हातात सोपवले आणि आम्ही इतर साथीदार स्थिरस्थावर होतोय तोवर ताईंनी गायला कधी सुरुवात केली ते आमच्या लक्षातही आले नाही. त्या दिवशी ताईंनी गायलेला केदार आणि सुहा कानडा मी आजही विसरू शकत नाही.

एकदा गोव्यातल्या महोत्सवात अनेक दिग्गजांसह माझाही कार्यक्रम होता. माझ्या व्हायोलिनवादनानंतर किशोरीताईंचे गाणे होते; पण काय झाले माहीत नाही. माझा कार्यक्रम रद्द केला गेला. ताईंचा कार्यक्रम म्हणून गर्दीही खूप होती. ताईंच्या साथीला बसलो. म्हणालो, ‘ताई, मी भूप रागाची खूप तयारी केली आहे, आपण भूप गाऊ या का?’ तर म्हणाल्या, ‘काळजी करू नकोस. मी सगळे सांभाळून घेते.’ ताई सुरुवातीला पूरियाधनाश्री आणि हंसकिंकिंणी गायल्या. मध्यंतरानंतर पुन्हा ताई गायला बसल्या. माझा नाराज चेहरा त्या बघत होत्या; पण जाणवून काहीच देत नव्हत्या. अचानक ताईंनी बोलायला सुरुवात केली. म्हणाल्या, ‘आमचा मिलिंद खूप छान भूप वाजवतो. आता तो तुमच्यासमोर भूप राग सादर करेल’ नंतर सगळ्या साथीदारांना कमी वाजवायला लावून मला मनसोक्त वाजवण्याची संधी दिली. एक आलाप ताई आणि एक आलाप माझ्या व्हायोलिनचा असा भूप आम्ही सादर केला. माझा कार्यक्रम रद्द झाल्याची उणीव ताईंनी अशा तऱ्हेने भरून काढली. आज मी जे काही व्हायोलिन वाजवतो ते निव्वळ माझ्या गुरुजनांमुळे आणि ताईंनी मला आयुष्यभर सांभाळल्यामुळे.

ताईंच्या अखेरच्या दिवसांत एकदा स्वरमंडल तुटले. ताई विचारत राहिल्या, ‘असे कसे माझे स्वरमंडल तुटले? गेली ५० वर्षे ते मला साथ देतेय. माझे बाळ ना ते? स्वरमंडल तुटले तर माझे गाणेही संपेल.’ याच दरम्यान एकदा माझे व्हायोलिनही तुटले तर त्या चिंतित झाल्या. म्हणाल्या, ‘अरे मिलिंद, तुझ्या व्हायोलिनमध्ये माझे गाणे आहे, ते जपून ठेव.’’ पुढे म्हणाल्या, ‘तू इतका जगभर फिरत असतोस तर एखादे चांगले व्हायोलिन का नाही विकत घेत? वाटले तर मी तुला पैशाची मदत करते.’’ त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्यावरचे प्रेम बघून माझे डोळे पाणावले.

एकदा दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्याकडे शिकायला गेलो. म्हणाल्या, ‘आज तुला एक भेट द्यायची आहे, जाताना आठवण कर.’ त्या दिवशी मला बसंतीकेदार शिकवला. एवढेच नाही तर त्यांनी मला तो रेकॉर्डही करू दिला. म्हणाल्या, ‘आज मी आहे, उद्या असेन नसेन, तेव्हा हे रेकॉर्डिग तुला उपयोगी पडेल. हे गुप्त ज्ञान आहे. मात्र ते कुणालाही ऐकवू नकोस. एखादा त्या तोडीचा विद्यार्थी असेल तरच त्याला दे, अन्यथा त्याचा वाईट परिणाम होईल.’ त्या दिवशी त्यांनी जे काही शिकवले ते अफाट होते. त्यांना मला द्यायची होती ती भेट हीच असे मला वाटले आणि मी मनोमन खूश झालो. तालमीनंतर पाया पडून  निघालो तर ताईंनी थांबवले व आतून आपले फार जुने असे स्वरमंडल मला भेट दिले. मी हादरलोच! त्यानंतर ते एक-दोन कार्यक्रमांत मी वाजवलेदेखील. त्याचे व्हायोलिनसाठी टय़ुनिंग करून आणायचे होते, पण मला पाहिजे तसा बनवणारा भेटला नाही. स्वरमंडल आणि ताईंचा अतूट संबंध होता. ताई गेल्यानंतर मी ते स्वरमंडल वाजवण्याकरिता काढले, पाहतो तर ते स्वरमंडल खालच्या बाजूने सुटलेले आणि तारा तुटलेल्या!

ताईंबरोबर माझा पहिला कार्यक्रम दिल्लीत झाला आणि शेवटचाही दिल्लीतच झाला. तिथे ताईंनी अप्रतिम पुरियाधनाश्री आणि कौशीकानडा सादर केला. कार्यक्रमानंतर निरोप घेताना ताईंनी अचानक माझ्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि कोकणीत म्हणाल्या, ‘आज तू छान वाजवलेस. असेच वाजवत राहा.’ मला तो प्रेमळ स्पर्श आजही स्पष्टपणे आठवतो. यापुढे ताई आपल्याबरोबर नसणार हे वास्तव स्वीकारायला मन आजही धजावत नाही. त्या मला माझ्या आईसारख्या होत्या. त्यांच्या जाण्यामुळे माझा सगळा आधारच हरवल्यासारखा झाला आहे.
(शब्दांकन – गणेश कुलकर्णी)
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com