हिंदू संस्कृतीमध्ये कुलदेवाबरोबरच कुलदेवतेची संकल्पना महत्त्वाची आहे. बहुतेक कुटुंबांचा कुलदेव आणि कुलदेवता असते. कुलदेवता ही संकल्पना कशी विकसित होत गेली असावी याचा नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर ऊहापोह-

आपल्या पूजेच्या संकल्पाच्या सुरुवातीसच इष्टदेवतांच्या स्मरणानंतर आठवण केली जाते ती कुलदेवतांची. ‘ॐ श्रीमन्महागणाधिपतये नम:, इष्टदेवताभ्यो नम:, कुलदेवताभ्यो नम:, ग्रामदेवताभ्यो नम:, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम:, सर्वेभ्यो देवेभ्यो नमोनम:, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमोनम:, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नम:। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णक: असे म्हणून सुरुवातीस नमस्कार केलेल्या गणपतींचे आवाहन करतो. कारण विघ्नहर्त्यांला नमस्कार केल्याशिवाय, त्याला पूजेसाठी निमंत्रण दिल्याशिवाय, मुख्य कार्याआधी त्याची पूजा केल्याशिवाय, हाती घेतलेले शुभकार्य सिद्धीस जाणार नाही, अशी त्यामागची भावना असते. एखादा नवस बोलल्यानंतर , त्यानिमित्ताने केलेला सत्यनारायण अथवा सत्यविनायक हे जुन्या परिभाषेत ‘नमित्तिक कर्म’ होय. त्याची प्रधानदेवता सत्यनारायण अथवा सत्यविनायक; पण त्या कार्याचे फळ मिळावयाचे झाल्यास, इष्टदेवता, ग्रामदेवता, नवग्रहदेवता, सर्वदेवता, आणि ब्राह्मण या सर्वाना निमंत्रून, त्यांना मानसन्मान केल्यानेच ते मिळणार असते. संकल्पात नवग्रहादी देवतांना महत्त्व या साठी दिले जाते की, ‘एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: श्रुति-स्मृति-पुराणोक्तफलप्राप्र्त्यथ अस्माकं सकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेमस्थर्यायुरारोगाभिवृद्ध्र्यथ समस्ताभ्युदयरथ श्रीपरमेश्वरप्रीर्त्यथ षोडशोपचारपूजां करिष्ये।’ या संकल्पात वेदापासून पुराणांपर्यंतच्या ग्रंथात सांगितलेली फळं मिळावी म्हणून, व परिवारासकट सर्व कुटुंबाचे आरोग्य, आयुष्य, स्थर्य आणि योगक्षेम यांची वाढ व्हावी म्हणून यजमानाने हे शुभ कार्य हाती घेतल्याचे म्हटले आहे. कुलदेवतांना तर या फलाबाबत बाबतीत अधिक महत्त्व दिले असेल तर आश्चर्य नाही. तीच गोष्ट विवाहादी संस्कारांच्या बाबतीतही तितकीच खरी आहे. आणि म्हणूनच ‘देवां-ब्राह्मणांच्या साक्षीने’ पार पाडलेला समारंभ अशा प्रकारचे शब्दप्रयोग रूढ झाले; त्यांत कुलदेवताही आल्याच. पूजेच्या संकल्पनेत आपल्या इष्ट व कुलदेवतांच्या बरोबरच ग्रामदेवतांचा अंतर्भाव करून िहदू धर्माचा सर्वसमावेशकपणाच अधोरेखित केला आहे, असे लक्षात येईल.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

आधुनिक प्रथा व आचार;

कुलदेवता संख्येने दोनापेक्षा जास्त असल्याचे किंवा अपेक्षित असल्याचे पूजेच्या संकल्पात गृहीत धरल्याचे दिसते. आजच्यासारखे प्रथेनुसार, तशी देवता ही बहुधा देवीच असते; व प्रथेनुसार कुलदेवतेचे नाव मंगल पत्रिकेच्या मथळ्यावर ॥ आई भवानी प्रसन्न ॥ अथवा ॥ महालक्ष्मी प्रसन्न ॥ अशा स्वरूपामध्ये आढळते. कधी कधी फक्त ॥ श्री गजानन प्रसन्न ॥, असा उल्लेख करून कुलदेवता आई भवानीकृपेकरून मंगलकार्य करण्याचे योजिले आहे अशी सुरुवात करून निमंत्रण दिले जाते. कुलदेवतांमध्ये एखादा देवसुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ प्रसिद्ध भोसले कुळाची कुलदेवता माताभवानी, तर आराध्यदैवत शिखर-िशगणापूरचा शंभु. तर नागपूरच्या भोसल्यांचे दैवत प्रभु श्रीरामचंद्र. बरे ही कुलदेवता जवळपासचीच असावी असे नाही; बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची कुलदेवता मराठवाडय़ातील अंबेजोगाई आहे.

आम्ही जामखेडकर मूळचे अहमदनगर जिल्हय़ातील जामखेडचे. परंतु, आमची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा अंबाभवानी. हा संबंध कसा जोडला गेला हे आम्हासही माहीत नाही. परंतु, योगायोगाने याबाबतीत आमचे पुरोहित रोहन पंडित यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही कल्पना स्पष्ट केली की, कुळातील एखाद्या महत्त्वाच्या पुरुषाने इष्ट किंवा उपास्य दैवत म्हणून एखाद्या देवतेची आराधना केली आणि त्याला मनासारखे फळ मिळाले तर पुढल्या पिढीपासून ती त्यांची कुलदेवता होते. म्हणजे कुलदेवता ही संकल्पना काहीशी अनुभवानुसार बदलणारी दिसते.

पंडित गुरुजींशी बोलताना आणखी काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्या कुलदेवतेच्या पूजेच्या संदर्भातील होत्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले, देशस्थांच्या मध्ये विवाहाचे देवक बसविताना कुलदेवतेची अभिषेकयुक्त पूजा केली जाते. तर कोकणस्थ आणि कऱ्हाडेंमध्ये देवक बसविण्याचा संकल्प सोडताना कुलदेवतेचे फक्त स्मरण केले जाते. मात्र विवाह संपन्न झाल्यानंतर कोकणस्थ बोडण घालतात म्हणजे कुलदेवतेची पूजा करतात. या पूजेमध्ये एका मोठय़ा परातीमध्ये अन्नपूर्णेची स्थापना करून पंचामृताने तिला स्नान घातले जाते. हे पंचामृत नावापुरते नसून भरपूर प्रमाणात त्याचा परातीत अभिषेकरूपाने मूर्तीवर वर्षांव केला जातो. हे बोडण पाच सुवासिनी आणि एक कुमारिका यांना बोलावून त्यांचा सन्मान करून पूर्ण होते. त्यापकी एखाद्या सुवासिनीच्या अंगात येते आणि तिला नवविवाहित दाम्पत्याच्या संदर्भात सूचक प्रश्न विचारले जातात. तिने दिलेली उत्तरे ही फार मार्गदर्शक व महत्त्वाची समजली जातात. कऱ्हाडय़ांकडे आणि काही देशस्थांकडे कुलदेवतेच्या निमित्ताने गोंधळी येऊन गोंधळ घालतात.

मराठय़ांच्या बाबतीत कुलदेवतेप्रमाणेच देवकाचा सन्मान असतो. मराठा क्षत्रियांमध्ये वैदिक गोत्रे असतात. पण सगोत्र विवाह होऊ शकतात. परंतु, समान देवक असलेल्यांमध्ये विवाह नक्कीच होत नाहीत. देवक हे निरनिराळ्या स्वरूपाचे असू शकते. पशू, पक्षी, झाडे, पाने अशा कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. त्यामुळे विवाहाचे देवक बसवताना त्याची पूजा महत्त्वाची असते. आणि म्हणूनच कदाचित टोटेमच्या (मूळ पुरुष) स्वरूपात असलेल्या या वस्तूंना देवक हे नाव पडले असावे.

प्राचीन शास्त्र ग्रंथांमध्ये कुलदेवतेची स्थापना कशी व केव्हा करावी यासंबंधीचा विधी सांगितलेला आहे. भारतीय संस्कृती कोशातील माहितीप्रमाणे स्थापनेच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहावे. स्थापनेच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर संगम, पुण्यतीर्थ इत्यादी सात पवित्र स्थळातील माती आणून त्याचा गोळा तयार करावा. त्यात पंचरत्ने घालावीत (सोनं, चांदी, माणिक, मोती, –) घराच्या अंगणात आग्नेयेस एक वेदी तयार करावी व त्यावर तो गोळा ठेवावा आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करावी. तीच त्याची कुलदेवता. कुलदेवतेच्या एका अंगाला शितला व दुसऱ्या अंगाला विषहरा देवीची स्थापना करून पूजा करावी. यावरून असे लक्षात येते की, घरातील मुलाबाळांना विषाची बाधा अथवा गोवरादी रोगराई होऊ नये यासाठीच या दोन देवतांची कुलदेवतेबरोबर पूजा केली जात असे. कुलदेवता बसविताना पौराणिक पद्धतीप्रमाणे महिना, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र यांचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ ही प्रतिष्ठापना प्रतिपदा, चतुर्थी, नवमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या तिथींना शुक्लपक्षात व उत्तरायणात करावी, असे सांगितले आहे. शुक्रवार असल्यास अधिक शुभ समजले जाते. तसेच गुरू आणि शुक्र हे ग्रह अनुकूल असावेत.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की, कुटुंबातील सदस्य लहान- मोठे यांना चांगले आयुरारोग्य लाभावे, त्यांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन सुखासमाधानाने जायचे असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही, अशी ठाम समजूत या संकल्पनेपाठीमागे आहे. पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्राच्या संदर्भात देवतांचा विचार केला तर असे लक्षात येते की, मानवाच्या तीन सांस्कृतिक अवस्थांमध्ये त्याच्या देवतांविषयीच्या संकल्पनांत बरेच बदल घडून आलेले दिसतात. पहिल्या वनचर (सॅवेज) अवस्थेत त्याला वंश टिकावा आणि चांगली शिकार मिळावी या दोन इच्छा तीव्रतर असणार. त्यामुळे शिकारीसंबंधीच्या संकल्पना आज आपल्याला फारशा स्पष्ट नसल्या तरीही संतती टिकावी म्हणून मातृदेवतांची पूजा मोठय़ा प्रमाणावर प्रचलित असावी, हे सापडणाऱ्या पाषाणातील आणि मातीच्या मूर्तीवरून तसेच रंगविलेल्या चित्रावरून लक्षात येते. कदाचित ती प्रथा सटवीच्या आणि जिवतीच्या पूजेच्या रूपाने आजही टिकून आहे. पशुपालन आणि शेतीच्या दुसऱ्या अवस्थांमध्ये शेतीचा शोध हा क्रांतिकारक असल्याने भूमी ही काळी आई झाली. सीता हे नाव त्या दृष्टीने मोठे रंजक आहे. संस्कृतमध्ये सीता म्हणजे नांगरलेले शेत. जनक राजालादेखील नांगराचा फाळ लागल्यानंतर वर आलेल्या पेटीमध्ये लहान बाळाच्या रूपात सीता सापडली, असे दंतकथा सांगते आणि रामायणही सीता अखेरच्या पर्वामध्ये पृथ्वीच्या पोटात शिरते, असे सांगते. महाराष्ट्रातच इनामगाव येथील उत्खननामध्ये असे लक्षात आले की, मृताचे दफन घरामध्येच जमिनीच्या खाली केले जात असे. तर गावाचा पाटील मरण पावल्यानंतर त्याचे मृत शरीर गर्भवती स्त्रीच्या पोटाच्या आकाराच्या कुंभामध्ये हातपाय मुडपलेल्या एखाद्या गर्भाप्रमाणे वाटेल अशा रीतीने दफन करण्यात येत असे. त्यामागची कल्पना अशी की, ज्याप्रमाणे कुठल्याही फळाचे किंवा धान्याचे बी मातीत गेल्यानंतर पावसाळ्यातील पाण्याने परत वर येते त्याप्रमाणे आई पृथ्वीच्या पोटात- मातीत गेल्यानंतर कालांतराने परत त्याच घरात मृत जीव जन्माला येतो. या समजुतीमुळेच आजा हा नातू म्हणून जन्माला येतो, अशी आपल्याला खात्री असते.

तिसऱ्या नागर अवस्थेमध्ये नगरदेवतेच्या रूपाने मातृकल्पना विकसित होताना दिसते. मागल्या अवस्थेत ती ग्रामदेवतेच्या स्वरूपात असते. अगदी सुरुवातीचे गाव हे एकाच महाकुलातील लोकांनी वसविलेले असायचे. त्यामुळे प्रत्येक जण हा एकमेकाचा नातेवाईक असायचा. त्यामुळे ग्रामदेवता हीच कुलदेवता होते. तर नागर अवस्थेमध्ये प्रत्येक नगराची एक देवता असते. मारुतीने लंकेत चोरून प्रवेश केल्यानंतर नगरदेवतेने विरोध केला होता. ही कल्पना फक्त भारतीय भाषा बोलणाऱ्यांच्यामध्येच होती असे नाही, तर ग्रीकांमध्येही नगरदेवतेची कल्पना आहे. पुष्कलावतीच्या नगरदेवतेची पूजा एका जिवंत हत्तीच्या रूपाने केली जात असे. त्यामुळे त्या शहरातील राजे डोक्यावर हत्तीचा मुकुट परिधान करत असत. ढवळीकरांच्या मते हे लोक जुन्या वाङ्मयातील हास्तिनायन असावेत. त्यांचा मूळ पुरुष हत्तीच असावा. मातृदेवतेची कल्पना ही निरनिराळ्या तीन अवस्थांमध्ये कधी कुलदेवता म्हणून, तर कधी ग्रामदेवता अथवा नगरदेवता म्हणून त्या त्या काळातील लोकांच्या जीवनात डोकावत राहाते.

आपण सुरुवातीस पाहिल्याप्रमाणे पूजेच्या संकल्पात कुलदेवतांचा बहुवचनात उल्लेख केला आहे. म्हणजे त्या दोनापेक्षाही अधिक असू शकतात. कोणाचे कुलदैवत मरतड भरव म्हणजे खंडोबा, गणपती किंवा शिव-विष्णूही असतात; पण कुलदेवता म्हटल्यानंतर ती देवीच असावी, असं आपल्या साहजिक मनात येतं. पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासानुसार, वर पाहिल्याप्रमाणे कूळ सातत्याने टिकून राहावे, ही माणसाच्या मनात खोलवर रुतून बसलेली इच्छा आहे. त्यामुळे पाषाणयुगात मातृदेवता, ग्रामीण अवस्थेत काळी आई आणि ग्रामदेवता तर नागर अवस्थेत नगरदेवता अशी निरनिराळी रूपे घेत मातृदेवताच सातत्याने मानवी जीवनात प्रभाव धरू शकली. महाभारतातील कथा या संदर्भात मोठय़ा अर्थपूर्ण वाटतात. प्रजापती हा सर्व सृष्टीचा पिता आणि सृष्टीमधील नक्षत्र-तारे हे सृष्टीच्या भव्यदिव्यतेची चमकणारी प्रतीके आहेत. त्यामुळे एके ठिकाणी २७ नक्षत्रे ही या प्रजापतीच्या पत्नी. प्रजापतीला अदिती नावाची पत्नी इंद्र-विष्णू आदी देव हे आदित्य, तिचे पुत्र. कद्रू आणि विनता याही प्रजापतीच्याच स्त्रिया. सर्प व नाग आणि गरुड, गिधाड इत्यादी ही त्यांची संतती. अशा रीतीने वेगवेगळे जीव हे त्यांच्या आईवरून लक्षात राहिले. लोकदेवतांची कल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. सर्व सृष्टीतील जीव ही त्यांची संतती; पण काकी, हलिमा इत्यादी सात देवता या जन्माला आलेल्या बाळांना भक्षण करणाऱ्या. स्कंदाचे कुमार हे गण लहान मुलांना रोगाच्या रूपाने गिळंकृत करणारे िहस्र गण होत; परंतु आपल्याला लोकमाता म्हणून सन्मान मिळावा, म्हणून स्कंद काíतकेयाला शरण गेले. त्याचा सेनापती म्हणून राज्याभिषेक झाला त्या वेळेस प्रत्येक जण नजराणे घेऊन त्याला सामोरा गेला. तशाच मृत्यूला कारणीभूत होणाऱ्या या जाखिणीसुद्धा त्याच्याकडे एक विनंती घेऊन गेल्या. लोक आमचा तिरस्कार करतात, कारण आम्ही लहान बाळांना खाऊन टाकतो. काहींचा जन्मच होऊ देत नाही, तर काहींना शैशवावस्थेत रोग होऊन ते मरतात. आम्हाला लोकांनी लोकमाता म्हणावे अशी आमची इच्छा आहे. स्कंद त्यांना असा उपदेश करतो की, जे लोक त्यांची पूजा करतील, जे सदाचरणी असतील, त्यांच्या मुलाबाळांना तुम्ही त्रास देऊ नये. पूजा केल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. त्यांनी त्याचा उपदेश मानला व त्या पूजनीय झाल्या. बौद्ध धर्मातील हरितीची कथाही अशाच स्वरूपाची आहे. महाभारतातील जरासंधाची कथाही अशाच प्रकारची आहे. याचा अर्थ असा की, मातृदेवतेची संकल्पना ही द्वंद्नयुक्त  आहे. रागावल्यानंतर मृत्यूप्रमाणे भासणारी, पण संतुष्ट केल्यानंतर आईसारखी प्रतिपाळ करणारी या मातृदेवतेच्या अवस्थेचा या कथांमधून साक्षात्कार होतो आणि कुळाला घडवणारी आणि एका अर्थाने त्याच्या अधोगतीला कारणीभूत होणारी स्त्रीच असल्यामुळे बरीचशी कुलदैवता ही मातृस्वरूपातच असतात, असे या निरनिराळ्या कथांवरून लक्षात येते.
डॉ. अरविंद जामखेडकर – response.lokprabha@expressindia.com