टीव्हीवरच्या मालिकांमध्ये तेच ते दाखवून पाल्हाळ लावलं जातं. मालिकेच्या एखाद्या ट्रॅकमध्ये कमी जीव असला तरी त्यात पाणी घालून ती मालिका खेचली जाते. या खेचाताणीत हव्याहव्याशा मालिका नकोशा वाटू लागतात.

आजकाल दूरदर्शनच्या विविध चॅनल्सवरून ज्या मराठी वा हिंदी मालिका दाखवतात त्या सुरुवातीच्या बऱ्याच एपिसोडस्पर्यंत मनाची पकड घेतात त्यामुळे हव्याहव्याशा वाटू लागतात, पण अचानक त्या असे काही वळण घेतात की दुधात पाणी घालून दूध वाढवून बेचव होते. त्याप्रमाणे कृत्रिमपणाने मालिका वाढवत नेल्यामुळे कंटाळवाण्या होतात व नको नकोशा वाटू लागतात. सध्या पाचशे एपिसोड झाले म्हणून दूरदर्शनवरून कौतुक झालेली ‘होणार सून मी ह्य घरची’ हे ताजे उदाहरण आहे.
७ नोव्हेंबर २०१४ च्या लोकप्रभाच्या अंकातील ‘हव्याहव्याशा वाटणाऱ्या मालिका’ या माझ्या लेखात ‘होणार सून मी ह्य घरची’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन मालिकांचे कौतुक केले होते. कारण या दोन्ही मालिकांत दाखवला जाणारा कौटुंबिक जिव्हाळा आणि खेळकरपणा मला आवडला होता. ‘होणार सून’मधल्या जान्हवीचे मोहक हास्य आणि ती आपल्या सासवांना त्यांच्याशी गोड बोलून त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसाय करण्यास प्रवृत्त करते हा प्रकारही मला भावला.
पण जान्हवी गरोदर राहिली तेव्हापासून या मालिकेने वेगळे वळण घेतले. ‘आपण गरोदर आहोत आणि तू बाबा होणार आहे’ इतका साधा मेसेज आजच्या मोबाइलच्या युगात मोबाइलवरून जान्हवी श्रीला सहज कळवू शकली असती. पण तसं केलं असतं तर मालिका केव्हाच संपली असती. तेव्हा आता ती पद्धतशीरपणे कशी वाढवत नेली जाते, ते पहाणे मनोरंजक ठरेल.
जान्हवी गरोदर राहिली तेव्हा तिच्या आक्रस्ताळी व कारस्थानी आईने- कलाबाईने ही बातमी सासरी सांगू नये अशी तिच्या होणाऱ्या बाळाची शपथ घालणे, जान्हवी सुशिक्षित असूनही शपथेवर विश्वास ठेवून श्रीलाही बाबाची चाहूल लागू नये म्हणून ‘माझ्या जिवाहून प्रिय असलेल्या व्यक्तीच्या जिवाखात्तर मी सध्या काही सांगत नाही’ असे श्रीला ऐकवणे, त्यामुळे जान्हवीचा कोणीतरी प्रियकर असावा असा श्रीने गैरसमज करून घेणे, त्याच वेळी कारस्थानी कलाबाईने श्रीच्या ऑफिसमध्ये जाऊन ‘जान्हवीला घटस्फोट हवा’ असे सांगणे.
कलाबाई श्रीच्या आजारी आईला भेटण्यासाठी गेली असता आक्रस्ताळी बेबी झाल्याची व तिची खडाजंगी होणे, पुढे बेबी आत्याने श्रीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालणे, त्याला मोठी आई, छोटी आई व सरू मावशी व दुसरी आई यांनी साथ देणे, मध्यंतरी जान्हवीचे व आजीचे सूर जुळणे आणि घरातील वातावरण खेळीमेळीचे होईल तेव्हाच आपण गरोदर असल्याचे जाहीर करू यावर दोघींचे एकमत होणे, श्री ती गोष्ट जाहीर करायला निघाला असता बेबी आत्याने त्याच्याशी अद्वातद्वा बोलणे त्यामुळे या मंडळींना काही सांगण्यात अर्थ नाही, असे म्हणून जान्हवीच्या गरोदरपणाची वार्ता सांगण्याचे पुन्हा पुढे ढकलणे सगळ्या आयांशी श्रीचा अबोला होणे व एकेका एपिसोडमध्ये एकेका आईशी समझोता होणे व गरोदरपणाची वार्ता जाहीर होणे. तिकडे जान्हवीच्या बाबांचा कलाबाईंशी अबोला आणि कलाबाईंना पिंटय़ाच्या लग्नाची घाई असणे. पिंटय़ाचे प्रेम प्रकरण चालू असतानाच त्याला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करणे अशा सर्व प्रसंगांमुळे पूर्वीचे खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण न राहाता प्रत्येक वेळी सर्वाचे लांबट चेहरे आणि श्री व जान्हवी किंवा जान्हवीच्या सासवा तसेच वडील व कलाबाई यांच्यात होणारे तेच तेच संवाद यामुळे मालिका कृत्रिमपणे वाढवली जात असून कंटाळवाणी वाटायला लागली आहे. एका काळी हवीहवीशी वाटणारी मालिका आता नको नकोशी वाटते आणि ‘आता पुरे करा’ असं म्हणावंसं वाटतं हा लेख लिहीत असताना श्री व जान्हवी यांच्यात सरू मावशीच्या लग्नासंबंधी चर्चा चालू होती. म्हणजे मालिका वाढवायला ‘स्कोप.’
त्या मानाने पूर्वी हवीहवीशी वाटणारी ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका अजूनही हवीहवीशी वाटते. कारण त्यात सुरुवातीपासून असलेले खेळकर हसतखेळत कौटुंबिक वातावरण आजपर्यंत कायम राखण्यात ती यशस्वी ठरलेली आहे. ही मालिका पद्धतशीरपणे वाढविण्याचे तंत्र या मालिकेतही दिसून येते.
आदित्य-मेघनाच्या विवाहानंतर मेघनाने पहिल्याच रात्री- आदित्य नगरकर बरोबरच्या आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती नवऱ्याला-आदित्य देसाईला देणे, समंजस नवऱ्याप्रमाणे त्याने मेघनाच्या प्रियकराचा शोध घेण्यास मदत करणे, तो शोध निष्फळ झाल्यावर मेघना आपले प्रेम विसरून वट सावित्रीच्या दिवशी आदित्य देसाईशी व त्याच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार करणे, हा सगळा प्रकार आपल्या देसाई कुटुंबाला आदित्यने प्रामाणिकपणे सांगणे, त्यामुळे आजपर्यंत हा प्रकार सर्वापासून आदित्यने का लपवून ठेवला म्हणून देसाई कुटुंबीय विशेषत: माई नाराज होणे-(पण काही दिवसच) त्यानंतर चित्रा आणि तिच्या विक्षिप्त स्वभावाच्या नवऱ्यामुळे देसाई कुटुंबात चिंतेचे वातावरण असणे, चित्राच्या देसाई कुटुंबातील वास्तव्यामुळे मेघनाच्या वडिलांची घालमेल होणे, आदित्य नगरकर देसाई वाडीत राहात असताना मेघनाने त्याला भोजनास येण्याचे निमंत्रण देणे, यामुळे देसाई मंडळीत चिंतातुर चर्चा होणे. हे सारे प्रसंग मालिका वाढविण्यासाठी असले तरी कथानकाशी विसंगत वाटत नाही आणि प्रत्येक प्रसंगात नाना ज्या शांतपणे सर्व प्रसंगांतून मार्ग काढून इतरांचे लांब झालेले चेहरे हासरे करतात तसेच आदित्य, अमित आणि खटय़ाळ अर्चना या भावंडात अधूनमधून होणारी चेष्टा मस्करी, किंवा देसाई वाडीला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून नाना-माई, अमित-विजया, आदित्य-मेघना, अर्चना-सतीश यांनी सादर केलेले छोटे छोटे नाटय़ प्रवेश यामुळे सर्व कुटुंबाचे सतत दिसणारे खेळीमेळीचे वातावरण यामुळे ही मालिका ‘होणार सून..’ या मालिकेपेक्षा मला तरी उजवी वाटते. निदान नको नकोशी वाटत नाही. देसाईंचे घर म्हणजे ‘घरासारखे घर’ वाटते आणि कवितेच्या पंक्ती आठवतात.
‘घर असावे घरासारखे,
नकोत नुसत्या भिंती।
इथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोत नुसती नाती॥
रामचंद्र नाडकर्णी – response.lokprabha@expressindia.com