21 February 2019

News Flash

गरज तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणाची

आपल्या पौराणिक कथांमध्ये नर, नारी आणि किन्नर असे तीन उल्लेख स्पष्टपणे आढळतात.

घटनेने तृतियपंथियांना व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा दिली आहे. आता ती समाजानेही द्यायला हवी.

भाग २
सनद हक्कांची
तृतीयपंथीयांच्या समस्यांचा आकडा कितीही मोठा असला तरी त्यावर उत्तर एकच आहे, ते म्हणजे त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी मदत करणं, तशी वातावरणनिर्मिती करणं!

लहानपणापासूनच तृतीयपंथीयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या व्यक्तींना वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी आपल्यातील वेगळेपणाची चाहूल लागते; पण त्याच वेळी आणि बरेचदा त्याआधीच त्यांना स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणत्या तरी एका लिंगसमूहामध्ये जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला जात असतो. यापकी कोणत्याही गटात सहजी वावरू न शकणारं ते मूल आपोआपच तिरस्काराचा विषय ठरू लागतं. अनेक कुटुंबांना अशी मुलं नकोशी असतात. मग ते त्यांना घराबाहेर काढतात किंवा स्वत:हून घर सोडून जाण्यास उद्युक्त करतात. अतिशय संवेदनशील मुलं आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून स्वत: घर सोडून पळूनही जातात. अशा परिस्थितीत अनेकांचं शिक्षण अर्धवटच राहतं. घरातून बाहेर पडलेली ही मुलं दुसऱ्या शहरात जाऊन राहतात, जिथे त्यांना कोणीच ओळखत नाही. त्यांच्याकडे कुठलंच ओळखपत्र किंवा पुरावा नसल्याने आसऱ्यासाठी आणि अन्नासाठी दारोदार भटकत फिरतात. मग किन्नर समाजाकडूनच त्यांना मदत केली जाते. तृतीयपंथीयांच्या गुरू-चेला परंपरेनुसार ते राहू लागतात.

किन्नर समाजाबद्दल लोकांना भीती, घृणा आणि अनुकंपा अशा तीन भावना असतात; पण त्यांच्याबद्दल कुणालाच आपुलकी वाटत नाही. समाजात मानाचं स्थान नाही आणि शिक्षणाचा अभाव, यामुळे त्यांना कोणीही नोकरी देत नाही. साधं घरकाम किंवा आयाचं कामही त्यांना मिळत नाही. अशा वेळी हे लोक कुणाकडे जाणार? शेवटी हे लोक भीक मागतात किंवा देहविक्रयाचं  काम करतात.

आपल्या पौराणिक कथांमध्ये नर, नारी आणि किन्नर असे तीन उल्लेख स्पष्टपणे आढळतात. किन्नर हे देवाचे भक्त असल्यामुळे त्यांना समाजात आदराचं स्थान असल्याचं मानलं जातं. ब्राह्मणांप्रमाणेच किन्नरांनाही दान देण्याची प्रथा होती. पण आता मात्र त्यांची समाजात अवहेलना होते आहे. शरीराने धडधाकट असताना, कोणतंही काम करून जगण्याची त्यांच्यात क्षमता असताना त्यांना समाजाच्या भिकेवर किंवा शरीरविक्रय करून जगावं लागतं आहे.

तृतीयपंथीयांनी समाजात आपली ओळख लपवून राहण्याचं मुख्य कारण म्हणजे कुणालाही आपल्या शेजारी तृतीयपंथी नको असतात. कारण ते देहविक्रयाचं काम करतात, अशी लोकांची समजूत असते. हे लोक आपल्या मुलांना बिघडवतील, त्यांना पळवून नेतील, वाममार्गाला लावतील असे अनेक गरसमज या समाजाबद्दल लोकांमध्ये आहेत. किन्नर समाजातील लोक झोपडपट्टीत राहतात. तिथे त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा दर्जा काय असणार? झोपडपट्टीत राहत असल्याने कुठल्याच सुरक्षिततेची खात्री नसते. वास्तव्याचा किंवा ओळखीचा कुठलाच पुरावा नसल्याने बँकेत खातं उघडता येत नाही. दररोज लोकांपुढे हात पसरा आणि खा, अशी परिस्थिती असल्याने पसे साठत नाहीत. पैसे स्वत:कडेच जमवून ठेवावे लागतात. त्यातून भांडणं होतात, चोरीदेखील होते. याची सरकारी दफ्तरी नोंद करून घेतली जात नाही. त्याउलट त्यांना आरोपीच्या िपजऱ्यात उभं केलं जातं. त्यांच्याविरोधात घडणाऱ्या गुन्ह्य़ांची नोंदही केली जात नाही.

ग्रामीण भागात कमावत्या लोकांचे हाल कुत्रंदेखील विचारत नाही, तर तृतीयपंथीयांना कोण विचारणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शहराकडे धाव घेतली जाते. शहरात राहण्याचा खर्च परवडत नाही. महिन्याला झोपडीच्याच भाडय़ाला पाच-सात हजार द्यावे लागतात. वर लाइट बिल, पाणीपट्टी, प्रवास, खाणं हा खर्च भीक मागून भागत नाही. मग अनेक जण देहविक्रीतून पसा कमावतात; पण तिथेही स्पर्धा आहे. ग्राहकांची पहिली पसंती देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनाच असते. मग जे गिऱ्हाईक मिळेल त्याच्याकडून मिळेल तितकं घ्यावं लागतं. त्यातही शारीरिक आणि मानसिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं.

सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांच्या शरीराच्याही काही वेगळ्या गरजा असतात. त्यांच्या शरीराची ठेवणही वेगळी असते. याबाबत अनेकदा डॉक्टरांनाही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या शारीरिक जखमांवर उपचार करायला डॉक्टर तयार होत नाहीत. अनेक डॉक्टरमंडळी तर तृतीयपंथीयांना हात लावायलादेखील घाबरतात. अशा वेळी एकातून दुसऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचा खर्च आवाक्याबाहेर जातो. समाजात आदराचं स्थान नसल्याने तृतीयपंथी भौतिक सुखातच धन्यता मानतात. देहविक्रीसाठी शरीर सुंदर बनवताना शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागतात. चेहऱ्यावरील केस काढण्याच्या साध्या लेझर ट्रीटमेंटसाठीही एका सिटिंगला तीन ते चार हजार खर्ची होतात. त्याशिवाय हॉर्मोन्सच्या बदलासाठी खूप मोठी रक्कम खर्च करावी लागते. हा सर्व पसा कुठून उभा करायचा, असा प्रश्न अनेकांसमोर असतो.

समाजाकडून तुच्छतेची वागणूक मिळत असल्याने तृतीयपंथीयांमध्ये जीवनेच्छा फार कमी असते. त्यांच्याकडून काहीवेळा आत्महत्येचे प्रयत्न होतात; पण बरेचदा इतरांसाठी त्यांना जगावं लागतं. अनेक तृतीयपंथी आपल्या गुरूची त्याच्या उतारवयात काळजी घेतात. शिवाय ज्या कुटुंबाने त्यांना नाकारलं त्यांनाही आíथक मदत पाठवत असतात. बहीण-भावाचं शिक्षण, लग्न यामध्ये त्यांचा मोठा हातभार असतो. तृतीयपंथीयांची ही चांगली बाजू समाजासमोर कधीच येत नाही, याचं अनेकांना दु:ख वाटतं.

बँकेत खातं नाही, नोकरी नाही. त्यामुळे आपल्या आíथक गरजांसाठी खासगी संस्था किंवा व्यक्तींकडून चढय़ा व्याजानं कर्ज घेतलं जातं. ते भरता न आल्यास चक्रवाढ व्याज. मग ते फेडण्यासाठी अधिक पसे कमवावे लागतात. अशा वेळी जिवाला धोका असलेली कामंही करावी लागतात. देहविक्रीच्या वेळी होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी नशेचा आधार घेतला जातो. त्यासाठी पसे मोजावे लागतातच, पण त्यातून नंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपचार करण्यासाठीही पसा खर्च होतो. हा पसा आणायचा कुठून, हा या समाजासमोरील मोठा प्रश्न आहे.

तृतीयपंथीयांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना दोन पातळ्यांवर काम करावं लागतं. एक तर या समाजाला कामासाठी तयार करणं आणि दुसरं ते जिथे काम करणार आहेत त्यांची यांच्याविषयीची मानसिकता बदलणं. हजारो वर्षांपासून असलेली ही मानसिकता बदलायला वेळ लागेल; पण दोन्ही बाजूंनी संयम बाळगणं आवश्यक आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृतीयपंथीयांना पुन्हा एक पाऊल मागे टाकावं लागलं अशीही उदाहरणं आहेत. मानवी बंदोपाध्याय या तृतीयपंथी समुदायातील पहिल्या सहयोगी प्राध्यापक म्हणून पश्चिम बंगालमधील विवेकानंद सातोबर्कशी महाविद्यालयात रुजू झाल्या होत्या; परंतु सहा महिन्यांतच त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. कोची मेट्रोमध्येही तब्बल १८ तृतीयपंथीयांना नोकरी दिली गेली होती; पण अध्र्याहून अधिक लोकांना ती सोडावी लागली. मधु किन्नर या छत्तीसगढमधील रायगड जिल्ह्य़ाच्या पहिला तृतीयपंथी महापौर; परंतु त्यांच्या सुरुवातीच्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांचं कुणीच ऐकलं नाही. एकूणच संधी मिळत असली तरी सन्मानपूर्वक वागणुकीचा मोठय़ा प्रमाणात अभाव आहे.

तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा कौशल्य विकास होणं खूप आवश्यक आहे. व्यवसायासाठी बँकांनी कमीत कमी कागदपत्रांच्या आधारावर कमी व्याजाची कर्जे उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांचा खूप गाजावाजा केला जातो; पण यामध्ये तृतीयपंथी समाजाच्या कौशल्य विकासाचा उल्लेख आहे का? कौशल्य विकास म्हणजे केवळ सगळ्यांना मेणबत्त्या बनवायला शिकवणं नाही, तर त्यांच्यातील गुण हेरून त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देणं आणि समान संधी उपलब्ध करून देणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सार्वजनिक आणि खासगी नोकऱ्या, शिक्षण आणि राजकारणात आरक्षण असायला हवं. भारतात तृतीयपंथीयांची संख्या तब्बल ४० लाखांच्या घरात आहे. त्यांचा समुदायाचा प्रतिनिधी व्यवस्थेत असल्याशिवाय त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकणार नाही. राज्यसभेवर अनेक खेळाडू आणि अभिनेत्रींची वर्णी लागते. आपल्या कार्यकाळात ते संसदेत फिरकतसुद्धा नाहीत. तृतीयपंथी समुदायातील अनेक जण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात. मग त्यांची राज्यसभेवर वर्णी लागायला काय हरकत आहे, असा सवालही या समाजाच्या प्रतिनिधींकडून उपस्थित केला जातो.

२०११ च्या जनगणनेत पहिल्यांदा तृतीयपंथीयांची जनगणना झाली; पण त्याव्यतिरिक्त कुठलंही सर्वेक्षण करताना त्यामध्ये तृतीयपंथीयांचा समावेशच नसेल तर त्यांची खरी संख्या आणि त्यांच्या समस्या समाजासमोर येणारच नाहीत. इतर विकसित देशांच्या तुलनेत आपल्याकडे या समाजाला भेदभावाला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं; पण इतर देशांत त्यांच्यासाठीचे कायदे जास्त पूरक आहेत. आपल्याकडे या समाजाला कायद्याच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. उच्च न्यायालय म्हणतं की, महिला, पुरुष आणि तृतीयपंथी यांना समाजात समान स्थान आहे. मग लोकांना या समाजाची का अडचण वाटावी? त्यामुळे कायद्याबरोबरच लोकांची मानसिकता बदलणंही अत्यंत गरजेचं आहे.

तृतीयपंथी समुदायाची लढाई सरकारपेक्षाही लोकांच्या मानसिकतेबरोबरच आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं तर ते मतदान करतील, राजकारणात येतील, कर भरू शकतील. त्यामुळे त्यांचं जीवनमान तर सुधारेलच, पण अर्थव्यवस्थेलाही त्याचा हातभार लागेल. त्यांना आíथकदृष्टय़ा सक्षम बनविल्यास अनेक समस्या निकालात निघू शकतात. म्हणूनच या समाजातील लोकांना आíथकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं ही काळाची गरज आहे. त्यांना समाजाची भीक नकोय, दया नकोय तर आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क हवा आहे.
प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com / @nprashant

First Published on February 23, 2018 1:03 am

Web Title: lgbt india transgender and their financial condition