श्रावण महिना म्हणजे पावसाचे दिवस. या काळात हवेत आद्र्रता असते. बाहेरील हवेतील थंडाव्याचा शरीरावरही परिणाम झालेला असतो. आपली पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे तिच्यावर फार ताण पडणार नाही असा आपला आहार असायला हवा. या काळात मिळणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण भाज्या मात्र जरूर खाव्यात.

आपल्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नर्ऋत्येकडून वर्षांऋतूचे आगमन होते. ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेल्या जमिनीत पावसाच्या पाण्याचे बाष्प निर्माण होते. पावसामुळे येणाऱ्या ओलाव्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण होतो. ‘ब्रह्माण्डी ते पिण्डी’ या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतानुसार, परिसरातील सर्व घटकांचे अस्तित्व मनुष्य शरीरातही असतेच. परिसरात क्षणात संपुष्टात आलेली उष्णता व अचानक वाढलेला गारवा आपल्या शरीरातही वाढू लागतो. शरीरातही क्लेद स्वरूपात अतिरिक्त पाणी साठू लागते. कालांतराने आषाढ महिन्याच्या शेवटी पावसाचा जोर कमी होतो. सर्वाना श्रावणाचे वेध लागतात.

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे।

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे॥

बालकवींच्या काव्यातील या पंक्ती आठवल्या की इंद्रधनुष्याची आठवण होते. निसर्गात हिरवी मखमल पसरलेली दिसते. क्षणात पाऊस तर क्षणात सूर्यप्रकाश अशी काहीशी अवस्था असते. पाऊस सुरू झाल्यावर गारवा जाणवतो, तर पाऊस कमी होऊन ऊन पडल्यावर पुन्हा उष्णता जाणवू लागते. या दुहेरी तपमानात आपले शरीर संतुलित ठेवताना व त्याचबरोबरीने विसर्गकाल सुरू झाल्यामुळे शरीराचे बळ हळूहळू कमी होताना जाणवते. पचन व्यवस्थित झाल्यावरच आपल्याला मिळणारे बळ व शक्ती ही आपल्या आहारातून मिळते. आहार सेवन केल्यावर, शरीरात त्याचे पचन होते. त्यापासून पोषक घटक शरीरात शोषून घेतले जातात.

बहुधा श्रावण महिन्यात अतिरिक्त जमलेल्या थंडाव्यामुळे वर्षांऋतूमध्ये शरीरातील जिवंतपणाची साक्ष असलेला अग्नीदेखील काहीसा मंद होतो. परिणामी भूक मंदावते आणि पर्यायाने पचन कमी प्रमाणात होते.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करताना शरीरातील त्रिदोष, मल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनशक्ती यांची अवस्था जाणून घेणे आवश्यक ठरते. आपल्या वैद्यकशास्त्राचा मूलभूत पाया वात, पित्त, कफ या दोषत्रयींवर अवलंबून आहे. वर्षांऋतूच्या काळात हा वातदोष बिघडण्याचा काळ असतो, शरीरातील पित्त संचित होण्याचा काळ असतो व सर्वत्र असलेल्या ओलाव्यामुळे कफाची व जलीय घटकाची पातळी वाढत असते.

या श्रावण महिन्याच्या दरम्यान सर्वधर्मीय भारतखंडात, संस्कृतीचा, परंपरेचा व धार्मिकतेचा वारसा चालवताना िहदू, मुस्लीम, पारसी, जैन या अशा सर्वधर्मीयांचे एकादशी, नारळीपौर्णिमा, नागपंचमी, रमजान, गाथा, पर्युषण असे उत्सव व सण साजरे केले जातात. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची देवाणघेवाण व रेलचेल या काळात या सर्व समाजात दिसते.

संपूर्ण वर्षभरात उपलब्ध नसतील एवढे खाद्यघटक या श्रावण महिन्याच्या काळात निसर्गात निर्माण होतात. शास्त्रानुसार ऋतुकालोद्भव आहाराचा आस्वाद घ्यावा असे सांगितलेले आहे. आपल्या शरीरातील बदलांचा परिणाम त्रासदायक होऊ नये यासाठी निसर्ग तत्पर असतो. निसर्गात अचूकपणे त्या भाज्या उगवतात, फळे उपलब्ध होतात जे शरीराला हितकर असते. त्यांचाच वापर आपण परमेश्वराला अर्पण करण्यासाठी करतो आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थाचा, या ऋतूतील श्रावणसरी अनुभवताना आपण त्यांचा आस्वादही घेतो. श्रावण महिन्यात ज्या पदार्थाच्या सेवनाने आपले आरोग्य टिकून राहण्यास मदत होईल अशा पदार्थाच्या गुणधर्माची माहिती करून घेऊ या.

वर्षभराचे धान्य गोदामात, घरातील कोठीच्या जागेत जेथे ओलावा अत्यंत कमी असतो अशा ठिकाणी साठवलेले असते. पावसात ओलावा वाढल्यामुळे हे धान्यकण काहीसे ओलसर होतात. धान्यापासून बनवण्यात येणारी पोळी, भाकरी बनवण्यासाठी ते कोरडे असणे आवश्यक असते. आरोग्य टिकविण्यासाठी हे थोडेसे ओलसर झालेले धान्य- गहू, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, मका हे कढईत कोरडे भाजून घ्यावेत. थंड झाल्यावरच त्यांचे पीठ करावे व वापरावे. तांदूळसुद्धा या दोन-तीन महिन्यांकरिता भात करण्यापूर्वी भाजून घ्यावेत. धान्यांमधल्या अतिरिक्त ओलाव्यामुळे शरीरातील आद्र्रता वाढू नये यासाठी हे आवश्यक ठरते.

द्विदल धान्ये म्हणजेच कडधान्ये. त्यांची नित्यातील उदाहरणे म्हणजे मूग, मसूर, तूर, चवळी, मटकी, कुळीथ, चणा, हरभरा इत्यादी. थोडत्यात कडधान्य म्हणजे सुकविलेल्या धान्यबिया. त्या कडधान्य या  स्वरूपात पचायला जड, शरीरातला वात वाढवणाऱ्या, असतात. म्हणून त्या आठ ते दहा तास भिजवणे गरजेचे असते. भिजल्यानंतर त्यांचा दाणा फुलतो. त्यानंतर त्यांच्यापासून उसळ, मिसळ, कोिशबीर, सूप, सार, कढण, आमटी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. श्रावण महिन्यात शक्यतो कडधान्ये रोज खाणे टाळावे. आठवडय़ातून एक-दोन वेळा जेवणात त्यांचा समावेश चालू शकतो. प्रत्येकाने आपल्या पचनशक्तीप्रमाणे यांचा वापर करावा. खाण्यापूर्वी धान्य पूर्णत: शिजलेले आहे याची खात्री करावी. पदार्थ पचण्यास हलका व्हावा यासाठी फोडणीमध्ये लसूण, आले, िहग, जिरे, कोिथबीर, पुदिना, संधव मीठ यांचा योग्य वापर जरूर करावा. शक्यतो सुकी उसळ या स्वरूपात न खाता, रस्सा असेल अशा स्वरूपात कडधान्ये या ऋतूत सेवन करावीत.

ताज्या स्वरूपात वापरावयाचा दुसरा घटक म्हणजे भाजी सर्वसाधारणपणे ‘शाक’ नावाने यांना ओळखले जाते. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळे इत्यादींचा समावेश होतो. श्रावण महिन्यात सर्वत्र पाणी असते आणि त्यामुळे ओलावा असते. शरीरात वात दोष वाढलेला असतो. या वाताचा जोर कमी करण्यासाठी या काळात उगवलेल्या विशिष्ट भाज्या खाव्यात! पावसात म्हणजेच श्रावणात ज्या भाज्यांची रेलचेल असते, त्यामध्ये चाकवत, अळू, तांदुळजा, अंबाडी, शेवग्याचा पाला, कंटोली, शिवर, बांबूचे अग्र, कच्ची पपई, टाकळा अशा भाज्यांचा समावेश होतो. इतर नेहमीच्या भाज्या वर्षभर उपलब्ध असतातच, मात्र या भाज्या श्रावणातच भाजी मंडईत खास गर्दी करतात. यातील प्रत्येक भाजीमध्ये स्वत:चे गुण असतात आणि वात कमी करणाऱ्या भाज्याच या काळात अधिक उगवतात हा निसर्गनियम! याचा वापर आपण खरोखरच योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात करावा.

चाकवत : चवीला गोड, रुचकर, सारक, पाचक, पचायला हलकी असते. कडधान्ये शिजवताना चाकवताची पाने वापरावीत. अपचन झाल्यास ही भाजी खावी. पोटात मुरडा होऊन, पोटदुखी दूर होण्यासाठी दही अथवा ताक, डािळब यासोबत चाकवताची भाजी खावी.

अळू : याचे पान व देठ बारीक चिरून भाजी करतात, भूक वाढवणारी भाजी. अळूची भाजी मलविबंध दूर करते. पित्त वाढल्यास अळूच्या मुळांचा म्हणजे मुंडल्याचाही भाजी म्हणून वापर करतात. पोटातील कृमी दूर होण्यासाठी या मुळांचा वापर केला जातो.

तांदुळजा : चवीला गोड असणारी भाजी, रुचकर, भूक वाढवणारी, पथ्यकर असल्याने सर्वासाठी चांगली असते.

अंबाडी : ही भाजी नावाप्रमाणे चवीला आंबट असते. अजीर्ण झाल्यास ही भाजी खावी. पावसाळ्यात, श्रावण महिन्यातच ती उपलब्ध असते. या काळात वातदोष बिघडलेला असतो. आंबट चवीच्या पदार्थानी वातदोषावर नियंत्रण ठेवता येते. आबंट असल्याने रुची उत्पन्न होण्यासाठी वापर करता येतो. तोंडाला चव आल्याने भूक वाढते.

शेवगापाला : वर्षभर शेवग्याच्या शेंगा आपण जेवणात वापरतो. परंतु याच झाडाचा पाला पावसाळ्यात, श्रावण महिन्यात जरूर खावा. पूर्वी उल्लेख केला आहे त्याप्रमाणे सर्वत्र ओलावा असतो. कफ वाढतो. शेवग्याचा पाला हा स्वभावत: ओलावा, कफ कमी करणारा आहे. यामुळे शरीरात उष्णता वाढते. हे लक्षात घेऊन पित्त प्रकोप अर्थात बिघडलेल्या पित्ताची वाढ होऊन जाणवणारा त्रास कमी व्हावा यासाठी उपयोगी ठरतो. कोठा साफ करते वेळी अनावश्यक पित्त शरीर बाहेर काढण्याचे कार्य होते.

कंटोली : चवीला कडू, तिखट, भूक वाढवणारी भाजी, फळभाजी प्रकारात येते. छोटी हिरवी फळे असतात. पोटशूळ, खोकला, दमा या आजारावर उपयुक्त ठरते. याची भाजी, काचऱ्या, भजी करता येतात. ही पथ्यकर भाजी असल्याने सर्वाना उपयुक्त.

आंबट चुका : रुचकर, भूक वाढवणारी, पचायला हलकी, मल साफ करणारी पथ्यकर भाजी. पोटात आग होत असेल, उलटय़ा होत असतील, तर तसंच भलत्याच पदार्थावर होत असलेली इच्छा बंद होण्यास या भाजीचा उपयोग होतो.

पानावर अन्नपदार्थ वाढताना, डाव्या हाताला वाढले जाणारे मीठ (संधव), िलबू, पुदिना चटणी, रायते, पंचामृत, कोशिंबीर असे विविध प्रकार श्रावण महिन्यात खावे. यासाठी िलबू, कडुिनबाची पाने, लसूण, कांदा, आले, कोथिंबीर, कच्ची पपई, पुदिना, कोकम, तुळशीची पाने, आमचूर पावडर, संधव  यांचा वापर करावा.

श्रावण महिन्यात व्रतवैकल्य व उपवासाच्या पदार्थाचे वेगळेच नाते असते. सणवाराप्रमाणे नवेद्याचे पदार्थ तयार केले जातात. यामध्ये पिष्टमय पदार्थ, तसंच गोड पदार्थाचा समावेश होतो. स्थूलता व मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गोड पदार्थ पूर्णत: टाळावेत. इतरांनीसुद्धा गोड पदार्थ खाल्यास त्याचे अजीर्ण होणार नाही, घशाशी आंबट, जळजळ होणार नाही एवढय़ाच प्रमाणात ते सेवन करण्याची खबरदारी घ्यावी. गूळ असलेल्या पदार्थात वेलची, मिरी, दालचिनी अथवा हळदीचे पान घालण्याची परंपरा आहे कारण त्याने अन्नपचनाला मदत होते. जुन्या ठेवणीतल्या मधाचा वापर करावा. मधुमेही व्यक्तींना, स्थूल व्यक्तींना, कफाचा त्रास असलेल्या रुग्णांना कडू औषधासोबत जुना मध दिल्यास फायदा होतो. श्रावणात ऊनपावसाचा खेळ सुरूच असतो. अशा वेळी शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मध घेण्यास हरकत नाही. मात्र मध कधीही गरम पाण्यासोबत किंवा गरम करून घेऊ नये. मध घेऊन १०-१५ मिनिटांनी गरम पाणी पिण्यास हरकत नाही. पावसामुळे सर्वत्र चिखल, गढूळ पाणी असल्याने उघडय़ावरील पदार्थ, उसाचा रस, उघडय़ावरील कापून ठेवलेली फळे किंवा फळांचे रस शक्यतो टाळावेत. उसाचा रस घरात काढता येत नाही. उसाच्या रसाच्या गुऱ्हाळात स्वच्छता टिकवणे व माशा घालवणे ही कसरत असते. त्यामुळे तो टाळावा. शरीरातील उष्णता कमी करून, थंडावा निर्माण करणारे नारळपाणी श्रावण महिन्यात योग्य नाहीच. मात्र निर्जल, कडक उपवास करणाऱ्या लोकांकरिता दिवसाउजेडी म्हणजेच सूर्योदयानंतर तासाभराने पिण्यास एकवार हरकत नाही. सूर्यास्तानंतर जास्त पाणी कोणीही पिऊच नये.

श्रावण महिन्यातील उपवासात एका पूर्णाहाराचा समावेश असतो ते म्हणजे दूध. ते केव्हाही पिताना शक्यतो गरम अथवा कोमट प्यावे. हळद, केशर, वेलची, सुंठ असे पदार्थ व्यक्तीच्या आवडी निवडीनुसार घालून दूध उकळून पिणे नक्कीच उत्तम. रात्री झोपताना दूध पिऊ नये. यामुळे कफ वाढतो. दमा असणाऱ्यांना किंवा वारंवार सर्दीची ज्यांना सवय आहे अशांना दूध जरी पूर्ण अन्न, तरीही रात्री वज्र्य समजावे.

पावसाळ्यात नद्यांना पूर येतो व समुद्र खवळलेला असतो. मासेमारी हा व्यवसाय अंशत: बंद असतो. या काळात निसर्गात मासे अंडी घालतात व अंडय़ातून निर्माण होणाऱ्या माशांमुळे प्रजोत्पादनासोबतच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. म्हणूनच या काळात मांसमच्छी खाणाऱ्यांनी ही मच्छी खाऊ नये असा प्रघात होता. अजूनही आहे आणि तो पूर्णत: शास्त्रातच आहे. नारळीपौर्णिमेनंतर पाऊस कमी होतो. अशा काळानंतर वर्षभर मत्स्याहार उपलब्ध होऊ शकतो. याच कारणास्तव बहुधा विविध धार्मिक बंधने व नियम दाखवून चातुर्मास पाळावा असे सांगतात.

मत्स्याहार व मांसाहार यांची किंचित चव गोड असते. त्यात मोठय़ा प्रमाणात तिखट मसाला वापरला जातो, तेलही भरपूर असते. यामुळे शरीरात चरबी वाढते. हे पदार्थ पचायला जड असतात. माणसाची पचनशक्ती सर्वसाधारणपणे या काळात कमी झालेली असते हे लक्षात घेऊनच श्रावण महिन्यात असा आहार, आरोग्य टिकवण्यासाठी निषिद्ध सांगितला आहे, हे आयुर्वेदाच्या दूरदर्शी व शास्त्रीयत्वाचे एक उत्तम उदाहरण!
वैद्य देवकी नाडकर्णी – response.lokprabha@expressindia.com