lkp20आजची तरुणाई सगळ्यात जास्त भेटते ती सोशल साइट्सवर. युवा पिढीची सोशल साइट्सवर रंगणारी चर्चा वाचायला मिळणार आहे ‘नेट कट्टा’ या नव्या सदरातून.

Tejali
December 29, 2015 at 6:41pm

‘कोटा’मध्ये एका वर्षांत तब्बल ३० मुलांनी आत्महत्या केली- ही बातमी खरंच मन सुन्न करणारी आहे. काय कारणं असतील याची नक्की? शैक्षणिक व्यवस्था, समाज, पालकांच्या अपेक्षा, मुलांवरचा ताण की अपयश पचवता न येण्याची मानसिकता? कधी आणि कशा थांबतील अशा घटना?

Like            Comment

Seen by 5

Sanket : : खूपदा आपल्याला काय वाटतंय या पेक्षा ‘लोग क्या कहेंगे?’ आणि ‘पापा कहते है बडम नाम करेगा’ या दोन गोष्टींचीच काळजी असते मुलांच्या मनात. त्याचंच टेन्शन घेऊन जगतात ती.. या दडपणाने स्वप्न आणि आयुष्य दोघांचा दुर्दैवी अंत होतोय.

Unlike · Reply · 1

Tejal : : जोपर्यंत ही जीवघेणी स्पर्धा थांबत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. खरं तर आपल्याला कळतही नाही की कधी आपण या स्पर्धेचा एक भाग होतो. आपली एकंदर लाइफस्टाइल इतकी बदलते आहे की, प्रत्येकाला यशस्वी व्हायचंच आहे आणि आपल्याला यशस्वी कसं व्हायचं ते शिकवलं जातं, पण अपयश कसं हॅण्डल करायचं, हे नाही शिकवलं जात. मग अपयश आलं की डिप्रेशन येतं आणि असे प्रकार घडतात.

Like · Reply

Rutuja : मेडिकल आणि इंजिनीयिरग या दोन क्षेत्रांना ग्लॅमर आहे.. म्हणजे आजही समाजात एका डॉक्टरला मिळणारा मान आणि एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्याला मिळणारा मान यात फारच तफावत आहे. मेट्रिमोनियल साइट्सवरसुद्धा मुलीच्या आणि मुलाच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा तो डॉक्टर किंवा इंजिनीयर असावा अशा असतात.. हा मानपान याहीपेक्षा विचारसरणीचा प्रश्न आहे. मुलाला इंजिनीयर हो सांगणाऱ्या पालकांची काळजी असते हे मान्य, पण म्हणून आपण आपल्या मुलांचा वर्तमान तर धोक्यात घालत नाही ना याचा विचार व्हायला हवा. मला संकेतचंही म्हणणं पटलंय. माझ्या मित्राच्या मुलाने/मुलीने जेईई दिली म्हणून ती माझ्याही पाल्याने द्यावी. आपलं समाजातलं स्थान अबाधित राहण्यासाठी. कशाला इतका अट्टहास? मुळात प्रत्येक मुलाला स्पर्धा ही आपली आपल्याशी करावी हेच माहीत नसतं, मग तो जगाच्या स्पर्धेत अडकतो. सुरुवात कुठून? तर अगदी लहानपणी आई आपल्या बाळाला घास भरवताना सांगते, ‘ए.. बाळा.. ते बघ त्याचं मंम्म् खाऊ न पण झालं.. नाही तर तू बघ.. चल जेव भरभर..!’ कशाला? जेवू देत ना त्याला त्याच्या स्पीडने.. आजकाल ट्रेनमध्यसुद्धा बायकांच्या चर्चा कुणाचा कोण दहावीत? कुणी कार्ला शुक्ला लावलाय? कुणी आकाश आणि कुणी काय..? म्हणजे मुलांना कुठला क्लास लावलाय ही गोष्टही स्टेट्स सिम्बॉलच असते काही पालकांसाठी. या सगळ्यात आपापल्या पाल्याला खरंच काय करायचंय, त्याची क्षमता काय आहे, याचा विचार होतो का; हा प्रश्नच आहे.. बहुतांश पालकांसाठी क्लासची फीही खरंतर आवाक्याबाहेरची असते, पण तरीही अट्टहास काही सुटत नाही. एखाद्याची बौद्धिक पातळी असेल तेवढी तर काहीच हरकत नाही पण नसेल तर मात्र त्या मुलांची घुसमट होते. अधिकपक्षी ‘आम्ही तुझ्यासाठी एवढा खर्च करतोय, किती कष्ट करतोय’ अशी डायलॉगबाजी.. करायच्या आधी विचारलं असतं तर सगळंच वाचलं असतं नाही का? हां आता यात उत्तम वेळेचं नियोजन करून यशस्वी होणारेही असतात, पण ते क्वचितच असतात याचं दु:ख आहे.

सगळा विचारांचा खेळ. विद्यार्थ्यांवर कुठल्या तरी डिग्रीचा शिक्का लागण्याअगोदर त्याच्यामधला माणूस जगणं महत्त्वाचं आहे.. आणि भविष्य सुरक्षित करण्याआधी वर्तमान सुरक्षित केलं पाहिजे. आत्महत्या ही पळवाट आहे आणि त्या वाटेकडे जाण्याआधी लोकांना त्यापासून थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे.

Unlike · Reply ·

Tejal :: आय थिंक एका रिअल लाइफ रँचोची गरज आहे इथे. प्रत्येक वर्गात प्रत्येक कॉलेजमध्ये एक रँचो असला तर तो मुलांना आणि त्यांच्या पालकांना रेसमध्ये धावण्यापासून परावृत्त करू शकेल आणि आता या देशाचा तरुण वर्ग म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या भावी पिढीसाठी असे रँचो तयार केले पाहिजेत. यासंबंधी आपल्याला आपल्या लहान भाऊ बहिणींशी ज्युनियर्सशी, मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे गरजेचे आहे. कोटामधील परिस्थितीविषयी बोलायचं तर सध्या तिथलं सरकार यावर तोडगा काढम्ण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी काऊन्सेलिंग आणि तणाव नियोजनासाठी उपक्रम सुरू केले आहेत. करिअर प्रत्येकालाच घडवायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे आणि त्यांचा तो हक्कच आहे. फक्त काहींना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा आणि मनापासून प्रयत्न केले असतील तर यश मिळतं हे नक्की. पण केलेल्या जीवतोड मेहनतीनंतर मिळालेलं यश बघण्यासाठी जिवंत राहणं तर गरजेचं आहे!

एका परीक्षेवर कोणाचं आयुष्य अवलंबून असू नये. परीक्षेत नापास झालेल्या अनेक युवकांनी जगात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत हे कायम लक्षात ठेवावं म्हणजे कठीण प्रसंगांना सामोरं जाणं सोपं होईल.

Like · Reply · 23 hrs

 

Tejali :  मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं पटतंय. मुळात पालकांच्या अपेक्षा, त्यांची स्वप्नं, समाज ह्य सगळ्याच्या बोज्याखाली विद्यार्थ्यांला काय हवंय, काय करायचंय याचा विचारच केला जात नाही. ह्य जीवघेण्या स्पर्धेमध्ये अजून एक धावणारा घोडा निर्माण करणं म्हणजे मुलावर चांगले संस्कार करणं नव्हे!! नक्की आपण कुठल्या स्पर्धेत आणि कशासाठी धावतोय हे तरी मुलाला माहिती करून द्या; कदाचित त्याला ह्य स्पर्धेचा विजेता तर सोडाच, पण स्पर्धकसुद्धा व्हायची इच्छा नसू शकते, ह्यचा विचार पालकांनी केला पाहिजे. नुकतीच एक बातमी वाचली ज्यात एका सहावीतल्या मुलाने जेईईचा क्लास लावलाय असं म्हटलं होतं. म्हणजे ६-७ वर्षांंनंतर द्यायच्या परीक्षेची तयारी सहा वर्षं आधीच सुरू केली त्याच्या पालकांनी, क्लास शिक्षकांनी आणि पर्यायाने त्यानेसुद्धा. खरंच तेरा वर्षांच्या जीवाने १८-१९ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास का करावा? त्याला तो जमेल की नाही? त्याची खेळण्याची, मजा करण्याची वर्षं त्याच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार कुणी दिला त्याच्या पालकांना? सततच्या अशा भडिमाराने विद्यार्थ्यांंची मानसिक घुसमट होते, बाकीच्या पर्यायांबद्दल त्यांना विचार करण्याची, ओळख करून देण्याची संधी न मिळाल्याने बाकीची दारे त्यांच्यासाठी बंद होतात; आणि मग अशा परिस्थितीत आलेलं अपयश किंवा ताण सहन झाला नाही की अशा आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडतात. जणू काही प्रतिष्ठित महाविद्यालयात, इंजिनीअिरग किंवा मेडिकलला प्रवेश मिळवणं हेच अंतिम ध्येय आहे, असं वारंवार मुलांना सांगितल्याने मुलांचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे ह्यकडे साफ दुर्लक्ष केलं जातं!

Like · Reply · 1

Greeshma: तेजल, तू म्हणतेस ते बरोबर आहे. यशस्वी कसं व्हायचं याचे सल्ले आपल्याला मिळतात, पण अपयश कसं पचवायचं याबद्दल फारसं बोललं जात नाही . याचा एक पैलू

असाही आहे की आज-काल एकच मूल असतं, आई-बाबा नोकरी करत असतात म्हणून त्यांच्याकडे पैसा असतो, पण मुलांना द्यायला वेळ नसतो मूल जे काही मागेल ते त्याला मिळतं. अगदी लहानपणी खेळणी असोत, कपडे, खाणं-पिणं की कुठल्या महागडय़ा कोर्सला प्रवेश घेणं असो, त्यांचे सगळे हट्ट पुरवण्याची पालकांची तयारी असते. त्यामुळे मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय नसते आणि मग काही कारणामुळे त्यांच्या मनाविरुद्ध झालं की पुढचा मागचा कसलाच विचार ते करू शकत नाहीत.

Like · Reply · 1 · 21 hrs

Tejali : करेक्ट! या सगळ्याबरोबर महत्त्वाचा मुद्दा हा ठरतो की, अशा आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी काय उपाय करावे लागतील? ‘कोटा’मध्ये आता ‘मस्ती की पाठशाला’ या उपक्रमात चित्रकला, विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम,      समुपदेशन असे उपाय करण्यात येत आहेत. त्याशिवाय मला काही उपाय सुचलेत.

१.     मुलांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर आपल्या इच्छा लादण्याचा अट्टहास पालकांनी करू नये, त्यांची बौद्धिक पातळी, इच्छा ह्यंचा विचार करणं आणि त्याबद्दल सत्यता जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

२.     अवास्तव अपेक्षा करून मुलांवर दडपण आणू नये, त्यामुळे त्यांची कुचंबणा होते.

३.     आपल्या पाल्याची इतर मुलांबरोबर सतत तुलना करू नये, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आपल्या मुलांची हुशारी शैक्षणिक क्षेत्रातच हवी, असा दावा करू नका. कदाचित इतर क्षेत्रांमधील त्यांचा गुणांक इतर मुलांपेक्षा अधिक असू शकतो; त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याला/तिला प्रोत्साहन द्या.

४.     कोचिंग क्लासेसमध्येसुद्धा मुलांच्या समुपदेशनाशिवाय त्यांना अ‍ॅडमिशन देऊ नये. फक्त कोचिंग क्लासेसची गर्दी वाढवण्यापेक्षा ज्यांना खरंच त्या क्लासने मदत होणार आहे अशांना अ‍ॅडमिशन दिली जावी.

५.     आत्महत्येच्या संभाव्य खुणा ओळखा आणि वेळीच सावध व्हा. विद्यार्थी कुणाशी बोलत नसेल, नीट झोपत नसेल, नीट खात—पीत नसेल, त्याच्या बोलण्यात आयुष्याच्या अंत व्हावा असा उल्लेख असेल तर ही काही ‘डिप्रेशनची/आत्महत्या करायची इच्छा असल्याची’ लक्षणं आहेत. त्यासाठी सावध होऊन वेळीच समुपदेशकाची मदत घ्या.

६.     मुलांशी मोकळा संवाद साधा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, त्यांच्या भावनांची कदर करा आणि मुख्य म्हणजे जगात

सगळ्याहून जास्त तुम्हाला मुलांचा ‘जीव’ महत्त्वाचा आहे याची जाणीव मुलांना करून द्या.

(चर्चा सहभाग : तेजल श्रृंगारपुरे, तेजाली कुंटे, संकेत पाटोळे, ऋतुजा फडके आणि ग्रीष्मा जोग)
टीम युथफुल – response.lokprabha@expressindia.com