दर वर्षी साजरा होणारा बाप्पांचा उत्सव आपण मनोभावे साजरा करतो खरं, पण थोडं आत डोकावून पाहतो का? निराकाराचं प्रतिनिधित्व करणारी गणरायाची सगुण साकार मूर्ती आपल्याला नेमकं काय सांगत असते?

‘येणार, येणार’ म्हणून गाजलेले बाप्पा ‘पुढल्या वर्षी लवकर या’ या गेल्या वर्षीच्या आपल्या विनंतीला जागून आले आहेत. ‘पुढल्या वर्षी लवकर या’ हा आपला दर वर्षीचा प्रेमाचा आग्रह. पण म्हणजे नक्की कुठचे? बाप्पा येतात कुठून वा ‘विसर्जन’ केल्यावर नक्की जातात कुठे?

बाप्पांचं ‘विसर्जन’ करताना जणू ‘विसरती जन ते विसर्जन’ असा आपला खाक्या असतो. कारण नंतर वर्षभर आपण आपल्याच आयुष्यात रमलेले, विवंचनेत गुरफटलेले असतो. पैशालाच ‘सुख’ समजून मृगजळाच्या मागे सतत धावत असतो. त्या आपल्या धावपळीत कित्येकदा बरं-वाईट वागतो, कित्येकांना कळत-नकळत दुखावतो, तरीही आपल्याच नादांत अन् सोशल मीडियात मश्गूल होऊन ‘स्मार्टफोन’ जीवन जगण्यांत मग्न असतो! या सगळ्यांत बाप्पांचा विसर पडतो! थेट ‘पुढल्या वर्षी’ आषाढ-श्रावणात गणपतीच्या ‘चित्रशाळां’तून रंगवलेल्या-बिनरंगवलेल्या मूर्ती दिसू लागतात. मग विविध प्रसार माध्यमांतून बाप्पांची मूर्ती कशाची, शाडू की पीओपीची, केमिकल की नैसर्गिक रंगाची, विसर्जन कुठे, पर्यावरण हानी-ध्वनिप्रदूषणाचं काय, वगैरे निर्थक चर्चा नियमित झडतात. एरवी वर्षभर हे सारे प्रश्न ‘रिसायकल बिन’मध्ये असतात.. अन् गणपती आले की पुन्हा डोकं वर काढतात!

आपल्यासाठी वर्षांच्या ३६५ दिवसांतले, वृत्ती आणि ऐपतीप्रमाणे, दीड-पांच-सात वा अगदी दहा दिवस बाप्पांसाठी म्हणजे डोक्यावरून पाणी! याच ‘पाण्यात’ अनंत चतुर्दशीला बाप्पांना पुन्हा अर्पण केलं म्हणजे आपण मोकळे! हे पाणी घरच्या बादलीतलं, कृत्रिम हौदातलं, नैसर्गिक नदी-तलावाचं की समुद्राचं, हा किरकोळ तपशिलाचा मुद्दा. पाणी तेच, जलतत्त्व तेच. पंचमहाभूतातील दुसरं तत्त्व, ‘आप’! (प्लीज, इथं राजकारण नको!) पहिलं तत्त्व म्हणजे पृथ्वी, अर्थात माती. या माती अन् पाण्याच्या मिश्रणातून, ‘सूर्यतेजा’मुळे वाळून घट्ट झालेली, तरीही असंख्य अंतर्गत छिद्र अर्थात ‘आकाशा’तून वायू भरून राहिलेली, अशी ही पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांतून घडविलेली बाप्पांची मूर्ती! गणेश-चतुर्थीच्या दिवशी त्या मूर्तीची पूजा मंत्रोपचार करून स्थापना करून, मूर्तीत ‘देवत्व’ येण्यासाठी आवाहन करायचं! जसं पंचमहाभूतांनी बनलेलं आपलं मानवी शरीर, अन् त्यांतील ‘ईश्वरी अंश’ म्हणजे चैतन्यरूपी आत्मा, तसाच हा प्रकार. ज्या शक्तीनं माणूस घडवला, त्या माणसाचा त्या शक्तीशी परमात्म्याशी- कृतज्ञ होण्यासाठी केलेला, ‘निराकार’ परमेश्वर ‘साकार’ करण्यासाठी मांडलेला हा सारा पसारा. या परमेश्वराचं, अनंत-अपार शक्तीचं ‘ओंकार स्वरूप’ वेगळं नको?

त्या शक्तीनेच लाभलेल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार होऊन मानवानंच ‘देवरूप’ साकारलं.. माणसानंच देवाची साकार ‘निर्मिती’ केली! चतुर्भुज, अष्टभुज, दशभुज हे तर शारीरिक शक्ती दर्शविण्याचे विविध प्रकार. शंकरभक्त शक्तिमान रावण दशानन असला तरी दहा मानवी वा दानवी मुखांचा. पण शंकरपुत्र ‘गणपती’ तर बुद्धिदाता देव, म्हणजे त्याच्या स्वरूपांत असामान्य बुद्धिमत्ताच हवी. हत्तीची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती असाधारण. त्याच्या ‘सुपाएवढय़ा’ कानांत असंख्य सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं जाळं, त्यामुळे अतिदूरवरचे सूक्ष्मातिसूक्ष्म ध्वनी ऐकण्याची क्षमता. हत्तीची सोंड तर अतिसंवेदनशील. आजवरच्या संशोधनानुसार या सोंडेमध्येंच एक लाखाच्या आसपास संवेदनक्षम स्नायू विशिष्ट रज्जाबंधनांत बांधले असल्यामुळे सोंडेची अतुलनीय हालचाल सहज शक्य. साधं जमिनीवरचं गवताचं पातं सोंडेनं उचलून तोंडांत सारण्याच्या नाजूक कृतीपासून, महावृक्ष मुळापासून उचलून फेकून देण्याची क्षमता असलेली हत्तीची सोंड. त्या सोंडेतील स्नायूंच्या इन्फ्रा साऊंड कम्युनिकेशन शक्तीमुळे जमिनीला स्पर्श करून जमिनीअंतर्गत लहरींचा मागोवा घेत दूरवरच्या शत्रूचा सुगावा लागणारी हत्तीची सोंड! अन् बारीक परंतु तीक्ष्ण नजर असलेल्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागांतील अभेद्य शक्तिशाली ‘त्रिपुंड्राकारी’ गंडस्थळ! हत्तीच्या मस्तकातील या साऱ्या शक्तीचा उपयोग मात्र केवळ स्वरक्षणासाठी असतो. पोटासाठी हत्या हत्तीला अमान्य, त्यामुळे वन्यप्राणी असूनही हत्ती ‘शाकाहारी’ असतो. विद्या-कलांच्या या देवतेला पोटासाठी हत्या कशी शोभेल? तीव्र स्मरणशक्ती अन् बुद्धिमत्ता, ध्वनिग्रहण शक्ती, अतुलनीय सोंड अर्थात ‘शुण्ड’, तीक्ष्ण नजर, अभेद्य गंडस्थळ.. सारं एकत्रित असणारं एकमेव ‘गजमुख’! म्हणून चतुर्भुज मानवी देहावर गजमुखाची संकल्पना. नंतर या संकल्पनेभोवती विविध ‘कथा’ रचणं ही माणसाची -त्याच्या भक्तीची- मानसिक गरज. जशी भक्तीसाठी ‘मूर्ती’ ही देखील त्याच्या ‘द्वैत’ मानसिकतेची  प्राथमिक गरज. ती मूर्ती साकारण्यासाठी हा आकार, हा ‘साकार ओंकार’ महत्त्वाचा..

अकार कर्ण युगुल,

उकार शुण्ड विशाळ,

मकार गंड-मंडळ, त्रिपुंड्राकारे !

पण अशी ही मंगलमूर्ती सर्वाच्याच घरीदारी येणार कुठून?

अर्थातच गणपतींच्या ‘फॅक्टरींतून.’ घरोघरी जाण्यासाठी अन् सार्वजनिक उत्सवांसाठी इतक्या प्रचंड संख्येनं मूर्ती हव्या असतील तर गणपतींचा कारखानाच हवा. पनवेलजवळील ‘पेण’ हे अशा मूर्तीच्या ‘इंडस्ट्री’साठीच नावाजलेलं गांव. तसे प्रत्येक गावांतून-शहरांतून लहान-मोठे कारखाने असतातच. त्यांतून काम करणारे हजारो कलाकार असतात. अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यावर, महिन्याभराच्या आंतच येणाऱ्या दसऱ्याच्या सुमुहूर्तावर कलाकुसरीच्या हत्यारांची पूजा करून ‘पुढच्या वर्षी लवकर येणाऱ्या’ गणपतींची तयारी सुरू होते! आता पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत, अकरा महिने काम सुरू. त्यांतील शेवटचे दोन-तीन महिने तर युद्धाचाच प्रसंग. गणपतींची सुटकाच नसते कुठे जायला. ‘पुढच्या वर्षी लवकर’ यायला ते जातातच कुठे? बाप्पा आपल्यातच असतात, कारखान्यांत ‘घडत’ असतात. आपणच त्यांना आपल्या रोजच्या जगण्याच्या धावपळीत विसरलेलो असतो.. आपण ‘बिझी’ असतो!

बाप्पांचा हा ‘साकार’ प्रवासदेखील बघण्यासारखा असतो. अगदी साच्यातल्या गणपतीचादेखील. साच्यांत कालवलेली माती भरून साचे बांधून वाळवत ठेवायचे. माती वाळल्यावर साच्यातले अवयव मग मूळ देहाला जोडायचे. प्रत्येकाची सोंड मात्र वेगवेगळी हातावर करून गजमुखाला जोडायची. मग वस्त्रालंकार, दोन दात, एक अखंड-एक तुटका, मुकुटाची कलाकुसर. मग रंगकाम, त्यात आधी बॉडीकलर, मग इतर रंग, पितांबर, सोंडेवरची लाल रेषा, इतर बारीकसारीक तपशील अन् सर्वात शेवटी देवाचे डोळे! कुठल्याही मूर्तीचं देवत्व हे डोळ्यांत असतं. डोळ्यांत प्राण ओतण्यासाठी मात्र ‘नेत्र-तज्ज्ञ’ अर्थात ‘आय-स्पेशालिस्ट’च हवा! हे सारं प्रत्यक्ष शून्यातून निर्माण होताना बघतानादेखील भान हरपून जावं, असं बाप्पांचं ‘साकार’ रूप! इतक्या विविध प्रकारांच्या मूर्ती, त्यांची नांवं अन् वर्गीकरणदेखील गमतीशीर असतं. काही मूर्ती साचा बनविणाऱ्या मूळ कलाकाराच्या नावानं ओळखल्या जातात, तर काही त्यांच्या बाहय़ स्वरूपावरून. मग शिवरेकर, पेशवाई बैठक, मराठेशाही पगडी, टिळक पगडी, मल्हार पगडी, बालाजी मुकुट, आडवा पेशवा, जर्मन कोच, जर्मन प्रभावळ, मैसुरी, सिंहासनी, लालबागचा राजा, दगडू हलवाई.. हल्ली ‘श्री खंडेराया’, ‘बाजीराव’ गणपती (हा छोटय़ा-मोठय़ा पडद्याचा इफेक्ट!) एवढंच नव्हे तर ‘नाना पाटेकर’ गणपती, वगैरे अनंत प्रकार तयार होतात!

मोठमोठय़ा सार्वजनिक गणपतींचं काम मात्र ‘साचेबद्ध’ नसतं. इथं ‘इंजिनीयरिंग’ महत्त्वाचं. कालियाच्या मस्तकावर एका पायावर तोलून नर्तन करण्याच्या आविर्भावात उभा असलेला कृष्णरूपी गणपतीचा ‘तोल’ एरवी कसा साकारणार? प्रचंड फ्रेमवर्कमध्ये लोखंडी सळया, बांबू, गवती पेंढा, काथ्या, तागाचं कापड, ताडपत्री, अशा अनंत गोष्टीतून ‘साकार’ झालेल्या अशा गणपतीचं दहा दिवसांतलं रूप किती आकर्षक असतं! गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती घरीदारी जातात अन् जिथं बाप्पांची निर्मिती झाली ते सारे कारखाने, मंडप-शामियाने, शाळा, दुकानं संध्याकाळपर्यंत रिकामे होतात.. ‘खाली खाली कुर्सिया है, खाली खाली तंबू है, खाली खाली डेरा है.. बिना चिडीया का बसेरा है!’ तसा सारा प्रकार. मोकळे स्टॅण्ड्स, विखुरलेली मूर्तिकामाची हत्यारं, रंगकामाचे डबे, स्प्रे-पेंटिंगची मशीन्स, काही राहिलेल्या मूर्ती तर काही मूर्तीचे उरलेले भग्नावशेष, कुठे थकूनभागून कोपऱ्यांत झोपलेला एखादा कलाकार.. अन् आता भगभगीत वाटणारे प्रकाशाचे दिवे! आपलं आयुष्य तरी याहून निराळं कुठं असतं?

विसर्जनाच्या दिवशी या साऱ्या निर्मितीमागची, कलाकारांची सारी मेहनत अक्षरश: पाण्यांत जाते! मूर्तीचं विसर्जन करून घरी आल्यावरदेखील तेच. उदासवाणी आरास, उघडमीट करणारे निर्जीव भासणारे दिवे, रिकामे मखर, रिकाम्या चौरंगावर ठेवलेला नारळ.. बिना चिडीया का बसेरा है! या उत्सवाचं जे रूप, तेच जीवनाचं सारदेखील नसतं कां? मातींतून घडशी, मातीत मिळशी.. ‘एक दिन बिक जायेगा माटी के मोल’! असं असलं तरी जन्म-मृत्यूच्या मधलं हे अनमोल आयुष्य, मग ते बाप्पांच्या ‘दीड-पाच-सात-दहा’ दिवसासारखं कितीही काळाचं का असेना, ते सार्थकी लावण्यासाठी आहे, ही जाणीव करून देण्यासाठी, दर वर्षी न चुकता येणारा हा मांगल्याचा आनंदोत्सव.. म्हणूनच बाप्पांचं स्वागत आपण उत्साहानं करू या.. या, या, मंगलमूर्ती.. मोरया!
प्रभाकर बोकील – response.lokprabha@expressindia.com