News Flash

Lockdown Memories : मालवणच्या छोटेखानी फिल्ममेकर्सची पडद्यामागची कहाणी

लाॅकडाउन निगेटिव्हली न घेता पाॅझिटिव्हली घ्यायचं ह्या  विचाराला आम्हा तिघांचाही  कौल मिळाला आणि ...

प्रतिकात्मक छायाचित्र

ध्यानीमनी नसताना आम्ही मालवणात जाऊन लॉकडाऊनमध्ये अडकलो. सुरुवातीला खूप टेंशन आलं. प्लॅन केलेलं नसताना इतके दिवस गावात अडकणं ही गोष्ट मनाला घाबरवत होती. मुंबईतल्या घराचं काय होईल, लॅबचं काय, मशीन चालू होईल की नाही, स्टाफचं काय… अशा एक ना अनेक शंका मनात होत्या. पण मग परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन हा लॉकडाऊन निगेटिव्हली न घेता पॉझिटीव्हली घ्यायचा या विचाराला आम्हा तिघांच्याही मनाचा कौल मिळाला आणि आपापले छंद जोपासण्यासाठी चालून आलेल्या या सुसंधीचा आनंद उपभोगायचा या विचारांनी हेमंत आणि सलोनी हरखून गेले आणि आपापल्या परीनं फोटोग्राफीमध्ये बुडून गेले.

दिवस अलगद सरकत होते आणि आमच्या परड्यातील अनेक नवनवीन पक्षांची, किटकांची आम्हाला नव्यानं ओळख होत होती. जी इक्विपमेंट सोबत आणली होती त्यावरच जास्तीत जास्त चांगले फोटो काढण्याचा आनंद आम्ही घेत होतो. आता या गोष्टीतल्या पात्रांचा थोडक्यात परिचय असा –

हेमंत – हा गिरगावात वाढलेला. केमिस्ट्री ग्रॅज्युएट आहे. फोटो केमिस्ट्री हा आवडता विषय असल्यानं फोटो लॅबमध्ये त्यानं शिरकाव केला. लग्नानंतर स्वतःची लॅब काढली आणि या क्षेत्रात बघताबघता एक मानाचं स्थान मिळवलं. अथक मेहनती, जिद्दी, धडपड्या,  सतत काहीतरी नवीन करणारा अशी त्यांची ख्याती आहे. `अशक्य` हा शब्दच त्याच्या डिक्शनरीत नाही. फोटोग्राफीचा वेडा छंद. पण, जीवनाच्या रहाटगाड्यात त्याला मुरड घातली होती. आमची धाकटी लेक सलोनी वयाच्या 11-12 व्या वर्षापासून फोटोग्राफी कलेची झलक दाखवू लागली, तेव्हा त्याच्या फोटोग्राफीच्या वेड्या छंदानं पुन्हा उचल खाल्ली. तिच्याबरोबर त्यानं मुरड घातलेला छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याला जंगल, वेगवेगळी गावं, जागा फिरून Wildlife photography करण्याचं वेडच लागलं आणि या वेडाचा उत्तमबिंदू म्हणावा असा या छोट्याशा फिल्ममध्ये दिसतोय.

सलोनी – ही वडिलांसारखीच हट्टी आणि जिद्दी. मूलं ज्या वयात cartoon films बघतात त्या वयात ती तासनतास Animal planet, River Monsters आणि तत्सम कार्यक्रम बघायची. वयाच्या 11 व्या वर्षी हेमंतनं तिच्या हातात पहिला रोल कॅमेरा दिला. आणि अवघ्या 2 वर्षांत ती डिजिटल कॅमेरा लीलया हाताळू लागली. कुठल्याही जनावराची तिला कधी भीती वाटली नाही. घरातच गुरू मिळाल्यानं तिची प्रगती वेगानं झाली. वाचनाची भयंकर आवड आणि एकपाठी असल्यानं ती हेमंतची Wikipedia बनली. सध्या ती झेवियर्स कॉलेजमध्ये Zoology व Botany घेउन Ty BSc करत आहे. पुढं तिला wildlife conservationमध्ये करीअर करायच आहे.

सायली – अतिशय मनमिळावू, कष्टाळू आणि जिद्दी. रचना संसदमधून BFA केलं. कायम पहिल्या चारात असणाऱ्या सायलीनं स्वतःच्या मेरीटवर Academy of Arts University, San Francisco इथं अ‍ॅडमिशन मिळवली आणि या मे महिन्यात Master’s in Graphic design and Digital media पूर्ण केलं. तिथंही Best student म्हणून नावाजली गेली. Perfectionच्या बाबतीत सायलीचा हात धरणं कठीण.

केतकी – दुसरं कन्यारत्न झाल्यावर आपलं Paramedical career सोडून हेमंतबरोबर Businessमध्ये शिरली आणि तेव्हापासून लॅबच मॅनेजमेंट लीलया पेललं आहे. चित्रकला, वाचन व लिखाणाची खूप आवड. मुलींच्या प्रगतीकडं घारीसारखं लक्ष ठेवते. हेमंतच्या प्रत्येक कामात तिची बरोबरीची साथ असते.

तर पुन्हा वळूया आमच्या परड्यातल्या फोटो नाट्याकडं…

पाचवी साखळी संपायच्या दरम्यान सहज एक विचार मनात आला की, इतकी वर्षं आपण फक्त स्वतःच्या आनंदासाठी फोटो काढत होतो. यावेळी वेळ आहे तर हाच आनंदाचा खजिना सर्वाबरोबर का शेअर करू नये? या कल्पनेनं मग आमच्या विचारांना वेगळी चालना मिळाली. हजारो फोटोंमधून निवडक फोटो सिलेक्ट केले. मग त्याच्या दिनचर्येचा अभ्यास करून त्यांची एन्ट्री ठरवली. हा सगळा खटाटोप सलोनीचा. हेमंतच्या डोक्यात फ्रेम तयार झाली आणि त्या दोघांची मतं घेऊन चित्रानं त्याला शब्दरूप दिलं. एक छोटेखानी फिल्म बनवायचं ठरलं. स्टोरी तयार झाली. सारं मटेरिअल सायलीकडं USAला पाठवलं. ती एक सर्कसच होती. मालवणच्या धक्के खात चालणाऱ्या Internet connectivity वरून फाइल्स पाठवणं हे एक दिव्य होतं. त्यात काही फाइल्सच्या साईजमध्ये तडजोडी कराव्या लागल्या. हळूहळू तेही झालं.
आता प्रश्न आला तो voiceoverचा. मालवणात तर Audio dubbing ची काहीच सोय नाही. पण हरेल तो मालवणी कसला?? मध्यरात्री सामसूम झाल्यावर खोली बंद करून आम्ही अक्षरशः मोबाईलच्या voice recorderवर कॉमेंट्री रेकॉर्ड केली आणि तीही सायलीला पाठवली.

ही सगळी सांगड घालणं तसं अवघडच होतं. कारण, करायचं तर चौघांनी मिळून असं ठरलं होतं. पण आम्ही तिघं मालवणात. तिथं कुठल्याही सोई नाहीत आणि सायली सातासमुद्रापलीकडं अमेरिकेत. प्रत्येक वेळी तिच्याशी विचारविनमय करायचा तर तिची सकाळ व्हायची वाट बघावी लागत होती. मग गरजेनुसार बदल करावे लागत.
सायलीची खरी परीक्षा इथं चालू झाली. अनुभव नसताना पाठवलेले फोटो व तुकडया- तुकड्यांमध्ये केलेलं रेकॉर्डिंग मॅच करून फायनल फिल्म बनवायची होती. त्यात पक्षांचे आवाज टाकायचे होते. पण हे चॅलेंज तिने लीलया पेललं आणि खेळ-खेळात सुरू केलेली ही छोटीशी फिल्म (जी तयार करायला एकही पै खर्च झाली नाही की कुणाचीही मदत घ्यावी लागली नाही.) तुम्हा सर्वांसमोर सादर केली. या सादरीकरणानंतर अनेकांचे फोन, मेसेज आले. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यातल्या दोन प्रातिनिधीक प्रतिक्रिया –

डॉ. सर्वेश रायकर- आमचे शेजारी. आमच्या परड्यातून त्यांचं घर दिसतं लॉकडाऊनमुळं समोरासमोर भेट होत नसली तरी कुतूहलानं विचारायचे की दिवसभर काय एवढे फोटो काढता?? मग रोज काढलेल्या फोटोंची देवाणघेवाण चालू झाली. आता ही फिल्म बघून त्यांना झालेला आनंद काही औरच आहे. ज्या फोटोंचे ते साक्षीदार होते त्या फोटोंना असं रुपडं मिळालेलं बघून ते खूप खूष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, इतक्या वर्षांत त्यांना कल्पनाच नव्हती की इतके पक्षी आमच्या अवतीभवती आहेत…

नितीन वाळके – हे आमची ओळख नसतानाही फिल्म बघून कुतुहलापोटी कोण हा हेमंत सावंत याचा शोध घेत होते. शेवटी साळगावकरांकडून त्यांनी माझा नंबर घेतला. मालवणवरील फिल्म बघून झालेला आनंद त्यांना हेमंतपर्यत पोचवायचा होता. आमचं कौतुक करण्यात त्यांनी जराही कंजुषी केली नाही.

लॉकडाऊनमधल्या वेळेचा सदुपयोग म्हणून गंमतीगंमतीत केलेल्या कलाकृतीला शाबासकीची इतकी भरभरून थाप मिळेल, असा विचारही मनात आला नव्हता. तुम्हा सर्वांचं कौतुक, शाबासकी आणि आशिर्वाद मिळाले… मनाला उभारी वाटली. हुरुप वाढला… अजून काय हवं… – केतकी हेमंत सावंत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 11:30 am

Web Title: lockdown memories the behind the scenes story of malvans short filmmakers msr 87
Next Stories
1 डॉक्टरच खरे हिरो…
2 एक तरी वारी अनुभवावी…
3 ब्युटी पार्लरमध्ये काय असतं ?
Just Now!
X