28 January 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : सायकलवरून युरोप

सायकलवरून कोकणची सफर केल्यानंतर मला सायकल टुरिंगचं आकर्षण वाटू लागलं.

एकदा एखाद्याला सायकल चालवण्याचा चस्का लागला की सायकलच त्याला कुठेकुठे घेऊन जाते. अगदी युरोपातही..

सायकलवरून कोकणची सफर केल्यानंतर मला सायकल टुिरगचं आकर्षण वाटू लागलं. नेटवर क्रेझी गाय ऑन बाइक डॉट कॉम (https://www.crazyguyonabike.com) वर लोकांच्या सायकल सफरींच्या कथा वाचून आपणही अशी मोठी सफर करावी असा किडा वळवळू लागला. मग कधी तरी सायकलवरून युरोप पाहायचाच असा दृढनिश्चय झाला. माझा ट्रेकिंग गुरू, केदार आदल्याच वर्षी एकटाच इटलीला सायकल टूर करून आला होता. मग २०१७ मध्ये केदार, मी आणि आमचा सायकल भिडू अविनाश अशा तिघांनी युरोपची सायकल सफर करायचं ठरलं.

आता प्रश्न होता कुठं जायचं.. मग नेटवर अभ्यास सुरू झाला. युरोपमध्ये युरोवेलो नावाचे आंतरदेशीय सायकलमार्ग आहेत. ते खास मोठय़ा सायकल सफरी करण्यासाठी बनवलेले आहेत. हे मार्ग खास प्रेक्षणीय स्थळांच्या जवळून जातील अशी काहीशी रचना आहे असं समजलं.

प्रथम माझ्या डोक्यात अ‍ॅमस्टरडॅम ते म्युनिक असा ऱ्हाईन नदीकाठाने जाणारा युरोवेलो फिफ्टीन हा मार्ग घ्यायचा आणि म्युनिकला होणारा ऑक्टोबर फेस्ट पाहता येईल अशा तारखा घ्यायच्या असा विचार होता. पण केदारच्या पुढच्या टूरच्या तारखा ठरलेल्या असल्याने मेळ जमत नव्हता. केदारच्या मनात बरेच दिवस ईस्टर्न युरोप करायचं होतं. त्यातून मग प्राग ते बुडापेस्ट हा मार्ग निश्चित झाला. पाचेक महिने आधीपासून तयारीला सुरुवात झाली. तशा युरोपमध्ये सर्वत्र भाडय़ाने सायकली मिळतात. पण ते प्रकरण महाग पडलं असतं. म्हणून आम्ही आमच्याच सायकली न्यायचं ठरलं.

आता प्रत्येक दिवसाचा प्रवास आखायचा होता. आम्ही आधीच ठरवलं होतं की, उगाच घाई-गडबड करायची नाही. सायकल हे साधन आणि आसमंत अनुभवणं हा उद्देश होता. तेव्हा उगाच भारंभार अंतर कापत बसायचं नाही. सकाळी न्याहारीनंतर सुरुवात करायची आणि दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत ईप्सित स्थळी पोहोचायचं. जेणेकरून तिकडला भाग नीट पाहता येईल. मग मी बाईकमॅप डॉट नेट (bikemap.net) या संकेतस्थळावरून मार्ग अभ्यासायला सुरुवात केली. दर दिवसाचं अंतर ठरवताना त्या दिवशी एकूण किती चढ असेल व किती उतार असेल याचा अंदाज घेऊन किती किलोमीटर करायचे ते ठरवलं. शक्यतो एखाद्या मोठय़ा गावापर्यंत प्रत्येक दिवशी जाता येईल असं पाहिलं. म्हणजे राहण्याचा प्रश्न सुटला. असं करीत एकूण ५५०-६०० किमी अकरा दिवसात कापायचं ठरलं. एक दिवस प्राग पाहायला आणि एक दिवस व्हिएन्ना पाहायला असे मध्ये दोन दिवस मोकळे ठेवले.

आता राहण्याची सोय. केदारच्या डोक्यात कॅम्पिंग करायची कल्पना होती. पण मग तंबू, स्लीिपग बॅग आली. त्यामुळे सामान वाढलं असतं. मग तो प्लान रद्द केला. युरोपात हॉस्टेलची सोय छान आहे. एक तर स्वस्त आणि इतर प्रवाशांशी ओळख व्हायला उत्तम संधी. आणि हो, खास सायकलस्वारांसाठी अजून एक छान सुविधा नेटवर आहे. वॉम्र्सशॉवर्स डॉट ऑर्ग (Warmshowers.org) या साइटवरून देशोदेशीचे सायकल प्रवासी त्यांच्या शहरात येणाऱ्या इतर सायकल प्रवाशांची स्वतच्या घरी राहण्याची विनामूल्य सोय करतात. तेव्हा जमेल तिकडे असे चकटफू राहायचे, नाही तर हॉस्टेलमध्ये असा आमचा बेत होता. मग आमच्या वेळापत्रकाप्रमाणे आधी हॉस्टेल बुकिंग केले. मग सायकल यजमानांना केदारने मेल धाडायला सुरुवात केली. पण आम्ही तिघं होतो आणि दोनपेक्षा जास्त सायकलस्वारांची घरात सोय करणं बऱ्याच जणांना जमत नसल्याने शेवटी हॉस्टेलचा मार्ग पत्करला.

आता प्रवासाची आखणी झाली होती. व्हिसाही मिळाला. आता मोर्चा वळला सामानाकडे. परदेश-प्रवास म्हटलं म्हणजे आपल्याला भरपूर सामान घेऊन जायची सवय असते. पण आमचं ओझं आम्हालाच वाहायचं होतं. तेव्हा अगदी मोजकंच सामान घ्यायचं ठरलं. सायकल आणि तिची टूल्स चेक-इन बॅगेजमध्ये जाणार होती. त्याचंच वजन २३ किलो भरलं. म्हणजे विमानाच्या कमाल मर्यादेची पुरेपूर वसुली. मग कपडे सोबतच्या बॅगेत सात किलोमध्ये बसवायचे. कपडय़ांवरही रेशन आलं. शेवटी सामानाची यादी अशी झाली :

सायकलचे सामान

(एकूण वजन २३ किलो)

१.     खुद्द सायकल

२.     सायकलला लावायच्या दोन रिकाम्या बॅगा

३.     सायकलची हत्यारं- यात मल्टी टूल, स्क्रू ड्रायव्हर, पेडल काढायचा पाना, टायर काढायचे लिवर, एक पकड.

४.     जास्तीच्या दोन टय़ूब, पंक्चर पॅच, पंक्चर सोल्युशन, हवा भरायचा छोटा पंप

५.     दिवे

६.     पाण्याची बाटली

७.     हेल्मेट

पाठीवरच्या पिशवीतले सामान

(एकूण वजन सात किलो)

१.     सायकल चालवताना घालायला दोन जोड

२.     आतले कपडे दोन जोड

३.     एक स्वेटर

४.     एक रेन जॅकेट

५.     जरा बऱ्यातले टीशर्ट दोन

६.     कार्गो पँट दोन

७.     एक टॉवेल

८.     गोप्रो कॅमेरा आणि त्याच्या विविध जोडण्या

९.     चार्जर, सोलार बॅटरी, युरोपला चालेल असा प्लग

१०.    भरपूर प्लास्टिक बॅगा (कपडे वगरे भिजू नयेत म्हणून)

प्रवासात खर्चाला म्हणून मल्टी करन्सी कार्डवर ५०० युरो लोड करून घेतले. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड व काही डॉलर बरोबर ठेवले. आणि मुख्य म्हणजे प्रवासाचा विमा काढून घेतला.

मी केदार आणि अविनाशपेक्षा एक दिवस आधी निघालो. माझा प्रवास मुंबई अ‍ॅमस्टरडॅम आणि नंतर अ‍ॅमस्टरडॅम ते प्राग स्थानिक विमान कंपनी इझीजेटने होता. अ‍ॅमस्टरडॅमला आठ तास मिळणार होते. फावल्या वेळात अ‍ॅमस्टरडॅम शहरापर्यंत रपेट मारायचं ठरवलं. विमानतळावरून बाहेर पडलो, सायकल जोडली, त्यावर सामान चढवलं आणि शहरात निघालो.

विमानतळापासूनच सायकल ट्रॅक चालू होतो. आधी बाइक मॅप लावलं, पण ते गंडलं. शेवटी गुगल जिंदाबाद. गुगल मॅपने अगदी अचूक मार्ग दाखवला व अध्र्या तासात मी अ‍ॅमस्टरडॅममधील वॉडेल पार्क या बागेत पोहोचलो.

रविवार असल्याने वर्दळ होती. पण गोंधळ नव्हता. कारंज्याच्या आजूबाजूला गवतात उन्हं खात लोक पहुडले होते. अगदी लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व वयोगटातले लोक सायकल चालवत होते. तिकडेच एका हॉटेलमध्ये सॅन्डविच घेतलं आणि आजूबाजूची गंमत न्याहाळत रेंगाळत बसलो. साधारण दुपारी एक वाजल्यावर परत निघालो. जाऊन-येऊन २५ किमी सायकिलग केलं असेल. पण खड्डे नाहीत, हॉर्न नाही की प्रदूषणाचा त्रास नाही. अ‍ॅमस्टरडॅम म्हणजे खरंच सायकल पंढरी आहे. कोणीही सायकलभक्ताने एकदा तरी इकडे सायकलवारी करावीच.

अ‍ॅमस्टरडॅमवरून रविवारी संध्याकाळी पावणेसातला विमान होतं. खरं तर मी शहरात जास्त वेळ फिरू शकलो असतो. पण परत सायकल बॅगेत कोंबून चेकइन करायचं टेन्शन होतं. मग मी दोन वाजताच विमानतळावर पोहोचलो. सायकल परत खोलून परत पॅक करणं आलं. अर्धा-पाऊण तास त्यात गेला.

सायकल पॅक करून काऊंटरवर गेलो. बरीच गर्दी होती. मी रांगेत उभा राहिलो तर तितक्यात एक महिला कर्मचारी आली आणि म्हणाली, इतकी अवजड बॅग घेऊन रांगेत नको उभा राहू, प्रायॉरिटी चेक इनमध्ये चल. तिथे चेकइन झालं. आपल्या पुण्यातल्या विमानतळाप्रमाणेच इकडेही विमानात शिडीने जावं लागलं. या शिडीच्या दोन्ही कठडय़ाच्या भिंतींना चक्क सोलर पॅनल लावले होते. भारी कल्पना होती. नाही तरी या शिडय़ा उन्हातच असणार.

प्रागला पोहोचून बाहेर येईपर्यंत रात्रीचे साडेनऊ झाले होते. आता परत सायकल बांधून रस्ता शोधत २० किमी जाण्याचं त्राण नव्हतं. म्हणून उबर बुक केली. गाडीचालक एक तरुण चुणचुणीत मुलगी होती. पण तिला इंग्रजी येत नसल्याने प्रवास चिडीचूप झाला. एकदा लेन बदलताना तिचा अंदाज चुकला म्हणून मागून कोणी हॉर्न वाजवला. तिने मला दहा वेळा सॉरी म्हटलं. मनात म्हटलं, ‘‘बाई, तुझी चूक झाली हे मला कळलंही नाही. आम्हाला लेन पाळायची सवय नाही आणि उलट हॉर्न ऐकून मायदेशाची याद झाली म्हणून मीच तुझे आभार मानायला हवेत.’’ पण मी पुणेरी असल्याने आभार वगरे मानायला अवघडल्यासारखे होते. त्यामुळे हे सर्व मनातच.

हॉस्टेलवर पोहोचलो तर समोर जणू पुणेरी पाटी. नो युरो कॅश, नो कार्ड, ओन्ली क्रोना. आता आली का पंचाईत. माझ्याकडे युरो होते व कार्ड. रिसेप्शनिस्टला विचारलं, उद्या कॅश दिली तर चालेल का? तिने कठोरपणे आज रोख, उद्यापण रोखच असं सुनावलं. मग तिने जवळपासचं एटीएम कुठे असेल ते अगदी व्यवस्थित सांगितलं. नशीब रस्ता सांगताना तिने चुकीचा रस्ता सांगायचा पुणेरीपणा केला नाही.

तर एटीएममध्ये पहिलं कार्ड चालेना. हृदयाची धडधड थोडी वाढली. पण शांतपणे विचार केला की अगदीच वेळ आली तर जिथे कार्ड चालेल असं मोठं हॉटेल बुक करू. पण तशी वेळ आली नाही. दुसरं कार्ड चाललं. हजार क्रोना काढले. रस्त्यात एक पब दिसला. तिकडे मोर्चा वळवला. इथे गिऱ्हाइकाला आल्याबरोबर पाण्याऐवजी बिअर आवर्जून विचारतात. बिअर, चिकन आणि त्यावर बेकनचे तुकडे मागवले. जेवण भारी होतं.

केदार व अविनाश दुसऱ्या दिवशी दुपारी येणार होते. त्याआधी मला न्याहारीची सोय पाहायला हवी होती. हॉस्टेलमध्ये विशेष पर्याय नव्हता. मग चालत बाहेर पडलो. छान गुलाबी थंडी होती. कोवळ्या उन्हाची ऊब हवीहवीशी वाटत होती. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. मस्त दुतर्फा झाडे, मधल्या लेनमध्ये ट्राम लाईन आणि दोन बाजूना शिस्तीत जाणारी वाहने. रुंद आणि मोकळे पादचारी मार्ग. एकदम भारी वाटत होतं.

जवळपास दीड किलोमीटर चालल्यावर एक सुपर मार्केट लागलं. माझ्या मते सुपर मार्केटमध्येच त्या देशाची संस्कृती दिसते. कारण ग्राहकाच्या आवडीनिवडी जाणूनच सुपर मार्केटमध्ये मांडणी केलेली असते.

सुपर मार्केटमध्ये न्याहारी करून रूमवर आलो आणि सायकल बांधायला घेतली. इझीजेटने (विमानसेवा) बॅगेला फारच इजा पोहोचवली होती. तीन मोठी भोकं पडली होती. आत उघडल्यावर पाहिलं तर गोप्रोची हँडलबारला लावायची जोडणी तुटलेली. बाकी सायकल व्यवस्थित होती. सायकल लवकर जोडून झाली, पण मागच्या ब्रेकने भारी वैताग दिला. ब्रेक पॅड चाकाला खेटून राहिलं होतं. कितीही टय़ुिनग करून उपयोग होत नव्हता. शेवटी दीड तास खटपट केल्यावर सुधारणा झाली.

दुपारी दोनला केदार व अविनाश विमानतळावरून सायकल चालवत आले. ते येऊन स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. जेवल्यावर आम्ही चार्ल्स ब्रिज पाहायला निघालो. जाताना थोडा गोंधळ झाला. कारण मॅप जो रस्ता दाखवत होता तिकडे नो एन्ट्रीचा बोर्ड होता. मग त्याच भागात थोडे घुटमळलो आणि कसाबसा रस्ता मिळाला.

चार्ल्स ब्रिजचा भाग अप्रतिम होता. तिकडे बोट राइड घेतली. मग चार्ल्स ब्रिजवरून फेरफटका मारून परत निघालो. केदार व अविनाश प्रवासाने दमलेले होते. दुपारचं जेवण उशिरा झाल्याने रात्रीचं जेवण टाळलं. अविनाशने आणलेल्या भोपळ्याच्या घारग्यांवर ताव मारला, कॉफी प्यायलो आणि आता झोपायची तयारी केली.

अजून एक दिवस प्रागमधला विश्रांतीचा दिवस होता. या दिवशी प्रागदर्शन. आधी प्रागच्या ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये जायचं ठरलं. माझं बाइकमॅप अ‍ॅप गंडलं होतं म्हणून मग मॅप डॉट मी (map.me) वापरायला घेतलं. हे त्यातल्या त्यात बरं होतं. पण कधी कधी उशिरा सूचना देत होतं. त्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. एका गार्डनमधून सायकल ट्रॅक जात होता. तिकडे एक छान आकर्षक इमारत दिसली म्हणून केदार म्हणाला जाऊन पाहू या. गेलो तर काय सांगावं. आमच्या समोर प्रागचं विहंगम दर्शन उभं ठाकलं. शहरातून जाणारी व्लाटावा नदी (आम्ही गमतीने तिचं वाटलावा असं नाव ठेवलं होतं), त्यावरचे सात पूल, समोर प्रागचा किल्ला, अहाहा. दिल खुश हो गया.

ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये पोहोचेपर्यंत दहा वाजले होते. पोटात कावळे कोकलत होते. हा परिसर पर्यटकांनी नुसता फुलला होता. तिकडे रस्त्यावर हातगाडय़ांवर विविध पदार्थ विकत होते. स्वस्त वाटले म्हणून एक बटाटय़ाचं सॅलड, एक सोसेज आणि एक हॅम स्टेक घेतलं. तर बिल झालं ८०० क्रोना! हा हिशेब काही जुळेना. चौकशी केली तर म्हणे रेट लिहिलेला होता तो १०० ग्रॅम वजनाचा होता आणि डिशचं वजन त्याहून जास्त होतं. म्हणजे आम्ही टुरिस्ट ट्रॅपमध्ये फसलो होतो. जेवण ओके होतं.

ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये एक घडय़ाळ आहे, त्यात दिवसाच्या प्रत्येक ठोक्याला एक खिडकी उघडते व त्यातून काही धर्मगुरूंच्या प्रतिकृती डोकावून जातात. तसंच एक हाडाचा सापळा ठोके वाजवतो. ते पाहिलं. मग आम्ही नुसतेच गल्ली-बोळांतून भटकत होतो. जरा दमलो असं वाटलं तेव्हा नदीकाठच्या गवतावर मस्त ताणून दिली.

झोप झाल्यावर मग पेट्रीन नावाची एक टेकडी आहे तिकडे गेलो. टेकडीवर जायला सायकल ट्रॅक होता. पण त्याचा चढ इतका भयानक होता की सिंहगड, पाबे घाटातले चढपण सोपे वाटतील. धापा टाकत तो पार पाडला. पण वर गेल्यावर परत शहराचं विहंगम दृश्य डोळ्यांचं पारणं फेडून गेलं. वर प्राग कॅसल होता. त्याला बगल देऊन आम्ही दुसऱ्या मार्गाने खाली उतरलो.

आता परत थोडी भूक लागली होती. इकडे टड्रलनिक (trdelnik) नावाचा एक प्रकार मिळतो. नळकांडय़ासारख्या दिसणाऱ्या या गोड ब्रेडमध्ये आईस्क्रीम वगरे घालून खायचे. ही झेक डेलिकसी आहे. आम्ही भटकत असताना मी हा प्रकार कुठे मिळतो ते पाहून ठेवलं होतं. फसू नये म्हणून रेटही पाहून घेतले. पण प्राग कॅसलवरून उतरताना एक दुकान मिळालं. तिकडे पिझा आणि टड्रलनिक (trdelnik) मिळत होतं. म्हणून तिकडेच थांबलो. टड्रलनिक (trdelnik) ची चव मस्तच होती.

नंतर परत चार्ल्स ब्रिजचा फेरफटका मारला व वेनकेस्लास स्क्वेअर (Wenceslas Square) कडे निघालो. इकडली एक एक इमारत पाहण्यासारखी. त्यांची रचना, कोरीव काम अगदी वाखाणण्यासारखं. आणि पक्ष्यांच्या विष्ठेने खराब होऊ नये म्हणून त्या कोरीव कामावर पारदर्शक जाळी लावली होती.

गर्दी पाहून आम्ही वेनकेस्लास स्क्वेअर (Wenceslas Square)  पर्यंत जायचा बेत रद्द केला व हॉस्टेलवर परत जायला निघालो. आता प्रागच्या रस्त्यांचा अंदाज चांगलाच आला होता. त्यामुळे सराईतपणे सायकल चालवणं जमत होतं. सिटी सेंटरवरून हॉटेलकडे जाताना एक टेकडी पार करावी लागते. परत तीव्र चढ. पण वरून डोळ्यांचे पारणे फेडणारा व्ह्य़ू होता. या टेकडीवर एक बार होता व गार्डनमध्ये आरामखुच्र्या टाकून लोक मस्त बिअरचे घुटके घेत होते. आपल्याकडे लोक जसा चहा ‘मारतात’ तसं इकडे लोक बिअर ‘मारतात’. काही लोक बिअर पीत बसले होते, काही आपल्या कुत्र्यांना फिरवत होते. काही आया मुलांना खेळायला म्हणून घेऊन आल्या होत्या. काही लोक पर्वती चढतात तसं टेकडी धावत चढून उतरायची आवर्तनं करीत होते. तरुण पोरं स्केटबोर्डवर स्टंटबाजी करीत होती. पण कुठेही गोंधळ नाही. अगदी मज्जानु लाइफ चाललं होतं. अनेक वर्षांचा नाझी व कम्युनिस्ट राजवटीचा जुलूम सहन केलेली हीच का ती जनता, असा प्रश्न पडला. अगदी आत्ता आत्तापर्यंत रेशिनग जेथे चालायचं तो हा देश आता मुक्त अर्थव्यवस्था अगदी एन्जॉय करतोय असं वाटून गेलं.

थोडं पुढे गेल्यावर गवतावर काही लोक डोंबारी करतो तसं दोरीवर तोल सांभाळत चालायचा प्रयत्न करीत होते. एक ग्रुप सर्कशीत दाखवतात तसं जिम्नॅस्टिक करायचा सराव करीत होता, तर काही मुलं पायाला उंच िस्प्रगच्या काठय़ा लावून उंच उडय़ा मारायचा खेळ खेळत होती. हे खरं प्राग, जे कुठलीही टुिरग कंपनी कधी दाखवत नाही.

एकूण दिवस मस्त उनाडण्यात गेला. आता बुधवारपासून सायकल ट्रिप चालू होणार. दोनच दिवसांत मला या शहराने लळा लावला.

बुधवारी सकाळी सहा वाजता उठून आम्ही सामानाची बांधाबांध सुरू केली. आज प्राग सोडायचं होतं. प्राग सोडतानाच मोठा चढ लागला. पण ताजेतवाने असल्याने निवांत पार पाडला. सुरुवातीचा रस्ता नदीकाठावरून असल्याने छान वाटत होतं. सकाळी लोक धावायला, सायकल चालवायला बाहेर पडलेले होते. मस्त माहोल होता.

आमचा मार्ग हमरस्त्यावरूनच होता. त्यामुळे बस, ट्रकची रहदारी खूप होती. पण आमच्या सायकलींनी आधीच कात्रजचा घाट पाहिल्यामुळे त्या बिचकल्या नाहीत. उलट इकडले ड्रायव्हर लोक भारी सौजन्य दाखवणारे निघाले. हॉर्न न वाजवता शांतपणे आम्ही बाजूला व्हायची वाट पाहत होते. आम्हालाच चुकल्याचुकल्यासारखं वाटायला लागलं.

प्राग शहर मागे पडल्यावर रहदारी थोडी कमी झाली आणि लॅण्डस्केपही बदलला. दुतर्फा मशागत केलेली जमीन, दूरवर पसरलेल्या टेकडय़ा, निरभ्र आकाश हे सर्व पाहताना रस्त्याच्या चढ-उतारामुळे पडणारे श्रम सार्थकी लागले असं वाटलं.

३० किलोमीटर गेल्यावर आम्ही कॉफीसाठी थांबलो. पेस्ट्रीजही खाल्ल्या. पाणी भरून घेतलं. मग पुढची मार्गक्रमणा सुरू झाली. थोडे पुढे गेलो तर माझ्या सायकलने मान टाकली. गिअरची केबल तुटली होती. नशिबाने केदारने एक जास्तीची केबल ठेवली होती. त्यानेच केबल बदलून दिली. यावरून घेतलेला धडा म्हणजे सायकल टुिरग करायचं म्हणजे स्वतबरोबरच सायकलचाही फिटनेस महत्त्वाचा. आणि बेसिक दुरुस्तीचे ज्ञानही महत्त्वाचे. असो.

तर गिअर केबल बदलल्यावर आम्ही पुढे कूच केले. २५ किमी राहिले होते व उतार सुरू झाला. तिकडे एका वळणावर उलट दिशेने येणारा सायकल टुरिस्ट भेटला. हा एकटाच व्हिएन्नावरून प्रागला निघाला होता. त्याने व्हिएन्ना- प्राग- ग्रीनवे हा सायकलसाठी आखलेला मार्ग घेतला होता. आम्हालाही हाच मार्ग हवा होता, पण आमच्या मॅपच्या अ‍ॅपने आम्हाला दुसऱ्या रस्त्यावरून नेलं. त्याने त्याच्याकडील छापील नकाशा आम्हाला दिला. थोडय़ा गप्पा, त्याच्या टुिरग सायकलची चौकशी करून आम्ही पुढे निघालो.

आता आजूबाजूचा परिसर कमालीचा बदलला होता. गर्द पाइनची झाडं, बाजूला छोटा तलाव असा मस्त रस्ता होता. आणि हो. कुठेही खड्डे नाहीत, हे भलतंच सुख होतं.

लहानपणी आम्हाला चित्रकलेच्या तासाला निसर्गचित्र काढायला सांगितलं की बऱ्याच जणांचं पेटंट चित्र म्हणजे दोन शेजारी शेजारी टेकडय़ा आणि मध्ये उगवणारा सूर्य. मग बाकी आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे, नदी, पक्षी, झाडे झुडपे असायची. निसर्गचित्राच्या या अशा कल्पनेचा जनक नक्कीच झेक रिपब्लिक देशाचा असावा असं माझं ठाम मत आहे. एकामागून एक टेकडय़ा आणि दोन टेकडय़ांच्या मध्ये वसलेली टुमदार गावं दिसत होती. गाडीतून फिरताना हे मस्तच वाटेल, पण सायकलवरून जाताना मात्र घाम फुटतो. एरवी पुण्यात ५० किमी एवढं अंतरही हातचा मळ वाटतो. पण एक तर इकडे सारखे चढ-उतार व त्यात आमच्या सायकलचं वजन, सामानाचं वजन आणि त्यात स्वतचं वजन असं एकूण १०० किलो वजन आम्ही ओढत होतो. त्यामुळे आमचा वेग १४ किमीच्या वर जायला तयार नव्हता.

पण आम्हाला कुठे कोणतं मस्टर गाठायचं होतं? मस्त रमतगमत आजूबाजूचा परिसर न्याहाळत आमचं सायकिलग चालू होतं. कधी डांबरी रस्ता तर कधी गर्द झाडीतून जाणारी पायवाट. कधी दुतर्फा सफरचंदाची झाडं आणि रस्त्यावर सफरचंदांचा खच पडलेला. आमची मधल्या वेळच्या खाण्याची चकटफू सोय. कधी जीवघेणा चढ तर कधी सुखावणारा उतार. कधी लहान-मोठी गावं आणि त्यातली टुमदार घरं तर कधी लांबवर पसरलेली शेतं. पहिले दोन दिवस सोडले तर हवापण बहारदार होती. एक दिवस भुरभुरा पाऊस होता. पूर्ण भिजलो, पण सायकल चालवत असल्याने थंडी वाजली नाही. मध्ये एक दिवस इटलीचा एक सायकलस्वार भेटला. तो एकटाच व्हिएन्नावरून प्रागला निघाला होता. सायकलस्वारांची एक खासियत आहे. एकदा तुम्ही सायकलस्वार झालात की दुसरा सायकलस्वार भेटल्यावर त्याबद्दल नकळतच आपुलकीची भावना येते. मग त्यात जात, धर्म, देश काही आड येत नाही.

प्रवासात आम्ही बुक केलेली हॉटेल्सही मस्त होती. एके ठिकाणी तर बंगल्यात सोय झाली होती. मालकीण व तिचा तरुण मुलगा तळमजल्यावर आणि वरच्या दोन बेडरूम्स, लििवग रूम, किचन आमच्या दिमतीला. घर खूपच कलात्मकरीत्या सजवलेलं. तिची बाग तर केवळ अप्रतिम. आणि तिने स्वत:हून खपून साकारलेली. मागे ग्रीन हाऊस. त्याच्या िभती काचेच्या बरण्या रचून बांधलेल्या. जेणेकरून आत सूर्यप्रकाश पोहोचेल. निघायच्या दिवशी सकाळी मालकीण आम्हाला भेटायला आली. तिने फ्रिझमधून एक पेय काढून आम्हाला देऊ केले. त्याने म्हणे पचनशक्ती सुधारते. हे पेय म्हणजे स्लिवोवाइस (slivovice) नावाची प्लमची ब्रॅण्डी होती. आता तिला नाराज कशाला करा, म्हणून आम्ही त्याचे शॉटस् घेतले. सकाळी सकाळी अल्कोहोल म्हणजे जरा अतीच. पण पाचक आहे म्हणजे औषधच अशी आम्ही स्वतची समजूत काढून घेतली.

प्राग ते व्हिएन्ना या मार्गावर बऱ्याच गावांनी पुढाकार घेऊन ग्रीनवे नावाचा सायकल मार्ग तयार केला आहे. हा रस्ता काही ठिकाणी गाडीरस्त्यावरून तर काही ठिकाणी स्वतंत्र जातो. आम्ही प्रागपासून हा मार्ग शोधत होतो, पण आता तिसऱ्या दिवसापासून याच्या पाटय़ा दिसू लागल्या. मग तो मार्ग धरला. पाइन वृक्षांच्या जंगलातून रस्ता जात होता. बरेच ठिकाणी स्किइंगचे मार्गपण काढलेले होते. म्हणजे थंडीत इकडे बर्फ होतो तर. एक मोठा लांब उतार लागला. त्यावरून ३०-३५ किमी वेगाने सायकली घरंगळत गेल्या. सुख म्हणजे काय याची प्रचीती आली.

पण पुढे स्लोव्हानाइस नावाच्या गावात ग्रीनवेच्या पाटय़ा गंडल्या. मग मोबाइल मॅपला शरण जाऊन त्याने सुचवलेल्या मार्गाने आम्ही जाऊ लागलो. आता नवीन समस्या. हा मार्ग पुढे सहा किमीवर बंद असल्याची पाटी मी पाहिली. मी केदारला तसं सांगितलं. पण केदार आत्मविश्वासाने म्हणाला, घाबरू नको, सायकल नक्की जाईल. मला ते पटलं नसलं तरी म्हटलं चला पाहू काय होतं ते. केदारला जास्त अनुभव आहे तेव्हा आपण मध्ये लुडबुड करू नये.

सहा किमीवर रस्ता पूर्ण खोदलेला होता. आणि मध्ये नदी. झालं, म्हणजे आता परत फिरा. पण केदारने तिकडल्या कामगारांना विचारलं तर त्यांनी बाजूने यायची खूण केली. फक्त घोटभर पाण्यातून सायकल काढायची होती. त्यामुळे केदारकडून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे भाषा येत नसली तरी तोंड उघडायचं. आम्ही आपली भाषा झेक लोकांना समजत नाही या गृहीतकावरच अडकलेले पण केदार बिनधास्त जाऊन त्यांच्याशी संभाषण साधत होता.

साधारण चार दिवस रोज सरासरी ६० किमी सायकिलग करून आम्ही चौथ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता झोन्ज्मो (zonjmo) गावी पोचलो. झेक रिपब्लिकमधला हा शेवटचा मुक्काम. हे साधारण ११०० साली वसलेलं झेक आणि ऑस्ट्रिया सीमेजवळचं गाव. या गावाचं वैशिष्टय़ म्हणजे इकडे सुमारे २७ किमीचे भूमिगत मार्ग आहेत. काही ठिकाणी तर सरपटत जावे लागते. हे पाहायला वेगवेगळ्या टूर्स निघतात. पण आम्ही जाईपर्यंत वेळ निघून गेली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. त्यात त्या दिवशी १०० किमी असा लांबचा पल्ला होता. त्यामुळे सायकिलग न करता सरळ ट्रेन वा बसने जावं का यावर चर्चा करत न्याहारी झाली. न्याहारी करता करता आम्ही ट्रेन, बसचे पर्याय शोधूनही ठेवले होते. शेवटी केदार म्हणाला, सरळ पॅडल मारायला लागू. पाऊस तर पाऊस. एव्हाना जोर कमी वाटत होता. मग आम्ही सायकलींवर टांग टाकून निघालो.

अध्र्या तासातच आमच्या मॅपने आम्हाला जंगलातल्या रस्त्यात नेले. हा रस्ता जवळपास सात किमी पूर्ण जंगलातून होता. काही ठिकाणी तर आम्हाला झाडांच्या फांद्या वेगळ्या करून पुढं जावं लागत होतं. रेल्वे-बसने न जाण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला.

साधारण अडीच तासांनी आम्ही झेक रिपब्लिकची बॉर्डर सोडली व ऑस्ट्रियामध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रियामध्ये शिरल्या शिरल्या आम्हाला आसपासच्या वातावरणात काही बदल जाणवू लागले. झेकमध्ये मका, सूर्यफुलांची शेती अधिक तर ऑस्ट्रियामध्ये भोपळे, द्राक्ष जास्त दिसले. झेकमधल्या गावातल्या रेस्टॉरंटमध्ये मुख्यत्वे कष्टकरी लोक बिअर पिताना आढळायचे. ऑस्ट्रियाच्या गावांमध्ये जास्त करून उच्चभ्रू लोक दिसले आणि त्यांच्या हातात वाइन. एकूणच ऑस्ट्रियामध्ये सुबत्ता जास्त असावी असं वाटलं.

आता आमची चढ-उताराची आवर्तनंही कमी होऊ लागली आणि जरा बरा स्पीड  मिळू लागला. इथले  सृष्टिसौंदर्य तर काय वर्णावे? साधारण दीड वाजता आम्ही जेवायला थांबलो. तीन वाजता परत सायकलवर टांग मारली. आता व्हिएन्ना फक्त ३० किमी होते. साधारण दहा किमी गेल्यावर डॅन्यूब नदीचं दर्शन झालं आणि या नदीच्या मधेच घुसलेल्या जमिनीवरून साधारण आठ किमीचा सायकल ट्रॅक. म्हणजे दोन्ही बाजूला पाणी आणि मधून सायकल ट्रॅक. ही खऱ्या अर्थाने जॉय राइड होती. संध्याकाळी पाच वाजता आम्ही आमच्या हॉटेलात पोहोचलो.

व्हिएन्ना. मोझार्ट, फ्रॉइड, आइन्स्टाइनसारख्या आसामींनी इथे वास्तव्य केलेलं. पाश्चिमात्य संगीताची आणि कॉफी संस्कृतीची पंढरी. जगाच्या सर्वोत्तम राहणीमानाच्या दृष्टीने केलेल्या पाहणीत पहिल्या क्रमांकावरचं हे शहर. आम्ही एक दिवस हे शहर पाहण्यासाठी राखून ठेवला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातच बरीचशी प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि तिकडे फ्री सिटी वॉकिंग टूर मिळते ती आम्ही घेतली. या टूरचे फायदे म्हणजे आधी पसे भरायचे नाहीत. गाइड आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो व माहिती देतो. टूर आवडली तर त्याला टीप द्यायची, नाही तर नाही.

पैसे न देता टूर असली तरी गाइडला ठरावीक परीक्षा देऊन मगच अशी टूर आयोजित करायचं प्रमाणपत्र मिळतं. गाइडने खूप छान माहिती दिली. व्हिएन्नामध्ये ऑपेराचे शो होतात. ते खूप महाग असतात आणि आधीपासून तिकिटं काढायला लागतात. पण शोच्या ९० मिनिटे आधी उभं राहून ऑपेरा पाहायला तिकीट मिळतं. अवघ्या साडेतीन युरोमध्ये. म्हणून मग आम्ही संध्याकाळी तिकीट काढायला यायचं ठरवलं. तेव्हाच इकडल्या सर्वात जुन्या अशा सेन्ट्रल कॅफेमध्ये कॉफी प्यायचं ठरवलं. खुद्द आइन्स्टाइन इकडे कॉफी प्यायला यायचा म्हणे.

पण सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे थोडय़ाच होतात.. आम्ही सायकलवरून दुपारी ऑपेरा हाऊसला निघालो खरे, पण आम्हाला  चक्क चकवा लागला. ऑपेरा हाऊसला दोनदा प्रदक्षिणा घातली असेल पण काही केल्या ते सापडायला तयार नाही. या वेळी शहरातून अक्षरश: बेभान होऊन सायकल चालवली. शेवटी ऑपेरा हाऊस मिळालं तेव्हा उशीर झाला होता. आमची संधी हुकली. सेन्ट्रल कॅफेपण काही कारणांमुळे बंद होतं. तेही राहिलं. तरी शहरात भरपूर सायकिलग करायला मिळालं. एरवी मुद्दाम जाऊन पहिले नसते असे वेगवेगळे भाग पाहायला मिळाले. व्हिएन्नामधल्या साध्या इमारतीसुद्धा पाहण्यासारख्या. प्रत्येक इमारतीवर काही ना काही नक्षीकाम केलेलं. खिडक्यांमध्ये रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली झाडं. अगदी दिव्याचे खांबसुद्धा अशा फुलझाडांनी मढवलेले. आखीव-रेखीव आणि स्वच्छ गुळगुळीत रस्ते. गर्दी असली तरी शिस्तबद्ध रहदारी. पोलीस आजूबाजूला नसले तरी शिस्त कायम होती. इथलं राहणीमान सर्वोत्तम का असेल त्याची प्रचीती आली.

एक दिवस आराम केल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. आता चढ जवळपास नाहीसेच झाले होते. वास्तविक व्हिएन्नापासून डॅन्यूब नदीच्या काठाकाठाने सायकल रस्ता जातो. पण पुण्याचा रिक्षावाला जसं बाहेरगावच्या प्रवाशाला उगाच घुमवतो, तसं मॅपने आमच्या बाबतीत केलं. आणि आम्हाला पूर्ण शहर घुमवून नेलं. पुढे ३० किमीवर आम्ही न्याहारीसाठी थांबलो असताना तिकडे एका आजोबांनी खाणाखुणा करीत आम्हाला सांगितलं की, पुढे फेरी मिळेल आणि तिकडून नदी पार केलीत की कमी रहदारीचा रस्ता मिळेल. काही ओळख ना पाळख. पण आम्ही उगाच गर्दीचा रस्ता घेतलाय हे लक्षात आलं म्हणून भाषेचा अडसर असतानासुद्धा मुद्दाम बोलायला आले आणि रस्ता सुचवला याचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं.

आमच्या सायकल सफरीचा रोजचा वृत्तान्त आम्ही एका  वेबसाइटवर टाकत होतो. तो वाचून स्लोवाकियात राहणाऱ्या मृणालिनी आणि निशांत साळवे या मराठी जोडप्याने आम्हाशी संपर्क साधला. आम्ही त्यांच्या ब्राटिस्लावा गावातून जाणार हे त्यांनी ताडलं होतं. म्हणून त्यांनी भेटायची इच्छा दर्शवली आणि त्याप्रमाणे आमची भेट झालीही. गेली सहा-सात र्वष ते तिकडे राहतायत. इतक्या दूर मराठी माणसं भेटल्यावर होणारा आनंद केवळ अवर्णनीय.

आमचं हॉटेल ब्राटिस्लावाहून २५ किमीवर होतं. रस्ता पूर्ण नदीकाठाने. एका बाजूला लहानलहान गावं आणि दुसऱ्या बाजूला डॅन्यूब नदीचं विशाल पात्र आणि मध्ये बंधाऱ्यावर केलेला सपाट सायकल रस्ता. त्यावर बऱ्याचदा आम्हा तिघांशिवाय कोणी नाही म्हणजे सुखाचा परमावधी. हॉटेलवर पोहोचलो तर तिकडे अविनाशचा जर्मन मित्र खास आम्हाला भेटायला आलेला. एकूण त्या दिवशी भेटीगाठींचा योग होता.

बुडापेस्टच्या अलीकडे ५० किमी अ‍ॅस्टरगोम नावाचं एक टुमदार गाव लागतं, तिकडे आमचा एक दिवस मुक्काम होता. घरमालकाचा आम्हाला निरोप होता की, त्याचं गावात दुकान आहे, तिकडे चावी मिळेल. आम्ही पोहोचलो तेव्हा म्हणाला, अजून साफसफाई होतेय. त्याने सुचवलं की, तोपर्यंत थोडं फिरून या. त्यानेच जेवायचं छान घरगुती ठिकाणही दाखवलं. जेवून शहर बघायला गेलो. इकडे एक किल्ला होता. साधारण पर्वतीपेक्षा थोडा बुटका डोंगर. वरून शहराचं दृश्य मस्त दिसत होतं. समोरच्या डोंगरावर एक पुरातन चर्च. दुसऱ्या बाजूला डॅन्यूब नदी आणि पलीकडे स्लोव्हाकिया. स्लोव्हाकियामध्ये उंच इमारतीचं जंगल आणि हंगेरीच्या बाजूला छान टुमदार कौलारू घरं. एका सीमारेषेने केवढा फरक केलेला.

मालकाबरोबर घरी गेलो. आम्ही ज्या गडावरून गेलो त्या गडावरच ते घर होतं. घर केवळ अप्रतिम. आमच्यासाठी त्याने घरगुती वाइन आणून दिली. आम्हाला संध्याकाळी सूर्यास्त कुठून पाहायचा ते दाखवून ठेवलं. खूप बोलका होता. िहदीत शुक्रिया म्हणून निघून गेला.

संध्याकाळी आम्ही सूर्यास्त पाहायला निघालो. या सनसेट पॉइंटवर आम्हा तिघांशिवाय कोणी नव्हतं. इतक्या शांतपणे सूर्यास्त शेवटी कधी पाहिला होता ते आठवत नाही. स्लोव्हाकियाच्या क्षितिजावर सूर्य मावळला आणि आम्ही कृतकृत्य होऊन निघालो.

बुडापेस्ट हे आमच्या सायकल सफरीचं शेवटचं ठिकाण. इकडून मी पुढे ट्रेनने जर्मनीला निघणार होतो. केदार आणि अविनाश आज एका स्थानिक सायकलिस्ट मुलीकडे राहणार होते. ही आयर्नवुमन स्पर्धा जिंकलेली मुलगी होती. पुढच्या वर्षी तिला सायकलवरून जगभ्रमण करायचं आहे. तिने केदारची वॉर्मशॉवरवरची पोस्ट वाचून आपल्या घरी राहण्याची सोय होईल असं कळवलं होतं. आम्ही तिच्या घरी बॅगा टाकून मग जेवायला गेलो.

याच वॉर्मशॉवरवरून एका अँड्रस नावाच्या सायकलिस्टने केदारला मेल केला होता. त्याने आम्हाला शहराची सायकल सफर घडवून आणायची तयारी दाखवली होती. त्यानुसार तो आम्हाला एके ठिकाणी भेटायला आला. त्याच्याबरोबर आम्ही शहरात सायकल बिनधास्त दामटली. बुडापेस्टमध्ये फिरताना मला वाटून गेलं की एखाद्या रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू असताना मुंबईतला फोर्ट, दादर टी टी भाग जसा दिसेल तसं हे शहर आहे.

संध्याकाळी मग अँड्रेसने आम्हाला स्टेशनवर सोडलं. केदार व अविनाशच्या मदतीने सायकल परत बॅगेत टाकून आमच्या या सफरीची सांगता झाली.

या ११ दिवसांत आमचा एकूण ७५० किमी प्रवास झाला. चार देशांच्या राजधानी पाहून झाल्या. प्रत्येक मोठय़ा शहरात सार्वजनिक वाहतुकीवर भर होता. मेट्रो, बस, ट्राम आणि भाडय़ाच्या सायकलींची सुविधा प्रत्येक ठिकाणी होती. या प्रत्येक शहरातून नदी खळाळत वाहत होती आणि नदीकाठाचा वापर कल्पकतेने गार्डन, पार्क, जॉिगग ट्रॅक अशा सुविधा पुरवून केला होता. खऱ्या अर्थाने ही शहरं स्मार्ट सिटी संकल्पना राबवत होती.

प्रवासात खूप छान अनुभव आले. इतर सायकल टुरिस्ट भेटले. व्हिएन्नात भेटलेलं एक स्पेनचं जोडपं दोन महिने डॅन्यूब नदीच्या काठाने प्रवास करीत होतं. चार फ्रेंच विद्यार्थी भेटले. ते पॅरिस ते बुडापेस्ट सायकल सफर करीत होते. त्यांच्या सायकली बऱ्यापकी जीर्ण झालेल्या. फोन तुटलेला. तरी बिनधास्त चालले होते. स्थानिक लोक भेटले. सकाळी सकाळी ब्रॅण्डी पाजणारी आजी, सायकल रस्ता आपणहून सांगणारे आजोबा, एके ठिकाणी आम्ही रस्ता विचारायला  गेलो असताना भेटलेले स्लोवाकियन आजोबा तर इतके खूश झाले होते की, मोठय़ा आवाजात आम्हाला त्यांच्या भाषेतून रस्ता समजावून सांगू लागले. काही कळत नव्हतं, पण त्यांचा उत्साह पाहून आम्ही माना डोलावत होतो. आम्ही निघताना त्यांनी आम्हाला त्यांच्या बागेतून बळे बळे टोमॅटो काढून दिले. एक एक टोमॅटो हातात मावेना इतका मोठा. नेहमीप्रमाणे पर्यटन केलं असतं तर असे अनुभव कधीच आले नसते. एखादा प्रदेश पाहणं आणि तो अनुभवणं यातला फरक आम्हाला या सायकल सफरीने दाखवून दिला.
निरंजन कऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com / @nkarhade

First Published on October 18, 2017 5:52 pm

Web Title: lokprabha 2017 diwali special issue europe tour on cycle
Next Stories
1 लोकप्रभा दिवाळी २०१७ : पुरा विदा कोस्टारिका
2 लोकप्रभा दिवाळी २०१७ : ‘तुमचा आराम’ हाच उद्योग
3 लोकप्रभा दिवाळी २०१७ : फिटनेसचा बिझनेस
Just Now!
X