# ट्रेण्डिंग
बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या स्थूलपणामुळे लोकांना फिटनेसची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे. आणि त्याचा फायदा घेऊ पाहणारी मोठी इण्डस्ट्री उभी राहिली आहे.

‘‘आम्ही एका आठवडय़ात ५० किलो वजन कमी केलं..’’

हे वाक्य वाचून दचकलात ना? पण हे वाक्य स्वत:ला आदरार्थी संबोधणाऱ्या कुणा महाभागाचं नाही. ही आहे एका फिटनेस सेंटरची जाहिरात. तिथे येणाऱ्या पाच—पन्नास लोकांनी मिळून आठवडय़ाला ५० किलो वजन कमी केलं असं त्यांना सांगायचंय. अर्थात हे पाचपन्नासजण म्हणजे देशाच्या कुठल्यातरी राज्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातले लोक. वजन कमी करण्याच्या उद्योगात तेच नाही तर जगभरात असे लाखो लोक सध्या गुंतलेले आहेत. फिटनेस, वेट लॉस, बीएमआर, बाऊ न्स बॅक, स्लीमिंग, मील रिप्लेसमेंट, हाय प्रोटीन, लो कार्ब्स, कॅलरीज, फॅट्स, बॅरियाट्रिक, लायपोसक्शन हे आणि असे कितीतरी शब्द त्यांच्या सध्या त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. अर्थात हे शब्दच नाही तर त्या शब्दांशी संबंधित वेगवेगळी माणसं आणि व्यवहार हेसुद्धा सध्याचं चलनी नाणं आहे. याला कारण आहे गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत गेलेली फिटनेसची इण्डस्ट्री.

एक काळ असा होता की सर्वसामान्य माणसाला आखाडे हे फक्त ऐकून माहिती असायचे. शरीर कमावणं हे फक्त पैलवानाचं काम होतं. तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, माणसाच्या शारीरिक हालचाली कमी होत गेल्या, आर्थिक परिस्थिती सुधारली, जीवनमान—खाणपिणं सुधारलं तसं हालचाली फार होत नसल्यामुळे वजन वाढायला लागलं. त्याबरोबर डायबिटिस, ब्लडप्रेशर, हार्ट अ‍ॅटॅक अशा रोगांनी त्याच्या शरीरात घर करायला सुरूवात केली. या सगळ्यातून निर्माण होत गेलेले आरोग्याचे प्रश्न आणि त्यांच्यावर मात करण्यासाठीचे वेगवेगळे प्रयत्न यातून आजची फिटनेस इण्डस्ट्री विकसित होत गेली आहे. पैलवान लोक जिथे घाम गाळत त्या आखाडय़ांचा सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, पांढरपेशा माणसाला काही उपयोग नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी व्यायामशाळा आल्या. पुढे त्या व्यायामशाळांचं रुपांतर जिम्नॅशियममध्ये झालं. साधारण ८०-९०च्या दशकात स्रियांनीही जिमला जायला सुरुवात केली. या जिमची हळूहळू फिटनेस सेंटर्स झाली. त्यानंतर त्यांचं रुपांतर वेलनेस सेंटरमध्ये झालं आणि आता तर व्यायामप्रेमींसाठी फिटनेस स्टुडिओ ही संकल्पना रुढ झाली आहे. आखाडय़ापासून फिटनेस स्टुडिओपर्यंतचा हा प्रवास नुसत्या बदलत्या संकल्पनांचा प्रवास नाही, तर तो आहे बदलत्या अर्थव्यवस्थेचा, बदलत्या बिझनेस मॉडेलचा प्रवास. जन्मत: मिळालेल्या आरोग्य या निसर्गदत्त गोष्टीला गुंतागुंतीची बनवून तो गुंता सोडवण्यासाठी पुन्हा तनमनधनाने केलेले प्रयत्न या फिटनेस इण्डस्ट्रीच्या मुळाशी आहेत, असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे.

ज्याने त्याने आपपापलं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणं यात गैर काय आहे, असा प्रतिप्रश्न कुणी केलाच, तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. पण आपली फिटनेसची गरज ओळखून हातपाय हलवू पाहणाऱ्याला तो देतो त्या मोबदल्यात काय मिळतं ते तपासायला गेलं तर समोर येणारं वास्तव निव्वळ मार्केटिंगच्या पायावर एखादा डोलारा कसा उभा राहतो हे स्पष्ट करणारं आहे. मुख्य म्हणजे हा डोलारा थोडाथोडका नाही तर कोटय़वधी रुपयांचा आहे. तो एखाद्या वर्षांपुरता नाही तर गेली काही वर्षे सतत चढता आहे आणि यापुढच्या काळातही चढता राहणार आहे. त्यामुळे खरंतर त्याला डोलारा म्हणणं चुकीचंच आहे. कुणीतरी गाळू इच्छित असलेल्या घामाच्या बळावर इथे डोलारे नव्हे तर गडगंज संपत्तीचे इमले उभे रहात आहेत, फरक इतकाच आहे की इथे घाम गाळू इच्छिणारा तो स्वच्छेने गाळतो आहे आणि त्यासाठी तो स्वत:च पैसेही मोजायला तयार आहे.

या सगळ्याला संदर्भ आहे भारतातल्या फिटनेस इण्डस्ट्रीसंदर्भातल्या फिक्कीच्या अहवालाचा.

फिक्की म्हणजे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इण्डस्ट्री. भारतातल्या उद्योगांचं प्रतिनिधित्व करणारी ही आस्थापना इथल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या उद्योगांसंदर्भातले आपले अहवाल नियमित प्रसिद्ध करत असते. वेलनेस इण्डस्ट्रीविषयीही फिक्कीने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सांगतो की २०१४—१५ या आर्थिक वर्षांत वेलनेस इण्डस्ट्रीने ८५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. पुढच्या पाच वर्षांत या क्षेत्राची संचित वार्षिक वाढ १२ टक्के होणं अपेक्षित असल्याचं हा अहवाल सांगतो. म्हणजेच २०२० पर्यंत वेलनेस इण्डस्ट्री या क्षेत्राची उलाढाल एक लाख ५० हजार कोटी (१.५ ट्रिलियन) पर्यंत जाणं अपेक्षित आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून आरोग्यविम्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता या अहवालाने मांडली आहे.

सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हा अहवाल फिटनेसबद्दल नाही तर त्याहीपुढे जाऊन वेलनेसबद्दल सांगतो. जागतिक आरोग्य संघटना सांगते की बहुतेक असंसर्गजन्य आजार हे चार प्रमुख जीवनशैलीशी जोडलेल्या घटकांशी संबंधित आहेत. ते चार घटक म्हणजे तंबाखु सेवन, कमी शारीरिक हालचाली, चुकीचा आहार आणि दारु. या चार गोष्टींमुळे ब्लड प्रेशर, डायबिटिस, कोलेस्टरॉल आणि वजन तर वाढतंच शिवाय त्यातूनच पुढे जाऊन अस्थमा, कॅन्सर, हार्ट अ‍ॅटॅक असे जीवावर बेतणारे आजार होऊ  शकतात. हे आजार लवकर लक्षात आले, तर बरे होण्याची शक्यता असते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते हे आजार होऊ च न देणं, ते थोपवणं, त्यासाठी स्वत:ची जीवनशैली बदलणं. त्यासाठी शारीरिक हालचाली, योग्य आहार, तणावनियोजन, धुम्रपान न करणं, वेळोवेळी योग्य त्या तपासण्या करणं या सगळ्या गोष्टी वेलनेसमध्ये येतात. हे सगळं करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणारी, मदत करणारी इण्डस्ट्री ती वेलनेस इण्डस्ट्री. त्यामुळे ती फिटनेसचा पुढचा टप्पा मानली जाते.

स्रियांसाठी सौंदर्यवर्धन सेवा, फिटनेस व्यवसाय या टप्प्यांमधून जात वेलनेस इण्डस्ट्री आता कोणाही व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्यापर्यंत आली आहे. फिक्कीच्या अहवालानुसार सध्या या इंडस्ट्रीचे ब्युटी केअर, न्यूट्रिशन केअर, फिटनेस सेंटर, अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्स, थेरपीज आणि रिज्युविनेशन असे पाच भाग आहेत. पुढच्या पाच वर्षांत या इण्डस्ट्रीत जी १२ टक्के संचित वाढ होणं अपेक्षित आहे, त्यात आहार, रिज्युविनेशन आणि फिटनेस या तीन घटकांचा वाटा मोठा असणार आहे.

या पद्धतीने वेलनेस हे क्षेत्र का वाढण्याची शक्यता आहे हे मांडताना हा अहवाल सांगतो की त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. एक तर आपल्या देशात सध्या असलेलं तरुणांचं सर्वाधिक प्रमाण तसंच  लोकांच्या हातात असलेला पैसा आणि तो खर्च करण्याची त्यांची मानसिकता. दुसरं म्हणजे सध्या भारतात डायबिटीसच्या रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ हायपरटेंशन, स्थूलत्व हे आजार आहेत. हे सगळे जीवनशैलीजन्य आजार आहेत. आणि त्यांच्यामुळेच लोकांमध्ये फिटनेसविषयी, वेलनेसविषयी जागरुकता निर्माण होते आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशाचं वेगाने शहरीकरण होत आहे. सध्या ३१.१६ टक्के लोक शहरात राहतात आणि त्यामध्ये दरवर्षी १.२ टक्कयाने भर पडते आहे. त्यामुळे मोठय़ा शहरांबरोबरच टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्येही वेलनेसची संकल्पना झिरपते आहे. हा अहवाल सांगतो की २०१४—१५ या वर्षांत भारतात लोकांचं उत्पन्न आठ टक्कय़ांनी वाढलं. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढली. याच काळात त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या समाजमाध्यमांमुळे त्यांना वेलनेसशी संबंधित वेगवेगळ्या घटकांची अधिक माहिती मिळू लागली. त्याचा परिणाम ही इण्डस्ट्री वाढण्यावर झाला.

भारत सरकारनेही या काळात आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथीच्या प्रसारासाठी आयुष या स्वतंत्र खात्याची निर्मिती केली. सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा व्हायला सुरूवात झाली. योग प्रशिक्षकांशी संबंधित क्युसीआयच्या परीक्षांच्या माध्यमातून सरकारने योग शिक्षणाला स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली आहे. या सगळ्याच्या परिणामुळे आज वेलनेस हे क्षेत्र वेगाने वाढताना दिसतं आहे, असं फिक्कीचा अहवाल सांगतो.

हा अहवाल बाजूला ठेवून या क्षेत्राकडे पाहिलं तर काय दिसतं? आपल्या आसपास आपण सहज नजर टाकली तर स्थूलत्वाचं म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं सहज दिसून येतं. एका अहवालानुसार २०३० पर्यंत जगातली ५१ टक्के लोकसंख्या स्थूल असणार आहे. शिवाय डायबिटिस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसिज, कोलेस्टरॉल, थायरॉइड या सगळ्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढती आहेच. या आजारांशी सामना करू इच्छिणाऱ्या लोकांपर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने या  वेलनेस, फिटनेस, वेट लॉसचं महत्त्व पोहोचत आहेत. त्यासाठीचे पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यातून मग कुणी जिम करतं, कुणी झुम्बा, कुणी  झोब्रा, कुणी पॉवर योगा करतं. त्याचबरोबर लोक डाएटिशियनकडे, न्यूट्रिशनिस्टकडे जातात. त्यांच्या सल्लय़ाने आहारात बदल करतात, वजन कमी करतात, फिटनेस वाढवतात. यातून वजन जास्त असतानाचे आजार, त्यातून होणारा त्रास कमी झालाय असं त्यांच्या लक्षात येतं. मग ते फिटनेसकडे आणखी गांभीर्याने बघायला लागतात. पण सगळ्यांचंच असं होत नाही. काहीजणांच्या बाबतीत त्यासाठी असणारी चिकाटी कमी पडते आणि मग ते वजन कमी करण्याच्या आणखी एखाद्या पर्यायाच्या शोधात निघतात.

असे लोक हे इण्डस्ट्रीसाठीची मोठी उपलब्धी असते. कारण या लोकांना वेट लॉसशी संबंधित सगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यासाठी फूड सप्लीमेंटची मोठी बाजारपेठ आहे. आमायनो अ‍ॅसिड, प्रोटीन, हर्बल प्रॉडक्ट्स यातल्या बऱ्याच गोष्टी परदेशातून येतात. सोशल मीडियातून त्याची जाहिरात केली जाते. शिवाय माऊथ पब्लिसिटी देखील होते. शारीरिक हालचालींसाठी जिम, फिटनेस सेंटर आहेत. लोकांचा मॅरेथॉन, सायकलिंगकडेही कल वाढला आहे. वेट लॉससाठी इलेक्ट्रॉनिक्समधली पायावर, हातावर लावायची गॅझेट्स आहेत. फिटबॅण्ड असतात. त्याबरोबरच फिटनेस अ‍ॅपची मोठी इंडस्ट्री आहे. त्याशिवाय सेलेब्रिटींच्या नावावर काही डाएटिशियन्स आपली उत्पादनं विकतात. अंजली मुखर्जी, ऋजुता दिवेकर, लीना मोगरे, मुफ्फी  लकडावाला, मिकी मेहता यांच्यासह अशी या इण्डस्ट्रीतली अनेक मोठी नावं आहेत. या सगळ्यांचा मार्केटिंगवर खूप भर असतो, त्यामुळे आज असं चित्र आहे की फिटनेसच्या नावाने खूप जण पैसा काढायला बघताहेत, असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. मध्यमवर्गीयांना हा फिटनेस मेंटेन करण्यासाठी एवढा पैसा खर्च करणं शक्य नाही. पण ते केल्याशिवाय फिटनेस शक्य नाही असा समज पसरवून दिला गेला जातो.

मध्यंतरी डायबिटिसच्या लोकांनी आंबे खाल्ले तरी चालतील असं सांगणारा एक व्हिडिओ फिरत होता.  मग ते ऐकून आपली रक्तातली साखरेची पातळी लक्षात न घेताच मधुमेही लोकांनी भरपेट आंबे खाल्ले. परिणामी त्यांची साखर वाढली. शेवटी एन्डोक्रायनिस्टनाही ‘असं करू नका, त्याआधी नीट विचार करा’ असं सांगणारी पोस्ट प्रसृत करावी लागली. एक प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट दर दोन तासांनी खा, असा सल्ला जाहीरपणे देतात. पण त्यात काय खा, हे मात्र सांगत नाहीत. कारण त्याचा तपशीलवार सल्ला त्यांना लोक क्लिनिकला आले की मग द्यायचा असतो. न्यूट्रिशनिस्ट दोन तासांनी खा म्हणून सांगतेय म्हटल्यावर लोक खूष होतात. मग वजनही वाढतं, असं फिटनेसच्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. त्यामुळे लोकांपर्यंत अनेक बाबतीत चुकीची माहिती पोहोचते. अनेक गोष्टी सुपर फूड म्हणून त्यांच्या गळ्यात मारल्या जातात. पतंजलीची उत्पादनं लोकांना फिट ठेवायचा प्रचार करतात. हल्ली नॅचरोपथीही जोरात आहे. डायबिटिक आहारतज्ज्ञ डॉ. नीतीन पाटणकर सांगतात की यातलं तथ्य काय आहे, हे लोकांना कुणीच सांगत नाही. शिवाय लोकही तज्ज्ञांचा सल्ला घेत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने फिटनेस हा मेडिकलपेक्षा कॉस्मेटिक मुद्दा  असतो. त्यासाठी ते मोठी किंमत मोजतात. पण त्या पैशाच्या तुलनेत त्यांना फारसं काहीच मिळत नाही. प्रोटीन मिळतं असं सांगून किनुआसारखं (०४्रल्लं) महागडं धान्य त्यांना घ्यायला सांगितलं जातं. पण आपल्याकडे राजगिऱ्यामधूनही प्रोटीन मिळतं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. नैसर्गिक आयुर्वेदिक उत्पादनेवाले, संजीव कपूर, बिपाशा बासू, करिना कपूर यांनी फिटनेसचं ग्लॅमर तयार केलं आहे.

वाढत्या किंवा कमी न होणाऱ्या वजनामुळे त्रस्त असलेल्या, ते कमी करण्यासाठी पैसे खर्च करण्यासाठी तयार असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून घेण्यासाठी या बाजारपेठेत अक्षरश: चढाओढ चाललेली असते. आक्रमक जाहिराती, वेगवेगळी पॅकेजेस, वेगवेगळी प्रलोभनं या सगळ्यातून अत्यंत प्रभावी मार्केटिंग सध्या केलं जात आहे. जिममध्ये एकावर एक फ्री, जोडप्यांसाठी स्वतंत्र पॅकेज, सगळं कुटुंब येणार असेल तर वेगळं पॅकेज, पर्सनल ट्रेनरची सुविधा, सॉना बाथ, स्टीम बाथ, वेट लॉस प्रोग्राम अशी विविध पॅकेजेस असतात. जीममध्ये नवीन प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला हवी तर ट्रायल घ्यायची सुविधा असते. तुम्ही काही कारणाने बाहेरगावी जाणार असाल आणि तुमचं तुमच्या नेहमीच्या जीममधलं वर्कआऊट चुकणार असेल तर तुम्ही जिथे असाल तिथल्या जिमही हल्ली अशा प्रवासी माणसाला तेवढय़ा दिवशीपुरती वर्क आऊट करायची सुविधा देतात. त्याच्या मोठमोठय़ा जाहिराती इंटरनेटवर बघायला मिळतात. ग्राहकांच्या दृष्टितून वरवर हे खूप सोयीचं दिसत असलं तरी अत्यंत चुकीचं असल्याचं फिटनेसतज्ज्ञ  सांगतात. त्यांच्या मते जिममध्ये येऊन ट्रायल घ्यायला व्यायाम ही काही मिठाई नसते. ती अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट असते. त्यामुळेच या शहरात नवीन आलेले आहात तर तुमचं वर्कआऊट चुकू नये म्हणून त्या दिवसापुरतं यायला मुभा देणं हा चुकीचा ट्रेण्ड आहे. तुमच्याकडे व्यायामाला येणाऱ्या माणसाच्या आरोग्याविषयी तुम्हाला नीट माहीत असायला हवं. ग्राहक मिळवण्यासाठी असे प्रकार करणं चुकीचं आहे. ते सांगतात की आजही आपल्याकडे अजूनही या क्षेत्राकडे इण्डस्ट्री म्हणून नाही, तर वरवरच बघितलं जातं. जागा उपलब्ध आहे म्हणून, फॅड म्हणून जिम चालवणारे लोकच जास्त आहेत. मुख्य म्हणजे आपल्याकडे या क्षेत्रासाठी परदेशात असतात तसे नियम नाहीत.

हाच मुद्दा डॉ. नीतीन पाटणकरही उचलून धरतात. त्यांच्या मते, आपल्याकडे फिटनेस, वेट लॉस सेंटर काढायला कोणतंही लायसन्स लागत नाही. गुमास्ता कायद्याप्रमाणे कुणीही ते काढू शकतं. वाण्याचं दुकान चालवायला, हॉटेल काढायला लायसन्स लागतं पण जिम चालवायला लागत नाही. कुणी फिटनेस तज्ज्ञ म्हणून काम करावं यावरही काही नियंत्रण नाही. फिटनेस कोच बनायचे महिना दोन महिन्याचे कोर्स असतात. ते करून लोक फिटनेसचे सल्ले द्यायला लागतात.  डॉ. पाटणकर सांगतात की हे म्हणजे मूल जन्माला घालणाऱ्या प्रत्येक स्रीने गायनॉकॉलॉजिस्ट बनण्यासारखं आहे. त्यामुळे कुणी म्हणतं, नॅचरोपथी करून तुमचं वजन कमी करून देऊ, कुणी म्हणतं हर्बल लाईफ करून तुमचं वजन कमी करून देऊ.  शिवाय वेट लॉससाठी हिप्नाटिझम करतात. अ‍ॅक्युप्रेशर करतात, रेकी करतात. वेट लॉससाठी ऑनलाइन कन्सल्टिंग करतात. पण उद्या त्यातून काही दुष्परिणाम झाले तर कुणाचा गळा पकडण्याची सोय नसते. दुष्परिणाम सोडाच, पण आपण जेवढे पैसे दिले, त्यायोग्य सेवा मिळाली नसेल तरी कुणाला जाबही विचारता येत नाही.

पण त्यासाठी अतिशय आवश्यक, साधी गोष्ट असते ती म्हणजे योग्य आहार आणि नियमित व्यायाम. डॉ. पाटणकर सांगतात, या साधेपणाला प्रमोट करणारं कुणी नसल्यामुळे त्याचं मार्केटिंग होत नाही.  रोज चाला, सूर्यनमस्कार घाला. घरातल्या कामांसाठीच्या हालचाली करा, पण हे प्रकार लोकांना बोअरिंग वाटतात. खरं तर एखादी अ‍ॅक्टिव्हिटी तुम्ही सतत करत राहिलात तर ती तुम्हाला फिटनेसकडे नेते. पण लोकांना सतत नवं हवं असतं.

हेच खाण्यापिण्याच्या बाबतीतही आहे. पूर्वी लोक केव्हातरी हॉटेलात जायचे. आता सतत बाहेर खातात. सतत बाहेरचं खाणं घरी मागवतात. साध्या घरच्या अन्नापासून आपण लांब जातो आहोत. प्रक्रिया केलेलं अन्न खातो. दोन्ही बाजूंनी त्याची किंमत मोजतो. एकतर पैसे मोजून अन्न खातो आणि मग त्यामुळे वजन वाढलं म्हणून फिटनेसवर खर्च करतो. हे सगळं मार्केटिंगच्या जोरावर चाललं आहे. औषधांच्या इण्डस्ट्रीत जसं नवीन औषधं असल्याशिवाय एमआरना डॉक्टरसमोर जाता येत नाही, मोबाइलवाले जसं सतत नवनवी पॅकेजेस आणत असतात तसं फिटनेसवाल्यांचंही असतं. त्यामुळे ते सतत झुंबा, झोब्रा, पॉवर योगा अशी वेगवेगवी पॅकेजेस घेऊन येत असतात. नवं काहीतरी दिल्याशिवाय त्यांना ते विकता येत नाही.

डॉक्टर पाटणकरांच्या मते लोकांना सतत नावीन्य हवं आहे, त्यासाठी पैसे खर्च करायचीही त्यांची तयारी आहे. खर्च करायला त्यांच्या हातात जास्त पैसा आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की फिटनेसही विकत घेता येतो. फिटनेसकडेही ते कमॉडिटी म्हणूनच बघतात. त्यांच्या दृष्टीने फिटनेस ही साजरं करायची गोष्ट झाली आहे. फिटनेस करणारा एक माणूस अंगावर ४० – ५० हजार रुपये मिरवत असतो. त्याचे शूज किमान सहा-सात हजारापासून ते २५ हजारापर्यंत असतात. शिवाय कपडे, फिटनेसचे बॅण्ड हे सगळं मार्केटिंगवर आधारित पैशाचे खेळ आहेत. मुख्य म्हणजे मोठय़ा शहरांखालोखल निमशहरांतही हे  खूप वाढलंय.

डॉक्टर पाटणकर सांगतात की या इण्डस्ट्रीत हल्ली असं झालं आहे की कोणीही पर्सनल ट्रेनर बनू शकतो. खरं तर मुळात पर्सनल ट्रेनरचीच काहीही गरज नसते. खूप ठिकाणी खुराक खाऊन बॉडी बनवणारा कुठलेतरी कोर्स करून ट्रेनर बनतो. त्याला थातूरमातून फिजिऑलॉजी येत असते. अशा पद्धतीने ट्रेनर बनण्याच्या या कोर्सना भरपूर गर्दी असते. आम्ही रोजगार निर्माण करतो असं म्हणणाऱ्या, या ट्रेनर घडवणाऱ्या कंपन्या त्यातून गडगंज बनतात. गंमत म्हणजे लोक आम्हा डॉक्टरना कोणती डिग्री आहे, ती कुठून घेतली, हे पश्न विचारतात, पण या अशा ट्रेनर लोकांना विचारत नाहीत. या सगळ्यातून एवढंच दिसतं की जन्मत: मिळालेल्या फिटनेसची कुणाला किंमत नाही.

डॉक्टर पाटणकर सांगतात की लोक फिटनेस संबंधीच्या गोष्टी इतक्या किरकोळीत घेतात की सेलेब्रिटींचे सल्ले बरोबर आहेत का तेही तपासून पहात नाहीत. एक लक्षात घ्यावं की कॉस्मेटिक प्रॉडक्टसच्या जाहिरातीत मॉडेल घेताना मुळात तिचे केस, त्वचा चांगली असणं ही पूर्वअट असते तसं करिना कपूरच्या बाबतीत असतं. ती तिच्या बारीक होण्याची जाहिरात करते कारण त्यातून तिला दोनपाच कोटी रुपये मिळणार असतात. त्यासाठी तिच्या आसपास चोवीस तास नोकर असतात. अंबानींचा मुलगा वजन कमी करतो तेव्हा त्याच्यासाठी २२-१५ जणांचा स्टाफ असतो. हे सगळं सामान्यांना मिळतं नसतं. मग आपण वजन कमी करायला त्यांच्या मार्गाने कशाला जायचं, असा प्रश्न ते उपस्थित करतात.

डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञ असलेल्या डॉ. वैशाली जोशी सांगतात की हल्ली लोक फिटनेसबद्दल सजग झाले आहेत. पण दुसरीकडे जीम वगैेरे प्रकारांमध्ये आजकाल खूप व्यापारीकरण झालं आहे. न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करणाऱ्यांना आहाराबद्दल माहिती असते पण त्यांना मानवी शरीररचना, आजार यांची फार माहिती नसते. काही ठिकाणी तर फिटनेस एक्सपर्टच डाएटिशियन म्हणूून काम करतात. कमी खा हा त्यांचा मुख्य सल्ला असतो. कमी खाल्लं, व्यायाम केला तर वजन कमी होतं ही खरी गोष्ट आहे पण त्याचे दुष्परिणामदेखील असतात. कमी खाणं आणि योग्य खाणं यांच्यात गल्लत करायची नसते. पण त्याकडे हे लोक लक्ष देत नाहीत. सगळ्या गोष्टी व्यापारी पद्धतीने करणारे काहीही पसरवतात. सोशल मीडियामुळे ते सोपंही झालं आहे.  इथे एक लक्षात घ्यायला हवं की न्यूट्रिशन्सिटला वैद्यकीय पाष्टद्धr(२२४)र्वभूमी नसते. त्यामुळे त्यांना आजारांबद्दल फारशी माहिती नसते. म्हणूनच वजन कमी करण्याआधी कोणते आजार आहेत ते डॉक्टरकडून समजून घ्यावं आणि मग न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन योग्य आहाराचा सल्ला घ्यावा असं करावं लागतं.

डॉक्टर वैशाली जोशी सांगतात की वजन कमी करताना डाएटबरोबर जीमचं केलं पाहिजे असं नाही. रोज चाललं तरी वजन कमी होतं. पण हल्ली लोक व्यायाम करायला वेळ मिळत नाही म्हणून ८० टक्के डाएटवर भर आणि २० टक्के व्यायामावर भर असं करतात. पण ते प्रत्यक्ष ६०-४० असं असायला हवं. पण हल्ली फॅड डाएट आली आहेत. उदाहरणार्थ लोक कीटो डाएट करतात. त्यात काबरेहायड्रेटचं प्रमाण नगण्य असतं. पण त्याचेही दुष्परिणाम असतात. त्यामुळे त्याचं नीट ज्ञान असणाऱ्याकडेच जायला हवं.

इंटरनेटवर उलटसुलट सल्ले मिळतात. एक साईट म्हणते की भरपूर खा, एक म्हणते थोडं खा. एका साइटवर सांगितलं जातं की डार्क चॉकलेट भरपूर खा, वजन वाढणार नाही. पण तसं नसतं. त्यालाही प्रमाण आहे. बदाम खायचा सल्ला मिळतो म्हणून लोक भरपूर बदाम खातात. पण ते कुणी खायचे, कुणी नाही, किती प्रमाणात खायचे असतात, बदाम खात असाल तर बाकी आहारात काय असायला हवं हे ठरलेलं आहे.

लोक खूपदा अर्धवट सल्ले घेऊन काहीतरी करायला जातात. त्यांना कुणाचं तरी ऐकून वेगात वजन उतरवायचं असतं. काहीजण योयो डाएट करतात. म्हणजे उपासतापास करून १५ किलो वजन उतरवायचं, मग हवं ते खायचं मग पुन्हा उपास काढून ते कमी करायचं. या सगळ्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. पण डॉक्टर सांगतात की जितकं वेगाने वजन उतरवाल तितकं ते वेगाने परत वाढतं.

त्या सांगतात, डाएट करायला जाणाऱ्यांना खूपदा भरमसाठ सप्लीमेंट्स लिहून दिली जातात. रोज सहा सात गोळ्या घ्यायच्या असतात. पण ते चुकीचं आहे. आपल्याला काही न करता थेट पैसा मिळाला तर काय होईल तसंच आपल्या शरीराचं आहे. त्याला आयती सप्लीमेंटस मिळाली तर त्याची आहारातून सप्लीमेंटस शोषून घ्यायची क्षमता कमी होते. सप्लीमेंट देऊ नयेत असं नाही तर तपासण्या करून जी कमी आहेत तीच द्यायची असतात. त्यांच्या मते लेझर तंत्रज्ञान, बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी हे उपाय लोक हल्ली अवलंबतात, पण ते सगळेच वरवरचे उपाय आहेत. मुळात तुम्ही योग्य आहार घेऊन, नियमित व्यायाम करून चरबी वाढू न देणं हाच खरा आणि महत्त्वाचा उपाय आहे.

फिटनेसतज्ज्ञ सांगतात की तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असाल तरच सप्लीमेंटस, तीही योग्य प्रमाणात घ्यायची असतात. एरवी  तुमचा आहार नीट असेल तर बाहेरून काही घ्यायची गरज नसते. पण आजकाल सकस अन्न मिळत नाही, असं म्हणून  तुमच्या शरीरावर सप्लीमेंटसचे प्रयोग केले जातात. हे सगळं होतं कारण  भारतात त्यावर फूड अ‍ॅण्ड ड्रग्जचं नियंत्रण नाही. आणि लोकांनाही सगळ्या गोष्टीत शॉर्ट कट हवा असतो. त्यामुळे ते अशा प्रकारांना बळी पडतात.

हे सगळं सांगणारी ही सगळी मंडळी या क्षेत्रात गांभीर्याने काम करणारी आहेत. स्वत:चं आरोग्य उत्तम राखणं ही गोष्ट अशक्य नसते, पण ती स्वत:च्या मनातून आली पाहिजे, ती आपल्याला ठेवता येईल तेवढी साधीसोपी ठेवली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बहुतेकांना जमत नाही. अभ्यास, व्यायाम या आपल्या वाटय़ाच्या गोष्टी दुसऱ्याने कुणीतरी कराव्यात असं त्यांना वाटत असतं. नेमका याच गोष्टीचा फायदा बाजारव्यवस्था उचलते आणि आपल्याच खिशातला पैसा काढून घेत सोप्या गोष्टी गुंतागुंतीच्या करून टाकते. वेलनेस, फिटनेस इण्डस्ट्रीचंही आज तसंच झालं आहे. त्यामुळे आक्रमक मार्केटिंगच्या पायावर आज या इण्डस्ट्रीचा कळस उभा आहे.

माध्यमांची भूमिका

या क्षेत्राच्या वाढीमध्ये माध्यमांची भूमिका नेहमीच महत्वाची ठरली आहे. नुकतीच मरण पावलेली ५०० किलो वजन असलेली इमान अहमद ही इजिप्शियन स्री उपचारांसाठी २०१७च्या फेब्रुवारी महिन्यात भारतात आली होती. मुंबईत सैफी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले. तिची बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी झाली, तिला बराच काळ प्रोटीन डाएटवर ठेवलं होतं, त्याचे साइड इफेक्ट्स होऊ  नयेत म्हणून कोणकोणती काळजी घेतली गेली, इमान उपचारांसाठी अबूधाबीमध्ये बुर्जिल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे तिच्यावर कोणकोणते उपचार झाले, वजन कमी करतान तिची इतर कोणकोणती ऑपरेशन्स झाली, ती का करावी लागली याच्या साद्यंत बातम्या वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे वजन कमी करण्यासंदर्भातल्या या वेगवेगळ्या गोष्टी देशभरातल्या लोकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचल्या. वजन कमी करण्याच्या इतर उपायांची माहिती त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली.
वैशाली चिटणीस