28 January 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : दुष्काळाने दाखवले सोन्याचे दिवस

मराठी माणूस आपलं गाव सोडून बाहेर जात नाही

मराठी माणसाबद्दलची सगळी गृहीतकं चुकीची ठरवत सांगली-साताऱ्यातल्या मराठी माणसांनीच वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन सोन्या-चांदीच्या व्यवसायात बावनकशी यश मिळवलं आहे.

सेलम, त्रिसुर, त्रिवेंद्रम, विशाखापट्टणम, बिकानेर, भिलाई, रांची, जयपूर, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद अशा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कोणत्याही सराफा बाजारात सोनं हा जसा एक अविभाज्य भाग आहे तसाच या सर्वच ठिकाणी आणखी एक घटक सामाईक असतो, तो म्हणजे तेथे असणारा मराठी व्यावसायिक. परप्रांतातील सराफा बाजारात मराठी माणूस हे खरे तरं आश्चर्यच म्हणावं लागेल. पण तो तेथे असतोच. अगदी न चुकता. त्याचे मूळ गाव असते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा जिल्ह्य़ातील खानापूर (विटा), आटपाडी, कवठेमहांकाळ, खटाव, मायणी तालुक्यात. देशभरातील सराफा बाजारात फिरताना इरसाल गावरान मराठीत एखादी खणखणीत हाक ऐकू आली तर बिनधास्त समजावं की हा माणूस विटा आटपाडीचाच. कोणी दहावी झालेला, तर कोणी चौथीतच शाळा सोडून गेलेला, तर कोणी जरा अधिक शिकलेला म्हणजे बारावीपर्यंत. पण आज प्रत्येकजण चारदोन दुकानांचा मालक. दुकानं कसली तर सोन्याच्या दागिन्यांची. सुरुवातीला काम काय केलं तर सोनं गलाईचं, आटणीचं. त्याला जोडून सोन्याचा टंच काढून देणं आणि सोनं शुद्ध करून देणे हे व्यवसायदेखील केले. कोणी त्यातूनच पुढे जात थेट दागिन्यांच्या उत्पादनात सक्रिय झाला, तर कोणी दागिन्यांच्या ठोक व्यापारात. संपूर्ण देशातील या व्यावसायिकांची संख्या किती तर तब्बल दीड लाखांच्या आसपास. म्हणजे यांची कुटुंबं धरून किमान चार-पाच लाख मराठी माणूस या व्यवसायामुळे देशभर पसरलेला.

आपल्याकडे असं म्हटलं जातं की, मराठी माणूस आपलं गाव सोडून बाहेर जात नाही, गेला तर तो नोकरी करतो, व्यवसाय-उद्योग तुलनेने कमीच. पण तो समज या दुष्काळी तालुक्यातून आलेल्यांनी पार मोडून काढलाय. आज खानापूर (विटा), आटपाडी तालुक्यांतील कोणत्याही छोटय़ा खेडय़ात गेलात तर घरटी किमान एक तरी माणूस या सोन्या चांदीच्या व्यवसायात स्थिरावलेला दिसेल. तेदेखील स्वत:च्या गावी नाही तर पार कुठेतरी परराज्यात. गेली शे-दीडशे वर्ष अव्याहतपणे हे लोक सोन्याचांदीच्या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. केवळ भारतातच नाही तर शेजारच्या श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि काही प्रमाणात थेट दुबईपर्यंत. हा सारा प्रवास एका दिवसात झालेला नाही. तो प्रवास सहजसोपादेखील नाही. कधी उपाशी-तापाशी राहून, कधी मंदिरात झोपून, तर कधी पोलिसांच्या वक्रदृष्टीमुळे तुरुंगवास भोगून ते इथवर पोहोचले आहेत. त्या त्या गावात, त्या त्या समाजाच्या बरोबरीने जुळवून घेत, त्यांचा विश्वास संपादन करत, त्यांची भाषा शिकत या सर्वानी आज संपूर्ण देशात महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचं नाव झळकवत ठेवलंय. या प्रवासाची सुरुवात खूपच रंजक आहे. अगदी एखाद्या गोष्टीतल्या सारखी. ती या लोकांकडून ऐकायला मिळते.

साधारण १८६०च्या सुमारास मुंबईत गोदीकाम तेजीत होतं. कामगारांना कामदेखील भरपूर असायचं. त्यामुळे देशभरातून लोक येथे कामासाठी येत असत. सांगली-सातारा जिल्ह्य़ातील दुष्काळी भागातील अनेकजण या कामासाठी जात असत. विटय़ाजवळच्या विजे गावातील काही माणसंदेखील गोदीच्या कामासाठी मुंबईत आली. त्यांच्याबरोबरच गावातील सखाराम हणमंत गुरव हा पोरसवदा मुलगादेखील मुंबईत आला. शरीरप्रकृती तुलनेनं किरकोळ असल्यामुळे गोदीतलं काम त्याला झेपलं नाही. मग एका भाजीपाला विक्रेत्याच्या हाताखाली भाजीपाला विक्रीचा व्यवसाय त्यानं सुरू केला. सकाळी बाजारातून भाजी टोपलीत भरायची आणि डोक्यावर टोपली घेऊन घरोघरी जाऊन विकायची. त्याच्या कामाचा विभाग होता झवेरी बाजार. सकाळी भाजीपाला विकून झाला की दुपारी एका झाडाखाली सखाराम जाऊन थांबायचा. तेथेच एका इराण्याचे सोने-चांदी गलाई व शुद्ध करण्याचे दुकान होते. रोजच्या येण्या-जाण्यामुळे सखारामची त्या इराण्याशी मैत्री झाली. त्याकाळी मुंबईच्या झवेरी बाजारात गलाई व सोनेचांदी शुद्ध करून देणारी दुकानं इराणीच चालवायचे. त्यांचा या व्यवसायात चांगलाच जम होता. दागिने तयार करण्यापूर्वी सोनं शुद्ध करून ते आटवून त्याच्या गरजेनुसार लगडी तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम. हे काम ही इराणी मुस्लीम मंडळी करायची.

सखारामची त्या इराण्याकडे ये-जा सुरू होतीच. ओळख झाली, विश्वास वाढला. फावल्या वेळात सखाराम सोने गलाई, शुद्धीकरणाची कामं शिकू लागला. ही कामं कष्टाची होती, पण सखारामने ते सारं आत्मसात केलं. इराण्याचादेखील त्याच्यावर विश्वास वाढला. सखाराम हळूहळू भाजीपाल्याचं काम सोडून याच कामात रमला. काम वाढू लागलं तसं पुढं सखारामने धाकटा भाऊ परशुरामलादेखील गावावरून बोलावून घेतले. इराण्याला मूलबाळ नव्हतं. सखाराम आणि परशुराम ही त्याच्यासाठी विश्वासाची माणसं. इराण्याला हजच्या यात्रेला जायचं होतं. आपला व्यवसाय या दोन पोरांच्या नावे करून स्वत:ला हवे तेवढे पैसे घेऊन तो इराणी हज यात्रेला निघून गेला. आणि सोने- चांदी गलाई व शुद्धीकरणाचा व्यवसाय सर्वप्रथम मराठी माणसाकडे आला.

दोघे भाऊ मिळून नेटाने काम करू लागले. १८८२ साली दोघांनी स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला. ‘सखाराम हणमंत आणि कंपनी’ नावाचा खरड गाळणीचा रिफायनरी कारखाना सुरू केला. पुढे काही आर्थिक कारणाने ही कंपनी बंद पडली. परशुराम यांनी मात्र आपली ‘परशराम हणमंत आणि कंपनी’ नावारूपाला आणली. त्यांनी व्यवसायाचे स्वरूप बदलले. आटणी किंवा शुद्धीकरणाच्या कामात मजुरीऐवजी सोने वेस्टेजच्या स्वरूपात मजुरी म्हणून दिले जायचे. पण ही पद्धत बंद करून त्यांनी मजुरी घेऊन सोने-चांदी शुद्ध करून देण्याची पद्धत सुरू केली. त्याला झवेरी बाजारातील सराफांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मजुरी पद्धतीने गलाई, शुद्धीकरण करणारी ही भारतातील पहिलीच रिफायनरी. परिणामी काम वाढू लागलं. मग त्यांनी आपल्याच गावातील काही तरुणांना मजूरकामासाठी मुंबईत आणलं. मुंबईतल्या बाजारात मराठी कारागिराचं, व्यावसायिकाचं नाव होऊ लागलं. मुंबईच्या बाजारात देशभरातून व्यापारी येत असत. मग एखादा व्यापारी या कारागिरांना म्हणायचं, चल आमच्या राज्यात, तेथे तुला दुकान काढून देतो. हळूहळू ही मराठी माणसं देशभरात पसरू लागली. परशुराम गुरवांनीदेखील आपल्या शाखा सुरू केल्या. आपल्याच मजुरांना भागीदारी देऊन त्यांना मालक केले. देशात गलाई व रिफायनरी कामात मराठी माणसाचं नाव होऊ लागलं. पुढे आर्थिक अडचणींमुळे परशुराम यांची कंपनी बंद पडली. या बंद पडलेल्या कंपन्यांचा वारसा तुकाराम सखाराम गुरव यांच्याकडे आला. त्यांनी हिकमतीने तुकाराम सखाराम गुरव कंपनी नावारूपास आणली. मूळ गावाच्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना या कामात सामावून घ्यायला सुरुवात केली. आज त्यांच्या पाचव्या पिढीतील मुकुंद गुरव हा व्यवसाय सांभाळत आहेत. गुरवांपाठोपाठ महादेवराव साळुंखे, पांडुरंग देवकर, तुकाराम साळुंखे ही काही हरहुन्नरी माणसं देशाटनास बाहेर पडली. गुरवांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी गलाईचा व्यवसाय देशभर नेला. पण त्याच्या पुढे जात आजच्या पिढीने तर थेट सोन्या-चांदीच्या दागिन्यातदेखील मराठी टक्का वाढवला आहे.

सोन्याचं काम जितकं नाजूक तितकंच ते विश्वासाचं. आधीचे दागिने मोडून नवीन दागिने करायचे असतील तर त्यासाठी ते सोनं आधी शुद्ध करणं गरजेचं असतं. दागिने तयार करण्यासाठी १०० टक्के शुद्ध सोन्यात तांबं अथवा इतर घटक मिसळावे लागतात तेव्हाच त्याला कठीणपणा येतो. असलेले दागिने मोडून नवीन दागिने करायचे असतील तर हे घटक काढून सोनं शुद्ध करणं महत्त्वाचं असतं. हे काम जिकिरीचं तर आहेच, पण ते करताना त्यात होणारा अ‍ॅसिडचा वापर शरीराला त्रासदायकदेखील असतो. तसेच त्याआधी सोन्याचा टंच काढून ते किती प्रमाणात शुद्ध आहे हे पाहणं गरजेचं असतं. रिफायनरीमधून त्या टंचानुसार शुद्ध सोनं मिळणं महत्त्वाचं असतं. हेच सोनं नंतर भट्टीत मुशीतून वितळावं लागतं. यालाच आटणी किंवा गलाई करणं म्हणतात. तेथे वितळलेलं सोनं साच्यात ओतून लगडीच्या स्वरूपात तयार करावं लागतं. हे सर्व काम करताना सोन्याचं स्वरूप बदलतानाच त्यात अपेक्षेपेक्षा अधिक घट येणं सोनाराला किंवा सराफाला परवडत नाही. तसेच त्यात अन्य काही मिलावट होणार नाही याचीदेखील खात्री असायला हवी. त्यामुळे हे काम करणारी माणसं विश्वासाचीच असणं महत्त्वाचं असतं. आणि हा विश्वास एका दिवसात मिळवता येत नसतो. तो विश्वास सखाराम आणि परशुराम गुरव भावंडांनी कमावला आणि वाढवला. आणि त्यांच्यापाठोपाठ या दुष्काळी भागातील अनेकांनी तो आजतागायत राखला आहे.

त्या काळात सोन्याचा व्यापारदेखील आजच्या इतका मोठा नव्हता. सोन्याची किंमत आजच्या तुलनेत अगदीच किरकोळ असली (दहा ग्रॅम सोन्याचा भाव १९२५ साली रु. १८.२५ होता तर, १९५४ साली रु. ७७.७५) तरी एकूणच लोकांची मिळकतदेखील तशीच मर्यादित होती. आणि सोन्याची खरेदी ही गुंतवणूक म्हणूनच अधिक केली जायची. अर्थातच आटणी, रिफायनरी वगैरे कामाचा विस्तारदेखील मर्यादितच होता. या सर्वाला खरा जोर आला तो साधारण ५०च्या दशकानंतर. ७०-८० च्या दशकात तर या सर्व दुष्काळी तालुक्यात ‘दुकानाला जायचं’ (म्हणजे परप्रांतात जाऊन गलाई व्यवसाय सुरू करायचा) हा अगदी परवलीचा शब्द होता. मात्र एकंदरीतच सुरुवातीचा काळ हा ओढगस्तीचाच असायचा.

काही ठरावीक भागात एखादा मराठी व्यावसायिक स्थिरावलेला असायचा त्याच्या ओळखीने इकडून कोणीतरी तिकडे जायचं. त्यातदेखील घरातीलच भावंडांचंच प्रमाण अधिक. कारण माणूस विश्वासाचं हवं. घरातली माणसं नसतील तर मग गावातली माणसं घेऊन जायचं ही इकडची प्रथा. पण गलाई व्यवसायात स्थिरावून सगळेच पुढे जायचे असे नाही. ज्यांना सोनेचांदी व्यवसायाची नस उमजली आणि जे त्या प्रदेशातच स्थिरावले, त्यांनी साम्राज्य म्हणावं अशी यंत्रणा स्वत:ची निर्मिली.

दादा देवकर हे ५०च्या दशकात त्रिवेंद्रमला होते. महादेव साळुंखे यांचे चुलते चेन्नईमध्ये. भाऊबंदकीत त्यांची फसवूणक झाली. परिस्थिती बेताचीच होती. मुलांना शिकायची इच्छा होती, पण एकूणच त्या परिस्थितीत काही होत नव्हतं. तेव्हा नशीब काढायला थोरला मुलगा प्रताप याने केरळात जायचं ठरवलं. तेव्हा केरळात त्रिवेंद्रमला देवकर हेच एकमेव मराठी माणूस. प्रताप साळुंखेंच्या मामांनी रोख एक हजार रुपये दिले आणि ते त्यांचे मित्र कृष्णाबरोबर अलेप्पीला आले. वर्ष होतं १९५४, वय वर्षे १३. अलेप्पी तसं आटोपशीर. एका मंदिरात मुक्काम ठोकला. समोरच्या तळ्यात आंघोळ करायची आणि मंदिरात राहायचं. गलाई व्यवसायाचं कौशल्य आत्मसात केलं होतं. पण व्यवसाय कुठे सुरू करायचा कळत नव्हतं. जागा मिळत नव्हती. पैसे संपू लागले होते. शेवटी १५ रुपये भाडय़ाने एक गुंठा जागा घेतली. कडेने नारळाच्या झावळ्यांच्या कुडासारख्या भिंती तयार केल्या, वर मोकळं आकाश. सुरुवातीला दोन महिने काहीच काम नाही. भट्टी पेटलीच नाही. हळूहळू काम मिळू लागलं. महाराष्ट्रातून आलेली दोन मुलं मेहनतीने काम करताहेत हे पाहून व्यापाऱ्यांचा विश्वास वाढू लागला. पण अल्लेप्पीला व्यवसायाच्या मर्यादा होत्या. त्यामुळे एर्नाकुलमला जायचं ठरवलं. व्यवसाय वाढला पाहिजे ही जिद्द. पण नंतर आलेल्या सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे एकूणच सोने-चांदी व्यवसायाला मोठा फटका बसला. काळा कायदा म्हणून तो या वर्गात ओळखला जातो. तेव्हा पोलिसांची नजर गलाई व्यावसायिकांवर होती. प्रतापदादा साळुंखे यांच्या कामाचा विस्तार वाढला असल्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्रातून येणारं सोनं पकडलं की अनेकजण हा माल दादांचा म्हणून सांगायचे. अशाच एका केसमध्ये केरळ पोलिसांनी प्रतापदादांना तुरुंगात टाकलं. पुरावा काहीच नव्हता. दादांच्या आटणी कारखान्यात मुद्देमालही सापडला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने प्रतापदादांना निर्दोष सोडलं. त्याकाळातील अशा प्रकारे निर्दोष सोडलेली ती पहिली केस असल्याचं प्रतापदादा साळुंखे सांगतात. पुढे दादांनी गलाई, रिफायनरी व्यवसाय तर वाढवलाच पण कोचीन येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायातदेखील ते स्थिरावले. त्यांच्या मुलांनी आज सोने विक्रीच्या व्यापारातदेखील प्रवेश केला आहे.

प्रतापदादा साळुंखेंनी आज पंच्याहत्तरी पार केली आहे. त्यांच्या वयाचं फारसं कोणी आज त्यांच्याइतकं यशस्वी नाही. त्यांचेच समकालीन असलेले दुसरे एक असेच धडपडे व्यावसायिक म्हणजे भगवानदादा भोसले. सध्या सांगली येथे त्यांचं वास्तव्य. पण मूळचे खानापूर तालुक्यातील बेणापूरचे. वयाच्या तेराव्या वर्षी (१९५४) अध्र्या चड्डीत घर सोडून गलाईच्या कामासाठी त्यांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) गाठले. वडिलांच्याच मित्राकडे खाऊन पिऊन वर्षांला ७५ रुपये पगारावर काम सुरू केलं. चार वर्ष गलाईचं तंत्र आत्मसात केल्यावर त्यांनी पुढे स्वत:चा गलाई व्यवसाय सुरू करायचा ठरवून थेट बिहार गाठलं. बिहारमध्ये बेणापूर आणि परिसरातील अनेकांची गलाई दुकानं तेव्हादेखील होतीच. त्यांच्याच सहाय्याने सहा महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर अखेरीस खगडिया येथे गलाई व्यवसाय सुरू केला. मेहनती स्वभावामुळे भगवानदादांचा चांगलाच जम बसला. इतका की, लवकरच त्यांनी आपल्या भावंडांनादेखील त्यात सामावून घेत बिहारात सहा-सात दुकानं सुरू करून दिली. पुढे त्यांनी दागिन्यांच्या व्यवसायातदेखील शिरकाव केला. आज सांगलीत त्यांची भव्य शोरूम आहेत.

गलाई व्यवसायातून पुढे मार्गक्रमण करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायात स्थिरावलेली ही पन्नासच्या दशकातील दोन महत्त्वाची उदाहरणे. नंतर साधारण ८०-९० च्या काळातदेखील या परिसरातून अनेकांचं स्थलांतर सुरूच राहिलं. एकतर या भागाला दुष्काळाचा शाप, त्यातच शिक्षणाच्या संधी कमी, त्यामुळे नोकरी व्यवसायाचे अन्य स्रोतदेखील मर्यादित. शेती असायची, पण पाणी नाही. त्यामुळे तीन-चार भावंडांच्या घरात एखादा तरी गलाई व्यवसायात शिरायचा. मग प्रांत कोणताही असो. नशीब काढायला म्हणून ही माणसं भटकत राहायची. कधी यशस्वी व्हायची, तर कधी एखाद्या शहरापुरतीच मर्यादित राहायची. वाढत्या व्यवसायाची गरज म्हणून गावाकडून माणसं बोलवायची हा इथला शिरस्ता.

शंकरराव पवार हे मूळचे चिखलगोठण. १९६७ साली सेलमला  चुलत्याकडे ते गलाई कामासाठी गेले. त्यातच स्थिरावले. त्यानंतर १९७६ ला त्यांनी कोइम्बतूरला सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा त्यांचा ठोक व्यापार सुरू केला. प्रकाश पाटील सध्या हैद्राबादला असतात. मूळ गाव बेणापूर. वडील प्राथमिक शिक्षक. त्यांचा भर शिक्षणावर. दुकान वगैरे काढणं हे काही त्यांना फारसं रुचणारं नव्हतं. पण प्रकाश यांचे एक मावसभाऊ हैद्राबादला असत. तेव्हाची मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनीदेखील हैद्राबादला जायचं ठरवलं. घरून तसा विरोधच होता, पण ते गेले. गलाई काम जमू लागल्यावर त्यांना पुढील वेध लागले. तोपर्यंत हैद्राबादला चांदी शुद्ध करायचा कारखाना नव्हता. प्रकाश पाटील यांनी जोर लावून १९८२ साली हैद्राबादला चांदी रिफाइन करण्याचा पहिला कारखाना काढला. दिवसाला २०० किलो चांदी शुद्ध करून देणारा पहिला कारखाना एका मराठी माणसानं परमुलखात सुरू केला हे कौतुकास्पद होतं. पुढे त्यांनी दागिन्यांच्या ठोक व्यापारातदेखील जम बसवला.

गणपत सूर्यवंशी पलुसचे. आजोबा स्वातंत्र्यसैनिक, तर वडील गावचे सरपंच. १९७२ च्या दुष्काळानं या सर्वांनाच खूप मोठा तडाखा बसला. तरी त्यांनी धीर सोडला नाही. आजोबा सर्वानाच मदत करायचे. दुष्काळात तर सहा महिने शाळेच्या पोरांना पिठलं भाकरी त्यांनी दिलं होतं. घरातल्या पाश्र्वभूमीवर गलाईच्या कामासाठी बाहेर पडणं कठीणच होतं. १२ वीपर्यंत शिक्षण झालेलं. पुढे काय करायचं कळत नव्हतं. दुष्काळाने तर परीक्षाच पाहिली होती. शेवटी १९७६ला त्यांनी आंध्र प्रदेशातलं नरसय्या पीठम गाठलं. गलाईत जम बसला तसं त्यांनी गावातून ३०-४० जणांना तिकडे नेलं. आंध्रात कामाचा विस्तार वाढवत नेला. आज त्यांची गलाईची सात आणि दागिन्यांची चार दुकानं आहेत. पलुस गावासाठी ते अनेक सामाजिक उपक्रमदेखील राबवत असतात. आंबेगाव तालुक्यातील संजय माने हे बारावी झाल्यावर १९८४ साली सेलमला गेले. १९८७ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पण केवळ गलाईत न रमता चांदीच्या व्यापारात त्यांनी शिरकाव केला. सेलम हे चांदीच्या पैंजणांसाठी प्रसिद्ध. महाराष्ट्रात हा मान हुपरीचा. पण सेलमला पैंजणांचं उत्पादन स्थानिकच करायचे. संजय माने यांनी मात्र सेलमला स्वत: पैंजणांचं उत्पादन सुरू केलं. तसं करणारे ते पहिलेच मराठी व्यापारी.

दक्षिण भारतात सोन्या-चांदीच्या व्यवसायाला चांगलीच मागणी. त्यामुळे तुलनेने उत्तर भारतात जाणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच. पण १९७२ च्या आसपास निवृत्ती सूर्यवंशी कोलकात्याला गेले. ते मूळचे खानापूरजवळच्या किंजरवाडीचे. तेव्हा कोलकात्यात मराठी गलाई व्यावसायिक कोणीच नव्हता. सुरुवातीला त्यांनी जवळच्या बरदवान जिल्ह्य़ातील एका मराठी गलाई व्यावसायिकाकडे काम केलं. नंतर मेमारे गावात गलाई व्यवसाय सुरू केला. पण तेथे फारसा वावच नव्हता. मग ७८च्या आसपास ते कोलकात्यात आले. त्यांनी गलाई दुकानांचा व्याप इतका वाढवला की मुलगा विजय सूर्यवंशी ८७ साली कोलकात्यात आला तेव्हा आठ- नऊ दुकानं झाली होती. विजय सूर्यवंशी यांनी हा व्यवसाय वाढवत सोन्या-चांदीच्या ठोक व्यापारातही प्रवेश केला. आज त्यांच्या १६ शाखा देशभर कार्यरत आहेत.

साळशिंगेचे अशोक जाधव, सध्या छत्तीसगडमध्ये भिलाई गावात स्थिरावले आहेत. पोलाद खाणी आणि कारखान्यांमुळे भिलाई म्हणजे एक प्रकारे मिनी भारतच म्हणावे लागेल. १९८७ साली त्यांनी भिलाईत गलाईच्या दुकानात कामाला सुरुवात केली. १९९१ ला स्वत:चं दुकान सुरू केलं. नंतर दागिन्यांचं दुकानदेखील सुरू केलं. आज दागिन्यांबरोबर कपडय़ांच्या व्यवसायातदेखील ते शिरले आहेत.

परप्रांतात जायचं आणि तेथे एखादा व्यवसाय सुरू करायचा हा तसा कठीणच प्रकार. त्यात केवळ विश्वासावर अवलंबून असलेलं काम. आजच्यासारखी मार्केटिंगची गणितं तेव्हा नव्हती. उलट परप्रांतीय म्हणून हेटाळणीच व्हायचा संभव अधिक. स्थानिक आणि उपरे हा संघर्ष आलाच. त्यात कोलकाता किंवा केरळसारखे कम्युनिस्ट प्रभावाखालचे राज्य असेल तर तो आणखीनच उफाळून येणार. अशा संघर्षांलादेखील अनेकांना तोंड द्यावं लागलं.

जयसिंग गायकवाड मूळचे बलवडी (खानापूर)चे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर अमृतसरला जाऊन त्यांनी वर्षभर मित्राच्या गलाई व्यवसायात अनुभव घेतला. त्यानंतर मुंबईजवळ मीरा भाईंदर येथे सात-आठ वर्षे गलाईचा व्यवसाय सुरू केला. त्यात फारसं यश मिळत नव्हतं. पैसा हाती राहत नव्हता. जोड व्यवसाय म्हणून रिक्षादेखील चालवली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की दागिन्यांच्या उत्पादनात जायला हवं, पण तेथे भांडवल लागणार. नातेवाईकांकडून उधार-उसनवार करून केरळात एर्नाकुलमजवळ हरिपाट येथे एक जागा घेऊन यंत्राद्वारे सोनसाखळी उत्पादनं सुरू केलं. आणि लागलीच स्थानिक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. स्थानिक कामगारांचं शोषण वगैरे मुद्दे पुढं करून चक्क कारखान्याला कुलूपच ठोकलं. यंत्रसामग्री आत अडकली. पैसे तर अडकलेच; पण कामदेखील थांबलं. तेव्हा एका मित्राकडून कळलं की त्रिसुरला सोनसाखळीची बरीच मागणी असते. मग त्यांनी त्रिसुरला गाजावाजा न करता गावापासून लांब एका बंगल्यात काम सुरू केलं. पुढून कुलूप लावून मागील दरवाजा वापरायचा. सोनसाखळीची मागणी वाढत गेली आणि भांडवल कमी पडू लागलं. तेव्हा कर्जाचा पर्याय डोळ्यासमोर होता. पण गावातल्या जमिनीशिवाय दुसरं काही तारण नव्हतं. नव्यानेच सुरू झालेल्या प्रतापदादा साळुंखे यांच्या पतसंस्थेने शेतजमिनीवर १२ लाख कर्ज द्यायचं कबूल केलं. खरे तर त्या भागातील एकंदरीत स्थिती अशी होती की लोक परप्रांतात रिकाम्या हाताने जायचे आणि गावाकडे येताना पैसे घेऊन यायचे. पण जयसिंग गायकवाड गावाकडून व्यवसायासाठी पैसे घेऊन चालले होते. हा उलटा मामला होता. पण त्यांनी व्यवसायात घेतलेल्या या जोखमीचा फायदाच झाला. आज त्रिसुरमध्ये ते आघाडीचे सोनसाखळी उत्पादक म्हणून ओळखले जातात.

अशी एक ना दोन कैक उदाहरणं सांगता येतील. आटपाडीचे राजाराम देशमुख कोलकात्याला दहा वर्ष राहिले. आत्ता मुंबईत झवेरी बाजारात त्यांची आटणी, टंच आणि हॉलमार्कगिंची तीन दुकानं कार्यरत आहेत. पारे गावचे दीपक साळुंखे तामिळनाडूमध्ये आज केरळात चेन सम्राट म्हणून ओळखले जातात. पुण्यात असंख्य मारवाडी व्यापाऱ्याच्या नाकावर टिच्चून दागिन्यांचा ठोक व्यापार करणारे तानाजी बाबर मूळचे वाळूंजचे. प्रत्येकाच्या संघर्षांची कथा वेगवेगळी.

परराज्यात जाऊन सोन्या-चांदीसारख्या केवळ विश्वासावर चालणाऱ्या या व्यवसायात कामं कशी मिळाली याची कारणमीमांसा शोधताना अनेक रंजक गोष्टी कळतात. गलाई, रिफायनरीला काम मिळायचं ते मुख्यत: व्यापाऱ्याकडूनच. त्यांच्याकडे काम मागायला जाताना अत्यंत नम्र होऊन, अगदी साधी लुंगी गुंडाळूनदेखील अनेकजण जायचे. भाषा येत नसायची, पण पाण्यात पडल्यावर पोहायला येते तशी परिस्थिती  होती. जुजबी भाषा शिकून घेतली. कामं कष्टाची होती, दिवसभर तप्त भट्टीच्या बाजूला बसून राहायचं म्हणजे त्रासाचंच काम होतं. ही कामं करायला बऱ्याच वेळा स्थानिक नाखूश असायचे हा आणखीन एक फायद्याचा मुद्दा होता. एखाद्या व्यापाऱ्याची ओळख असायची त्यावरून मग पुढे व्यवसाय वाढवत न्यायचा. कधी कधी दुकान सुरू केल्यानंतर पाच-सहा महिने कामच नसायचं. गावातून निघताना ‘दुकान काढायला’ गेला असं म्हटलं जायचं. पण खरं तर या दुकानात भट्टीशेजारी बसून पुरतं काळवंडून जायला व्हायचं. आज गॅसची भट्टी आहे, पण पूर्वी कोळशाची भट्टी असायची. शिकायला गेलेल्याला पहिल्यांदा कोळसे फोडणं हेच काम करायला लागायचं. आजच्यासारखी फोनची सुविधादेखील नव्हती. त्यामुळे वर्षभरात गावाकडची खबरबात नसायची. परत जायचं तर प्रवासाची माहिती आणि पैसेदेखील नसायचे. जे पडेल ते काम करायचं. महिनाभरात कारागीर तयार व्हायचा.

एकूणच हे सारं कष्टाचं काम असलं तरी यात प्रलोभनदेखील प्रचंड. रोज हाताशी येणारं किलो किलो सोनं मोहात पाडायला पुरेसं होतं. पण त्याचबरोबर चोरीचा माल वितळवून घ्यायला म्हणूनदेखील या गलाई दुकानांकडे पाहिलं जायचं. पूर्वी चोरी झाली की पारध्यांच्या पालावर पोलिसांच्या धाडी पडायच्या, तसे सोन्याच्या चोरीनंतर पहिली संशयाची सुई ही गलाई व्यावसायिकावर यायची. काही जण त्या मोहात पडून घसरायचे, ज्यांनी हा मोह टाळला ते टिकून राहिले, पुढे जात राहिले.

उत्तरेच्या तुलनेत सर्वाधिक स्थलांतर झाले ते दक्षिणेत. येथे सोन्याच्या दागिन्यांची मागणी सर्वाधिक. विशेषत: दक्षिणेतील मुस्लीम आणि ख्रिश्चनांमध्ये सोन्याचा वापर अधिक असल्याचे तेथील व्यापारी सांगतात. तुलनेने उत्तरेत तशी मागणी कमी. पण सर्वाधिक वेग आला तो सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे घातलेली बंदी उठल्यानंतर.

हे लोक कामानिमित्त भारतभर पसरले असले तरी या सर्वाची नाळ आपल्या गावांशीच जोडली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने स्थानिक भाषा शिकली असली तरी पश्चिम महाराष्ट्राची रांगडी भाषा आजही त्याच ठसक्यांसह त्यांच्या तोंडी दिसून येते. जे बाहेर गेले त्यांच्या पुढच्या पिढय़ा वाढल्या त्या वेगवेगळ्या राज्यात. त्यांची लग्नंदेखील झाली ती वेगवेगळ्या राज्यांतील व्यावसायिकांशी. मात्र सारं लग्नकार्य मूळ गावात येऊनच. आईपांढरीचं नातं त्यांच्या मनातून पुसलेलं नाही.

१९६० ते ८०च्या दशकात स्थलांतरित झालेले बहुतांश गलाई व्यावसायिक हे कमी शिक्षित होते. पण त्यांना व्यवसाय कसा करावा याचं गणित चांगलंच माहीत होतं. पुढच्या पिढीला मात्र त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षण दिलं. आज पहिल्या पिढीने वाढवलेला व्यवसाय अनेक ठिकाणी सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये विस्तारला आहे तो सांभाळण्याचं काम शिकली सवरलेली हीच पुढची पिढी करत आहे.

देशभरात इतका विस्तार असला तरी गेल्या काही वर्षांपर्यंत मात्र यांचे संघटन नव्हते. परराज्यात एकेका शहरात ५०० हजारच्या संख्येने असलेला मराठी माणूस तुलनेने स्वत:च्याच कोशात असायचा. एकतर व्यवसाय वाढवण्याची गरज होती. त्यामुळे दुसऱ्या कोणाशी सलगी केली तर तो आपला व्यवसाय पळवेल ही भीती. त्यामुळे अनेकदा आपापसातच फारशी सलगीदेखील होत नसे.  पर भागात असल्यामुळे आपल्या संघटनेकडे स्थानिक व्यापारी कसे पाहतील हीदेखील भीती होतीच. शिवाजी महाराज म्हणजे शिवसेना, अशी परराज्यातील स्थानिकांची समजूत झालेली असल्यामुळे आपल्या कामात राजकारणाचा शिरकाव नको म्हणून शिवाजी महाराजांचा फोटोदेखील आपल्या फलकावर लावण्याचे टाळण्याकडे कल झुकावा अशी परिस्थिती काही ठिकाणी होती. या सर्वाला पूर्वीच्या लोकांनी भोगलेल्या हालअपेष्टा, कष्टांची पाश्र्वभूमीदेखील आहेच. फारसं कोणाच्या अध्यात मध्यात न जाणारा हा वर्ग, त्यामुळे स्वत:साठी देखील लवकर एकत्र आला नव्हता. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, केरळ अशा ठिकाणी काही प्रमाणात राज्य पातळीवर एकत्रीकरण सुरू होतं. राज्य पातळीवर संघटना काढल्या होत्या. केरळात अखिल भारतीय मराठी संवर्धन, आंध्रात मराठा असोसिएशन असे प्रयोग सुरू झाले होते. पण ते सर्व २००० नंतरच्या काळात. जयसिंग गायकवाड यांनी ‘अखिल भारतील मराठी संवर्धन’ या संस्थेच्या माध्यमातून काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवरील सर्व आटणी व्यावसायिकांना एकत्र आणायला सुरुवात केली होती. मधुकर उपाध्ये यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक काम करून दक्षिण भारतातील गलाई बांधवांची माहिती संग्रहित करून प्रकाशित करण्याचे मोठे काम केले. तर ‘नॅशनल गोल्ड, सिल्व्हर रिफायनर्स अ‍ॅण्ड ज्वेलर्स’ची स्थापना झाली ती २०११ साली. आज देशभरातील गलाई बांधवांना एकत्र आणायचे काम ही संस्था करत आहे.

देशभरात विस्तारलेल्या या दीड लाखांच्या आसपास असलेल्या गलाई बांधवांच्या एकूणच कामाचे दस्तावेजीकरण होणे गरजेचे आहे. यांच्या स्थलांतरणामुळे दुष्काळी भागालादेखील आज काही प्रमाणात विकासाची कवाडं खुली झाली आहेत. काहींनी आपल्या परिसरातील शिक्षणाच्या सुविधांचा विकास केलाय, तर काहींनी इतर सामाजिक कामात भाग घेतलाय. पण त्याबरोबरच या गलाई व्यावसायिकांमुळे एकूणच येथील अर्थव्यवस्थेतदेखील बराच फरक पडला आहे. मे महिन्यात विटय़ातून देशभरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी अगदी रोजची खासगी बससेवा असते इतकी त्यांची व्याप्ती वाढलेली आहे. आज सुमारे ३० टक्के गलाई व्यावसायिक दागिन्यांच्या व्यवसायात स्थिरावले आहेत, काही सोने खरेदीविक्रीचा ठोक व्यापारदेखील करतात. तर ७० टक्के आजही गलाई कामात आहेत. २००० सालानंतर मात्र हे स्थलांतर काहीसं मंदावलं आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या घट म्हणून मिळणाऱ्या सोन्याच्या प्रमाणातदेखील बदल झाले आहेत.  गलाई, शुद्धीकरण, टंच या कामात यंत्राने केलेला शिरकाव हे तर कारण आहेच, पण त्याचबरोबर या दुष्काळी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे व नोकरी-व्यवसायाचे इतर पर्याय धुंडाळण्याकडे कल राहिलेला दिसतो. यंत्राच्या शिरकाव्यामुळे जिथे दहा माणसे लागायची ते काम दोनचार माणसांमध्ये होऊ लागले. त्यामुळे मानवी कौशल्याचा भाग कमी झाला. कामाचा वेगदेखील वाढला, तसा स्थलांतरणाचा वेग मंदावला. मात्र त्यापूर्वीच्या पिढय़ांनी निर्माण केलेली त्यांची ओळख आजही कायम आहे, ती राहणारच आहे. कारण आज ते तेथील व्यवसाय चक्राचा एक भाग झाले आहेत. त्या व्यवसायात टिकून राहण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. दुष्काळातून शोधलेल्या या गलाई व्यवसायाच्या मार्गाने त्यांना खरोखरच सोन्याचे दिवस दाखवले आहेत, हे मात्र निश्चित.

मानवी कौशल्य ते यंत्राचा वापर

गलाई व्यावसायिक देशभर पसरला ते त्याच्या कष्टांमुळे आणि गलाई करण्याच्या कौशल्यामुळे. अतिशय तप्त अशा भट्टीत मुशीत सोनं वितळवायचं आणि त्याच्या लगडी तयार करायच्या या कामात मुख्यत: कौशल्यापेक्षा कष्टाचा भाग अधिक होता. मात्र याच्या जोडीने या कारागिरांनी सोने-चांदी शुद्ध करण्याचं कौशल्य आत्मसात केलं. आज अ‍ॅसिडला हात न लावता, त्याचा धूर सहन करावा न लागता यंत्राच्या साहाय्याने अल्पकाळात सोनं शुद्ध करणं शक्य झालं असलं तरी दहा-पंधरा वर्षांपूर्वी हे सारं काम केवळ मानवी कौशल्यावरच अवलंबून होतं. हे काम जिकिरीचं होतं. एक किलो सोनं जर शुद्ध करायचं असेल तर ते दोन किलो चांदी बरोबर नायट्रिक अ‍ॅसिडमध्ये उकळवावं लागायचं. त्या प्रक्रियेत चांदीचे पाणी व्हायचं आणि सोनं माती स्वरूपात खाली बसायचं. ही माती सुकवायची. ती १०५० डिग्री तापमानावर तापवली की सोनं तयार व्हायचं. चांदी राहिलेल्या पाण्यात सोडीयम क्लोराइड टाकली की विरजल्या दुधासारखं मिश्रण तयार व्हायचं. त्यात आर्यन सिल्व्हर नायट्रेट थोडा वेळ फिरवलं की मातीच्या रूपात चांदी खाली बसू लागते. रोज किलोभर सोनं शुद्ध करायचं काम सलग चारपाच वर्ष केलं की फुप्फुसांवर दुष्परिणाम झालाच म्हणून समजायचं. त्यामुळे हे अ‍ॅसिडचं काम केल्यावर मद्यपान केल्यास त्रास होत नाही अशी गैरसमजूत काही कारागिरांमध्ये रुजली होती. परिणामी अनेक कारागीर मद्याच्या आहारी जाऊन बरबाद झाल्याचेदेखील सांगितलं जातं. आज हे सर्व अ‍ॅसिडचं काम यंत्राच्या साह्य़ाने केलं जातं. त्यामध्ये माणसाचा अ‍ॅसिडशी कोणताही थेट संपर्क येत नाही. अर्थात ही यंत्रसामग्री महागदेखील असते. साधारण गेल्या दहा वर्षांत यंत्रयुक्त रिफायनरीजनी या उद्योगाचा ताबा घेतला आहे.

व्यवसायाचे बदलते गणित

गलाई, रिफायनरी व्यवसायातील गणितं काळानुसार बदलत गेली. सुरुवातीला गलाई, रिफायनरीमध्ये रोख मजुरीऐवजी वेस्टेजमध्ये मजुरी मिळायची. कालांतराने ही पद्धत बदलत गेली. एकतर रिफायनरीचं काम यंत्राधारित होत गेलं. आटणीमध्ये कोळसा जाऊन गॅस भट्टी वगैरे प्रकार आले. महत्त्वाचे म्हणजे वेस्टेजचं प्रमाण कमी होत गेलं. काही व्यावसायिकांच्या मते जेव्हा सोनं पाच लाख रुपये किलो होतं तेव्हा दिवसभर किलोभर सोन्याचं काम केलं तर वीस एक हजार सुटायचे. आज सोनं तीस लाख रुपये किलो झालं तरी तेवढेच पैसे मिळतात. त्यातच ज्यांनी केवळ आटणीपुरताच व्यवसाय मर्यादित ठेवला त्यांच्या प्राप्तीवर मर्यादा आली. ज्यांनी त्यातून पुढे जात त्याला अन्य व्यवसायाची जोड दिली ते यशस्वी होत गेले.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2

First Published on October 18, 2017 3:03 pm

Web Title: lokprabha 2017 diwali special issue other states successful marathi businessmen in gold
Next Stories
1 लोकप्रभा दिवाळी २०१७ : झलक देखण्या युक्रेनची..!
2 लोकप्रभा दिवाळी २०१७ : ड्रॅगन डायरी
3 आदरांजली : आरशात ‘पाहणारा’ पत्रकार!
Just Now!
X