अजब गावांची, गजब कहाणी…
गाव म्हणजे वेगवेगळ्या जातिधर्मातली, आर्थिक स्तरातली, वेगवेगळ्या वयाची, स्वभावाची माणसं. एखाद्या गावात तिथली सगळी माणसं मिळून एकाच गोष्टीचं वेड घेऊन जगतात यावर कोण विश्वास ठेवील? आपल्या देशातल्या अशा वेडय़ा गावांविषयी-

एकीकडे सगळं जग इंग्रजी भाषेच्या मागे धावत असताना कर्नाटकातलं मत्तूर हे गाव मात्र संस्कृतप्रेमी आहे. या गावातले लोक फक्त आणि फक्त संस्कृत बोलतात.

‘भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती..’ असं संस्कृत भाषेचं वर्णन केलं गेलेलं आहे. सर्व भाषांमधील मुख्य आणि गोड भाषा कोणती तर ती संस्कृत असं सांगितलं गेलं आहे. सर्वात प्राचीन भाषा, देवांची भाषा, सर्व भाषांची जननी असलेली भाषा म्हणून संस्कृत भाषेचा गौरव केलेला असतो. परंतु आज भारतात किती लोकांना ही भाषा अवगत आहे असे विचारले तर अतिशय निराशाजनक उत्तर समोर येतं. शाळेत क्वचित शिकली जाणारी भाषा आणि नंतर फक्त वेदांचा अभ्यास करायचा असेल किंवा पौरोहित्य करायचे असेल तर शिकायची भाषा इतपतच या भाषेचे महत्त्व राहिले आहे असे वाटते. या भाषेच्या संवर्धनासाठी विविध संस्थांकडून प्रयत्नसुद्धा केलेले दिसतात. परंतु तरीही काहीशी नकारात्मक स्थिती असताना आपल्या देशात एक गाव असे आहे जिथे सगळे ग्रामस्थ फक्त संस्कृतच बोलतात. ऐकून आश्चर्य वाटेल पण होय, कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यत मत्तूर नावाचे हे गाव आहे, ज्या गावातील सर्व ग्रामवासी हे फक्त संस्कृतमध्येच बोलतात.

शिमोगा जिल्ह्यच्या दक्षिणेला फक्त आठ कि. मी. अंतरावर आहे हे अजब गाव मत्तूर. तुंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे नितांतसुंदर असे टुमदार गाव, ज्याला भारतातलं संस्कृत गाव म्हणून ओळखलं जातं. इथल्या सर्व ग्रामस्थांची संभाषणाची भाषा संस्कृत आहे. राज्याची भाषा कन्नड असली तरीसुद्धा इथल्या ग्रामस्थांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक आपली प्राचीन भाषा संस्कृत आजही जपून ठेवली आहे. नुसती जपून ठेवली आहे असे नाही तर गावची बोलीभाषा म्हणून संस्कृतचाच वापर केला जातो. या गावाला तशी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. मत्तूरमध्ये संखेती ब्राह्मण लोक मोठय़ा संख्येने आहेत. हे लोक जवळपास ६०० वर्षांपूर्वी केरळमधून इथे येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला या गावात कन्नड आणि तमिळ भाषा बोलली जायची. संस्कृत भाषा ही फक्त संखेती ब्राह्मणच बोलायचे. परंतु १९८० साली गावातील काही प्रतिष्ठित मंडळी आणि संस्कृत भारती या संस्थेने सर्व गावकऱ्यांना संस्कृत शिकण्यासंबंधी आवाहन केले, आणि आश्चर्य म्हणजे गावकऱ्यांनीसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर संस्कृत भाषा ही सर्व ग्रामस्थांना शिकवली गेली आणि गावातले आबालवृद्ध आता फक्त संस्कृतमध्येच एकमेकांशी संवाद साधतात. गावात बालवाडीपासून ते इयत्ता दहावीपर्यंत सर्वाना संस्कृत शिकवले जाते. सर्व जातीधर्माचे लोक कुठलाही अभिनिवेश न बाळगता मोठय़ा आनंदाने संस्कृत शिकतात. पाठशाळेतील विद्यार्थी गावात उपलब्ध असलेल्या प्राचीन पोथ्यांमधील संस्कृत साहित्य वाचून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला एखादा अथवा तीन-चार शब्द गहाळ झालेले असतात, ते कॉम्प्युटरवर स्कॅन करून गहाळ झालेले शब्द कोणते असतील ते शोधून त्या त्या ठिकाणी ते पुन्हा लिहितात.

मत्तूरमध्ये वेदाध्ययन करण्यासाठी पाठशाळा आहेत आणि गावातले अनेक तरुण व्यवसाय म्हणून संस्कृत अध्यापनाकडे मोठय़ा आनंदाने वळतात. अतिशय देखण्या अशा या मत्तूर गावात आल्यावर आपण जणू भूतकाळात प्रवेश केला आहे असेच जाणवते. अतिशय गोड आणि नादमय अशी संस्कृत भाषा जिथे तिथे कानावर पडत असते. प्राचीन मंदिरे, भातशेती आणि नारळाच्या बागा आपले स्वागत करतात. आणि त्याच्याच जोडीला असते सुमधुर अशी गीर्वाणवाणी अर्थात संस्कृत भाषा. इथे प्राचीन संस्कृत भाषेचे संवर्धन होत असले तरीसुद्धा इथले लोक आधुनिक विचारसरणी जोपासणारे आहेत. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने यांचा अगदी सहजगत्या इथे वापर होतो. आणि गावातल्या पाठशाळेतले काही तरुण अध्यापक तर आता स्काईपच्या माध्यमातून जगभरात कोणालाही मोफत संस्कृत शिकवतात. या त्यांच्या उपक्रमाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तसेच गावातले काही तरुण उच्चविद्याविभूषित असून परदेशातसुद्धा स्थायिक झालेले आहेत. परंतु ही मंडळीसुद्धा मुद्दाम आपल्या गावी येऊन इथे जोपासली जाणारी संस्कृती आवर्जून जतन करण्याच्या कामी आपला हातभार लावत असतात. या गावाची अजून एक खासियत म्हणजे इथे असलेली ‘गमका कला’. संगीत आणि कथाकथन यांच्याशी निगडित असलेली ही कला इथल्या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मत्तूर या संस्कृत गावाची प्रसिद्धी आता देशाच्या सीमारेषा ओलांडून थेट परदेशात पोहोचलेली आहे. त्यामुळे परदेशी अभ्यासक आता या गावात येऊन संस्कृत शिकू लागले आहेत.

या गावात राहायला हॉटेल्स, रेस्टॉरंट असं काहीही नाही. शिमोगा हे जिल्ह्यचे ठिकाण इथून फक्त आठ कि. मी. वर असल्यामुळे इथे येणारे पर्यटक एका दिवसात गाव बघून परत शिमोग्याला जातात. परंतु संस्कृत शिकण्यासाठी इथे राहायचे असेल तर गावकरी एकतर गावातल्या पाठशाळेत राहायची सोय करतात नाहीतर गावातल्या कोणाच्या तरी घरी राहण्या-जेवणाची सोय केली जाते. परदेशी अभ्यासकसुद्धा इथे स्थानिकांच्याच घरात राहून संस्कृत भाषा मोठय़ा आनंदाने शिकतात. सातासमुद्रापार गेलेली या संस्कृत गावाची कीर्ती, आपल्या देशातल्या लोकांना माहिती नसावी हेच मोठे दुर्दैव. म्हणूनच यापुढे जेव्हा केव्हा कर्नाटकात जाल तेव्हा शिमोग्याला अवश्य जा. तिथल्या भेटीत मत्तूरला जरूर भेट द्या. तिथे सहजगत्या बोलली जाणारी मधुर गीर्वाणवाणी ऐका आणि तिचा आगळावेगळा आनंद घ्या.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यतले झिरी हे गावसुद्धा असेच संस्कृत बोलणारे गाव म्हणून ओळखले जाते.
आशुतोष बापट