अजब गावांची, गजब कहाणी…
गाव म्हणजे वेगवेगळ्या जातिधर्मातली, आर्थिक स्तरातली, वेगवेगळ्या वयाची, स्वभावाची माणसं. एखाद्या गावात तिथली सगळी माणसं मिळून एकाच गोष्टीचं वेड घेऊन जगतात यावर कोण विश्वास ठेवील? आपल्या देशातल्या अशा वेडय़ा गावांविषयी-

ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवजा दुकानातून हवी ती वस्तू उचलायची, तिची योग्य ती किंमत तिथे ठेवायची आणि पुढे जायचं. दुकानदार नसला तरी इथे कधीही फसवणूक होत नाही.

मिझोरम या ईशान्येकडील राज्यात पोस्टिंग आले, तेव्हा आपल्या बदलीत काही राम नाही असे वाटायला लागले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणात पुरातत्त्ववेत्ता म्हणून दिल्लीत सुरुवात केल्यावर कच्छ, हरयाणा, उत्तर प्रदेश येथे हडप्पा संस्कृतीशी संबंधित उत्खननांचा अनुभव गाठीशी धरून मी महाराष्ट्रात परतलो होतो. महाराष्ट्रात पुरातन तोफांचा अभ्यास चालू केल्यानंतर पश्चिम भारत हे आपले कार्यक्षेत्र असणार याची मनात खूणगाठ बांधली होती. त्या दृष्टीने गोव्यातील समुद्री पुरातत्त्व शाखेत बदलीसाठी मी उत्सुक होतो, पण झाले भलतेच.. पश्चिमऐवजी मी थेट उत्तर पूर्वेत आणि समुद्राऐवजी डोंगराळ प्रदेशात जाऊन पडणार होतो. याबद्दल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महानिर्देशक डॉ. राकेश तिवारी  यांच्याकडे एक वेळ दादही मागून पाहिली. त्यांनी फक्त हसून, ‘‘बेटा, मैं सही आदमी को वहाँ भेज रहाँ हूं’’ एवढेच सांगितले. कामही थोडेसे अवघडच. ईशान्येकडील सातही राज्यांतील पुरातत्त्वाचा कारभार ‘गोहाटी मंडल’ या कार्यालयामार्फत चालवला जात होता. त्यापैकी मिझोरम, त्रिपुरा व मणिपूर या अतिपूर्वेतील राज्यांचे एक मंडल बनवून त्यासाठी आईझॉल मंडल या नवीन कार्यालयाची स्थापना करायची होती. तसेच मिझोरममध्ये पुरातत्त्वाविषयी पायाभूत संशोधन करणेही अपेक्षित होते. ईशान्य भारतातील संस्कृतीबद्दल थोडेफार वाचन असले तरी हा भाग कधीही न पाहिलेला होता, तिथली संस्कृती, भाषा, रीतिरिवाज, खानपान हे सगळेच नवे असल्यामुळे आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कितपत पार पाडता येईल याबद्दल मी साशंक होतो. सुदैवाने पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना बरेचसे मित्र मेघालय, आसाम, नागालँड, अरुणाचल व मणिपूर येथील होते. तसेच मामेबहीण मुग्धा व तिचा नवरा लेफ्टनंट कर्नल श्रीकृष्ण केळकर मिझोरमची राजधानी आईझॉल येथे असल्याचे कळल्यावर सर्व काळजी दूर झाली. तेथे स्थिरस्थावर झाल्यानंतर ऑफिससाठी जागा शोधणं आदी प्रशासनिक कामांबरोबरच पुरातात्त्विक संशोधनासाठी अस्मादिकांची मुशाफिरी सुरू झाली.

मिझोरम तसा पूर्णपणे डोंगराळ प्रदेश, चांपाईकडील थोडा मैदानी भाग सोडल्यास सपाट जमीन विरळाच. ज्याला आपण ‘मिझो’ टोळ्यांनी व्यापलेला भाग समजतो तो भूभाग. भाषाशास्त्राच्या एका मतप्रवाहानुसार ‘मि’ म्हणजे आपण लोक व ‘झो’ म्हणजे डोंगराळ भूप्रदेश होय. ब्रिटिश काळात हा बंगाल – आसाममधील ‘लुशाई हिल्स’ या नावाने ओळखला जायचा. या भागातील जनजीवन ढवळून निघाले ते ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतरच. खरे तर या भागातील आपापसांत झगडणाऱ्या तसेच चहाच्या मळ्यांवर छापे टाकणाऱ्या टोळ्या ब्रिटिशांच्या दृष्टीने डोकेदुखी होती. त्यामुळे मुख्य आसाम व ब्रह्मदेश यामधील भूभागावर प्रशासकीय पकड ढिलीच होती. ब्रह्मदेश व भारत यामधील सीमेचे आरेखन करताना रिओ नदीच्या पूर्वेकडील भाग ब्रह्मदेशात तर पश्चिमेकडील भूभाग भारतात आला. प्रत्यक्षात या नदीच्या दोन्ही बाजूस मिझो टोळ्यांचे वास्तव्य होते. वांशिक तसेच भाषिक आधारावर अनेक लोकांची भारत ही पसंती नव्हती, परंतु १९३७ ला ही सीमारेखा निश्चित केली गेली व त्यातच पुढील प्रादेशिक फुटीची बीजे रोवली गेली. हा सर्व भूभाग स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात यावा यासाठी सशस्त्र लढाही लढला गेला; परंतु खंबीर राजकीय भूमिकेमुळे तसेच भारतीय सेना व वायुसेना यांच्या एकत्रित उपाययोजनांमुळे १९७२ पासून मिझोरम भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक आहे.

पुरातात्त्विक अवशेष धुंडाळण्यासाठी खेडी भटकायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या मिझोरमचे अंतरंग उलगडू लागले. या संपूर्ण भागाचे अर्थकारण झूमू या पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या शेतीवर तसंच पशुपालनावर आधारित आहे. चिकट वर्गात मोडणारी भाताची एक जात, मका, चहा, कडधान्ये व काही प्रमाणात रेशीम उत्पादन इथे होते. व्यापारउदीम तसा आईझॉल वा जिल्ह्य़ांच्या ठिकाणी एकवटलेला. भारताबरोबरीनेच म्यानमारची उत्पादने सर्वत्र दुकानांमध्ये दिसतात. दुकानदारीत सर्वत्र स्त्रियांची मक्तेदारी दिसून येते, वाहने-दुरुस्ती वगळता सर्व दुकाने स्त्रीवर्ग चालवतो. शहरांमध्ये रोजगाराच्या काही वेगळ्या संधी उपलब्ध असल्या तरी खेडय़ांतील जनजीवन शेती, पशुपालन, शिकार व चर्च यांभोवतीच फिरते. वर्षांतील सात ते आठ महिने पावसाचे असल्यामुळे जंगलामध्ये भरभरून झाडे, वनस्पती व प्राणी आहेत. येथे साग व बांबू यांपासून फर्निचर आदी बनवण्याचे उद्योग आहेत. एकूण काय, तर इथले आयुष्य कष्टप्रद आहे. डोंगरउतारावरील शेतीसाठी, फळे गोळा करण्यासाठी लाकूड, बांबू किंवा शिकारीसाठी जंगलात जाणे अपरिहार्य ठरते. शहरांमध्ये दुकानदारीला वाव असला तरी गावात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ती चैन ठरते. कदाचित त्यातूनच ‘ऑनेस्ट शॉप्स’ ही कल्पना पुढे आली असावी.

दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी बांबूच्या चौकटी उभ्या करून पत्र्याचे छत असलेली अनेक दुकाने दिसली. त्यात सामान मांडून ठेवलेले दिसत होते, पण माणसे दिसली नाहीत. सुरुवातीला एवढे विशेष वाटले नाही. पण नंतर न राहवून आमच्या स्थानिक सहकाऱ्याला, माहुमा सिनसाँगला विचारले, ‘‘काही कारणाने दुकानदार कुठे गेले आहेत का? संप-बिम्प?’’ तो हसला व एका दुकानापाशी गाडी थांबवायला लावली. दुकानात वेगवेगळ्या भाज्यांचे गठ्ठे बांधून ठेवले होते. काही ठिकाणी वाटे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधलेले होते, तर काही ठिकाणी भोपळ्यांसारख्या भाज्यांवर आकडे टाकले होते. सर्व ठिकाणी दिसणारी एकसमान गोष्ट होती, ती म्हणजे पैसे टाकण्यासाठी ठेवलेला डबा. हवी ती गोष्ट उचला, त्यावर लिहिलेली किंमत डब्यात टाका. मनात अनेक शंका होत्या, लोक पैसे न टाकताच भाज्या उचलत असतील का? कमी पैसे टाकत असतील का? माल कशावरून चोरी होत नाही? इ. इ. आमच्या मित्राने या सर्व शंकांचे निराकरण केले. आणि केवळ विश्वासाच्या जोरावर हे सगळे व्यवहार चालतात हे पटवून दिले. या छोटय़ाशा दुकानांमध्ये दुनियाभरचे आश्चर्य सामावलेले होते. शितावरून भाताची परीक्षा म्हणतात तसे मिझो समाजाचे अंतरंग ही दुकाने दाखवत होती. हे पैशांनी भरलेले डबे चोरीस गेल्याचे आजवर एकही उदाहरण दिसून येत नाही.

नोकरीच्या निमित्ताने भारतातील सर्व राज्ये व परदेशात भटकण्याची व तेथील जीवन अनुभवण्याची संधी मिळाली, पण दुकानदार नसलेल्या दुकानांमध्ये ग्राहक नेमके पैसे देऊन तेवढाच माल उचलतो हे दुर्मीळ उदाहरण केवळ मिझोरममध्येच दिसले. एवढय़ा दुरून आपल्या भागात संशोधनासाठी आलेल्या माणसाला मदत करायची धडपड, स्वभावातील सरळपणा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी मनाला भिडून गेल्या. खरे तर ज्यांना आपण मिझो टोळ्या समजतो त्यातही लुशेई, पाईते, दुलियन,  रात्ते, पोई, फालम, भार व कुकी अशा अनेक टोळ्या आहेत. यांचा एकमेकांविरुद्ध तसेच ब्रिटिश व भारत सरकारविरुद्ध लढायांचा दीर्घ हिंसक इतिहास आहे. ‘हेड हंटर्स’ म्हणून नागा लोकांबरोबर मिझोही प्रसिद्ध होते. स्वातंत्र्योत्तर काळातही इथल्या सामान्य नागरिकांनी दुष्काळ, भूमिगत चळवळी व भारतीय सेना यातील संघर्षांत खूप यातना भोगल्या. असे असूनही माणुसकीवरचा या समाजाचा विश्वास या ‘ऑनेस्ट शॉप्स’च्या रूपाने दिसून येतो. आपल्या राज्यात, शहरात वा गावात असा प्रयोग केल्यास काय होईल हा विचार करावयास मात्र मन धजत नाही.
डॉ. तेजस गर्गे