पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेला युक्रेन आता पूर्व युरोपीय देश आहे. सोव्हियत युनियनच्या विभाजनानंतर हा देश आर्थिक गर्तेत लोटला गेला. पण स्वच्छता, सौंदर्य यांचा आर्थिक परिस्थितीशी काहीही संबंध नसतो, हे तिथे गेल्यावर समजतं.

माझी युक्रेन या कम्युनिस्ट देशाची भेट पर्यटनासाठी नव्हे तर माझ्या सुनेचा, मरिनाचा देश बघण्यासाठी होती. पण त्या भेटीसाठी इतके कुटाणे करावे लागले की नकोसा जीव होऊन गेला. मुळातच या देशात जाण्यासाठीची व्हिसा प्रक्रिया भयंकर कटकटीची आणि वेळखाऊ आहे. आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर भरपूर पसे खर्च करावे लागतात. एकतर या देशाचा दूतावास फक्त दिल्लीला आहे. आणि व्हिसाचा अर्ज देण्यासाठी स्वत जावे लागते. शिवाय युक्रेनमधून कुणाचे तरी आमंत्रणपत्र असणे आवश्यक आहे. हे आमंत्रणपत्र सरकारी सहीशिक्क्यनिशी असावे लागते. आणि हा सहीशिक्का मिळवणे सर्वात अवघड गोष्ट असते. कारण युक्रेन देश भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताच्या चार पावले तरी पुढे आहे. सरकारी कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय कुठलेही काम होत नाही हे नक्की. माझ्या सूनबाईने आम्हा उभयतांच्या आमंत्रणासाठी पाचशे डॉलर्स देऊन ते लवकरात लवकर प्राप्त करून घेतले. असो, आमच्या १८ दिवसांच्या व्हिसासाठी आम्ही ६० हजार रुपये खर्च केले आणि इस्तंबूलमाग्रे हारकोव्ह या युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात पोहोचलो.

हे गाव आहे मात्र अप्रतिम सुंदर! या शहराच्या नावाच्या स्पेलिंगनुसार त्याचा रशियनमधून उच्चार होतो ‘खारकोव्ह’, मात्र युक्रेनियन पद्धतीने ‘हारखोव’असे म्हटले जाते. हारकोव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. अतिशय सुंदर आणि गर्द हिरवाईने नटलेले. हारकोव्ह शहराने संपूर्ण युरोपमध्ये तीन वेळा सर्वाधिक हिरवाई असलेले शहर हा किताब पटकावला आहे, असे सांगितले जाते. तसे हारकोव्ह शहराचे सौंदर्य वाढवण्यास नव्याने काही केलेले नाही. पण सोव्हिएत काळातील भव्य इमारती आणि जुनी चच्रेस, मोठमोठय़ा बागा, त्यात असणारे सुरेख वृक्ष आणि सर्वच ठिकाणी जाणवणारे वृक्षसंवर्धन यामुळे शहराला एक शांत आणि संयत व देखणे रूप प्राप्त झालेले आहे. हारकोव्हमधील सेंट्रल पार्क आणि गोर्के पार्क फारच सुंदर आहेत. यापकी गोर्के पार्क साधारण आपल्या एस्सेल वर्ल्डप्रमाणे आहे. पण बागबगीचाही तितकाच प्रेक्षणीय आहे. मधोमध सुंदर तलाव आहे. भरपूर घनगर्द वृक्षराजी आहे. बागेत जागोजागी लहान मुलांचे ब्राँझचे सुंदर पुतळे ठेवलेले आहेत. ही ब्राँझची शिल्पं फारच सुंदर आहेत.. मुलांना खेळण्यासाठी इतक्या वैविध्यपूर्ण सुविधा आहेत की लहान मुलं या पार्कातून बाहेर निघायला तयारच होत नाहीत. सेंट्रल पार्क शहराच्या मध्यभागी आहे. सुंदर कारंजे, नव्याने बांधलेलं चर्च यामुळे हे पार्क खूपच छान वाटते. त्याच आवारात बऱ्यापकी नीटनेटका झू आहे. पार्कच्या आवारातच एका बाजूला डॉल्फिन शोही चालू असतो. सेंट्रल पार्कच्या समोर ऑपेराची देखणी इमारत आहे. तेथून जवळच असलेल्या युनिव्हर्सिटी हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात शनिवार आणि रविवार, शहरातील कलाकार एका लहानशा पार्कच्या बाजूला, मोकळ्या जागेत आपली पेंटिंग्ज विकायला मांडून ठेवतात. काही पेंटिंग्ज इतकी सुंदर होती की पाहातच राहावे. युक्रेनियन, रशियन निसर्गसौंदर्य कॅनव्हासवर चित्रित केलेले होते. मला फार आवडली ही चित्रं.. त्यामानाने त्यांची किंमत खूपच कमी होती. युक्रेन देश इतका गरीब आहे की या कलेला जास्त किंमत मोजण्याइतके पसे कुणाकडे असणार हा प्रश्नच आहे. मी न राहवून चार पेंटिंग्ज विकत घेतली. पण ती युक्रेनमधून आणताना दमछाक झाली.

एकूणच युक्रेन हा देश फार सुंदर आहे. पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेला हा देश आता पूर्व युरोपीय देश आहे. सोव्हिएत काळात बांधलेल्या सुंदर, मोठमोठय़ा इमारती, अतिशय आखीव-रेखीव रस्ते, सर्वत्र सुंदर बागा, प्रत्येक चार इमारतींच्या मध्ये लहान मुलांना खेळायला भरपूर जागा आणि खेळण्याची साधने या गोष्टी अगदी अग्रक्रमाने असतातच. रस्ते अतिशय प्रशस्त असून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आपल्याकडील मेनरोडएवढे रुंद पदपथ आहेत. या चालण्यासाठी म्हणून असणाऱ्या प्रशस्त रस्त्यांच्या दुतर्फा हारीने लावलेले गर्द सावली देणारे वृक्ष तर संपूर्ण शहराची शोभा वाढवणारे दूतच जणू.. मुलांसाठी खेळायला असणाऱ्या मोकळ्या जागा आणि सर्वत्र असणारी हिरवाई यामुळे हारकोव्हने माझं मनच जिंकून घेतले जणू. सर्वत्र इतकी स्वच्छता असते की मनात येते असं आपल्याकडे कधी पाहायला मिळणार..? खरं पाहता सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर युक्रेनची आíथक संपन्नता संपुष्टात आली आणि देश अत्यंत हलाखीच्या आíथक गत्रेत लोटला गेला. याला अनेक कारणं असली तरी राज्यकर्त्यांचा नाकत्रेपणा हे प्रमुख कारण आहेच. पण त्याचबरोबर, आíथक विपन्नतेमुळे संपूर्ण देशातील सर्वच कार्यप्रणालीमध्ये कमालीचा भ्रष्टाचार बोकाळला आहे. असं म्हणतात की येथील बहुतेक सर्व सरकारी ऑफिसेसमध्ये पसे चारल्याशिवाय कामं होतच नाहीत..! याबाबतीत युक्रेन भारताच्या दोन पावले पुढे आहे असं मला माझ्या सुनेने सांगितले. या देशातील लोकांच्या समस्यांचा जो काही उल्लेख तिच्या बोलण्यातून समोर आला तो ऐकून फार वाईट वाटले. तरुणांना नोकऱ्या नाहीत, बाहेरदेशात जाण्यात अडचणी, राज्यकर्त्यांना काही करावयाचे नाही या सर्व बाबींमुळे देशात एक प्रकारची उदासीनता जाणवते. विशेष म्हणजे या देशातील महिला अधिक आक्रमक, सक्षम आणि सर्व क्षेत्रांत आघाडीवर असल्याचे तीव्रतेने जाणवले. उदासीनता असूनही सगळीकडे स्वच्छता आहे, बागबगीचे, रस्ते, मेट्रो, ट्रम, बस यांसारख्या सेवा अतिशय स्वस्त आणि स्वच्छ आहेत असं तीव्रतेने जाणवलं. वृद्ध व्यक्तीला या सर्व सेवा, त्याचबरोबर वैद्यकीय सेवासुविधा मोफत मिळतात. ब्रेड, बटर, फळं यांसारख्या खाद्यपदार्थाची स्वस्ताई आहे असं मरिना सांगते.

युक्रेन देश सोव्हिएत युनियनपासून विभक्त झाल्यानंतर या देशाची खरं तर परवड झाली. कारण युक्रेनला पश्चिम युरोपीयन समूहामध्ये सामील होण्याची इच्छा होती. परंतु पोलंड, ऑस्ट्रिया या देशांप्रमाणे त्यांनी युक्रेनलाही सामावून घेण्यास नकार दिला. त्यामुळे देशाची आíथक घडी बसण्यास मदत होईल ही युक्रेनियन लोकांची आशा संपुष्टात आली. देशातील तरुणाईला देशाबाहेर जाऊन ऊन्नतीचे मार्ग शोधण्यास अडसर निर्माण झाले. देशांतर्गत आíथक स्थर्य निर्माण करण्यास सरकारला अद्याप यश मिळालेले नाही. उद्योगधंद्यात वृद्धी नसल्यामुळे तरुणवर्गाला नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहेच. शिवाय जुन्या लोकांना ६० वष्रे वयानंतर रिटायर होऊनही कमी वेतनावर काम करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे जुने लोक सत्तरी ओलांडली तरी कामावर जातात. माझी रशियन विहीण, नीना, सत्तरीला पोहोचलेली आहे तरी इंजिनीअर म्हणून अजूनही कामावर जाते. पण तिच्या मुलाला धड नोकरी मिळत नाहीय. नीना मरिनाच्या आईची बालपणापासूनची मत्रीण आहे. तीच आता मरिनाला आईप्रमाणे पाहते. कारण मरिनाचे आईवडील दोघेही कॅन्सरने वारले. नीनाचे यजमानही कॅन्सरनेच १५ वर्षांपूर्वी गेले. हारकोव्ह हे शहर रशियाच्या सीमारेषेपासून अगदी जवळ आहे. सोव्हिएत काळात ज्या चेर्नोबील अणुभट्टीमध्ये विस्फोट होऊन बऱ्यापकी रेडिएशन पसरले होते, ते चेर्नोबील हारकोव्हपासून फार लांब नाही. त्यामुळेच त्या काळात  मध्यमवयीन असणारे बरेच लोक कॅन्सरने गेले किंवा जात आहेत असं मरिनाने सांगितले. खरंतर हारकोव्हमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना रशियामध्ये सामील होण्याची इच्छा आहे. कारण एकतर बहुतेक सर्वजण मूळ रशियातून कामानिमित्त हारखोव्हमध्ये आलेले होते. शिवाय रशियात सामील होता आले तर भविष्यात काही चांगले घडेल अशी त्यांना आशा वाटते. त्यामुळे मध्यंतरी चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत क्रिमियासोबत खारकोव्हसुद्धा रशियात सामील व्हायला हवे होते असे येथील कैक जणांना वाटते. असो. काहीही असले तरी हा देश मला खरंच फार आवडला. कारण सोव्हिएत काळातील या देशाचे वैभव अद्याप अबाधित आहेच. पण गरिबी आहे म्हणून आपल्यासारखे गरिबीचे जे दिनवाणे रुप रस्त्यावर पहायला मिळते, तसे इथे पहायला मिळाले नाही.

तुटपुंज्या उत्पन्नातही हे लोक आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात असंच काहीसं वाटलं. इथले लोक दिसायला अतिशय देखणे आहेत. त्यातही स्त्रिया कमालीच्या सुंदर आहेत. कार, मोटरसायकल, दुचाक्या यांचा वापरही फार कमी असल्याचे जाणवले. कारण हे शौक करायला लोकांकडे पसे नाहीत. सगळेजण चालताना दिसतात. भराभरा चालत कामावर जातात, येतात आणि बस आणि मेट्रो यांसारख्या सरकारी सुविधांचा वापर करताना दिसतात. या सुविधा परिपूर्ण वाटल्या. मला युक्रेनच्या आणि आपल्या जीवनशैलीमध्ये  तसेच संस्कृतीमध्ये खूप साम्य जाणवले. नीनाच्या घरी राहताना गोऱ्या परदेशी लोकांच्या घरी राहातोय असं जाणवलंच नाही. मुलीच्या सासरकडच्या मंडळींची जेवढी म्हणून अपूर्वाई करता येईल ती सारी नीना या माझ्या सुंदर रशियन विहिणीनं माझ्यासाठी केली. मला किव हे त्यांच्या राजधानीचे शहर दाखवण्यासाठी नीना घेऊन गेली. त्यासाठी आम्ही खारकोव्हहून रात्रीच्या ट्रेनने निघालो. सकाळी ट्रेनमध्येच फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो. तेथे पोहोचल्यानंतर आम्हाला पिकअप करण्यासाठी मिखाईल नावाचा गोरापान, देखणा तरुण हजर होता. त्याचीच कार होती आणि तो मालक असूनही इंग्रजी बोलता येत असल्यामुळे स्वत आला होता. त्याने मी त्याला ‘मीशा’ म्हणावे असे सुचवले. युक्रेनमधे इंग्रजी भाषा अजिबात बोलली जात नाही, त्यामुळे समजतही नाही. माझ्या विहिणीला तर इंग्रजीचा ओ का ठो कळत नाही. मी मध्यरात्री जेव्हा हारकोव्हच्या विमानतळावर उतरले होते तेव्हा माझ्या मुलाबरोबर नीना मला रिसीव्ह करायला आली होती. मला पाहताच पुढे येऊन मला मिठीत घेत आनंदाने म्हणाली, ‘गो टू युक्रेन राधिका.. गो टू युक्रेन..’ कम ला गो आणि गो ला कम म्हणणारी नीना आणि तिचे भले इंग्रजी..! पण म्हणून आमचं कधी अडलं नाही. खाणाखुणा आणि हातवारे यांच्यामुळे सगळं काही उमजायचे. जुन्या मत्रिणींप्रमाणे हातात हात घालून मस्त फिरलो आम्ही. हारकोव्हप्रमाणेच किव शहर अफलातून सुंदर आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर, हिरवाईने नटलेलं.

सोव्हिएत यूएसएसआरचे विभाजन झाले आणि २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेन या राष्ट्राचा जन्म झाला. पोलंड, स्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, मालडोवा, बेलारूस आणि रशिया हे सर्व देश युक्रेनचे शेजारी देश आहेत. आता पूर्व युरोपीय  देश असलेल्या युक्रेनमध्ये थोडय़ाथोडक्या नाही तर  ४०० नद्या वाहतात. या  सुजलाम् सुफलाम् जमिनीमुळे कधीकाळी सोव्हिएत रशियाची ‘ग्रिनरी’ म्हणून ओळखला जायचा युक्रेन..! निप्रो ही विशाल नदी युक्रेनची सर्वात मोठी नदी असून अख्खा देश या नदीमुळे उजव्या आणि डाव्या तीरावरील असा विभागलेला आहे. युक्रेनच्या राजधानीचे शहर किव हेसुद्धा या विशाल नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे.

आम्ही किव स्टेशनवर उतरलो आणि थोडय़ा वेळातच मीशाबरोबर आमची अध्र्या दिवसाची टूर सुरू झाली. आमच्याबरोबर माझा मुलगा सारंगही होता. त्याला किवमधून दुबईला जाण्यासाठी विमान पकडायचे होते. किवचे रेल्वे स्टेशनही खूपच सुंदर आहे. किव शहराला जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास आहे. साधारणत दहाव्या शतकाच्या अखेरीस (९८८ ए.डी,) ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनिटी धर्माचा या देशाने स्वीकार केला. त्यानंतर या भागात ख्रिश्चन धर्माच्या प्रसारास सुरुवात झाली. नंतरच्या काळात अप्रतिम अशा स्थापत्यशैलीतील अनेक ऑर्थोडॉक्स चच्रेस किवमध्ये उभारण्यात आली. त्यापकी बहुतेक इमारतींचे काळाच्या ओघात नूतनीकरण झालेले आहे. मात्र खास युक्रेनियन शैलीतील चच्रेस आणि मठ पाहून जीव थक्क होतो. सगळ्यात भावते ती स्वच्छता आणि हिरवाई.

मीशाने आम्हाला काही महत्त्वाची चच्रेस दाखवली. ‘नेटिव्हिटी ऑफ ख्रिस्त चर्च’ या चर्चचे अंतरंग फार सुरेख आहे. खूप म्युरल्स चर्चच्या िभतीवर चितारलेली आहेत..पण हे चर्च अलीकडच्या काळात नव्याने बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका अतिशय प्रशस्त चौकात पोहोचलो. तेथे एका बाजूला एक अतिशय प्रशस्त इमारत पाहायला मिळाली. ते सोव्हिएत काळातील केजीबीचे मुख्य ऑफिस होते. आता त्याच इमारतीमध्ये युक्रेनच्या इंटेलिजन्स ब्युरोचे ऑफिस आहे. एका बाजूला सोफिया कॅथ्रेडल हे जुने चर्च आहे. अकराव्या शतकात बांधलेले हे चर्च त्यामधील जुन्या म्युरल्ससाठी प्रसिद्ध आहे. सतराव्या शतकात या चर्चचे नूतनीकरण झाले आणि त्याला खास युक्रेनियन शैलीमध्ये म्हणजेच ‘युक्रेनियन बॅरोक’ पद्धतीच्या घुमटांनी सजवण्यात आले. सध्या ‘सोफिया’ला म्युझियमचा दर्जा देण्यात आला आहे. आम्हाला वेळेअभावी ते पाहायला जाणे शक्यच नव्हते.  त्याच चौकात ‘हेतमान बोहदान’ या योद्धय़ाचे अत्यंत सुंदर असे घोडय़ावर बसलेले ब्राँझमधील शिल्प आहे. १६४८ साली, हा योद्धा पोलंडबरोबरील युद्ध जिंकून गोल्डन गेटमधून किवमध्ये आपल्या विजयी आर्मीबरोबर परतला होता. त्याचे अत्यंत धूमधडाक्यात स्वागत झाले होते. हे शिल्प उत्तम कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. तेथून जवळच असणारे सेंट मायकेल कॅथड्रल आणि सोनेरी घुमट असणारी मॉनेस्टरी फारच प्रेक्षणीय आहे. उंच जागी असणाऱ्या या मॉनेस्ट्रीच्या प्रशस्त आवारातून आपल्याला निप्रो नदीचे पात्र, त्याच्यावरील दोन पूल, आणि त्यापलीकडील किव शहराचा संपूर्ण देखावा पाहायला मिळतो. निळ्या आणि सोनेरी रंगातील या कॅथड्रलचे स्थापत्य फार सुंदर आहे. असं म्हणतात की सेंट मायकल कॅथड्रलचे अठराव्या शतकात नूतनीकरण झाले होते, परंतु दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब हल्ल्यात ते पूर्णपणे बेचिराख झाले होते. युक्रेन देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे चर्च पुन्हा नव्याने पण त्याच धर्तीवर बांधण्यात आले. आकाशाच्या गडद निळ्या रंगातील हे चर्च पाहून डोळे निवतात. सोन्याने मढवलेले घुमट इतके शोभून दिसतात की हे कॅथड्रल आपल्या मनात ठसून जाते. विशेष म्हणजे इकडील कॅथड्रलच्या घुमटांचा आकार ‘युक्रेनियन बॅरोक’ पद्धतीचा असून  त्याचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते. विशेष म्हणजे बहुतेक सर्व घुमट सोन्याने मढवलेले आहेत.

दहाव्या शतकातील राजा, ‘यारोस्लाव मूद्राय’ याच्या कारकिर्दीत या शहरातील काही अप्रतिम सुंदर वास्तूंची निर्मिती झाली होती. त्याच्याच काळात संपूर्ण शहराभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. आजघडीला ही तटबंदी पूर्णतया लयाला गेली असली तरी एका जागी पूर्वीच्या तटबंदीचे काही अवशेष शिल्लक उरले होते. गोल्डन गेट या नावाचे स्थळ म्हणजे तटबंदीच्या उरलेल्या अवशेषांना जोडून नव्याने बांधलेले स्मारक आहे. असं मीशाने सांगितले. हे गोल्डन गेट शहराच्या मध्यवर्ती जागी आहे. किव शहरातील ऑपेराची इमारत जुनी आणि अतिशय देखणी आहे. युक्रेन देश सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाल्यानंतर किवमधील मध्यवर्ती चौकात स्वतंत्रता मदान बांधण्यात आले. हे अतिशय सुंदर स्थळ स्वतंत्रता दिवसाच्या दहाव्या वर्धापन दिनादिवशी राष्ट्राला अर्पण करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठीतील आणि संस्कृत भाषेतील बरेचसे शब्द रशियन भाषेत त्याच अर्थाने वापरले जातात. उदाहरणार्थ मैदान हा शब्द.

सेंट अँड्रय़ूज चर्च हे किवमधील सर्वात उंच जागेवर आहे. हे अलीकडच्या काळातील सुंदर चर्च आम्हाला बाहेरूनच पाहायला मिळाले. कारण दुरुस्तीचे काम चालू होते. किव शहरातील हा भाग सर्वात जुना आणि प्रसिद्ध भाग आहे. या भागातील रस्ते फारच सुंदर आहेत आणि ते युरोपमधील रस्त्यांप्रमाणे दगडी पेव्हर ब्लॉक लावून बनवलेले आहेत. याच भागातील एका रस्त्याच्या कडेला एक सुंदर असे ब्राँझचे शिल्प पाहायला मिळाले. गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीसमोर प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रेमीचे हे शिल्प किवमध्ये प्रसिद्ध आहे. किवमध्ये येऊन हे शिल्प न पाहता परत जाणे म्हणजे किव न पाहाता परत जाण्यासारखेच आहे. जुन्या किव शहरातील हा रस्ता खूप प्रसिद्ध आहे असं मीशाने नंतर सांगितले. सोव्हिएत काळातील अनेक मान्यवर, लेखक, कलाकार, प्रसिद्ध व्यक्ती या रोडवर वास्तव्यास होते. आजही किवमधील बडी प्रस्थं या परिसरात राहतात. आमची अध्र्या दिवसाची टूर संपल्यानंतर मीशाने आम्हाला रेल्वे स्टेशनजवळ सोडले.  नीनाने मला एका छानशा हॉटेलमध्ये जेवायला नेले. नंतर मेट्रोने आम्ही शहराच्या वेगळ्या भागात गेलो. तेथून चालतच आम्ही दोघी इटर्नल ग्लोरी पार्कमध्ये गेलो. हे खूप मोठे पार्क असून या ठिकाणी वेगवेगळी स्मारके उभारलेली आहेत. सनिकांचे पुतळे उभारलेले आहेत. याच ठिकाणी ‘हुतात्मा स्मारक’ म्हणून अमेरिकेतील वॉिशग्टन डीसी शहरातील, जॉर्ज वॉिशग्टन स्मारकासारखेच एक उंच स्मारक उभारण्यात आलेले आहे. या स्मारकाच्या समोर एक अखंड ज्योत तेवती ठेवण्यात आलेली आहे. पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर आम्ही ‘लावरा’ ही केव्ह मॉनेस्ट्री पाहायला गेलो.

लावरा ही मुख्य मॉनेस्ट्री असून निप्रो नदीच्या काठावरील विशाल परिसरात अनेक लहान-मोठय़ा मठांचा हा समूह आहे. या आवारात जुना किल्ला, सर्वात जुनी मॉनेस्ट्री, गुंफा अशा अनेक गोष्टी आहेत. अप्रतिम स्थापत्य आणि सोनेरी घुमट यामुळे ही मॉनेस्ट्री उठून दिसते. जवळच ट्रिनिटी गेट चर्च आहे. सर्वत्र कमालीची स्वच्छता, फुलांचे ताटवे, हिरवीकंच हिरवाई असलेले लावराचे प्रशस्त आवार मला खूप आवडले. चालून चालून पाय दुखायला लागले होते. पण किवच्या शांत रस्त्यावरून नीनाबरोबर भटकण्यात वेगळाच आनंद मिळत होता. एकमेकींच्या हातात हात गुंफून भटकताना शब्दांची गरज क्वचितच भासत होती. गर्दीच्या ठिकाणी, मेट्रो स्टेशनात नीना माझा हात घट्ट धरून ठेवत असे. पण आपल्यासारखी गर्दी  इकडे नव्हतीच. अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या या देशात गर्दी पाहायला मिळाली नाही. भारतात आल्यानंतर मुंबई आणि पुण्यात फिरताना मरिना कावरीबावरी होऊन जायची. घाबरून जायची, कारण आपल्याकडे माणसांना चालण्यासाठी जागा नसतेच. तिची भीती अनाठायी नव्हती हे मला इथे आल्यामुळे कळून चुकले. किव शहराचा, युरोपमधील अत्यंत सुंदर अशा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश होतो. सोव्हिएत काळातील रशियन पद्धतीचे स्थापत्य असलेल्या जुन्या पण देखण्या इमारती आहेत. प्रशस्त रस्ते, प्रशस्त पदपथ, त्यावर डेरेदार वृक्षांनी केलेल्या कमानी यामुळे किव शहराला अनोखे वैभव प्राप्त झालेले आहे. कुठेही गर्दी नाही. पदपथावर विक्रेत्यांचे अतिक्रमण नाही. आरडाओरडा नाही की गोंधळ नाही. कर्कश वाजणारे हॉर्न नाहीत की ट्रॅफिक जॅम नाहीत. मला सर्वात आश्चर्य वाटले ते जमिनीच्या आठ-दहा मजले खाली खोलातून धावणाऱ्या ४० ते ५०वष्रे जुन्या मेट्रोचे. रशियामध्ये जवळजवळ ५० वर्षांपूर्वी मेट्रो बांधण्यात आली होती. या मेट्रोसाठीची भुयारं किती खोलवर आहेत हे तीन तीन एस्कलेटर्स बदलून वर येताना कळते. विशेष म्हणजे शहराच्या काही भागांत मेट्रो निप्रो नदीच्या खालून जाते. या मेट्रो अक्षरश आजही नव्यासारख्या वाटत होत्या. मेट्रोसाठी असणाऱ्या सबवेमध्ये भरपूर उजेड होता. कमालीची स्वच्छता होती आणि अनेक लहानमोठी दुकानं होती. मेट्रोच्या भुयारात कुठेही घाण नव्हती. पानांच्या पिचकाऱ्यांचे घाणेरडे डाग नव्हते की गर्दुल्ल्यांचे ठिय्ये नव्हते की बेघरांनी वळचण शोधून बनवलेली घरं नव्हती.! गरिबीबरोबर येणारी गलिच्छता या देशात मला कुठेही पाहायला मिळाली नाही. गोरीपान देखणी माणसं, अत्यंत सुंदर ललना, पण मी कुणालाही खळखळून हसताना पाहिलं नाही. सर्वजण आपल्याच विश्वात हरवल्यागत चालताना दिसत. कम्युनिस्ट देशातील जीवनाचा हा परिणाम असावा कदाचित. आपण खरोखरच विकसित देशांच्या किती मागे आहोत हे या अशा देशात भटकंती केल्यानंतर लक्षात येते. म्हणायला हा गरिबीनं गांजलेला देश असला तरी या बाबतीत भारताच्या खूप पुढे आहे.

शेवटी सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही दोघी मेट्रोने पुन्हा स्टेशनवर परतलो. पुन्हा एकदा सुपर फास्ट ट्रेनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ५०० कि.मी. अंतर पाच तासांत पार करून आम्ही दोघी अकराच्या सुमारास हारकोव्हमध्ये परतलो.. एकमेकींशी शब्दात बोलता येत नव्हते तरी आम्ही दिवसभर मस्त भटकंती केली होती आणि किव शहर पाहून मी आनंदाने परत आले होते. मला हा देश मनापासून भावला होता. युक्रेनमधील वास्तव्याचे दिवस कापरासारखे उडून गेले. मरिनाच्या दाचामध्ये घालवलेले क्षण आठवले की वाटते तिथे जाऊन निवांत राहावे आणि हवं ते लिहीत बसावे. इतकी शांतता होती या दाचा नावाच्या बगिचासाठी असलेल्या जमिनीच्या तुकडय़ामध्ये! सोव्हिएत काळात प्रत्येक कुटुंबासाठी भाजीपाला लावण्यासाठी, बागबगीचा करण्यासाठी एक लहान जमिनीचा तुकडा दिला जायचा. त्याला दाचा असं म्हणतात. कारण राहण्यासाठी प्रत्येकाला सारख्याच आकाराचे फ्लॅट असायचे. आता हे दाचा प्रत्येकाची प्रॉपर्टी झालेली आहे. ही संकल्पना मला फार फार आवडली. सुट्टीच्या दिवशी दाचामध्ये घाम गाळायचा, बाब्रेक्यू करायचे, फ्रेश व्हायचे आणि मग नव्यानं आठवडय़ाची सुरुवात करावयाची. सगळेच छान होते.
राधिका टिपरे – response.lokprabha@expressindia.com