13 August 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : बुद्धिबळासाठी दारू सोडणारं गाव

केरळमधलं मारोत्तीचल गाव आहे बुद्धिबळवेडय़ा लोकांचं.

अजब गावांची, गजब कहाणी…
गाव म्हणजे वेगवेगळ्या जातिधर्मातली, आर्थिक स्तरातली, वेगवेगळ्या वयाची, स्वभावाची माणसं. एखाद्या गावात तिथली सगळी माणसं मिळून एकाच गोष्टीचं वेड घेऊन जगतात यावर कोण विश्वास ठेवील? आपल्या देशातल्या अशा वेडय़ा गावांविषयी-

केरळमधलं मारोत्तीचल गाव आहे बुद्धिबळवेडय़ा लोकांचं. त्यासाठी या गावातल्या लोकांनी चक्क जुगार आणि दारुही सोडून दिली. या गावात ७०० लोकांची बुद्धिबळ संघटना आहे.

चौसष्ट घरांचा राजा असा किताब भारताच्या विश्वनाथन आनंदला मिळाला, आणि सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बुद्धिबळ हा खेळ म्हणजे भारताने जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे असे समजले जाते. एकाग्रता, चिवटपणा, सहनशीलता असे अनेक गुण अंगी असलेली माणसे या खेळात आपले नाव कमवून आहेत. चौसष्ट घरांच्या या खेळाने साऱ्या जगाला वेड लावले आहे. गेल्या काही वर्षांत या खेळाचा प्रसार आपल्याकडेसुद्धा फार मोठय़ा प्रमाणावर झालेला पाहायला मिळतो. क्रिकेटच्या बाहेरही काही विश्व आहे आणि त्यातही असे बुद्धीची कसोटी पाहणारे खेळ आहेत याची जाणीव भारतीयांना आता आता कुठे होऊ लागली आहे. बुद्धिबळ हा खेळ फक्त बुद्धीचा कस, समयसूचकता, चित्ताचे स्थर्य एवढेच पाहतो असे नसून, हा खेळ एखाद्या गावाला व्यसनाधीनतेतून बाहेर काढतो आणि एक सशक्त समाज घडवतो असे जर सांगितले तर कोणाचा विश्वासच बसणार नाही. सांगणारा काहीतरी बरळतोय किंवा तो उगाचच वेडय़ासारखी बडबड करतोय असेच ऐकणाऱ्याला वाटेल. पण ही नुसती बडबड नाहीये, तर एक सत्य परिस्थिती आहे. आणि तीसुद्धा आपल्याच भारत देशात घडलेली आहे. जसे बुद्धिबळाचा खेळ ही भारतीयांची देणगी आहे असे आपण अभिमानाने सांगतो, तितक्याच अभिमानाने सांगण्यासारखी ही गोष्टसुद्धा आहे की पूर्ण वाया गेलेले एक गाव या खेळामुळे आज मोठय़ा दिमाखात उभे आहे.

ही गोष्ट आहे केरळची. ‘गॉडस् ओन कंट्री’ असे ज्या निसर्गसमृद्ध राज्याचे वर्णन केले जाते अशा केरळमधल्या त्रिसूर जिल्ह्य़ातील मारोत्तीचल या गावाची. त्रिसूरच्या आग्नेयेला फक्त २१ कि.मी. अंतरावर त्रिसूर-मनमंगलम मार्गावर मारोत्तीचल गाव आहे. सन १९७०-८०च्या दशकात मारोत्तीचल गाव देशी दारू आणि जुगाराच्या विळख्यात पूर्ण अडकले होते. या भयानक व्यसनासोबत येणारी भांडणे, मारामाऱ्या तर नित्याच्याच झाल्या होत्या. संपूर्ण गावाला या व्यसनाचा विळखा पडला होता. गावकऱ्यांना यातून बाहेर पडायला हवे हे समजत होते पण उमजत नव्हते. पण शेवटी गावाला एक देवदूत मिळालाच. सी. उन्नीकृष्णन हे त्या देवदूताचे नाव. उन्नीकृष्णनला बुद्धिबळाचे व्यसन लागले होते. अमेरिकन बुद्धिबळपटू बॉबी फिशर याने वयाच्या १६ व्या वर्षीच इंटरनॅशनल ग्रँडमास्टर हा किताब पटकावला. त्याची स्थानिक वृत्तपत्रात आलेली बातमी उन्नीकृष्णनने वाचली आणि त्याला बुद्धिबळ या खेळाविषयी ओढ वाटू लागली. जवळच्याच गावात जाऊन तो बुद्धिबळ शिकला आणि त्याला असे जाणवले की मारोत्तीचल गावातल्या लोकांना दारूच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर बुद्धिबळासारख्या खेळाचा उपाय करून बघावा. आपले गाव सुधारण्यासाठी आपल्या या लाडक्या खेळाचा उपयोग करून घ्यायचा असा ध्यासच उन्नीकृष्णनने घेतला.

उन्नीकृष्णनचे गावात चहाचे छोटे हॉटेल आहे. त्याने गावकऱ्यांना बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. त्याच्या हॉटेलच्या मागची पडवी हा बुद्धिबळाचा अड्डाच झाला. एक एक करत त्याने सर्व गावकऱ्यांना बुद्धिबळ शिकवले. आणि बघता बघता गावाचा कायापालट झाला. गावकऱ्यांचे दारू आणि जुगाराचे व्यसन लीलया सुटले. लोक आता बुद्धिबळाचा पट आणि सोंगटय़ा मांडून त्यावरच चर्चा करू लागले. वेळप्रसंगी खेळाच्या एखाद्या चालीवरून वाद घालू लागले, तात्त्विक भांडू लागले. बघता बघता मारोत्तीचल गाव हे बुद्धिबळ या व्यसनाच्या अधीन झाले. गावात कोणीही, कुठेही बुद्धिबळ खेळताना दिसू लागला. अगदी प्राथमिक शाळेतसुद्धा मधल्या सुट्टीत मुले बुद्धिबळाचा डाव मांडून बसू लागली. गावाच्या चव्हाटय़ावर, झाडाच्या पारावर, बसथांब्यावर, मंदिराच्या समोर जिथे दिसेल तिथे आता लोक बुद्धिबळ खेळत असतात. उन्नीकृष्णन यांनी आपले इप्सित साध्य करण्यासाठी हाच खेळ का निवडला असे विचारता ते सांगतात की एकतर त्यांना स्वत:ला या खेळाची जबरदस्त आवड होती, शिवाय या खेळाला मदानाची गरज नसते. मारोत्तीचल गावाभोवती रबराची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्यामुळे तिथे खेळायला मोकळी जागा अजिबात नाही. अशा वेळी अगदी कमी जागेत बसून खेळता येईल असा बुद्धिबळाचा खेळ त्यांना भावला. त्याचबरोबर बुद्धिबळामुळे मनाची एकाग्रता, शांतता, मानसिक स्थर्य या सगळ्याच गोष्टी प्राप्त होत असल्यामुळे त्यांना हाच खेळ निवडावासा वाटले. दारू आणि जुगार या व्यसनांना शह द्यायचा असेल तर राजा, वजीर, घोडा, उंट, हत्ती यांचाच वापर केला पाहिजे असे उन्नीकृष्णन यांनी मनोमन ठरवले आणि गावाला या खेळाची गोडी नव्हे व्यसनच लावले.

मारोत्तीचल गावात घरटी एक माणूस बुद्धिबळ खेळतोच. तसेच लोक मोकळ्या वेळात टेलिव्हिजनसमोर बसण्याऐवजी बुद्धिबळाचा पट मांडून बसतात. त्यांचा खेळ बघायला अजून चार माणसे त्यांच्याभोवती जमा होतात. भारताचा थोर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने सुद्धा उन्नीकृष्णनच्या या प्रयत्नाचे आवर्जून कौतुक केलेले आहे. मारोत्तीचल गावात आता जवळपास ७०० लोकांची बुद्धिबळ संघटना निर्माण झालेली आहे. त्यांनी एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी बुद्धिबळ खेळण्याचा आशियाई विक्रम केला आहे. या बुद्धिबळवेडय़ा गावाची दखल २०१३ सालच्या ‘ऑगस्ट क्लब’ या मल्याळी चित्रपटानेसुद्धा घेतलेली आहे. व्यसनाधीनता सन्मार्गाला लागली तर ते व्यसन माणसाचा उत्कर्ष तर करतेच, परंतु त्याचसोबत गावाचा आणि समाजाचासुद्धा उत्कर्ष करते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे केरळमधले हे मारोत्तीचल गाव. उन्नीकृष्णनसारख्या एका ध्येयवेडय़ाने गावकऱ्यांना साद घातली, आणि गावकऱ्यांनीसुद्धा चौसष्ट घरांच्या आणि त्यावरच्या सोंगटय़ा यांच्या साहाय्याने दारूच्या व्यसनाला चेकमेट केले.
आशुतोष बापट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 11:15 am

Web Title: lokprabha 2017 diwali special issue village stopped drinking liquor for chess
Next Stories
1 लोकप्रभा दिवाळी २०१७ : बिनदुकानदारांचे दुकान
2 लोकप्रभा दिवाळी २०१७ : खासगीपणाचा अधिकार माझा, कुटुंबाचा आणि समाजाचा…
3 लोकप्रभा दिवाळी २०१७ : सायकलवरून युरोप
Just Now!
X