15 August 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : वेबरंजनाचा नवउद्योग

टीव्हीवरच्या मनोरंजन विश्वातली सगळी गणितं वेबसीरिजनी बदलायला सुरुवात केली आहे.

काही वर्षांपूर्वी चित्रपट हे माध्यम आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय होतं. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपटांच्या काळापासून ते अगदी सेव्हंटीजच्या रेट्रोपर्यंत आपण सगळेच चित्रपटांच्या प्रेमात होतो. एखादा चित्रपट बघायचा म्हणजे त्याकाळी काय उत्साह असायचा. पण कालातंराने या माध्यमाला स्पर्धा निर्माण झाली; ती टीव्हीच्या माध्यमामुळे. टीव्हीची निर्मिती झाली आणि अनेकांच्या घरी टीव्ही आले. चित्रपट बघण्यासाठी म्हणजे मनोरंजनासाठी लोकांना चित्रपटगृहापर्यंत जावं लागायचं. टीव्हीमुळे ते मनोरंजन घरबसल्या मिळू लागलं. टीव्हीच्या निर्मितीमुळे ‘आपल्याला हवं ते’ बघण्याची मुभा लोकांना मिळू लागली. काही वर्षांनी यालाही स्पर्धा निर्माण झाली. इंटरनेटमुळे. आता याही स्पर्धेत आणखी एक खेळाडू उतरला आहे तो म्हणजे ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म. प्रेक्षकांना मनोरंजनासाठी चित्रपटगृहापर्यंत जावं लागायचं ते टप्प्याटप्प्याने आता त्यांच्या खिशातच आलं आहे. निमित्त आहे वेगवेगळ्या डिजिटल अ‍ॅप्सचं. आता प्रेक्षकांना ‘हवं ते’ बघण्याच्या मुभेसह ‘हवं तेव्हा आणि हवं तेवढं’ अशा सगळ्याच मुभा मिळाल्या आहेत. मनोरंजनाचं समूहाचं माध्यम आता ओटीटीमुळे एका व्यक्तीभोवती केंद्रित झालं आहे.

मनोरंजन क्षेत्रातला संक्रमणाचा हा प्रत्येक काळ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. टीव्हीची निर्मिती, रंगीत टीव्हीची सुरुवात, खासगी चॅनल्स आणि त्यामुळे टीव्ही माध्यमात झालेला बदल, असं सगळंच यात आलं. २००० सालापासून मराठीतही खासगी चॅनल्स यायला सुरुवात झाली. स्पर्धा वाढली. याआधी जी स्पर्धा सिनेमा आणि टीव्ही अशा दोन माध्यमांत होती तीच आता टीव्ही माध्यमातच वेगवेगळ्या चॅनल्समध्ये सुरू झाली. यूटय़ूबचा जन्म २००५ मध्ये झाला. भारतात यूटय़ूब २००८ मध्ये सुरू झालं. मनोरंजन क्षेत्राचं रूप पालटणारी ही घटना. ऑनलाइन व्हिडीओचं जाळं पसरायला इथूनच सुरुवात झाली. या जाळ्यातसुद्धा आपापसात जोरदार स्पर्धा सुरू आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या संक्रमणाच्या घटनांपैकी एक घटना म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मचं (ओटीटीपी) वाढतं महत्त्व. यामुळे वेब सीरिज, वेब शोज, व्हिडीओ अशांची संख्या वाढतेय आणि त्यामुळेच ओटीटी प्लॅटफॉर्म ही एक इंडस्ट्री होऊ  पाहतेय.

इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे व्हिडीओ, वेब सीरिज, वेब शो असं काहीही, कुठेही, कितीही, कधीही बघण्याचा पर्याय उपलब्ध झाला. एआयबी, टीवीएफ यांच्यामुळे हिंदीमध्ये साताठ वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली असली तरी यात आता मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळेच येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला इण्डस्ट्रीचं रूप प्राप्त होतंय अशी चिन्हं आहेत. ब्रॉडकास्टिंगमध्ये ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ म्हणजे ऑडिओ आणि व्हिडीओ या दोन्ही सेवा इंटरनेटच्या आधारे पुरविणारे तंत्रज्ञान. याच्या सहाय्याने सेवा पुरवठादारांना व्हिडीओ ऑन डिमांडसारख्या (व्हिओडी-श्ऊ) सेवा पुरविणे शक्य झाले. सध्या आपण व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हिडीओ कॉलिंग अर्थात स्काइपसारख्या अ‍ॅप्ससाठी ओटीटी तंत्रज्ञानाचा वापर करतो. हेच तंत्रज्ञान ब्रॉडकास्टिंगमध्ये वापरले जात आहे. यामुळे अ‍ॅप्सआधारित चॅनलपासून ओटीटी तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवांपर्यंत त्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे आपल्याला कमी पैशात जास्त मनोरंजन मिळवणं शक्य झालं आहे.

ओटीटीवर येणाऱ्या वेब सीरिज, शोज, छोटे व्हिडीओ या साऱ्यामुळे मनोरंजन आता प्रत्येकाच्या खिशात आलेलं आहे. इंटरनेट वापरणारे आता फक्त सोशल मीडिया वापरण्यापुरतं थांबत नाहीत तर यूटय़ूब, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ओझी, अल्ट बालाजी, अमेझॉन प्राइम, वुट अशा अनेक अ‍ॅपवर त्यांची हजेरी असते. म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. नेमकं हेच हेरून अनेक जण यात उतरले आहेत. मुळात याची सुरुवात कशी आणि केव्हापासून झाली हे बघावं लागेल. २००३ च्या आसपास सुरू झालेल्या ऑर्कुट या सोशल मीडियामुळे लोक एकमेकांशी कनेक्ट होत होते. तीनेक वर्षांनी म्हणजे २००४ मध्ये फेसबुकचा जन्म झाला. विविध कारणांमुळे तरुणांना ऑर्कुटपेक्षा फेसबुक आवडू लागलं. ऑर्कुट मागे पडलं. त्याच वेळी स्मार्टफोनही यायला लागले. या स्मार्टफोनमुळे लोक इंटरनेट वापरायला लागले. इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना व्हीडिओच्या माध्यमातून काहीतरी कन्टेन्ट द्यायला हवा या हेतून त्यावर छोटय़ा छोटय़ा व्हिडीओचं प्रमाण वाढत गेलं. युटय़ुब आपल्याकडे प्रस्थापित होत असतानाच साधारण २०१२-२०१३ मध्ये एआयबी, टीवीएफ (द व्हायरल फिव्हर) या यूटय़ूब चॅनलचं वारं वाहू लागलं आणि तिथून हळूहळू याचा विस्तार होत गेला.

ओटीटीचे तीन भाग आहेत. सिनेमा, लाइव्ह शो म्हणजे स्पोर्ट्स-इव्हेंट्स आणि सीरिज. या तीन भागांमधल्या गुंतवणुकीविषयी अल्ट बालाजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नचिकेत पंतवैद्य सांगतात, ‘सीरिज प्रोग्रामिंगमध्ये आता गुंतवणूक होताना दिसत नाही. लोकांनी बरंच भांडवल स्पोर्ट्स त्यातही क्रिकेटमध्ये गुंतवलं आहे. फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर मालिका बनवण्यासाठी दरवर्षी १०० कोटींची गुंतवणूक करणारे सध्या तरी अल्ट बालाजी हे एकमेव आहेत. सीरिजमध्ये फार गुंतवणूक न करण्याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत. पहिलं, टीव्हीच्या मालिकेसारखी ती खेचायची नसते आणि अगदी त्याचा सिनेमाही बनवायचा नसतो. साधारण दहाच भाग करायचे असतात. त्यासाठी लिखाणही वेगळं करावं लागतं. दुसरं, टीव्हीवर मालिका बघणारा प्रेक्षक (ग्राहक) आणि ओटीटीवर सीरिज बघणारा प्रेक्षक (ग्राहक) यात मोठा फरक आहे. ग्राहकांना ओटीटीवर आपल्याच भाषेत टीव्हीवरच्या मालिका सोडून काहीतरी बघावंसं वाटतं. पाश्चात्त्य शोज बघायला ते तयार नसतील तरी त्यांना दुसरं काहीतरी बघायचं आहे. या सगळ्याचं आर्थिक गणितं खूप वेगळं असतं. त्यानुसार गुंतवणूक केली जाते.’ अल्ट बालाजीने केलेल्या एका सव्‍‌र्हेतून प्रेक्षकांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण झालेले दिसून येते. टीव्हीसारखा कंटेंट असावा, पण मालिकेसारखा खेचलेला नसावा असं वाटणारा एक प्रेक्षक, ओटीटीवर भारतीय आशयविषयच बघायचा आहे असा दुसरा प्रेक्षक आणि तिसरा इंटेलेक्च्युअल प्रेक्षक.

इंटरनेटचे कमी झालेले दर हे इंटरनेटचा वापर वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. गेल्या वर्षी निश्चलनीकरणानंतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांनी इंटरनेटचे दर कमी केले त्यातच काही महिन्यांपूर्वी आलेल्या जिओने इंटरनेट वापरणं अधिकच सोयीचं आणि परवडणारं केलं. त्यामुळे जास्तीत जास्त लोक इंटरनेट वापरू लागले. कमीत कमी डेटा वापरून जास्तीत जास्त सर्फिग करू लागले. यावर्षीच्या फिक्कीच्या (फेडरेशन ऑफ इंडिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इण्डस्ट्री) अहवालानुसार २०१६ मध्ये वायरलेस (वायफाय, हॉटस्पॉट) इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ३८९.६१ दशलक्ष इतकी तर वायर्ड (केबल) इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २१.९५ दशलक्ष इतकी होती. ही संख्या वाढून २०१७ मध्ये वायरलेस इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ४७५.३२ दशलक्ष इतकी तर वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २४.११ दशलक्ष इतकी झाली. इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली. ही संख्या वाढली म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे पर्याय देण्यास अनेक चॅनल्स सक्रीय झाली. या प्लॅटफॉम्र्सने दिलेल्या अनेक गोष्टींना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत गेला.

हिंदीत एआयबी, टीव्हीएफ, अल्ट बालाजी, विक्रम भट, आरे, एरॉस नाऊ  यांसारखी मोठी नावं मराठीत अजूनतरी नाहीत. भारतीय डिजीटल पार्टी (भाडिपा), कॅफे मराठी, रानवाटा, शॉटपूट असे काही चॅनल्स सध्या मराठीमध्ये दिसतात. या चॅनल्सवरील कार्यक्रम प्रेक्षकांना आवडत असून त्यांचे सबस्क्रायबर्सही वाढताहेत. पण अजून मराठी प्रायोजकांना मराठी वेब सीरिज, शोमध्ये गुंतवणुकीत हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. भाडिपा या चॅनलवरील ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’ या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक सारंग साठय़े याबद्दल एक वेगळा मुद्दा मांडतात, ‘मराठी ब्रॅण्ड्सना ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलची अजून पुरेशी माहिती नाही. पण आता हळूहळू तेही होताना दिसतंय. जोवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चॅनल्सचा एक समुदाय दिसत नाही तोवर त्याची ताकद दिसून येणार नाही. माझ्या मते ही स्पर्धा नाहीच. खरंतर जितक्या जास्त सीरिज, वेब शोज येतील तितकी मराठी वेब दुनियेची ताकद वाढून ती एक समुदाय तयार होईल. एकमेकांना मदत करूनच ती समुदाय तयार होईल. समुदाय झाला की संख्या वाढेल. संख्या वाढली की इण्डस्ट्री तयार होईल. इण्डस्ट्री झाली की गुंतवणूकदार येतील आणि त्यानंतर खरी स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेचासुद्धा फायदाच होईल. इण्डस्ट्री प्रस्थापित झाली की गुंतवणूकदार अधिक सक्रिय होतील. त्यांच्यातही स्पर्धा सुरू होईल आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही वाढेल. हे खऱ्या अर्थाने एकमेकांना जोडलेलं एक नेटवर्क आहे.’ एखादी मराठी सीरिज बघून झाली की त्याखाली येणाऱ्या ‘सजेस्टेड व्हिडीओ’मध्ये इतर मराठी वेब सीरिज, वेब शो, छोटे व्हिडीओ असं येतं. त्यापैकी एक पाहिलं की ते संपल्यानंतर आणखी काही पर्याय ‘सजेस्टेड व्हिडीओ’मध्ये दिसतात. ही साखळी सुरूच राहते. अशा प्रकारे मराठीची साखळी मोठी व्हायला हवी, असं ते सांगतात. मराठी ब्रॅण्ड्स आजही मराठी सीरिज, शोसाठी प्रायोजक म्हणून कमी पडत आहेत. याचं एक कारण कॅफे मराठीचे संचालक आणि सहसंस्थापक भुपेंद्रकुमार नंदन सांगतात, ‘मराठी ब्रॅण्ड्सना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणं हे मोठं आव्हान असतं. वर्तमानपत्रात जाहिरात येणं, होर्डिग्सवर जाहिरात असणं म्हणजेच मोठी जाहिरात होणं, असा समज आजही काही मराठी ब्रॅण्ड्समध्ये आहे. पण डिजिटलमध्ये जाहिरात केली तर ती दीर्घकाळासाठी असू शकते, हे त्यांना पटायला थोडा वेळ लागेल असं दिसतंय. हे अशक्य नाही, पण हे चित्र बदलायला थोडा वेळ लागेल. याची आता सुरुवात झाली आहे.’

मराठीमधलं कॅफे मराठी हे यूटय़ूब चॅनल तरुणाईचं प्रतिनिधित्व करतं. खरंतर सुरुवातीला हे मराठीतलं पहिलंवहिलं अ‍ॅप म्हणून प्रेक्षकांसमोर आलं होतं. यात सगळ्या मराठी सिनेमा, नाटक, मालिका, कलाकार यांच्याविषयी माहिती दिली जाते. आता या अ‍ॅपसह कॅफे मराठी यूटय़ूब चॅनल म्हणून सुरू झालं आहे. ‘बिनधास्त बोल’ हा या चॅनलचा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यात साधारण १५ ते २० मिनिटांच्या या कार्यक्रमात कॉलेजवयीन मुलांना एका एपिसोडमध्ये एक प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाची ते बिनधास्त उत्तरं देतात, त्याविषयाबद्दलची मतंही स्पष्टपणे मांडतात. हे विषय कधीकधी बोल्डही असतात. मराठीमध्ये असा वेब शो आताच्या तरुणाईसाठी उपलब्ध झाला आहे. कॅफे मराठीचे संचालक आणि सहसंस्थापक निखिल रायबोले याबद्दल सांगतात, ‘कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी विविध विषयांवर बिनधास्त बोलायला तयार असतात, हे आम्ही केलेल्या एका सव्‍‌र्हेतून लक्षात आलं. तिथून आम्हाला ‘बिनधास्त बोल’ची कल्पना सुचली. ही पिढी विचार, मतं शेअर करणारी आहे. बिनधास्त बोलचे व्हिडीओ अगदी छोटे वाटतात. पण त्यामागे बऱ्याच तासांची मेहनत असते. शिवाय सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. बहुतांश शूटिंग कॉलेजच्या आवारात किंवा कॉलेजमध्येच होतं. कॉलेजच्या सुट्टय़ा, परीक्षा असं सगळं बघून जावं लागतं.’

अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स हे आताच्या ओटीटीचे सगळ्यात महत्त्वाचे आणि मोठे ब्रॅण्ड्स आहेत. अमेझॉन आणि नेटफ्लिक्स हे अमेरिकेतले प्रस्थापित अ‍ॅप्स आहेत. त्यांनी आता भारतीय बाजारपेठेत शिरकाव केलेला आहे. वेगवेगळ्या सीरिज, विविध भाषांमधले सिनेमे विकत घेऊन त्याची लायब्ररी बनवणं हे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनचं प्रमुख उद्दिष्ट आहे. नेटफ्लिक्सचा एक सीरिज बनवण्याचा खर्च आपल्याकडील एक सिनेमा बनवण्याच्या खर्चापेक्षा जास्त असतो. याव्यतिरिक्त भारतीय ब्रॅण्ड्स म्हणजे हॉटस्टार, ओझी, वुट, सोनी लीव्ह हे मालिका मानसिकतेत येतात. त्यांचा प्रेक्षकवर्ग फक्त भारतीय आहे. हे सगळे ब्रॅण्ड्स डेटा ड्रिव्हन आहेत. डेटा ड्रिव्हन म्हणजे त्या ब्रॅण्ड्ससंबंधी विविध पैलूंवर सर्वेक्षण करून जमवलेल्या माहितीवर काम करणे. त्यांचा प्रेक्षक कोण आहे, किती आहे, ते त्यावर असलेला कन्टेन्ट कसा बघतात, त्यांचा भूतकाळ-भविष्यकाळ काय आहे या सगळ्याचा अभ्यास करून ते कन्टेन्ट तयार करतात.

ओटीटी ही इण्डस्ट्री म्हणून उभी राहतेय, पण अजूनही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या महसुलाचं निश्चित गणित आता सांगता येत नाही. ते अद्याप म्हणावं तसं विकसितही झालेलं नाही. पण या प्लॅटफॉर्मच्या अर्थकारणाविषयी जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी दोन प्रकारचे प्रायोजकत्व मिळतं. एक प्लॅटफॉर्म ओरिएंटेड आणि दुसरं स्पॉन्सर्सशिप ड्रीव्हन. सोशल मिडीया अभ्यासक रोहन पाटील याविषयी अधिक स्पष्टपणे सांगतात, ‘प्लॅटफॉर्म ओरिएंटेड स्पॉन्सरशिप म्हणजे जे यूटय़ूबकडून मिळतं. यूटय़ूबवर व्हिडीओ सुरू होताना एक जाहिरात लागते. त्या जाहिरातीतून मिळणारे पैसे दोन भागांत वाटले जातात. त्यातले ६० टक्के युटय़ूब स्वत:कडे ठेवतं आणि ४० टक्के ज्याच्या व्हिडिओसाठी ते प्रायोजकत्व मिळालं आहे त्याला मिळतात. जेवढय़ा जास्त जाहिराती यूटय़ूबवर दाखवल्या जातात तेवढा जास्त फायदा यूटय़ूबला आणि पर्यायाने व्हिडीओ तयार करणाऱ्याला मिळतो. शिवाय यूटय़ूब डॉलर्समध्ये पैसे देतं. त्यामुळे त्यातून मिळणारा पैसा जास्तच असतो. पण जर मोठय़ा ब्रॅण्डचा व्हिडिओ असेल तर ६०-४० टक्क्य़ांचं प्रमाण उलटंही होऊ शकतं. म्हणजे यूटय़ूब स्वत:ला ४० टक्के ठेवून समोरच्याला ६० टक्के देतं. स्पॉन्सरशिप ड्रिव्हन हे दुसऱ्या प्रकारचं प्रायोजकत्व. हे प्रायोजकत्वही दोन प्रकारचं असतं. एक, पॅकेजच्या स्वरूपात तर दुसरं ऑरगॅनिक कन्टेन्ट स्वरूपात. पॅकेज म्हणजे एका ब्रॅण्डला एका विशिष्ट यूटय़ूब चॅनलमध्ये जाहिरात द्यायची असेल तर त्याचं एका व्हिडिओचं पॅकेज असतं. साधारण या एका व्हिडिओचे चार ते पाच लाख रुपये सांगितले जातात. यामध्ये एक व्हिडिओ, एक मुलाखत, एक पोस्ट, एक ब्लॉग असं पॅकेज असतं. नावाजलेल्या काही यूटय़ूब चॅनल्सची किंमत अशा जाहिरातींसाठी आणखी जास्त असते. दुसरं असतं ऑरगॅनिक कन्टेन्ट. म्हणजे एखाद्या सिनेमाचं प्रमोशन करायचं असेल तर ‘सिनेमा अमुक एका तारखेला प्रदर्शित होत आहे. सिनेमागृहात जाऊन बघा’ असं सांगितलं तर कोणी बघणार नाही. पण तेच एखाद्या व्हिडीओमधून त्याचाच एक भाग म्हणून सांगितलं तर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. म्हणूनच सिनेमाच्या अशा वेगळ्या प्रकारच्या प्रमोशनसाठी खास कन्टेन्ट तयार केला जातो. हा कन्टेन्ट तयार करण्यासाठी पैसे घेतले जातात. अशा जाहिरातींचे दर यूटय़ूब चॅनलप्रमाणे कमी-जास्त होतात. तसंच यूटय़ूब दहा टॉप चॅनल्सची यादी जाहीर करतं. त्यानुसारही त्याचे दर बदलत राहतात.’ रोहनने सांगितलेल्या शेवटच्या प्रकाराचं एक उदाहरण आपण नुकतंच बघितलं. कंगना राणावतचा ‘सिमरन’ हा सिनेमा गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. एआयबीने तिचं एक व्हिडिओ साँग तयार केलं होतं. या गाण्यात कुठेही सिमरन सिनेमाचा उल्लेख केला नव्हता. फक्त गाण्याच्या सगळ्यात शेवटी त्या सिनेमाबद्दल एका वाक्यात सांगितलं गेलं.

ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येकाच्या खिशात टीव्ही आला आहे. कधी, काय आणि किती बघायचं हे जो तो त्यांच्या सोयीनुसार ठरवू लागला. काही ओटीटी प्लॅटफॉर्म तर एका सीरिजचे सगळे भाग एकाच वेळी प्रदर्शित करतात. नवे सिनेमे एक-दीड महिन्यात या प्लॅटफॉर्मवर येतात. आता तंत्रज्ञानामुळे टीव्हीच्या मोठय़ा पडद्यावरही मोबाइलच्या साहाय्याने हे ओटीटी प्लॅटफॉर्म बघता येतात. त्यामुळे मोबाइलच्या छोटय़ा स्क्रीनवर उत्तमोत्तम सीरिज बघण्यापेक्षा त्या मोठय़ा स्क्रीनवरही बघता येतात हा पर्याय नेटकऱ्यांना आनंद देणारा आहे. येणाऱ्या काळात एखादा सिनेमासुद्धा अशाच एका प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित झाला तर आश्चर्य वाटायला नको!

ओटीटी प्लॅटफॉर्म मोठा होतोय, त्यावरील संधी झपाटय़ाने वाढत आहेत. कारण हिंदीतले मोठे निर्माते, निर्माती संस्था यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. ही मोठी मंडळी बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. म्हणूनच जाहिरातदारही त्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. हे सगळं एकमेकांना जोडलेलं असल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची ‘इण्डस्ट्री’म्हणून वाटचाल सुरू झाली आहे असं म्हणावं लागेल. ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉम्र्सनी वेगवेगळ्या आणि चांगल्या निर्मात्या संस्थांसोबत टाय-अप्स केले आहेत. फिक्कीच्या यावर्षीच्या अहवालात याबद्दल स्पष्टपणे नमूद केले आहे. या अहवालानुसार एकंदरीतच ओटीटी इंडस्ट्रीत गुंतवणूक करण्याचं एकूण बजेट सुमारे २६ अब्ज इतकं आहे.

ओटीटीमधील गुंतवणूकीवर बोलताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. १९९०च्या दशकात गुन्हेगारी विश्वातल्या बडय़ा लोकांकडे असलेला पैसा त्यांनी रिअल इस्टेट आणि मनोरंजनविश्वात गुंतवायला सुरुवात केली होती. हा ट्रेण्ड जवळपास २००० सालापर्यंत प्रकर्षांने दिसत होता. म्हणूनच त्या काळात गुन्हेगारी विश्व आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यातले संबंध वाढलेले दिसत होते. यासंदर्भातली अनेक प्रकरणं वेळोवेळी समोर येत होती. आता हे चित्र काहीसं बदललेलं दिसतं. रिअल इस्टेटचा बिझनेस सध्या काहीसा थंडावलाय. अशा वेळी काही मोठय़ा बिल्डर्सकडे असलेला पैसा कशात गुंतवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी प्लॅटफॉर्मचं भविष्य त्यांना कळून चुकलंय. त्यामुळे अशा काही बिल्डर्सनी त्यांचा पैसा ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवायला सुरुवात केली आहे, असं समजतं. यासंदर्भातली आकडेवारी सध्या कुठेच उपलब्ध नसली तरी ओटीटीसाठी इतर गुंतवणूकदारासह आता काही बिल्डर्सही यात उतरले आहेत, असंही समजतं.

वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या वेगवेगळ्या बजेटमुळे यामध्ये तगडी स्पर्धा होणार यात शंका नाही. वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची येत्या काळात मोठी इण्डस्ट्री होणार हे नक्की. इण्डस्ट्री म्हटलं की तिथे स्पर्धा ही आलीच. या स्पर्धेत आणखी अनेक चॅनल्स, निर्माते उतरू शकतात. त्यावरील सीरिज, शोजची संख्या वाढणार. त्यात काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांचीसुद्धा संख्या वाढणार. थोडक्यात काय तर इथली स्पर्धा टीव्ही, सिनेमांइतकीच अटीतटीची होणार. या माध्यमाला कसलंच बंधन नसल्यामुळे त्यांच्या संकल्पना त्यांना हव्या तशा मांडता येऊ शकतात. तसंच त्यांचा कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे ब्रॅण्ड हवं ते करू शकतात. त्यामुळे इथे स्पर्धा होणार हे नक्की. पण या स्पर्धेबद्दल अनेकांची मतमतांतरे आहेत. ‘कास्टिंग काऊच..’च्या सारंग साठे यांचं मत आहे की, आधी मराठी यूटय़ूब चॅनल्सनी, सीरिज, शोजनी एकत्र यायला पाहिजे. ती संख्या वाढली की मगच त्याकडे इण्डस्ट्री म्हणून पाहिलं जाईल आणि गुंतवणूकदार मिळतील. त्यामुळे जितके जास्त जण या क्षेत्रात उतरतील तितकं चांगलंच आहे. तर शॉटपुटचे सहसंस्थापक विनोद गायकर सांगतात की, येत्या पाच ते सात वर्षांत ही ओटीटी प्लॅटफॉर्म इण्डस्ट्री म्हणून नक्कीच प्रस्थापित झाला असेल. मोठमोठय़ा कंपन्या, निर्मिती संस्था यात आताच उतरत आहेत. सीरिज बघणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे, हे त्यांना कळून चुकलंय. त्यामुळे इथे गुंतवणूकही मोठी होणार आणि त्याचं रूपांतर स्पर्धेत होणार. अल्ट बालाजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नचिकेत पंतवैद्य यांचं मत थोडं वेगळं आहे. ते सांगतात की, ही स्पर्धा तर नक्की आहे. पण या स्पर्धेत कोणी एक जिंकणार नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन प्रकार आहेत. एक लाइव्ह इव्हेंट्स दाखवणे, उदा. स्पोर्ट्स. इथे त्यांचं काम थेट प्रक्षेपणाचं आहे. दुसरा प्रकार सिनेमा दाखवणं. यात सिनेमाचे हक्क विकत घेतले जाऊन त्याचं प्रक्षेपण होतं. आणि तिसरं सीरिज तयार करणं. सीरिज तयार करणाऱ्यांना यशस्वी व्हायची संधी जास्त आहे, असं दिसतं.

पण हा सगळा तामझाम चाललाय तो या सगळ्याला कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाही म्हणून. सिनेमा, मालिका, रिअ‍ॅलिटी शो या सगळ्याला सेन्सॉरची कात्री असल्यामुळे तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा येते. या मर्यादेत राहून अनेकदा चांगल्या दर्जाच्या सिनेमांना सेन्सॉरमुळे ‘कट-कट’ सहन करावी लागते. यालाच कंटाळून अनेकांनी सेन्सॉरशिप नसलेल्या माध्यमांकडे दुसरा पर्याय म्हणून बघितलं. म्हणूनच बडे निर्माते आता यात आक्रमक झालेले दिसतात. ओटीटीला कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाही म्हणून इथे सगळ्यांचं फावतंय. कोणतेही विषय हव्या त्या पद्धतीने मांडण्याची मुभा त्यांना मिळतेय. ज्या वेळी ओटीटीवर सेन्सॉरची नजर पडेल तेव्हा ही इण्डस्ट्री कशा प्रकारे विस्तारेल, तिचं स्वरूप कसं असेल, तिचं अर्थकारण काय असेल हे सगळंच महत्त्वाचं ठरेलं. पण याची चिन्हे एवढय़ात तरी दिसत नाहीत. त्यामुळे तुर्तास ओटीटीच्या ‘इण्डस्ट्री’ होण्याच्या वाटचालीचे साक्षीदार होऊया.

जाहिरातींचं वेगळेपण

यूटय़ूब किंवा कोणत्याही ओटीटीवर एखादा व्हिडिओ बघताना त्यामध्ये जाहिरात हमखास येते. पण आताच्या पिढीला या जाहिरातींचा व्यत्यय नको असतो. त्यामुळे आता अनेक ठिकाणी एखादी जाहिरात काही सेकंद दाखवून त्यामध्ये ‘स्किप’ असा पर्याय येतो. त्यावर क्लिक केलं की जाहिरात बंद होऊन प्रेक्षक बघत असलेला व्हिडिओ पुन्हा लागतो. म्हणजेच जाहिरातींचा व्यत्यय होऊ द्यायचा की नाही हे आता प्रेक्षकांच्या हातात आलेलं आहे. पण आता यातही बदल होताना दिसतोय. जाहिराती अशा प्रकारे सीरिज किंवा शोमध्येच मिसळायच्या की त्या जाहिरातीही वाटायला हव्यात आणि त्यामुळे व्यत्ययसुद्धा वाटायला नकोत. ‘गर्ल इन द सिटी’ यांसारख्या काही सीरिजमध्ये असे प्रसंग दिसती. या सीरिजमध्ये ती फॅशन डिझायनर असल्यामुळे तिच्या कामाचा भाग म्हणून अनेकदा एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा उल्लेख केलेला दिसून येतो तर कधीकधी तिच्या स्कूटरसंदर्भात ऑइलची जाहिरातही सीरिजचा भाग म्हणून दाखवली जाते. कॅफे मराठीने एका डिक्श्नरी अ‍ॅपचाही अशाच एका व्हिडिओमधून वापर केला होता. अशा पद्धतीचं जाहिरातींचं सीरिजमध्ये असलेलं पोझिशनिंग कमालीचं कल्पक आहे.

माध्यमाची सवय लावायला हवी

ओटीटीचा प्रेक्षकवर्ग तरुणच असतो हा एक गैरसमज आहे. अल्ट बालाजीचा प्रेक्षकवर्ग १८ ते ४० असा आहे. त्यामुळे डिजिटल म्हणजे तरुणाई हे चुकीचं आहे. इ-कॉमर्सचा पर्चेसिंग डेटा बघितलात तर २०-४५ वयोगटातील प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट; टीव्हीवर दाखवून झालेली मालिका आम्ही दाखवतोय असं कधीच होत नाही. पहिल्या दर्जाचं माध्यम म्हणूनच आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्याप्रमाणेच नवा कन्टेन्ट तयार करतो. भारतीय कन्टेन्ट पुरवणारे सध्या भारतात एकमेव किंवा नंबर वन असे आम्ही म्हणजे अल्ट बालाजीच आहोत. अशा नव्या माध्यमाची प्रेक्षकांना सवय लावणं खूप महत्त्वाचं असतं. आतापर्यंत आम्हाला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम आहे. आताच्या घडीला अल्ट बालाजीच्या ग्राहकांची संख्या भारत आणि भारताबाहेरील ९० देशांतून मिळून दहा दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. रिलायन्स जिओने २४.९ टक्के गुंतवणूक केली आहे. ४१३ कोटींची गुंतवणूक मिळाल्यामुळे आमचा बिझनेस चांगला सुरू आहे. आम्ही ग्राहकांना जबरदस्तीने पैसे भरायला सांगत नाही. कोणत्याही सीरिजचे तीन भाग यूटय़ूबवर विनामूल्य बघायला मिळतात. ते आवडले तर अ‍ॅप डाऊनलोड करून पुढचे दोन भाग त्यावर बघता येतात. तेही आवडले तर पुढचे भाग बघण्यासाठी पैसे भरावे लागतात. म्हणजेच प्रेक्षकांना आमच्या सीरिज, शो आवडले तरच त्यांनी पैसे भरून पुढचे भाग बघावेत.
– नचिकेत पंतवैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, अल्ट बालाजी

वेबस्टार्स चमकले

बॉलीवूड स्टार्स, टीव्ही स्टार्स असे शब्द यापूर्वी अनेकदा ऐकले असतील. त्या त्या माध्यमाच्या पुढे स्टार असं लागलं की तो कलाकार मोठा झालाच म्हणून समजा. असेच आता वेब स्टार्सही या वर्तुळात दिसू लागले आहेत. वेबची दुनिया हळूहळू विस्तारत आहे. या दुनियेत अनेक कलाकार येताहेत. कोणी छोटय़ा व्हिडिओंमधून तर कोणी सीरिजमधून. पण असे कलाकार येताहेत आणि प्रेक्षकांची मनं जिंकून जाताहेत. वेबच्या दुनियेत झळकल्यानंतर काही कलाकार हिंदी चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोंमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. मिथिला पालकर, निधी सिंग, निधी बिश्त, सुमित व्यास, आनंद तिवारी, जितेंद्र कुमार, मलायका दुवा ही त्यातलीच काही महत्त्वाची नावं. या सगळ्यांनी वेबवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांच्या उत्तम अभिनयामुळे त्यांनी आता थेट सिनेमा, रिअ‍ॅलिटी शोचे मेंटॉर, जाहिराती अशा अनेक माध्यमांकडे झेप घेतली आहे.

२६ अब्जांची गुंतवणूक होणार

फिक्कीच्या यंदाच्या अहवालानुसार ओटीटीमध्ये गुंतवणुकीसाठी एकूण बजेट २६ अब्ज आहे. त्यामुळे भविष्यात इतकी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचं ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठीचं बजेट पाच अब्ज असून त्यांनी एक्सेल एंटरटेंमेंट, फॅण्टम फिल्म्स, अनुराग कश्यप यांच्याशी टाय-अप केलं आहे. नेटफ्लिक्सने ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठी फॅण्टम फिल्म्सशी टाय-अप केलेलं आहे. हॉटस्टारचं ओरिजिनल कन्टेन्ट तयार करण्यासाठीचं बजेट चार अब्ज असून त्यांनी फोर लायन्स फिल्म्सशी टाय-अप केलेलं आहे. अल्ट बालाजीचं बजेट अर्धा अब्ज असून त्यांनी वैष्णवी मीडिया वर्क्‍ससोबत टाय-अप केलंय. इरॉस नॉऊचं बजेट चार अब्ज असून त्यांनी संजय लीला भन्साळी, रोहन सिप्पी, अनिल कपूर फिल्म कंपनी यांच्यासोबत टाय-अप केलंय. वुटचं बजेट चार अब्ज असून त्यांनी टर्नर इंडिया, कोलोस्कीअम मीडिया यांच्याशी टायअप केलं आहे. तर सोनी लिव्हचं बजेट चार अब्ज असून त्यांनी विक्रम भट यांच्याशी टाय अप केलं आहे. थोडक्यात काय तर, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांचंच बजेट मोठं असून त्यांनी टाय-अप केलं आहे. टाय-अप केलेल्या कंपन्यांसुद्धा नावाजलेल्या आणि मोठय़ा आहेत. यावरूनच हा ओटीटीचा विस्तार किती वेगाने आणि कसा होणार आहे याचा अंदाज येतो.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 3:33 pm

Web Title: lokprabha 2017 diwali special issue web series trend
Next Stories
1 लोकप्रभा दिवाळी २०१७ : नायकवजा काळाची दास्तान
2 लोकप्रभा दिवाळी २०१७ : नाझींना मूर्ख बनवणारा ‘सिल्व्हर’
3 लोकप्रभा दिवाळी २०१७ : दुष्काळाने दाखवले सोन्याचे दिवस
Just Now!
X